ऑल्टो K10: मारुती सुझुकीसाठी ही छोटी कार एवढी महत्त्वाची का आहे?

फोटो स्रोत, Maruti Suzuki
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
मारुती सुझुकीला खऱ्या अर्थाने रोजीरोटी पुरवणाऱ्या ऑल्टो K10 या छोट्या गाडीचं नव्या रूपात पुनरागमन झालं आहे. या गाडीचा जन्म कसा झाला, तिचा अस्त का झाला आणि मारुती सुझुकीने तिला परत का आणलंय?
संजय गांधी यांचं स्वप्न त्यांच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पूर्ण केलं. जपानच्या ओसामू सुझुकींना सोबत घेत, त्यांनी मारुती उद्योगाची सुरुवात केली. ते साल होतं 1983. भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कपही अगदी सहा महिन्यांपूर्वीच जिंकला होता, म्हणजे दुहेरी सुवर्णयोग.
दिल्लीच्या हरपाल सिंग यांना DIA 6479 नंबरच्या मारुती 800ची चावी देऊन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतीय उद्योग जगतात एक नवीन अध्याय सुरू केला. तेव्हा मोजक्याच गाड्यांची भारतात विक्री व्हायची - महिंद्रा अँड महिंद्राची कमांडर जीप, हिंदुस्तान मोटर्सची अंबॅसेडर, प्रिमियरची पद्मिनी (आपण फियाटही म्हणायचो), आणि काही परदेशातून थेट आयात होणाऱ्या मोठ्ठ्या गाड्या. पण प्रत्यक्षात मारुती 800ने जी क्रांती घडवली, ती अजरामर झाली.
याच 800ने आणखी एका कारच्या यशाची पायाभरणी करून ठेवली. ती म्हणजे ऑल्टो...
खुल्या बाजारपेठेतली आव्हानं
21व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता. महायुद्ध, फाळणी, अणूस्फोटासारख्या गेल्या शतकातल्या भयावह घटनांना मागे टाकत, जग Y2Kचा उंबरठा ओलांडून नवीन आशेने पुढे जात होतं.
भारतातलं राजकारणही जवळजवळ दोन दशकांच्या स्थित्यंतरानंतर आता जरा स्थिरावू लागलं होतं.
उदारीकरण आणि जागतिकीकरणाला एक दशक लोटत होतं. नवनवीन तंत्रज्ञान, कंप्युटर्स, व्हीडिओ गेम्स, मोबाईल फोन, परदेशी कंपन्यांच्या गाड्या बाजारात येऊ लागल्या होत्या.
अशात एक कंपनी सातत्याने भारताला आणि भारतीयांना गती देण्याचं काम करत होती - ती म्हणजे मारुती सुझुकी.

फोटो स्रोत, Maruti Suzuki
1993 साली मारुतीने 800चीच गुटगुटीत आणि दमदार आवृत्ती, अर्थात झेन (Zen) बाजारात आणून पुन्हा एकदा दणका उडवून दिला होता.
त्याशिवाय मारुती 1000 नावाची एक लीटर इंजिनवाली एक सेडानसुद्धा लोकांना भुरळ घालत होती. पुढे चालून याच गाडीला एस्टीम (Esteem) असं नाव पडलं.
इतकंच नव्हे तर हरिणायातल्या मारुती उद्योगच्या कारखान्यात बनलेली मारुती 800 आता युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये 'ऑल्टो' नावाने निर्यातही होऊ लागली होती.
म्हणजे काय तर 2000 सालापर्यंत मारुतीने जवळजवळ अख्खं कार मार्केट काबीज केलं होतं.
पण भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर 5-6 वर्षांतच अनेक परदेशी कंपन्या भारतात दाखल झाल्या - कोरियाच्या देवू आणि ह्युंदाई, जपानच्या होंडा आणि टोयोटा, अमेरिकेतल्या फोर्ड आणि जनरल मोटर्स. अमेरिकन गाड्या लांबच लांब, आकाराने मोठ्या होत्या. पण जपानी गाड्या या लहान आणि तितक्याच किफायतशीर असण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यामुळे सुझुकीला हे ठाऊक होतं की त्यांच्या जपानी प्रतिस्पर्धींच्या भात्यात कोणकोणते बाण असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
1998 साली ह्युंदाईने सँट्रोसह भारतात पाऊल ठेवलं. त्यापाठोपाठ देवूने मटीझ नावाची एक पिटुकली कार आणली. या दोन्ही गाड्या मारुतीला पहिलंच थेट आव्हान ठरणार होत्या - परदेशी ब्रँड, थोड्या अद्ययावत, नवीन डिझाईनमुळे जरा हटके दिसणाऱ्या. मटीझला देवूच्या कमकुवत डीलर नेटवर्कमुळे तितकं यश आलं नाही, पण सँट्रोने टॉप गेअर टाकला. तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला शाहरुख खान सँट्रोची जाहिरात करायचा.
या परदेशी हालचालींमुळे देशातल्या कंपन्याही सावध झाल्या. तोवर फक्त ट्रक आणि बस बनवणाऱ्या भारतातल्या दिग्गज टाटांनीही प्रवासी वाहन उद्योगात पाऊल टाकायचा निर्णय घेतला, आणि 1998-99 साली भारताची पहिली स्वदेशी कार 'इंडिका'चा जन्म झाला. या गाडीचं ब्रीदवाक्य 'More Car Per Car' एकप्रकारे मारुतीच्या छोट्या गाड्यांना टोमणा मारायचा प्रयत्न करत होतं. मोठं इंजिन आणि मोठा आकार, त्यामुळे ऐसपैस जागा, पण किंमत कमीच, याच्या जोरावर इंडिका सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरली.

