मराठवाडा पाऊस : 'नोकरी सोडून शेतीकडे वळालो, सगळी 11 पिकं पावसामुळे वाहून गेली'

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या आगाठाण गावात जाताना जी काही शेतं दिसत होती, त्यात गुडघाभर पाणी साचलेलं होतं.
कापूस, सोयाबीन, आलं, मका, टोमॅटो... सगळी पीकं पाण्यात पाहून काढणीला आलेला हा माल असा वाया गेल्याचं दिसत होतं.
ज्या शेतमालाच्या भरवशावर शेतकरी आपल्या मुला-मुलींचं शिक्षण, त्यांची लग्न किंवा कर्ज फेडण्याचा विचार करत होते, त्या पिकांची शेतातच नासाडी झाली आहे.
ही नासाडी पाहून परवा माझ्या वडिलांचा फोनवर बोलताना बारीक झालेला आवाज आठवत होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पावसाविषयी मी जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, "खूप पाऊस झाला, आपल्या उसाचं आणि सोयाबिनीचं काही खरं दिसत नाही."
जेव्हा ते हे सांगत होते, तेव्हा त्यांचा आवाज खोल गेला होता.
आगाठाण गावात पोहोचताना आसपासच्या शेतातली परिस्थिती पाहता पाहता हा विचार मनात येत होता.
काही वेळात मी आगाठाण गावात पोहोचलो.
तिथं 15 ते 20 शेतकरी एकत्र दिसले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते आपआपसात चर्चा करत होते.
आमचं रामराम वगैरे करून झाल्यानंतर शेतकरी जालिंदर औताडे बोलायला लागले.
"मी माझ्या आयुष्यात गेल्या 50 वर्षांत एवढा पाऊस कधी पाहिला नाही. खूप म्हणजे खूप पाऊस झाला. 3 ते 4 दिवस रपरप पाऊस सुरू होता. थांबायचं नावच घेत नव्हता. आमची सोयाबीन आणि कापूस सगळं पीक वाया गेलं. सोयाबीनच्या शेंग्यांना कोंब आलेत. कापूस, सोयाबीन, मका गेला, पूर्ण नुकसान झाल. कापसाची बोंडं काळी पडली. मका आडवी पडली, सोयाबीनच्या शेंगांना कोंब आले."

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC
जालिंदर यांचं पावसामुळे जवळपास 5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 10 एकर शेती असलेल्या जालिंदर यांच्या कपाशीच्या शेतात आजही पाणी साचलेलं आहे.
गावात शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असताना एक जण म्हणाले, "एक एकर टमाटरमागे आमचं 1 लाखाचं नुकसान झालं."
त्यामुळे मग टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही शेतकरी अण्णासाहेब औताडे यांच्या शेतात पोहोचलो.
साडेतीन एकर शेतीत ते टोमॅटो, कापूस, सोयाबीनचं पीक घेतात.
"शेतात दहा-पंधरापूर्वी टमाटरचं पीक एकदम भारी होतं. मागे 3 रुपये किलोनं विकावा लागला. आता 20 ते 25 रुपये भाव आले, तर पावसानं टमाटरची परिस्थिती अशी केलीय.
बी आणलं, रोपं आणले, लागवडी आणि खताचा खर्च. त्यानंतर मजुरीचा खर्च. तारीचे भाव होते 120 रुपये किलो, बांबू 40 रुपयाला एक नग मिळाला. सुतळी 120 रुपये किलो होती. 20 गुंठ्यांत टमाटर लावला. यासाठी 1 लाख रुपये खर्च आला."

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC
अण्णासाहेब यांच्या टोमॅटोच्या शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे टोमॅटोमध्ये अळ्या पडल्या आहेत.
सरकारनं हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी, असं त्यांची मागणी आहे.
गणेश कराळे सध्या नाशिकमध्ये इंजीनियरिंगचं शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे तो गेल्या वर्षी गावी आला आणि शिक्षणासोबत घरच्यांना शेतीत मदत करायला लागला.
मी सुशिक्षित आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तो माझ्यापाशी आला आणि बोलायला लागला,
"2019 पासून माझं शिक्षण व्याजानं पैसे घेऊन झालं. आता मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. कॉलेजवाल्यांचे दररोज फोन येत आहेत की पैसे भरा. पण, हे असं नुकसान झालं तर पैसे भरणार कुठून? कसं अडमिशन घेणार? शेतीत एकरी 70 हजार घातले. 5 ते 6 एकरसाठी तुम्हीच बघा किती खर्च केला असेल तर. सरकार मदत तर कधी करणार आम्हाला. आम्ही आत्महत्या केल्यावर सरकार येणार आहे का आमच्याकडे? तोवर काही सरकार जागी होत नाही."

