आर्थिक नियोजन : नवी नोकरी लागल्यावर सर्वांत आधी या 3 गोष्टी सुरू करा...

मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

जागतिकीकरणामुळे, गेल्या तीन दशकांमध्ये आपल्या देशात अनेक बदल घडून आले आहेत. आपण जरा नीट न्याहाळलं तर सध्याची पिढी आणि या आधीची पिढी यांच्या दैनंदिन आयुष्यातील फरक आपल्याला सहज दिसून येऊ शकतील.

याआधीची पिढी आपल्या निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम काढून घर घेत असे आणि त्यानंतर एक चिंतामुक्त आयुष्य जगत असे. पण सध्याच्या पिढीला पन्नाशीच्या आतच निवृत्त व्हायचं आहे आणि जगभ्रमंती करायची आहे. या दोन पिढ्यांच्या विचारसरणीमध्ये अजिबात साम्य नाही.

सध्याच्या परिस्थितीत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि वैद्यकीय खर्च यात प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे आर्थिक स्वावलंबनाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळे करिअर नियोजनाप्रमाणेच आर्थिक नियोजनही तितकंच आवश्यक आहे.

आर्थिक नियोजनच्या बाबतीत खालील तीन प्रकारे विभागणी करता येऊ शकते

  • जीवन विमा (टर्म पॉलिसी)
  • आरोग्य विमा (मेडिकल पॉलिसी)
  • गुंतवणूक
आर्थिक नियोजन, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

जीवन विमा

टर्म पॉलिसी हा गेल्या दहा-पंधरा वर्षातील एक क्रांतिकारी बदल आहे. 2005मध्ये टर्म पॉलिसी घेणे ही अत्यंत कठीण प्रक्रिया होती.

पण आता 2-3 कार्यालयीन दिवसांमध्ये टर्म पॉलिसी मिळून जाते. सुरुवातीला अशा प्रकारची पॉलिसी केवळ कर्मचाऱ्यांनाच देण्यात येत होती. पण आता काही कंपन्या ही सुविधा कर्मचाऱ्याच्या जोडीदारालाही देऊ करतात.

या पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, जर कर्मचाऱ्याच्या बाबतीत काही अनुचित घटना घडली तर त्याच्या/तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी.

टर्म पॉलिसीमुळे, कठीण परिस्थितीत कुटुंबाला आपल्या राहणीमानाच्या दर्जाबाबत तडजोड न करता कठीण परिस्थिती हाताळता येते. जो कोणी नोकरीची सुरुवात करतो, त्याने लगेच टर्म पॉलिसी घेणं आवश्यक आहे.

याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांचं वय तीसच्या आत आहे, त्यांच्यासाठी टर्म पॉलिसीचा प्रीमिअम खूप कमी असतो. त्याचप्रमाणे 40 वर्षांनंतर टर्म पॉलिसी मिळविणं खूप कठीण असतं. टर्म पॉलिसीची रक्कम किती असावी, यासाठी अनेक घटक आहेत. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार पॉलिसी घ्यावी.

आरोग्य विमा

केवळ महानगरातच नव्हे तर छोट्या शहरांमध्येही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. छोट्या शहरांमध्ये दर्जेदार उपचार शक्य असले तरी रुग्णांना येणारा उपचारांचा खर्च प्रचंड असतो.

आर्थिक नियोजन, घर

फोटो स्रोत, Getty Images

प्रसूतीपासून ते लहान मुलांच्या उपचारांपर्यंत आणि रुट कॅनलसारख्या उपचारांसाठी येणारा खर्च खूप असतो. एखाद्यावर फार ओझे न येता वैद्यकीय खर्चापासून त्यांचे संरक्षण करणे हे आरोग्य विम्याचं उद्दिष्ट असतं.

टर्म पॉलिसीप्रमाणेच, तुम्ही तरुण वयात आरोग्य विमा घेतला तर पॉलिसीचा प्रीमियम कमी असतो.

जोडीदार आणि मुलांसाठी नवी पॉलिसी घेण्याऐवजी त्यांना विद्यमान पॉलिसीमध्ये ॲड करणं स्वस्त पडतं.

