एका मोटारसायकलवर 50 वर्षं नितांत प्रेम करणाऱ्या कुटुंबाची कथा

फोटो स्रोत, SRINIVASAN FAMILY
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
असं म्हणतात की आपल्या सच्च्या प्रेमाच्या शोधात माणसं अनेक वर्षं भटकतात. पण कोणत्याही धातूच्या गोष्टीच्या प्रेमात कोणी 50 वर्षं असेल अशी गोष्ट ऐकिवात आली नसणार.
ही प्रेमकथा थोडी हटके आहे आहे. या कथेत 75 वर्षांचे श्रीनिवासन आपलं 'प्रेम' शोधत राहिले. त्याचं प्रेम म्हणजे एक मोटरसायकल होती. जेव्हाही ते रस्त्यावर कोणतीही बुलेट किंवा रॉयल एनफिल्ड गाडी पाहायचे तेव्हा त्यांना आपलं प्रेम आठवायचं.
श्रीनिवासन यांनी बँकेकडून लोन घेऊन जवळपास 50 वर्षांपूर्वी एक मोटारसायकल खरेदी केली होती. 1990 च्या दशकात ती बाईक त्यांच्या एका मित्राच्या घरासमोरून चोरीला गेली.
बुलेटचा डुग-डुग आवाज जेव्हाही त्यांच्या कानी पडायचा तेव्हा त्यांच्या मनाला यातना व्हायच्या. त्यांचे डोळे आपल्या आवडत्या बाईकला शोधायला लागायचे. ते आपल्या मुलाला आपल्या बुलेटच्या गोष्टी सांगायचे.
ते सांगायचे की कशी त्यांची बुलेट मित्राच्या घरासमोरून चोरीला गेली. श्रीनिवासन यांनी खरं तर त्यांची बुलेट या मित्राला विकली होती.
एन श्रीनिवासन यांचा मुलगा अरुण श्रीनिवासन सांगतात, "जेव्हाही ही मी वडिलांसोबत बाहेर जायचो आणि समोर बुलेट दिसायची तेव्हा मी माझी गाडी स्लो करायचो म्हणजे यांना ती बुलेट दिसेल. बुलेटशी त्यांच्या भावना जोडलेल्या होत्या. ते मला नेहमी म्हणायचे की मी ती गाडी विकायला नको हवी."
गाडी विकली पण एका अटीवर
सीनियर श्रीनिवासन सांगतात, "माझी मंगळुरूहून लखनऊला बदली झाली होती. मी तिथे बाईक घेऊन जाऊ शकत नव्हतो. मी एका खाजगी बँकेत फिल्ड ऑफिसर होतो. बुलेट तेव्हा महागडी गाडी होती. तेव्हा मला ही गाडी 6400 रुपयांना मिळाली होती. मी यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं."

फोटो स्रोत, SRINIVASAN FAMILY
बदली झाल्यामुळे श्रीनिवासन यांनी आपली बाईक मित्राला विकली पण एका अटीवर की जर त्या मित्राने कधी ही गाडी विकली तर ते श्रीनिवासन यांनाच विकतील.
पण त्या मित्राच्या घरासमोरून ती बुलेट चोरीला गेली.
बाईक चोरीला गेल्यावर श्रीनिवासन यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली पण तिचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
ही गाडी हासन शहरातल्या एका पोलीस स्टेशन बाहेर तब्बल 10 वर्षं उभी होती. या गाडीवर कोणी दावा केला नव्हता. आता ही गाडी चोरी झाली होती, की अजून काय हे कोणालाच माहिती नाही. हासन शहरातल्या पोलीस स्टेशनात ही गाडी कशी पोचली याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.
नवी गाडी घ्या असे सल्ले
श्रीनिवासन आपल्या चोरीला गेलेलया बुलेटमुळे फारच दुःखी होते त्यामुळे त्यांचा मुलगा अरुण याने या गाडीचा शोध घेण्याचं ठरवलं.
अरुण म्हणतात, "मला पण जुन्या गाड्या आणि कार आवडतात. माझ्या वडिलांची एक जुनी कार आहे माझ्या काकांची एक कार तर 1960 ची आहे. आमच्या घरात सहा-सात वाहनं आहेत. आम्ही कोणतीच गाडी कधी विकली नाही. पण या बुलेटची जागा रिकामी होती."
अरुण पुढे सांगतात, "माझ्या वडिलांनी या गाडीचा वापर 25 वर्षं केला. मी आणि माझी बहिणी त्या बुलेटबरोबरच मोठे झालो. आमच्या कुटुंबाचं हे पहिलं वाहन होतं. वडिलांनी ही गाडी मित्राला विकली तेव्हा मी सहावीत होतो. ती बाईक आमच्या घरासमोर उभी आहे हे दृश्य माझ्या मनावर कोरलेलं आहे."
म्हणून 38 वर्षांचे अरुण त्यांचे वडील जिथे बँकेत काम करायचे त्या मणिपालमध्ये गेले. तिथल्या काही जुन्या गॅरेजमध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या गाडीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
अरुण म्हणतात, "मला वाटलं माझ्या भावना फक्त गॅरेजवाले समजू शकतात."
काही गॅरेजवाल्यांनी अरुणला काही उत्तर दिलं नाही आणि पळवून लावलं. तर काहींनी त्यांना सल्ला दिला की कशाला वेळ घालवता, नवीन गाडी घ्या.
पण अरुण आपल्या निर्धारावर ठाम होते. ते म्हणतात, "रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसात काही माहिती मिळत नव्हती. मी पोलीस स्टेशन्समध्ये जाऊनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण कोणाला काहीच माहिती नव्हतं. पण मग RTO विभाग संपूर्ण डिजीटल झाला आणि यामुळे मला माझी गाडी शोधायला मदत मिळाली."
अशी सापडली गाडी
2021 च्या सुरुवातीला अरुण यांना RTO च्या पोर्टलवरून कळलं की त्यांची गाडी क्रमांक MYH1731 वर एक विमा पॉलिसी घेतली गेली आहे. MYH म्हणजे त्या काळचं म्हैसूर राज्य.

