नितीन गडकरी : हायड्रोजन कार नेमकी कशी असते? ती खरंच उपयुक्त ठरेल का?

फोटो स्रोत, Nitin gadkari twitter
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी सातत्याने कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असतात. अब्जावधी किंमतीच्या रस्त्यांबद्दलच्या घोषणा असोत नव्या प्रकल्पांचं उद्घाटन असो की नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात असो, नितीन गडकरी अत्यंत उत्साहाने या सगळ्या गोष्टी करताना दिसतात.
बुधवारीही (30 मार्च) नितीन गडकरी आपल्या एका नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत आले. निमित्त होतं हायड्रोजन कार या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नितीन गडकरींनी नवी दिल्लीतल्या आपल्या राहत्या घरापासून ते संसदेपर्यंतचा प्रवास भारतातील पहिल्या हायड्रोजन कारमधून केला. ही कार पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे आणि केंद्र सरकारने त्यासाठी एक मिशन सुरू केल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.
आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, LPG तसंच CNG वर चालणारी वाहने आपल्याला माहिती आहेत. गेल्या काही वर्षांपासून वीजेवर चालणाऱ्या वाहनांची खास चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. पण, हायड्रोजन कार ही संकल्पना अद्याप लोकांच्या ओळखीची नाही.

फोटो स्रोत, Twitter
त्यामुळे नितीन गडकरींनी आणलेल्या या नव्या कारची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर हायड्रोजन कार नेमकी कशी असते, ती कसं काम करते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती खरंच उपयुक्त आहे का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
हायड्रोजन कार म्हणजे काय? त्याचं इंजीन कसं चालतं?
नितीन गडकरी यांनी 16 मार्च रोजी एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. यामध्ये हायड्रोजन कारची संकल्पना समजावून सांगण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हायड्रोजन कारचं इंजीन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) तंत्रज्ञानावर काम करतं. ग्रीन हायड्रोजन हा या तंत्रज्ञानाचा ऊर्जास्त्रोत आहे.
हायड्रोजन कारच्या इंजिनमध्ये हायड्रोजन हाय प्रेशर टँक, बॅटरी, फ्युएल सेल स्टॅक, बूस्ट कनव्हर्टर आणि इलेक्ट्रिक मोटर आणि पॉवर कंटक्टर हे प्रमुख भाग असतात.
हाय प्रेशर टँक पूर्णपणे ग्रीन हायड्रोजनने भरण्यासाठी यामध्ये केवळ 3 ते 5 मिनिटांचा वेळ लागतो. इथून तो फ्युएल सेल स्टॅकमध्ये सोडण्यात येतो.
याठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात संयोग घडवून आणून रासायनिक प्रक्रिया घडवली जाते. या प्रक्रियेदरम्यान जे बल निर्माण होतं, त्याच्या उपयोगाने वीजेची निर्मिती केली जाते.
यादरम्यान, कोणत्याही प्रकारचा धूर निर्माण न होता प्रक्रियेतून पाणी बाहेर पडतं.
टोयोटाची मिराई कार
हायड्रोजन कार तंत्रज्ञानावर जगभरात काही वाहने आणली गेली आहेत. त्यापैकीच एक वाहन म्हणजे टोयोटा मिराई. जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थ होतो भविष्य.
मिराई कारची पहिली आवृत्ती 2014 मध्ये बाजारात आणण्यात आली होती. तर सध्याची ही दुसरी आवृत्ती 2022 मध्येच बाजारात आली आहे.

फोटो स्रोत, Twitter
5 मिनिटे इंधन भरल्यानंतर मिराई कार तब्बल 650 किलोमीटरचा प्रवास करू शकते. डिसेंबर 2021 पर्यंत 18 हजार मिराई कार जगभरात विकल्या गेल्या आहेत.
याच वाहनाचा चाचणी प्रकल्प टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड आणि द इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीकडून सुरू करण्यात आला आहे.
याचअंतर्गत भारतातील पहिल्या कारचा प्रवास करण्याची संधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आली.
इंधनासाठीचं हायड्रोजन कसं मिळतं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी या कारमधून प्रवास केल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ पोस्ट केला. यामध्ये हायड्रोजन कार तसंच या तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये गडकरी म्हणतात, "जागतिक बाजारपेठेत सातत्याने पेट्रोल आणि गॅसच्या किंमती वाढत चालल्या आहेत. स्वाभाविकपणे या कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागतं.