गुंतवणूक

भविष्यातील गरजांचा विचार करून गुंतवणूक करणं आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आपण धान्यसुद्धा कोठारात साठवून ठेवतो आणि आवश्यकता असेल तेव्हा वापरतो.

त्याचप्रमाणे आर्थिक स्वावलंबनासाठीही गुंतवणूक करणं आवश्यक असतं. मासिक वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक मार्ग आहेत आणि त्यापैकी काही महत्त्वाचे मार्ग खालीलप्रमाणे :

भविष्यनिर्वाह निधी

दर महिन्याला रोजगार देणाऱ्याच्या योगदानासह भविष्यनिर्वाह निधी जमा करण्यात येतो. कर्मचाऱ्याच्या दीर्घकालीन गरजांसाठी तो अत्यंत उपयुक्त असतो. नव्या नियमानुसार भविष्यनिर्वाह निधीमधील वार्षिक योगदान अडीच लाखांवर गेलं तर त्यावर कर भरावा लागतो.

आर्थिक नियोजन, बँक

फोटो स्रोत, Getty Images

हे नवीन नियम लक्षात घेऊनही भविष्यनिर्वाह निधी ही कर्मचाऱ्यांसाठी एक उत्तम संधी असते. तो खात्यामध्ये आपोआप जमा होत असतो. कारण यात कर्मचाऱ्याला वेगळं काहीच करायचं नसतं. त्यामुळे वेगळी गुंतवणूक करावी लागत नाही.

या मार्गे जमा होणारा निधी विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरता येऊ शकतो. दीर्घकालीन आवश्यकता आणि तातडीच्या वेळी भविष्यनिर्वाह निधी ही 'लाइफ लाइन' आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सध्या भविष्यनिर्वाह निधीवरील व्याज हे साधारण 8.5% आहे. पण भविष्यात ते 8 टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी शक्यता आहे.

फिक्स्ड डिपॉझिट (मुदत ठेव योजना)

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये बँकेत आपले पैसे ठरावीक मुदतीसाठी ठेवण्यात येतात. पूर्वी याच गुंतवणूक पर्यायाला सर्वाधिक लोकप्रियता लाभली होती.

हा मार्ग पुढील कारणांमुळे फार उपयुक्त नाही. बँकेचा व्याजदर खूप कमी असतो, व्याजावर कर भरावा लागतो, जमा रक्कम मुदतीआधी काढून घेतली तर दंड आकारला जातो.

आर्थिक नियोजन, स्टॉक

फोटो स्रोत, Getty Images

पण आपल्याला ठरावीक मुदतीनंतर ठरावी रक्कम हवी असते, तेव्हा हा पर्याय चांगला ठरतो.

शेअर बाजार

शेअर बाजारात म्युच्युअल फंड्स, शेअर, फ्युचर्स आणि ऑप्शन्स इत्यादी विविध प्रकारचे गुंतवणूक प्लॅन असतात. पण अशा गुंतवणुकींवर कर द्यावा लागू शकतो पूर्वअटीमुळे ज्यांना अशी गुंतवणूक सुयोग्य वाटते त्यांनीच या प्रकारात गुंतवणूक करावी.

पण प्रत्येक गुंतवणूक योजना ही स्वतंत्र आहे. शेअर बाजारातील घोटाळे, बाजारात घसरण इत्यादी गोष्टी आपल्या कानावर येत असल्या तरी अनेक जण शेअर बाजारात शिस्तबद्ध गुंतवणूक करतात आणि त्यांची आर्थिक ध्येयं साध्य करतात.

रिअल इस्टेट

पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. लोकसंख्या कितीही वाढली तरी जमीन तेवढीच राहणार आहे. या गृहितकावर रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू आहे.

रियल इस्टेट

पूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रात अनेकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे आणि नफा कमवला आहे. पण गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात फार वाढ झालेली नाही. या व्यतिरिक्त कोव्हिडचाही या क्षेत्रावर प्रभाव राहिला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)