फोटो स्रोत, Tata Motors
मारुतीला सहाजिकच काहीतरी पावलं उचलण्याची गरज होती. अखेर त्यांनी तोच यशस्वी फॉर्म्युला वापरला आणि मारुतीने 800च्याच धरतीवर 27 सप्टेंबर 2000 रोजी आणखी एक गाडी आणली. नाव होतं ऑल्टो. तेच 800 सीसीचं इंजिन, तोच आकार आणि तशीच बनावट, पण जरा जास्त आकर्षक, पावर स्टिअरिंगसह, पाचवा गेअर टाकता येईल अशी, आणि इतर काही आरामदायी फीचर्ससह. यामुळे इंडिका आणि सँट्रोच्या विरुद्ध मारुतीच्या चाहत्यांपुढे आता आणखी एक पर्याय उपलब्ध झाला होता. आणि लोकांनी तो स्वीकारलासुद्धा.
पहिल्या तीन वर्षांतच एक लाख ऑल्टो विकल्या गेल्या. काही वर्षांनी मारुतीने एक लीटर इंजिनसह ऑल्टो K10 आणली आणि तीसुद्धा प्रचंड यशस्वी ठरली. अधिक दमदार इंजिन काळाची गरज होती. इंडिका V2, i10, सँट्रो झिंग, शेवरोले स्पार्क, टाटा नॅनोसह अनेक गाड्या आता बाजारात स्पर्धेत उतरल्या होत्या. त्यामुळे मारुतीनेच पुढे चालून ऑल्टोच्याच कुटुंबातील, पण जरा आकाराने मोठी आणि प्रशस्त अशी वॅगन आर आणली. पण ऑल्टो K10 ही तरीसुद्धा महिन्याला 8 हजार विक्रीचा आकडा गाठत होतीच. गाव-खेड्यांमध्ये, पर्यटन स्थळी टूरिस्ट कॅब म्हणून आणि छोट्या कुटुंबाची पहिली कार म्हणून सर्वत्र ऑल्टो दिसू लागली होती.

फोटो स्रोत, ANI
लाँच झाल्यापासून सलग 16 वर्ष ऑल्टो मारुती सुझुकीचीच नव्हे तर देशातली सर्वांत जास्त विकली जाणारी कार ठरली. आणि आजवर 42 लाखांपेक्षा जास्त ऑल्टो भारतात विकल्या गेल्या आहेत. मारुती सुझुकीनुसार "यापैकी 76 टक्के ग्राहकांची ऑल्टो ही पहिली गाडी होती."
ऑल्टोचं भवितव्य अंधारात होतं?
पहिल्या ऑल्टोला लाँच होऊन आता 22 वर्षं लोटली आहेत. यादरम्यान बाजारपेठ अनाकलनीय पद्धतीने बदलली आहे - आजच्या गाड्या जास्त कार्यक्षम, जास्त सुरक्षित आणि जास्त आधुनिक आहेत. प्रदूषण आणि सुरक्षा आज कळीचे मुद्दे बनले आहेत.
2020मध्ये लागू झालेल्या ताज्या भारत स्टेज-6 या प्रदूषण नियमांचं पालन होत नसल्यामुळे मारुती सुझुकीने ऑल्टो K10चं उत्पादन बंद केलं होतं. नवीन इंजिन तयार होईस्तोवर यात आणखी काही तांत्रिक बदलही करण्यात आले, जेणेकरून ही गाडी अधिक कार्यक्षम आणि काळानुरूप अद्ययावत होईल. पण ऑल्टो परत येईल की नाही, हे अधांतरी असण्याचं आणखी एक कारण होतं...

