Auto Expo 2020 : टाटा, मारुती, किया, महिंद्रा - सगळ्यांचाच 'कार'भार आता इलेक्ट्रिक होतोय

फोटो स्रोत, ANI
दर दोन वर्षांनी होणाऱ्या दिल्ली ऑटो एक्सपोचा आज पहिला दिवस. मंदावलेल्या वाहन उद्योग आणि चीनहून आलेल्या कोरोना व्हायरसच्या सावटाखाली यंदाचा हा गाड्यांचा मेळावा होतोय.
मात्र या व्हायरसच्या भीतीसारखीच एक कल्पना या एक्सपोमध्ये प्रत्येकाच्या मनाला शिवतीये - इलेक्ट्रिक कार्सची. आणि जर्मन किंवा चिनी नव्हे तर भारतीय कंपन्यांनी या इलेक्ट्रिक कार्सच्या शर्यतीत आघाडी मारली आहे.
यापैकी सर्वच गाड्या काही तुमच्याआमच्यासाठी तयार नव्हत्या - काही कॉन्सेप्ट कार्सही आणि बाईक्सही होत्या, ज्याद्वारे या कंपन्या त्यांची भविष्याची वाट किंवा विचारसरणी स्पष्ट करतात, अत्यानुधिकतेची स्वप्न दाखवतात.
मग आज कोणकोणत्या कंपनीने कोणकोणती स्वप्न दाखवली? एक नजर टाकूया -
1. मारुती सुझुकी
भारतात निम्म्या कार्स मारुती सुझुकीच्या विकल्या जातात. याही कंपनीची विक्री गेल्या काही महिन्यांमध्ये मंदावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या, त्यामुळे खरंच ऑटो सेक्टरचं इंजन थंड पडल्याचं सांगितलं गेलं.

फोटो स्रोत, Maruti Suzuki
आता या एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने #MissionGreenMillion लाँच केला आहे, ज्याअंतर्गत कंपनीने 2022 पर्यंत 10 लाख प्रदूषणरहित गाड्या विकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
याबरोबरच कंपनीने e-Futuro या इलेक्ट्रिक SUVची झलक कॉन्सेप्ट स्वरूपात दाखवली.
2. किया मोटर्स
सध्या सगळेच किया मोटर्स या नवीन कोरियन ब्रँडच्या सेल्टोस या गाडीने भारावले आहेत. ऑगस्टमध्ये लाँच झाल्यापासून या कंपनीने तब्बल 60 हजार गाड्या विकल्या आहेत, म्हणजे महिन्याला सरासरी 10 हजार.

फोटो स्रोत, Kia.com
किया मोटर्सने आज भलीमोठी किया 'कार्निवल' ही मोठ्या कुटुंबांसाठीची आलिशान गाडी लाँच केली.
तसंच 'सॉनेट' नावाची एक छोटी SUV सुद्दधा लाँच केली.
3. टाटा मोटर्स
टाटा मोटर्सने ट्रक आणि बस बनवल्यानंतर पॅसेंजर वाहनं बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यांची सर्वांत पहिली गाडी कोणती होती, आठवते तुम्हाला? सुमो, इंडिया, सिएरा?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हा, तीच सिएरा, जिचा मागचा भाग एखाद्या काचेच्या पेटीसारखा दिसायचा! काही स्टाइलिश गाड्यांपैकी एक होती सिएरा. तिचाच 21व्या शतकातील इलेक्ट्रिक अवतार टाटाने आज जगापुढे आणला!
त्याशिवाय HBX ही छोटी SUVसुद्धा कॉन्सेप्ट स्वरूपात सादर केली.

फोटो स्रोत, Twitter / @TataMotors
आणि त्यांची पहिली जनसामान्यासाठीची इलेक्ट्रिक कार नेक्सॉन EV सुद्धा सादर केली. काही दिवसांपूर्वीच ही गाडी लाँच करण्यात आली होती. 13 लाख रुपयांपासून या इलेक्ट्रिक कारची किंमत सुरू होते, मात्र तिची रेंज सध्यातरी कंपनी 250-300 किमी प्रतिचार्ज असल्याचं सांगते आहे.
4. ग्रेट वॉल मोटर्स
तुम्ही MG Motorsच्या अॅड्स पाहिल्याच असतील. मॉरिस गराजेस ही मूळची ब्रिटिश कंपनी आता SAIC या चिनी कंपनीच्या मालकीची आहे. त्यांनी गेल्या वर्षी भारतीय कारबाजारात प्रवेश केल्यानंतर आता ग्रेट वॉल मोटर्स किंवा GWM या आणखी एका चिनी बलाढ्य कंपनीचं भारतात आगमन होत आहे.