फोटो स्रोत, Twitter
आत्मनिर्भर भारत बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. पण आपल्याला 8 लाख कोटींपेक्षा जास्त इंधन आयात करावं लागतं. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं असेल तर इंधन उत्पादन करावं लागेल.
त्यामुळेच परिवहन विभागाच्या वतीने आम्ही इथेनॉल, मिथेनॉल, बायो-डिझेल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी, वीज तसंच ग्रीन हायड्रोजनसंदर्भात काम केलं.
ग्रीन हायड्रोजन हे पाण्यापासून किंवा ऑरगॅनिक कचऱ्यापासून मिळवता येतं.
पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेलं असतं. पाण्यावर रासायनिक दबाव टाकल्यास ही दोन्ही मूलद्रव्ये वेगळी होतात.
यादरम्यान, हायड्रोजनवर अतिरिक्त दबाव टाकून त्याला एका टँकमध्ये वेगळं केलं जातं.
त्याशिवाय ग्रीन हायड्रोजन मिळवण्याचा दुसराही एक मार्ग आहे. ऑरगॅनिक कचऱ्यावर प्रक्रिया करूनही ग्रीन हायड्रोजन मिळवता येऊ शकतं.
कोळशापासून ब्लॅक हायड्रोजन मिळतं. पेट्रोलियममधून ब्राऊन हायड्रोजन मिळतं. मात्र पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला ग्रीन हायड्रोजन हवं आहे. ते आपल्याला पाणी आणि ऑरगॅनिक कचऱ्यापासून मिळेल.
पर्यावरणपूरक स्वस्त इंधन पर्याय
सध्या जगभरात सर्वत्र हवामान बदलाविरोधात लढाई सुरू आहे. याच अंतर्गत इंधनाच्या बाबतीत विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येत आहेत.
एकूणच जगात सर्वत्र पर्यावरणपूरक इंधन आणि शून्य कार्बन उत्सर्जन विषयक विविध संशोधन करण्यात येत आहेत.

फोटो स्रोत, Twitter
या गोष्टी लक्षात घेता, पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधन पर्याय म्हणून ग्रीन हायड्रोजन ओळखलं जाईल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या मते, पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा प्रति किमी खर्च हा 10 रुपये इतका असतो. नूतन तंत्रज्ञानाअंतर्गत वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी हाच खर्च प्रति किमी 1 रुपये इतका आहे.
त्याचप्रमाणे हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचा खर्च वीजेवरील वाहनांपेक्षा किंचित जास्त म्हणजेच 2 रुपये प्रति किलोमीटर इतका असू शकतो, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
ग्रीन हायड्रोजनबाबत सरकारचं मिशन
नितीन गडकरी यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत ग्रीन हायड्रोजन गॅस निर्मितीचे प्रकल्प देशभरात ठिकठिकाणी उभे करता येऊ शकतात.
त्यामुळे ग्रीन हायड्रोजन वाहनांना प्रोत्साहन दिल्यास नवे रोजगारही देशात उपलब्ध होतील, असं गडकरी यांनी सांगितलं.
"ग्रीन हायड्रोजनसंदर्भात 3 हजार कोटींचं मिशन भारत सरकारने ठरवलं आहे. आपण भविष्यात ग्रीन हायड्रोजन एक्सपोर्ट करणारा देश बनू. ज्या-ज्या ठिकाणी गॅस-कोळसा वापरला जातो, त्याठिकाणी ग्रीन हायड्रोजन वापरलं जाऊ शकतं."
या इंधनावर चालणाऱ्या या गाडीचं हे पायलट प्रोजेक्ट आहे. लोकांचा यावर विश्वास बसावा, यासाठी हे सुरू करण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









