काँग्रेस अध्यक्षपद निवडणूकः आता लढाई थरुर आणि खर्गे यांच्यात

2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.

त्यानंतर आज एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गांधी परिवारातील कोणताही सदस्य सहभागी होणार नाहीये.

दरम्यान आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

दरम्यान काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरुर, राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि झारखंड काँग्रेसचे के एन त्रिपाठी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर असल्यामुळे ही निवडणूक आणखी रंजक होणार असल्याचं सध्या तरी दिसत आहे.

अशोक गेहलोत रिंगणाबाहेर...

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा असल्याचं चित्र सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत होतं.

त्यानंतर पुढचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून गेहलोत यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. मात्र गेहलोतांचा जीव मुख्यमंत्रीपदात अडकल्याचं दिसून आलं.

गेहलोत अध्यक्ष झाले तर सचिन पायलट हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होतील असा अंदाज बांधला जाऊ लागला.

मात्र पायलट यांच्या नावाच्या चर्चेने सगळं राजकारणचं ढवळून निघालं. त्यांच्या नावाला प्रचंड विरोध सुरू झालाय.

गेहलोत यांच्या समर्थकांनी सचिन पायलट यांच्या नावाला उघडपणे विरोध केला. गेहलोत यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे सादर केले.

शेवटी राजस्थानातील आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर गेहलोत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेऊन या निवडणुकीतून माघार घेतली.

राजस्थानातील आमदारांच्या बंडाची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत त्यांनी सोनिया गांधींची माफी देखील मागितली.

दिग्विजय सिंह यांनी घेतली माघार...

दरम्यान अध्यक्षपदासाठी होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खर्गे यांचं नाव जाहीर होताच अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत असणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.

दिग्विजय सिंह यांनी यावेळी माध्यामांशी बोलताना सांगितलं की, "खर्गे हे माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि त्यांना सांगितले की त्यांनी जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. ते म्हणाले होते की ते अर्ज दाखल करणार नाहीयेत. नंतर माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर मला समजलं की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत."दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, "मी त्यांना सांगितलं आहे की ते माझे वरिष्ठ आहेत. मी त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही."

त्यामुळे अध्यक्षपदाची लढत मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर अशीच होणार... शशी थरुर यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

ते म्हणाले, "माझं काँग्रेससाठी एक ध्येय आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या शर्यतीत सहभागी होता तेव्हा निकाल काय येईल हे आपल्याला माहित नसतं. मात्र निकाल काहीही असो तुम्ही आत्मविश्वासाने ही लढत लढता. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज होण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे."

त्यामुळे सध्यातरी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)