फोटो स्रोत, Facebook / GWM India
ग्रेट वॉल मोटर्सने आज दिल्लीत हवल ही SUV, GWM EV हा इलेक्ट्रिक कार ब्रँड आणि दोन कॉन्सेप्ट कार्स H आणि विझन 2025 या गाड्या सादर केल्या.
ही कंपनी लवकरच आपला व्यवसाय भारतात सुरू करणार आहे.
एका वृत्तानुसार सध्या चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस संकटामुळे या कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना भारतात ऑटो एक्स्पोसाठी येणं टाळावं लागलं.
5. फॉक्सवॅगन ग्रुप - श्कोडा
गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळापासून भारतात असलेल्या फॉक्सवॅगन ग्रुपला या बाजारपेठेत पाय रोवणं जमलेलं नाही. त्यामुळेच त्यांनी आता त्यांचा बजेट ब्रँड श्कोडा भारतात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Skoda India
साधारण अडिच वर्षांपूर्वी 'डिजलगेट' प्रकरणात मोठं नुकसान आणि बदनामी झाल्यानंतर फोक्सवॅगन आता स्वच्छ इंधन तंत्रज्ञानावर भर देते आहे.
ऑटो एक्सपोमध्ये फॉक्सवॅगनने टायगुन तर त्याच्या उपकंपनी श्कोडाने विजन इन या SUV जगाला दाखवल्या.
कंपनीचा भर आता 2025 पर्यंत भारतीय वाहन उद्योगाचा 5 टक्के वाटा मिळवणं आहे. सध्या फॉक्सवॅगन आणि श्कोडा या दोन्ही कंपन्यांचा भारतीय बाजारात दोन टक्क्यांपेक्षाही कमी वाटा आहे.
6. महिंद्रा आणि महिंद्रा
बेंगळुरूच्या एका छोट्या रेवा इलेक्ट्रिक कंपनीला विकत घेत महिंद्रा ग्रुपने आपण इलेक्ट्रिक गाड्या आणणार असल्याचं बऱ्याच आधी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या दोन EV - महिंद्रा e2o आणि eVerito अनेक वर्षांपासून राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर दिसतही होत्या, मात्र सामान्यांसाठी त्या किमती आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनाने उपलब्ध होत नव्हत्या.
अखेर आज महिंद्राने eKUV ही गाडी 8.25 लाखांना लाँच करत गोष्टी जरा आटोक्यात आणि इलेक्ट्रिकची स्वप्न पाहणाऱ्यांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.

फोटो स्रोत, Twitter @MahnidraElctrc
गेल्या ऑटो एक्सपोमध्येच म्हणजे दोन वर्षांपूर्वी महिंद्राने आपला संपूर्ण इलेक्ट्रिक प्लान सांगितला होताच, मात्र प्रत्यक्षात पायाभूत सविधांचा अभाव असल्याने ही स्वप्न अपूर्ण राहिली होती.
BS-VIचा शुभारंभ
वेळोवेळी तंत्रज्ञान अद्ययावत होत असतं तसं त्याला सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष रूपरेषेची गरज असते. भारत स्टेज-6 किंवा BS-VI हा अधिक शुद्ध इंजिन, इंधन आणि वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. सरकारने काही वर्षांपूर्वीच भारतातील सर्व गाड्या 1 एप्रिल 2020 पासून BS-VI तंत्रज्ञानाच्या असतील, असं जाहीर केलं होतं.
त्यानुसार सर्व कंपन्या या एक्सपोमध्ये या नवीन तंत्रज्ञानाच्याच गाड्या आणत आहेत. सुझुकी, हिरो या दुचाकी कंपन्यांपासून ते ह्युदाई, मारुती सुझुकी आणि टाटा, अशा अनेक कंपन्या आता या अधिक कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
(ऑटो एक्सपोमधल्या सर्व मोठ्या अपडेट्ससाठी तुम्ही बीबीसी मराठीच्या सोशल मीडिया हँडल्सवर पाहू शकता.)

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









