मारुती सुझुकीने 'टोयोटा इनोव्हा हायक्रॉस'सारखीच 'इन्व्हिक्टो' लाँच केली कारण...

मारुती सुझुकी, टोयोटा

फोटो स्रोत, Maruti Suzuki

फोटो कॅप्शन, मारुती सुझुकीची नवी गाडी
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी

मारुती सुझुकीने त्यांची नवीन गाडी इन्व्हिक्टो हायब्रिड लाँच केली आहे. तिची किंमत 24.79 लाखांपासून सुरू होते.

ही गाडी मारुती सुझुकीने लाँच केली असली, तरीही अशीच गाडी आधीपासून टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या रूपात उपलब्ध आहे. असं का?

तुम्हाला माहिती असेलच की मारुती सुझुकीची बलेनो ही प्रिमियम हॅचबॅक गाडी टोयोटा ग्लांझा या नावाने विकली जाते आणि ब्रेझा नावाची कॉम्पॅक्ट SUV टोयोटा अर्बन क्रूझर नावाने बाजारात आपला लोगो सगळीकडे चिकटवून विकतं.

याशिवाय गेल्या वर्षी आलेली मारुती सुझुकीची ग्रँड विटारा ही हायब्रिड तंत्रज्ञान असलेली नवीन SUV टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ही कंपनी अर्बन क्रूझर हायराइडर या मॉडेलरूपात विकते. या गाडीची जोरदार चर्चा झाली, कारण यामुळे एक लीटर पेट्रोलवर तुम्ही 27 किमी प्रवास करू शकाल, असा कंपनीचा दावा आहे.

खरंतर टोयोटा आणि सुझुकी जगातल्या अग्रगण्य कार उत्पादक कंपन्यांपैकी एक, आणि जपानसह जगभरात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी. मग या दोन्ही कंपन्या भारतात एकसारख्याच गाड्या का विकतात?

याला एक शब्द आहे - बॅज इंजिनिअरिंग किंवा रिबॅजिंग (Badge Engineering or Rebadging).

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या का विकतात?

बॅज इंजिनिअरिंग

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्या एका कंपनीची गाडी त्या कंपनीशी तसा करार करून, आपल्या कंपनीचा लोगो लावून विकायचा. असं कुणी का करेल बुवा?

यामागे अनेक आर्थिक आणि तांत्रिक कारणं असतात. आधी पाहू या मारुती सुझुकी आणि टोयोटा असं का करतात.

2017 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी एक करार केला, त्यानुसार मारुती सुझुकी टोयोटाकडे असलेल्या 'स्ट्राँग हायब्रिड' तंत्रज्ञानाचा वापर आपल्या भारतातील गाड्यांमध्ये करेल आणि टोयोटा मारुती सुझुकीच्या भारतातल्या कॉम्पॅक्ट आणि सर्वमान्य अशा लहान गाड्या आपल्या शोरूममधून, आपल्या लोगोसह बाजारात आणेल.

याचा फायदा खरंतर दोन्ही कंपन्यांना होऊ शकतो. कसा?

1. तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर

सध्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांवरचा भर वाढताना दिसतोय. सर्वच कंपन्या आपापलं तंत्रज्ञान बाजारात लवकरात लवकर आणण्यावर भर देत आहेत. त्यामुळे टोयोटा मोटर कॉर्पोरेशनसारखी कंपनी, जिच्याकडे अनेक वर्षांपासून जपानी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड तंत्रज्ञान आहे, त्याच तंत्रज्ञानावर आपली इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनं विकसित करून आपण भारतीय बाजारात नवीन वाहनं आणू शकतो, असा मारुती सुझुकी आणि टोयाटा-किर्लोस्कर यांचा मानस आहे.

आतली सजावट किंवा इतर साधनं थोडीफार बदलू शकतात.

फोटो स्रोत, VW and Skoda

फोटो कॅप्शन, श्कोडा स्लाव्हिया आणि फोक्सवॅगन व्हर्चुअस यांना जुळ्या कार म्हणता येतील. आतली सजावट किंवा इतर साधनं थोडीफार बदलू शकतात.

टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांनी वाहनांच्या विद्युतीकरणाच्या दिशेने आधीच जोमाने पावलं टाकल्याने आता मारुती सुझुकी आणि टोयोटालासुद्धा या क्षेत्रात मागे राहणं परवडणार नाही.