फोटो स्रोत, Maruti Suzuki
2014 नंतर भारतात गाड्यांचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. तो ग्लोबल NCAP मुळे. NCAP म्हणजे New Car Assessment Programme - म्हणजे कुठलीही नवीन कार एखाद्या अपघाताप्रसंगी तिच्या प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहे, याचं मानांकन. जगभरात सध्या Global NCAP, EuroNCAP, ASEAN NCAP, Latin America NCAP अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत, ज्या त्यांच्या अख्त्यारीतील देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या गाड्यांची सुरक्षितता तपासून पाहत असतात. याच जागतिक सेफ्टी रेंटिग्सच्या धरतीवर भारतातही भारत NCAP आणणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली होती.
पण त्यापूर्वीच सर्व गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्स सक्तीने लावावीत, अशी त्यांची मागणी होती, ज्यावरून मारुती सुझुकीसह काही कार उत्पादक कंपन्या गोंधळात सापडल्या होत्या. कारण एअरबॅग्ज लावण्याचा खर्च सहाजिकच कारची किंमत वाढवेल. "याचा फटका गरीब लोकांना बसेल, जे महाग कार खरेदी करू शकत नाहीत," असं मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं होतं. त्यामुळे गाड्यांची मागणी कमी झाल्यास लहान गाड्यांचं उत्पादन कमी करावं लागेल, असंही भार्गव दुसऱ्या एका मुलाखतीत म्हणाले होते.
पण आता मारुती सुझुकीने ऑल्टो K10 परत आणत असल्याचं घोषणा केली आहेच. मात्र या गाडीत किमान दोन एअरबॅग्स असतील, अशी अपेक्षा आहे.
मारुतीसाठी ऑल्टो महत्त्वाची का?
ऑल्टोला मारुती सुझुकीची रोजीरोटी मानलं जातं. इतर कुठल्याही मॉडेलपेक्षा ऑल्टोचा खप आणि त्यातून होणारा नफा निश्चितच जास्त आहे. पण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारतात SUV (Sport Utility Vehicles)चा आलेला ट्रेंड पाहता, छोट्या हॅचबॅक गाड्यांची मागणी कमी झाल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्याचा मोठा परिणाम मारुती सुझुकीच्या बाजारपेठेतील वर्चस्वावरही झाला आहे.
नेहमी 50-55 टक्के बाजारपेठेवर कब्जा असलेल्या मारुती सुझुकीचा मार्केट शेअर 2021-22 मध्ये 43 टक्क्यांवर आला होता. याची दोन कारणं- कोरोना काळात मध्यम वर्गीयांचं कंबरडं मोडलं होतं, अनेकांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं. अशात अनेकांचं पहिली गाडी घेण्याचं स्वप्न बारगळलं. त्यामुळे मारुतीचे संभाव्य ग्राहक कमी झाले.

दुसरं कारण म्हणजे, याच दरम्यान टाटा मोटर्स, महिंद्रा आणि किया मोटर्ससारख्या कंपन्यांची दमदार कामगिरी. SUVच्या जोरावर या तिन्ही कंपन्यांनी आपापला मार्केट शेअर 4 ते 6 टक्क्यांनी वाढवलाय, ज्यामुळे मारुती सुझुकीला फटका बसला आहे.
त्यामुळे आता ऑल्टो K10चं पुनरागमन मारुती सुझुकीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मारुतीने गेल्या काही काळात ब्रेझा, बलेनोसारख्या गाड्यांचे फेसलिफ्ट आणले आहेत, पण त्यांना मोठे आकडे देणारी गाडी अर्थातच ऑल्टो आहे, ज्यावर सध्या कंपनीची भिस्त आहे.
साधारण वयाच्या 21-22व्या वर्षी एखादी व्यक्ती नोकरीला लागून कुटुंबाची जबाबदारी थोडी थोडी का होईना सांभाळू लागते, तशीच अपेक्षा मारुती सुझुकी कुटुंबाला आता ऑल्टो नावाच्या या लेकराकडून असावी.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









