Flex Fuel Engine म्हणजे काय? त्यामुळे पेट्रोल पंप नाहीसे होतील?

पेट्रोल, डिझेल दर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेट्रोल, डिझेल दर
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत असताना केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणालेत की देशातून पेट्रोल पंपच नाहिसे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. इंधनाच्या वाढत्या दरातून लोकांची सुटका होईल का? ज्या नवीन तंत्रज्ञानाचा गडकरी उल्लेख करत आहेत ते फ्लेक्स फ्युएल इंजिन काय आहे?

22 ऑक्टोबरला नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "मी सांगतो तुम्हाला, पुढची गाडी तुम्ही पेट्रोलच्या ऐवजी फ्लेक्स इंजिनची घ्या. ते म्हणजे १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल. यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल आणि प्रदूषणही कमी होईल."

तुमच्या गाडीचं इंजिन पेट्रोल किंवा डिझेलवर धावतं. पण सरकारने कार उत्पादकांना सांगितलंय की येणाऱ्या काळात असं इंजिन बनवा जे पेट्रोल किंवा डिझेल बरोबरच इथेनॉल किंवा बायो-डिझेलवरही धावू शकेल. यालाच फ्लेक्स फ्लुएल इंजिन म्हणतात. यातून काय काय साध्य होणार आहे आणि याचे काही तोटे असू शकतील का?

फ्लेक्स फ्युएल इंजिन नेमकं काय करेल?

तुमच्या गाडीच्या टाकीवर लिहीलेलं असतं त्यात पेट्रोल भरायचं की डिझेल. कारण तुमच्या गाडीचं जे इंजिन असतं ते त्या विशिष्ट इंधनासाठी बनवलेलं असतं. दुसऱ्यावर ते चालू शकणार नाही.

पण फ्लेक्स फ्लुएल इंजिन काय करणार आहे? समजा तुमची पेट्रोलची गाडी असेल तर हे इंजिन 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के इथेनॉलवर चालू शकेल. त्यासाठी तुम्हाला काही कुठे बटन दाबायला नको, गाडीत काय भरलंय ते इंजिनला कळेल आणि त्यानुसार ते काम करेल. डिझेलची गाडी असेल तर डिझेल आणि बायो-डिझेल यापैकी एकावर ते चालू शकेल.

फ्लेक्स फ्लुएल इंजिनचा संबंध दोन गोष्टींशी आहे. एक आहे केंद्र सरकारची 2018 साली आलेली बायो फ्युएल पॉलिसी म्हणजे जैव इंधन धोरण आणि दुसरं आहे भारताची कार्बन उत्सर्जन उद्दिष्टं.

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी आपला वाटा म्हणून भारताने काही उद्दिष्टं ठरवली आहेत. वाहनांवाटे होणारं उत्सर्जन कमी करणं हा त्यातला एक भाग झाला. त्यासाठीच आपण इलेक्ट्रिक वाहनांचा पुरस्कार करतोय तसंच बायोफ्युएलवर चालणाऱ्या गाड्यांनाही उत्तेजन दिलं जातंय.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari

येत्या 6 ते 8 महिन्यांत कार उत्पादकांनी प्लेक्स फ्युएलवर चालू शकणारी इंजिन आपल्या गाड्यांमध्ये बसवावी असं सरकार म्हणतंय. टोयोटा कंपनीकडे अशी इंजिन्स तयार असल्याचंही ते म्हणालेत. याचे काय फायदे तोटे असणारेत?

फ्लेक्स फ्युएल इंजिन : फायदे काय-तोटे काय?

सध्या पेट्रोलचा भाव 100 रुपयांच्यावर आहे. इथेनॉलचा भाव साधारण 65 रुपये प्रतिलीटर आहे. 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंग आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेलचं ब्लेंडिंग करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून काय काय होईल?

पैशाची बचत - भारत सध्या 8 लाख कोटी रुपयांचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयात करतो. पुढच्या काही वर्षांत हे 25 लाख कोटी रुपयांवर जाईल. हा खर्च कमी करण्यासाठी यात मदत होऊ शकेल.

प्रदूषण कमी - इथेनॉलची पेट्रोलशी तुलना केलीत तर त्यातून होणारं प्रदूषण कमी आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ इनर्जीच्या ऑल्टरनेटिव्ह फ्युएल्स डेटा सेंटरच्या म्हणण्यानुसार मक्यातून बनणाऱ्या इथेनॉलमुळे हरित गृह वायूंचं (Green House Gases) चं उत्सर्जन 34 टक्के कमी होतं.