2. एकच कारखाना, कमी खर्च

आजही भारतीय चारचाकी वाहन उद्योगावर मारुती सुझुकीचीच पकड आहे. मार्केट अर्ध्याअधिक गाड्या याच कंपनीच्या असतात, शिवाय मारुती सुझुकीचे भारतात तीन उत्पादन कारखाने आहेत - दोन हरियाणाच्या गुरुग्राम आणि मानेसरमध्ये आणि तिसरा एक गुजरातच्या साणंदमध्ये. तिथे ऑल्टो, स्विफ्टपासून ते अगदी ब्रेझा आणि अर्टिगासारख्या गाड्यांची निर्मिती होते.

याच असेंब्ली लाईनवर त्यांच्याच तंत्रज्ञानावर आधारित वाहनांची निर्मिती होते. म्हणजे गाडीची बॉडी, इंजिन, गेअरबॉक्स, सीट वगैरे तीच असतात. आतली सजावट किंवा इतर साधनं थोडीफार बदलू शकतात.

म्हणजे तेच तंत्रज्ञान वापरून दोन वेगवेगळ्या कंपन्यांची दोन वेगवेगळी मॉडेल्स बाजारात येतात, ज्यामुळे संशोधनाचा आणि नवीन कारखाना किंवा असेंब्ली लाईन टाकण्याचा खर्च कमी होतो. गुजरातच्याच या प्लांटमधून मारुतीच्या बलेनोसह टोयोटाची ग्लांझा आणि ब्रेझासह अर्बन क्रूझर परदेशी निर्यातसुद्धा होते.

एकाच असे

फोटो स्रोत, Getty Images

3. डीलर आणि सर्व्हिस सेंटरसाठी

टोयोटा-किर्लोस्कर या कंपनीचा भारतातील व्यापार मुख्यत्वे दोन मॉडेल्सपुरता मर्यादित आहे - इनोव्हा आणि फॉर्च्युनर. या दोन्ही गाड्या महिन्याला साधारण 6 हजार आणि अडीच हजार अनुक्रमे, इतकी विक्री होते. त्यांची इतरही काही मॉडेल्स आहेत, पण प्रामुख्याने नफा याच दोन मॉडेल्समधून होतो.

प्रत्येक गाडीमागचा शोरूम डीलरला आणि सर्व्हिस सेंटर चालवणाऱ्यांना नफा व्हावा, या हेतूने अधिक गाड्या विकणं आवश्यक आहे. त्यामुळेच ग्लांझा आणि अर्बन क्रूझरसारखी मॉडेल्स टोयोटाच्या शोरूममध्ये पाहायला मिळतात.

दर महिन्याला किमान या मॉडेल्सच्या प्रत्येकी तीन-साडेतीन हजार गाड्या विकल्या जातात, म्हणजे टोयोटाकडे तितके अतिरिक्त ग्राहक येतात, ज्यामुळे त्यांच्या डीलर्सना आणि सर्व्हिस सेंटरला नफा मिळतो.

शोरूम डीलर आणि सर्व्हिस सेंटर चालकांच्या नफ्यासाठी जास्त वाहनं विकली जाणंही आवश्यक आहे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शोरूम डीलर आणि सर्व्हिस सेंटर चालकांच्या नफ्यासाठी जास्त वाहनं विकली जाणंही आवश्यक आहे

4. ग्राहकांना पर्याय मिळतात

अनेक जणांना परदेशी ब्रँड्सचं आकर्षण असतं. मारुतीपेक्षा टोयोटा कधीही चांगली, असा अनेकांचा समज आहे. जर आपल्या बजेटमध्ये बसणारी एखादी गाडी मारुतीऐवजी टोयोटा रूपात मिळत असेल तर का नाही, असा विचार करत अनेकदा लोक टोयोटा घेतात. याचा फायदा अशा भागीदारींना होतो, शिवाय स्पर्धाही कमी होते.

5. टोयोटाचं यश-अपयश

टोयोटा स्वतःचे असेच मॉडेल्स आणू शकत नाही असं नाही. पण कंपनी असे प्रयोग करून फसली आहे. गेल्या सुमारे दशकभरात टोयोटाने इटियॉस, इटियॉस लिव्हा आणि यारिससारखे मॉडेल्स आणले खरे, पण त्यांना हवा तसा सारखा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय इटियॉसचं टॅक्सीत रूपांतर झाल्यामुळे कंपनीला ती सामान्य ग्राहकांना विकणं अवघड झालं - ज्यामुळेच तिच्या विक्रीचे आकडे खुंटले आणि अखेर ते मॉडेल बंद झालं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

एकमेका सहाय्य करू...

