मूनलायटिंग काय आहे? इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्या यावरून का चिडल्या आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही दिवसांपासून मूनलायटिंगसंदर्भात प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली होती.
कंपनीच्या नियमांनुसार मूनलायटिंगची परवानगी नसेल. याचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तपालनसंदर्भात कारवाई केली जाईल, याअंतर्गत नोकरीवरूनही काढलं जाऊ शकतं, असा इशारा इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेलमार्फत दिला आहे.
त्याचप्रमाणे,व्हीप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनीही मूनलायटिंगचा विरोध करताना ही एक धोकेबाजी आहे, असं म्हटलं आहे.
ट्वीट करून ते म्हणाले, "टेक इंडस्ट्रीमध्ये मूनलायटिंग करण्याच्या चर्चा आहेत. ही उघडउघड एक दगाबाजीच आहे."
दरम्यान, IBM या आघाडीच्या कंपनीचं नावही वरील यादीत समाविष्ट झालं. त्यांनीही मूनलायटिंग करणं हे अनैतिक असल्याची भूमिका मांडली आहे.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, IBM चे भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील म्हणाले, "IBM च्या नियमांप्रमाणे कंपनीत नोकरीला सुरुवात करण्यापूर्वी कर्मचारी केवळ याच कंपनीत काम करण्यासंदर्भात अटीवर स्वाक्षरी करतो."
इतर वेळेत लोक त्यांची इच्छा असेल ते करू शकतात, पण मूनलायटिंग हा प्रकार नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, SOPA IMAGES / CONTRIBUTOR
मूनलायटिंगमुळे कर्मचाऱ्याच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो आणि यामुळे कंपनीचं नुकसान होतं, अशी भूमिका कंपन्यांकडून मांडलं जातं.
मूनलायटिंग म्हणजे काय?
एखादा कर्मचारी आपल्या नियमित नोकरीशिवाय इतर कोणतंही काम करत असेल, तर त्याला मूनलायटिंग असं संबोधलं जातं.
केवळ IT क्षेत्रच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये लोक नोकरीच्या व्यतिरिक्त आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी इतर कामे करतात. याला फ्री-लान्सिंग असंही संबोधण्यात येतं.
एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीला मूनलायटिंग म्हणण्याचं कारणही जाणून घ्यायला हवं.
साधारपणपणे, लोक दिवसभरात 8 ते 9 तास काम करतात. त्यामुळे दिवसभर आपल्या नियमित नोकरीमधलं काम केल्यानंतर रात्री दुसरं एखादं काम काहीजण करत असतात. रात्री हे काम केलं जात असल्यामुळेच त्याला मूनलायटिंग संबोधलं जाऊ लागलं.
पण, बदलत्या काळात लोकांच्या नोकरीच्या वेळा शिफ्टनुसार बदलतात. त्यामुळे नियमित नोकरीत रात्रीची शिफ्ट करणारा व्यक्ती दुपारी दुसरं एखादं काम करतो. म्हणजे मूनलायटिंग करण्याची अशी निश्चित कोणतीही वेळ नसते.
नियमित काम सांभाळून केल्या जाणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही कामाला मूनलायटिंग संबोधलं जातं.
मूनलायटिंग हे कोणत्याही प्रकारचं काम असू शकतं. काही जण आपल्याच क्षेत्रातील मूळ कामाशी संबंधित प्रोजेक्टची कामे घेतात. कुणी रात्री फुड डिलिव्हरीचं काम करतात, तर कुणी वेटरचं.
कुणी अनुवाद, डबिंग, लेखन, वेबसाईट बनवणं, मार्केटिंग किंवा कन्सल्टंट म्हणून काम करतात.
साधारणपणे या कामादरम्यान कर्मचाऱ्याच्या नियमित नोकरीच्या आस्थापनेला त्याच्या दुसऱ्या कामाची किंवा नोकरीची कल्पना नसते.
मूनलायटिंगविषयी मतमतांतरे
मूनलायटिंगबाबत सर्वच कंपन्यांमध्ये सारखे नियम आहेत, असं नाही. वेगवेगळ्या कंपन्यांमध्येही यासंदर्भात वेगवेगळे नियम पाहायला मिळतात.
इतकंच नव्हे तर ज्यांच्यामुळे हा सगळा मुद्दा चर्चिला जात आहे, त्या इन्फोसिस कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक मोहनदास पै मूनलायटिंग ही दगाबाजी आहे, असं मानत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
बिझनेस टुडे या इंग्रजी वेबसाईटशी बोलताना ते म्हणाले, "नोकरी ही संबंधित कंपनीसोबतचा एक करार असते. यानुसार एका दिवसात काही तास काम केल्यानंतर आपल्याला पगार मिळतो. त्या कालावधीत मी नियमांशी बांधील असतो. पण नंतर मी काय करावं, हा माझा निर्णय आहे. मी मला जे हवं ते करू शकतो."
