मारुती सुझुकी: भारतातील सर्वोच्च कार निर्माता अधिकच्या एअरबॅग्जला विरोध का करत आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कारचा अपघात झाल्यानंतर एअरबॅग्ज या अनेक शतकांपासून चालक आणि प्रवाशांचा जीव वाचवत आहेत. सीटबेल्टनंतर एअरबॅग्ज या ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे टूल म्हणून ओळखले जाते.
मग भारतातील सर्वांत मोठी कार निर्माता कंपनी, कारमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य असण्याच्या निर्णयाला विरोध का करत आहे? जागतिक बँकेनुसार, जगात रस्त्यावर मृत्यू होणाऱ्या दर 10 पैकी किमान एक जण हा भारतातून असतो.
जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची बहुतांश मालकी असलेल्या मारूती सुझुकीने म्हटलंय की, अधिक एअरबॅग्ज बसवल्याने कारची किंमत वाढेल आणि यामुळे छोट्या कार बाजारपेठेला त्याचा फटका बसेल.
"याचा फटका बसेल, लहान आणि गरीब लोकांना जे महागड्या कार खरेदी करू शकत नाहीत," संस्थेचे अध्यक्ष आर.सी भार्गव यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
भारतीय गाड्यांमध्ये चालक आणि त्याच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशासाठी एअरबॅग्ज अनिवार्य आहेत. यात आणखी चार एअरबॅगची किंमत जोडल्यास ही किंमत अंदाजे 18-19 हजार रुपयांनी वाढेल वाढेल. हे अशा देशात जिथे केवळ 8 टक्के नागरिकांकडेच कार आहे आणि छोट्या कारची किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते.

फोटो स्रोत, Getty Images
"बाजारपेठेत मध्यवर्गाचं आणि छोट्या डीलर्सचं मोठं नुकसान होईल, कारण त्या वर्गांसाठी ही किंमत खूप अधिक आहे," असंही आर. सी. भार्गव यांनी सांगितलं.
कार कंपन्यांची एक संघटना, 'सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्स' यांच्यानुसार, भारताने गेल्यावर्षी 3 कोट अधिक कारची विक्री केली. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी जास्त आहे.
बहुतेक लोक लहान कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात, परंतु युटिलिटी, स्पोर्ट्स आणि मल्टी-युटिलिटी वाहनांची विक्री आता वाढत आहे. जगातील चौथ्या क्रमांकाच्या कार मार्केटमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 30 लाख अधिक लोकांना रोजगार मिळतो आणि भारताच्या GDP मध्ये त्याचे सुमारे 6% योगदान आहे.
आता चांगली बातमी इथेच संपते. कारण जागतिक बँकेनुसार, जागतिक स्तरावर विकल्या गेलेल्या वाहनांपैकी फक्त 1% वाहने असूनही जगातील सर्व अपघाती मृत्यूंपैकी 10% मृत्यू भारतात आहेत. 2020 मध्ये 1 लाख 30 हजार लोकांहून अधिकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. यात 70 टक्के पीडित हे 18 ते 45 या वयोगटातील आहेत. यापैकी अर्धे लोक हे रस्त्यावर चालत होते, काही सायकल चालक होते तर काही बाईक चालक होते. भारत दरवर्षी आपल्या जीडीपीच्या 3 टक्के जीडीपी केवळ कार अपघातामध्ये गमावतो.
2025 पर्यंत हा मृत्यूचा आकडा 50 टक्क्यांनी तरी कमी करण्याचे लक्ष्य भारताने समोर ठेवले आहे.
ऑटोमोबाईल सुरक्षेला प्राधान्य देणे हा एक पर्याय आहे. कारमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य करणे याव्यतिरिक्त भारत सरकार 'Bharat NCAP' लाँच करत आहे. गाड्यांच्या सुरक्षेचे निकष ठरवणे आणि त्यांना त्यानुसार गाड्यांना सुरेक्षेसाठी रेटिंग देणं. एक ते पाच स्टार्स या आधारावर सुरक्षा तंत्रज्ञान आणि बालके ते प्रौढ प्रवासी संरक्षण यानुसार ही चाचणी होईल.