फोटो स्रोत, SRINIVASAN FAMILY
अनेक महिने RTO च्या ऑफिसात चकरा मारल्यानंतर अरुण यांना कळलं की या रजिस्ट्रेशन नंबरची गाडी म्हैसूर जिल्ह्यातले एक शेतकरी टी नारासीपुरा यांच्याकडे आहे.
अरुण यांनी त्या शेतकऱ्याशी संपर्क साधला आणि आपल्या वडिलांना खुश करण्याची त्यांची इच्छा आणि त्यांचे प्रयत्न याबद्दल सांगितलं.
तेव्हा अरुण यांना कळलं की त्या शेतकऱ्याने ही गाडी एका वाहन डीलरकडून विकत घेतली होती. या डीलरने ती गाडी पोलिसांच्या लिलावात घेतली होती. ज्या गाड्यांवर कोणी दावा करत नाही त्या गाड्या काही वर्षांनंतर पोलिस लिलावात विकतात.
पोलिसांनी या शेतकऱ्याला एक प्रमाणपत्र दिलं होतं ज्यात लिहिलं होतं की हे वाहन चोरीचं आहे पण या प्रमाणपत्राच्या आधारावर तो याची नोंदणी आपल्या नावावर करू शकतो.
सुदैवाने गाडी विकत घेतलेल्या शेतकऱ्याने त्या गाडीची नव्याने नोंदणी केली नाही कारण त्यांना याची प्रक्रिया माहिती नव्हती. परिणामी गाडीचा नंबर बदलला नाही.
सुरुवातीला त्या शेतकऱ्याने ही गाडी विकायला नकार दिला. पण अनेक महिन्यांनी त्यांनी अरुण यांना फोन करून आपण ती गाडी विकायला तयार असल्याचं सांगितलं.
वाहन डीलरने ती गाडी पोलिसांकडून 1800 रुपयात घेतली होती आणि या शेतकऱ्याला ती 45 हजार रुपयांना विकली होती.
अरुण म्हणतात की या गाडीसाठी त्यांना एक लाख रुपयांहून जास्त पैसे द्यावे लागले कारण त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की ही गाडी दुरुस्त करायला त्यांनी बराच खर्च केला होता.
जेव्हा अरुण यांनी ती गाडी पुन्हा विकत घेतल्याची गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली तेव्हा ते भावनिक झाले. अरुण म्हणतात, "25 वर्षांनी आमची बुलेट सापडली ही खूप मोठी गोष्ट होती. मी माझ्या मित्रांसह ती गाडी चालवत घरी गेलो."
अरुण यांचे वडील म्हणतात की, "माझा विश्वासच बसला नाही की ही माझी गाडी आहे. मी याचा चेसी नंबर पाहिला, माझ्याकडे जुनं आरसी बुक होतं. ही गाडी घरी आणल्याबद्दल मी माझ्या मुलाचा आभारी आहे. असं वाटलं की आमचा हरवलेला घोडा परत आला."
"आम्ही बुलेटवर फिरायला ही गेलो. जास्त लांब गेलो नाही कारण अजून याची नोंदणी करणं बाकी आहे. बुलेटसाठी माझी उंची कमी पडते पण ही गाडी माझ्यासाठी आरामदायक आहे. यावरूनही स्पष्ट झालं की ही माझीच गाडी आहे."
म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. भले मग ते 50 वर्षं जुन्या मोटारसायकलवर का असेना.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