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारनं फीमध्ये 50 टक्के सवलत द्यावी आणि जेवढं नुकसान झालं तेवढं भरून द्यावं, अशी अपेक्षा गणेश व्यक्त करतो.
आगाठाण गावच्या शेतकऱ्यांशी बोलताना एक मुद्दा प्रकर्षानं जाणवलो तो म्हणजे पीक विमा.
गेली दोन वर्षं गावातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा न मिळाल्याचं इथले शेतकरी सांगतात.
पण, मग तरीही तुम्ही विम्याचा हप्ता का भरता, असं विचारल्यावर ते म्हणतात, सर अपेक्षा असते शेतकऱ्याला. यावेळेस नाही तर निदान पुढच्या वेळेस तरी विमा मिळेल म्हणू आम्ही हप्ता भरतो.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
हरिभाऊ बडोघे यांच्या शेतात मोसंबीची बाग आहे. पावसामुळे त्यांच्या बागेचं नुकसान झालं आहे.
ते सांगतात, "मोसंबीला दोन बार येतात. याला अंबिया बहार आणि मृग बहार येतो. 8 लाख रुपये कर्ज घेऊन बाग उभारली आहे. आम्हाला कोणत्याच हंगामात विमा मिळालेला नाही. आता तर बागेत पाणी साचलंय. आता हे कर्ज कुठून भरणार. बँकेवाले म्हणतात पैसे भरा, कुठून भरणार आम्ही ऐकत होतो विदर्भात शेतकरी आत्महत्या होतात, आज आमच्यावर वेळ आली तर त्या का होतात, हे समजलं."
तलाठी साहेबांना पंचनाम्यासाठी बोलावलं तर ते म्हणतात वरून ऑर्डर नाही, मग काय करायचं आम्ही? ते पुढे सांगतात.
यामुळेच या शेतकऱ्यांची सरसकट भरपाईची मागणी आहे.
हरिभाऊ सांगतात, "पंचनामे कागदोपत्री होतात. 2 ते 5 हजार रुपये प्रती हेक्टर भेटतात. इतक्यात तर शेतकऱ्याची मजुरीसुद्धा फिटत नाही."
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा घेतला आहे.
महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तर, "महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषि अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामे सुरू करावेत. एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, यापद्धतीनं कार्यवाही करावी. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीचं धोरण ठरवलं जाईल," असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
याच गावातील कल्याण औताडे हा तरुण तासिका तत्वावर शिक्षक म्हणून काम करायचा. पण, कोरोना काळात तो नोकरी सोडून शेतीकडे वळाला.
त्याच्याकडे 35 एकर शेती आहे आणि त्यात 11 पिके घेतली आहेत. ही सगळीच्या सगळी पिके आज पाण्यात आहेत.
तो सांगतो, "माझं संपूर्ण पीक नासलेलं आहे, कुजलेलं आहे, सडलेलं आहे. माझं प्रमुख पीक कापूस आहे. 35 पैकी 21 एकरात कापूस लावलेला आहे. 21 एकर कापसाला एकही कैरी नाही, पाती नाही. पावणेचार एकर टमाट्यात पावणेचार लाख खर्च झाला, पण हातात पावणे चार रुपयेही आले नाही."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
आगाठाण हे गाव शिवना नदीला लागून आहे.
पावसामुळे नदीचं पाणी गावात शिरलं आणि त्यामुळे जनावरं वाहून गेली. बकऱ्या, बैल वाहून गेले. तर काही जणांचं शेततळं फुटलंय.
अतिवृष्टीमुळे इथल्या शेतकऱ्यांच्या भावना या शेती आणि सरकार या दोघांविषयीही एकदम आक्रमक असल्याचं दिसून आलं.
ना मीडिया, ना प्रशासन, ना सरकार कुणीही आमची परिस्थिती पाहायला येत नाही, मग आत्महत्येशिवाय करायचं का, असा प्रश्न हे शेतकरी विचारतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