फोटो स्रोत, Getty Images
यामुळे "भारताला जगातील नंबर एक ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या मिशनला चालना मिळेल," असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
भारत खरंच रस्त्यावरील मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणू शकतो?
भारतीय बाजारपेठेत तीव्र स्पर्धा आहे. भारतात उपलब्ध असलेल्या कारच्या किमती 3 लाख 40 हजार रुपयांपासून ते 3 कोटी रुपयांपर्यंत. तरीही छोट्या कारची मागणी कमी होत चालली आहे.
कच्च्या मालाची वाढती किंमत आणि करांमुळे कार महाग होत आहेत. दुचाकी वाहनांपासून अपग्रेड होऊ इच्छितात त्यांच्या आवाक्याबाहेर या किमती आहेत. इंधनाचे दरही खूप वाढले आहेत.
प्रदीर्घ आर्थिक मंदीमुळे अनेकांचे उत्पन्नाचे मार्ग ठप्प आहेत. ज्यांना परवडत आहे ते सेडन्स आणि किंवा त्याहून अधिक सुविधा असलेल्या वाहनाकडे वळत आहेत यामुळे छोट्या कारची बाजारपेठ कमी होत आहे.
गेल्या चार वर्षांत हॅचबॅकच्या बाजारपेठेत 25 टक्क्यांची घसरण झाल्याचं मारूती सुझुकीचं म्हणणं आहे. पण प्रश्न हा आहे की भारतीय गाड्या सुरक्षित आहेत का?
यूकेतील स्वतंत्र कार संरक्षण निरीक्षक ग्लोबल NCAP च्या अभ्यासानुसार, त्यांनी हे चित्र सादर केलं आहे.
2014 मध्ये जेव्हा भारतीय निर्मित कार्सची चाचणी सुरू झाली तेव्हा देशातील पाच सर्वांत लोकप्रिय छोट्या कार- एकूण विक्रीच्या 20 टक्के - क्रॅश चाचणीत अपयशी ठरल्या. (यात टाटा, फोर्ड, वोल्क्सवॅगन आणि ह्युंदाई मॉडेल्सचा समावेश होता.)
तेव्हापासून, या नियंत्रकांनी 50 हून अधिक मॉडेल्सची चाचणी केली आहे - टाटा आणि महिंद्राने बनवलेल्या मॉडेल्सना त्यापैकी सर्वांत सुरक्षित मानण्यात आले. टाटा नेक्सॉन ही पाच आसनी SUV, "प्रौढ रहिवासी संरक्षण" साठी पंचतारांकित सुरक्षा रेटिंग मिळवणारी पहिली भारतीय कार होती.

फोटो स्रोत, GLOBAL NCAP
"वाहन सुरक्षा डिझाइनमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे, परंतु आमच्या ताज्या निकालांवरून पाहिल्यास, भारतातील ग्राहक ज्या उच्च सुरक्षा मानकांची मागणी करतात ते साध्य करण्यासाठी आणखी काही गोष्टी करणं आवश्यक आहे," असं ग्लोबल एनसीएपीचे सेक्रेटरी जनरल अलेजांद्रो फुरास म्हणतात.
लोकप्रिय भारतीय कार चाचणीत अपयशी
अलजांद्रो फुरास म्हणाले, "भारतीय कार निर्मात्यांनी सुरक्षेची मानके वाढवली. परंतु "मुख्य जागतिक ब्रँड सुरक्षिततेच्या बाबतीत कमी पडतात आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये या आवश्यकता ते सहज पूर्ण करतात." म्हणजे कार भारतीय बाजारपेठेसाठी स्वस्त बनवण्यासाठी सुरक्षेसाठीची वैशिष्ट्य पूर्ण केली जात नाहीत."
पण सामान्यत: गेल्या काही वर्षांत भारतीय कार 'सुरक्षित बनल्या आहेत' असं अग्रगण्य ऑटोमोबाईल मासिक 'ऑटोएक्स'चे संपादक ध्रूव बेहल सांगतात. सुरक्षेचा दर्जा वाढवण्यासाठीचा खर्च कमी होईल असा विश्वास त्यांना वाटतो.

फोटो स्रोत, Getty Images
ऑटोमोबाईलविषयी लिहिणारे कुशन मित्रा सांगतात, "सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारी कार चालकाइतकीच महत्त्वाची असते. "भारतीय गाडी चांगली चालवत नाहीत. आपण सुरक्षेसाठी तेवढे जागरूक नाही. माझा मुलगा एका पॉश प्राथमिक शाळेत जातो. केवळ 10 टक्के पालकांनी लहान मुलांसाठी सुरक्षा सीट बसवल्या आहेत," असंही ते म्हणाले.
खरं तर मुलं प्रवाशांच्या मांडीवर बसतात, प्रवासी सीट बेल्ट लावतच नाहीत, चालक चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवतात. नवीन महामार्गांवर वेगाने गाडी चालवणे आणि दारू पिऊन गाडी चालवणे हे नेहमीचं बनलं आहे. महामार्गावर अवजड वाहने पार्क केली जातात. कॅब्स किंवा टॅक्सीमध्ये अनेकदा सीटबेल्ट उपलब्ध होत नाहीत. अनेक रस्ते खराब झाले आहेत किंवा चुकीचे बांधले आहे. तसंच वाहतूक नियमांची अंमलबजावणी ढिसाळ असल्याचं दिसतं.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणतात, "जेव्हा लोक वाहन खरेदी करतात तेव्हा ते सामान्यत: लेदर सीट, सनरूफ आणि कार स्टिरिओची चौकशी करतात. कार खरेदी करताना अनेकांचा कल कार किती सुरक्षित आहे याकडे नसतो."
"कारकडून सुरक्षा ही सहसा सर्वांत महत्त्वाची अपेक्षा नसते. कार सुरक्षित नाही यामुळे कुणी सहसा निर्णयही रद्द करत नाही. पण याबाबतीत हळूहळू जागरुकता वाढत आहे," असंही ते सांगतात.
अर्चना तिवारी-पंत या अशाच एक ग्राहक आहेत. 58 वर्षीय अर्चना लवकरच SUV खरेदी करणार आहेत. कारमध्ये अधिक एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि मागील पार्किग सेन्सरसाठी अधिक आग्रही असणार आहेत असं त्या सांगतात.
"माझ्या कारने माझी सुरक्षा करावी असं मला वाटतं," असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