स्विगीने याबाबत म्हटलं की कार्यालयीन कामाच्या तासांनंतर किंवा सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्याची उत्पादकता प्रभावित होऊ न देता, लाभाचं पद न स्वीकारता कोणताही कर्मचारी दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्ट अथवा कामाचा भाग होऊ शकतो."
पण, यासंदर्भात कंपन्यांचं आपापलं वेगळं मत स्पष्टपणे दिसून येतं.
काही कंपन्यांच्या मते, कर्मचारी यामुळे आपलं काम मन लावून करत नाहीत. ते वारंवार सुट्ट्या घेतात. त्यांना आरामासाठी दिलेल्या सुटीच्या दिवशी ते काम करतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.
दुसरीकडे कर्मचारी हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं मानतात.त्यांच्या मते, कर्मचारी हा कंपनीच्या नियमांशी केवळ कामाच्या तासांदरम्यानच बांधील असतो. यानंतर तो कोणतंही काम करण्यास स्वतंत्र आहे, असं त्यांना वाटतं.
पण, जे कर्मचारी स्वतः मूनलायटिंग करतात, त्यांचं याबाबत काय मत आहे? एका नोकरीत असूनही ते दुसरं काम करण्याचे कष्ट का घेतात?
लोक मूनलायटिंग का करतात?
एका नामांकित IT कंपनीत काम करणाऱ्या अमन वर्मा (बदललेलं नाव) यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी प्रियांका झा यांनी संवाद साधला.
अमन सांगतात, "दुसरं काम करण्याचं कारण साधारणपणे अतिरिक्त उत्पन्न हेच असतं. पण काही वेळा त्याची इतर कारणेही असण्याची शक्यता आहे."

फोटो स्रोत, LAKSHMIPRASAD S
त्यांच्या मते, "कार्यालयात तुमची भूमिका निर्धारित आणि मर्यादित स्वरुपात असते. जसं आमच्या क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग ही दोन प्रकारची कामे असतात. पण काही कारणामुळे मला टेस्टर म्हणून काम सुरू करावं लागलं. पण मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम करायचं आहे, पण माझ्या कंपनीत त्याची संधी अद्याप मिळालेली नाही. अशा स्थितीत मी फ्री-लान्सिंग म्हणून असे प्रोजेक्ट शोधू शकतो. यामुळे मला माझ्यातील क्षमता वापरण्याची संधी मिळू शकते."
ते सांगतात, "लोकांमध्ये आर्थिक सुरक्षिततेची भीतीसुद्धा वाढली आहे. कोरोना काळात उपचाराअभावी अनेकांचे मृत्यू झाले. त्यामुळे हातात पैसा असावा यासाठी लोकांना आपली कमाई वाढवायची आहे."
अशाच प्रकारे व्हीडिओ एडिटिंगचं काम करणाऱ्या अर्चना सिंह यासुद्धा फ्री-लान्सिंग करतात. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात फ्रीलान्सिंग केलं होतं.
नाव बदलण्याच्या अटीवर त्यांनी बीबीसी प्रतिनिधी कमलेश मठेनी यांना सांगितलं, "मी मुंबईला पहिल्यांदा आले तेव्हा मला पगार अत्यंत कमी होता. यामध्ये मुंबईत राहण्याचा, खाण्या-पिण्याचा खर्च पेलवणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी बाहेरची कामे घेण्यास सुरुवात केली. याचे आणखी काही फायदे आहेत. त्यामुळे तुमची तुमच्या कामावरची पकड चांगली होते. अनेकवेळा या प्रोजेक्टमधून नवं काहीतरी शिकायला मिळतं."
अर्चना यांचे काही सहकारीही फ्री-लान्सिंग करतात. त्या याबाबत म्हणाल्या, "लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्याने मूनलायटिंग करण्याचं प्रचलन वाढलं आहे. लोकांचा प्रवासाचा वेळ वाचला आहे. त्यामुळे इतर काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो."
मूनलायटिंगसंदर्भात भारतात विशिष्ट असा नियम नाही. पण कंपन्या आपल्या अटी व शर्थींमध्ये या गोष्टींचा समावेश करतात.
अनेक कंपन्या दुसऱ्या ठिकाणी कामाची परवानगी देत नाहीत. पण काही कंपन्या अटी व शर्थींसह त्याची परवानगी देतात.
नियमात इतर ठिकाणी काम न करण्याबाबत लिहिलं असेल तर मूनलायटिंग ही दगाबाजी मानली जाऊ शकते.
शिवाय, फॅक्टरी अॅक्टनुसारही एकाच वेळी दोन-दोन ठिकाणी नोकरी करण्यास बंदी आहे. काही राज्यांमध्ये आयटी कंपन्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