तांत्रिकदृष्ट्या सोपं - ऑल्टरनेटिव्ह फ्युएल्स डेटा सेंटर म्हणतं की पेट्रोलवर चालणारं इंजिन अल्प प्रमाणात इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलचाही नीट वापर करू शकतं. इथेनॉलचं प्रमाण वाढवत जरी नेलं तरी इंजिनमध्ये काही मामुली बदल करून काम होऊ शकतं. त्यासाठी पूर्णपणे वेगळ्या रचनेची गरज असते असं नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पण अर्थात याच्यात काही अडचणीही आहेत.

ॲव्हरेजचं काय? - हा प्रश्न गाडीबद्दल बोलताना हमखास विचारला जातो. इथेनॉलवर आधारलेली इंधनं ही पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी ऊर्जा देतात. म्हणजे 1 किलोमीटर अंतरासाठी तुम्ही जितकं पेट्रोल किंवा डिझेल जाळात त्याच्या तुलनेत जास्त इथेनॉल तुम्हाला लागेल. इथेनॉलची किंमत कमी असली तरी जास्त इंधन भरून शेवटी तुमचं आर्थिक गणित तसंच राहणार आहे का हा प्रश्नही विचारला जातो.

उपलब्धता - आताच्या घडीला भारतात वाहतुकीसाठी जैवइंधनाची उपलब्धता आणि वापर हे दोन्हीही मर्यादित आहे. जसे पेट्रोल पंप आहेत तसे इथेनॉल पंप सर्रास दिसतात का? सरकारचं म्हणणं आहे की येत्या काळात ती उपलब्धता वाढवण्यावर त्यांचा भर आहे.

शेतीवर परिणाम - आता याला दोन बाजू आहेत. अधिकृत धोरणाप्रमाणे भारतात जैवइंधन निर्मितीसाठी पीक घ्यावं असं ठरलं नाहीय. अतिरिक्त पिकाचा वापर करावा किंवा पिकावर प्रक्रिया झाल्यानंतर बायप्रॉडक्टचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करावा असा साधारण प्रघात आहे. उदाहरणार्थ काकवी वापरून इथेनॉल बनवता येऊ शकतं.

अन्नसुरक्षा

फोटो स्रोत, Getty Images

पण जुलै 2021 मध्ये भारत सरकारने FCI च्या गोदामांमधला 78 हजार टन तांदुळ इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना देण्याचं ठरवलं. यावर भरपूर टीका झाली होती. कारण लांब पल्ल्यात इथेनॉल निर्मतीसाठी धान्याचा किंवा साखरेचा पुरवठा करणं हीच नीती होऊन जाईल आणि यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा किंवा महागाई वाढेल अशी एक भीती आहे.

पण शेतकऱ्यांना हे निर्णय घेण्यासाठी अधिकाधिक मुभा द्यावी असंही काहींची मागणी आहे. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब म्हणतात, "इथेनॉलसाठी लागवड आणि GM पिकांवरची बंदी दोन्ही उठवलं तर दोन्ही प्रश्न मिटतील. शेतकऱ्याला जिथे जास्त फायदा मिळेल तो पर्याय ते निवडतील. नाहीतर आज जे पेट्रोल पंप करतायत ते उद्या इथेनॉल पंप करतील."

अमेरिकेत इथेनॉल निर्मितीमागे मका उत्पादकांची मोठी लॉबी आहे. अमेरिकेत इथेनॉलचा वापर मोठा असला आणि त्याचे फायदे असले तरी अशाप्रकारे एक पीक एका इंधनाच्या उत्पादनाला बांधलं गेल्यामुळे अनेक समस्याही उभ्या राहिल्या आहेत.

रहदारी

फोटो स्रोत, Getty Images

2025 पर्यंत अधिक स्वच्छ उर्जेवर चालणारी म्हणजे उत्सर्जन कमीत कमी करणारी वाहनं भारतात वाढतील असी सरकारने घोषणा केलीय. यासाठी आपण सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र देणार होतो पण आता कार उत्पादकांना 6 ते 8 महिन्यांत फ्लेक्स फ्युएल इंजिन बनवण्याचं आपण सांगायचा विचार करतोय असं नितीन गडकरी म्हणालेत.

ईलेक्ट्रिक आणि फ्लेक्स फ्युएल इंधनावर चालणाऱ्या गाड्या वाढवून आपण आपली पर्यावरणीय उद्दिष्टांची गाडी रुळावर ठेवू शकू का हे आता पाहायचंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)