रस्त्यावरून धावता धावता उडणार कार, 'फ्लाईंग कार'ला मिळालं प्रमाणपत्र

फोटो स्रोत, Getty Images
उडणारी कार आता आणखी वेगानं आणि आणखी उंचावरून उडू शकते. स्लोव्हॅक ट्रान्स्पोर्ट ऑथोरिटीनं तशी परवानगीच तिला दिलीय.
आता ही 'फ्लाईंग कार' ताशी 160 किलोमीटर वेगानं आणि 8 हजार फूटांवरून उडू शकते. स्लोव्हॅक ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीनं त्यासंबंधीचं प्रमाणपत्र दिलंय.
एअरकार नामक या हायब्रीड कार-एअरक्राफ्टमध्ये BMW कंपनीचं इंजिन आहे. नियमित पेट्रोल पंपवरील इंधन टाकून ही एअरकार उडू शकते.
या कारचे विमानात रुपांतर व्हायला केवळ 2 मिनिट 15 सेकंदाचा अवधी लागतो.
70 तासांची चाचणी आणि 200 हून अधिक उड्डाणांनंतर या एअरकारला प्रमाणपत्र देण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
"एअरकारला प्रमाणपत्र मिळाल्यानं आता सक्षम फ्लाईंग कारच्या मोठ्या निर्मितीची दारं खुली झाली आहेत," असं या कारचे निर्माते प्रो. स्टिफन क्लेईन यांनी म्हटलं.
ते पुढे म्हणतात, "मध्यम स्वरूपाच्या प्रवासात क्रांतिकारी बदल करण्याच्या आमच्या क्षमतेवर आता शिक्कामोर्तब झालं आहे."
'आशावादी'
गेल्यावर्षी जूनमध्ये या फ्लाईंग कारनं स्लोवॅकियामधील नित्रा आणि ब्राटिस्लावादरम्यानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळातला 35 मिनिटांचा प्रवास पूर्ण केला होता.
एअरकारच्या कंपनीनं बीबीसी न्यूजला सांगितलं की, नजीकच्या काळात लंडन ते पॅरिस असा प्रवासही एअरकारनं शक्य होईल, तसा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. स्टिव्ह राईट हे यूनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट ऑफ इंग्लंडच्या एव्हिओनिक आणि एअरक्राफ्ट यंत्रणेतले रिसर्च फेलो आहेत.
ते म्हणतात, "हे या कंपनीसाठी एक चांगलं पाऊल आहे. मात्र, ही सतकर्तापूर्ण आशावादी घटना आहे. एक दिवस अनेक एअरकार दिसतील. त्यासाठी आणखी वेळ लागेल हे निश्चित."
इतर कंपन्यांनीही अशा प्रकारची वाहनं तयार करण्याचं प्रयत्न करत आहेत.
तीनचाकी PAL-V लिबर्टीला युरोपमध्ये कायदेशीर परवानगी मिळालीय आणि आता युरोपियन यूनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या प्रमाणपत्रासाठी ते प्रयत्न करत आहेत.
मात्र, डॉ. राईट यांना शंका आहे की, किती संख्येत लोकांना फ्लाईंग कार आकर्षित करू शकते.
फ्लाईंग कार हेच भविष्य असेल का? हो... आणि नाही, असं ते म्हणतात.
"वैयक्तिक वाहतुकीची क्रांती निश्चितच होतेय. मात्र, ती अशी दिसत नाहीय. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ही खालच्या स्तरावर आहे," असं ते म्हणतात.
एअर टॅक्सी सर्व्हिस
इतर विमानांप्रमाणेच एअरकार उड्डाण घेते आणि जमिनीवर उतरते. ही एअरकार चालवण्यासाठी पायलट लायसन्सची आवश्यकता असेल.
आता अनेक कंपन्या अन-पायलटेड एअर टॅक्सी सर्व्हिससाठी प्रयत्न करत आहेत. एअरकार वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीचं आणि किफायतशीर माध्यम होईल यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
सोमवारीच (24 जानेवारी) बोईंगनं जाहीर केलंय की, ते अतिरिक्त 450 मिलियन डॉलरची कॅलिफोर्नियास्थित एअर टॅक्सी कंपनी असलेल्या व्हिस्कमध्ये गुंतवणूक करणार आहेत.
किट्टी हॉक हे या कंपनीचे मालक आहेत. गूगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्या सोबत या कंपनीची स्थापना करण्यात आलीय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