पण बॅज इंजिनिअरिंग, म्हणजे फक्त कंपनीचा ब्रँड लोगो आणि काही प्रमाणात डिझाईन बदलून एखादी गाडी दुसऱ्या रूपात विकण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या अनेक दशकांपासून आपल्याकडे हा प्रकार घडताना दिसतोय.

हिंदुस्तान अंबॅसेडर ही मुळात मॉरिस ऑक्सफर्ड होती

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, हिंदुस्तान अंबॅसेडर ही मुळात मॉरिस ऑक्सफर्ड होती

उदाहरणार्थ- भारतात विकली जाणारी हिंदुस्तान अँबेसेडर ही मुळात मॉरिस ऑक्सफर्ड या ब्रिटिश कंपनीच्या एका मॉडेलची भारतीय प्रत होती. भारतातल्या बिर्लांच्या हिंदुस्तान मोटर्सने तेच मॉडेल भारतात बनवण्याचे अधिकार मिळवल्यानंतर अंबॅसेडर भारतात बनू लागली. शिवाय फियाट कंपनीच्या 1100 ही गाडी वालचंद ग्रुप मुंबईत प्रिमियर पद्मिनी नावाने बनवू लागलं. या दोन्ही गाड्या आज तुम्हाला भारतभरात काली-पीली टॅक्सीच्या रूपात दिसून येतात.

अनेक परदेशी कंपन्यासुद्धा एकमेकांची अशीच कॉपी करून त्यांच्या गाड्या भारतात विकताना दिसतात. फोक्सवॅगन आणि स्कोडा (किंवा श्कोडा); निस्सान, रेनो (किंवा रेनॉ) आणि डॅटसन; ह्युंदाई आणि किया, या काही अशा कंपन्या आहेत, ज्यांच्या काही मॉडेल्समध्ये बरंच साम्य आढळतं, ते रिबॅजिंगमुळेच.

एक नजर टाकू या अशाच काही बॅज इंजिनिअरिंगच्या उदाहरणांवर....

  • ह्युंदाई क्रेटा - किया सेल्टॉस
  • ह्युंदाई व्हेन्यू - किया सॉनेट
  • ह्युंदाई एंडेव्हर - किया कारेन्स
  • निसान मॅग्नाईट - रेनो ट्रायबर
  • फोक्सवॅगन व्हर्ट्यूस - श्कोडा स्लाव्हिया
  • फोक्सवॅगन तायगुन - श्कोडा कुशाक
  • फोक्सवॅगन वेंटो - श्कोडा रॅपिड
  • निसान टेरानो - रेनो डस्टर
  • निसान मायक्रा - रेनो पल्स
  • निसान सनी - रेनो फ्लुएन्स
  • निसान किक्स - रेनो कॅप्टर
  • डॅटसन रेडी गो - रेनो क्विड

एवढंच नव्हे तर अनेक भारतीय मॉडेल्ससुद्धा जगभरात वेगवेगळ्या बॅजने वेगवेगळ्या नावांनी विकली जातात, जसं की मारुती सुझुकीची अर्टिगा ही सहा-आसनी कार दक्षिण आफ्रिकेत टोयोटा रुमियॉन म्हणून विकली जाते. अशी चर्चा आहे की ही गाडीसुद्धा लवकरच भारतात उपलब्ध होईल.

याशिवाय, एकेकाळी टाटा इंडिका ही गाडीसुद्धा काही काळ ब्रिटनमध्ये रोव्हर नावाच्या एका कंपनीने सिटीरोव्हर म्हणून विकली.

यातून कंपन्यांना किमी उत्पादन खर्चात एकापेक्षा जास्त ब्रँड्स अंतर्गत एकच माल विकता येतो. काही डिझाईनचे बदल केलेत, तर ग्राहकांनाही अनेक पर्याय उपलब्ध होतात, आणि कार उत्पादक कंपन्यांनाही एकदाचं संशोधन करून अनेक मॉडेल्स काढणं शक्य होतं.

हेही नक्की पाहा -

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)