You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे-अमित शाहांची फोनवरून चर्चा, तर्क-वितर्कांना उत #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) अमित शाहांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे दिल्लीत, चर्चांना उधाण
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क केल्याच्या वृत्ताला खासदार रक्षा खडसेंनीच दुजोरा दिलाय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलय.
काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेतून म्हटलं होतं की, एकनाथ खडसेंनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली.
त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.
अखेर भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं की, एकनाथ खडसेंची दिल्लीत अमित शाहांची भेट झाली नाही, मात्र फोनवरून चर्चा झाली.
आता एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या फोनवरील चर्चेत नेमकं काय झालं, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे आणि त्याचीच चर्चा आता जळगावसह महाराष्ट्रभर सुरू झालीय.
2) मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा संप मागे, 1 ऑक्टोबरपासून भाडेवाढ
सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी चालक 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतनंतर हा संप तत्वत: मागे घेत असल्याचं मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने स्पष्ट केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालक 15 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. पण 13 सप्टेंबर रोजी उदय सामंत यांची मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसमवेत बैठक झाली आणि संप मागे घेतला.
मात्र, बैठकीत शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा 26 सप्टेंबरपासून हा बेमुदत संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं.
त्याच पार्श्वभूमीवर काल (23 सप्टेंबर) उदय सामंत यांची मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसह बैठक पार पडली. या बैठकीत संप तत्वत: मागे घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुढील आठवड्यात एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय होईल. त्यानंतर टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये तर रिक्षाच्या भाड्यात दोन रुपये वाढ केली जाईल.
एक ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ लागू करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे.
3) जनआकोश यात्रा म्हणजे आदित्य ठाकरेंची पायावर कुऱ्हाड - चंद्रकांत पाटील
"शक्ती वापरण्यासाठी नव्हे तर भीती दाखवण्यासाठी निर्माण करायची असते. जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतायत," असे टीकास्त्र भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय
महाराष्ट्रात येणारा महत्वपूर्ण फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे हे राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत.
यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
"आदित्य ठाकरे जसजसे जनआक्रोश यात्रेच्या निमित्ताने बाहेर पडतील तसं वेदांत प्रकल्प कोणामुळे महाराष्ट्रच्या बाहेर गेला हे सर्वांना समजेल," असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
4) 8 ओव्हरच्या लढतीत भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
नागपूर इथे झालेल्या पावसामुळे 20 ऐवजी प्रत्येकी आठ ओव्हरच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय मिळवला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाने 8 ओव्हर्समध्ये 90 धावांची मजल मारली. मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी केली. आरोन फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या. भारतातर्फे अक्षर पटेलने 13 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार रोहित शर्माच्या 46 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला. रोहितने 4 चौकार आणि 4 षटकारांच्या साह्याने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची खेळी केली.
दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करत त्याला चांगली साथ दिली. रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी झाली आहे. तिसरा सामना हैदराबाद इथे रविवारी होणार आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
5) 'नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला'
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्यासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात ते बोलत होते. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
अमित शाह म्हणाले, "केवळ पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा असल्यानं काँग्रेसविरोधी राजकारणातून पुढे आलेल्या नितीश कुमार यांनी राजद आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, त्यासाठी त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला."
नितीश कुमार यांना कुठलीही राजकीय विचारधारा नसल्याचंही अमित शाह म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)