You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेः 'दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी-शाहांचे हस्त होऊ' #5 मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. 'दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी-शाहांचे हस्त होऊ'- एकनाथ शिंदे
राज्यात मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पैठण येथे झालेल्या सभेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली.
ते म्हणाले, "निवडणुकीत आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून प्रचार केला होता. लोकांनी सत्तेतही आणले पण यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली. भारताचा शत्रू असणाऱ्या मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण या काळात झाले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही मोदी-शहांचे हस्तक होऊ."
या सभेत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
2. मुंबई-महाराष्ट्रात फिरायचंय ना?- नारायण राणेंचा ठाकरे गटाला इशारा
गणपती विसर्जनाच्या वेळेस ठाकरे आणि शिंदे गटामध्ये झालेला वाद अजून काही काळ सुरूच राहील अशी चिन्हे आहेत. प्रभादेवी येथे सदा सरवणकर आणि एकनाथ शिंदे यांचे पोस्टर फाडण्यात आले.
त्यानंतर झालेल्या गोंधळात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटातर्फे ठेवण्यात आला.
त्यानंतर दोन दिवस हा वाद सुरूच राहिला. आता या वादामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रवेश केला आहे. राणे यांनी सदा सरवणकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
यावेळेस ते म्हणाले, "मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू आहे. असले हल्ले-बिल्ले करू नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल."
ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
3. काँग्रेसला कमजोर करणे ही एकजूट नव्हे- जयराम रमेश
एकीकडे काँग्रेसेतर पक्षांच्या नेत्यांनी गाठी-भेटी सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.
विरोधी पक्षांनी एकत्रित प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेस आणि इतर पक्षांनी असे वेगवेगळे प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यामधील अंतर्विरोधावर चर्चा सुरू झाली आहे.
विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची राहील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यावर प्रतिक्रिया देण्यात आली.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला, "विरोधकांचे ऐक्य काँग्रेसच्या मजबुतीशिवाय शक्य नसून भारत जोडो यात्रा विरोधी ऐक्यासाठी नव्हे तर काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आहे, असे ते म्हणाले." ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
आता अशा स्थितीत विरोधी पक्षांच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेसला कोणती भूमिका मिळेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल संयुक्त काँग्रेसला कशा पद्धतीने सामावून घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
4. संघाच्या गणवेशाबाबत आक्षेपार्ह ट्वीट- भाजपाची काँग्रेसवर टीका
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाला आग लागल्याचं चित्र काँग्रेसतर्फे ट्वीटरवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
यामुळे काँग्रेस हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याची टीका भाजपाने केली आहे.
या चित्राबरोबर "द्वेषाच्या बेड्यातून देशाला मुक्त करायचे आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे केल्या गेलेल्या नुकसानाची भरपाई करायची आहे. एक-एक पाऊल टाकत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू," असे काँग्रेस पक्षातर्फे लिहिले आहे.
यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "भारताच्या संवैधानिक व्यवस्थेत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. काँग्रेसचे आगीशी जुने नाते आहे. त्यांनी सत्तेवर असताना पंजाबला आगीत ढकलले व 1984 मध्ये शिखांना जिवंत जाळण्यामागे ते जबाबदार होते. काँग्रेसने केरळमधील 'दहशतवाद्यां'ना संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचे संकेत या 'ट्वीट'द्वारे दिले आहेत. काँग्रेसने हे 'ट्वीट' त्वरित हटवावे."
5. करुणा शर्मा घेणार भगवानगडावर दसरा मेळावा
भगवानगड आणि मुंडे कुटुंबीय यांचं नातं गेली अनेक वर्षं कायम आहे. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची सतत चर्चा सुरू असते.
गेल्या काही वर्षांमध्ये पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांच्या सावरगाव या जन्मगावी दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली आहे. आता करुणा शर्मा यांनीही आपण दसरा मेळावा घेणार असून तोही भगवानगडावर घेण्याची घोषणा केली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.
याची घोषणा करताना त्या म्हणाल्या, "मी देखील वंजारी समाजाची सून असल्याने आणि मुंडेंच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असल्याने भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. 7 ते 8 वर्षांपासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाही. जी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे ती परंपरा यंदा परत सुरू करणार आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)