...तर 'दीवार'मधला विजयचा रोल अमिताभला नाही, राजेश खन्नाला मिळाला असता

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला दीवार हा सिनेमा 24 जानेवारी 1975 साली प्रदर्शित झाला. मनोज कुमार यांच्या 'रोटी कपड़ा और मकान' या सिनेमाला 50 आठवडे पूर्ण झाल्यानंतर दीवार रिलीज झाला होता.

दिग्दर्शक यश चोप्रा यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हाच त्यांना लक्षात आलं की, आपल्या हाती एक ब्लॉकब्लस्टर लागला आहे.

नंतर यश चोप्रांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, "पहिल्यांदा जेव्हा मी कथा ऐकली, तेव्हा ही गोष्ट 'मदर इंडिया'वरून प्रभावित असल्याचं मला वाटलं. मात्र सलीम-जावेद यांची स्क्रिप्ट जबरदस्त होती आणि त्यांचे संवादही प्रचंड प्रभावी होते."

ही अशी स्क्रिप्ट होती, ज्यावर सिनेमा बनवल्यानंतर मला एकही डायलॉग काढावा लागला नव्हता. सलीम-जावेदनं आपल्या पूर्ण करिअरमध्ये यापेक्षा अधिक जबरदस्त स्क्रिप्ट लिहिली नसेल.

केवळ पटकथेचा विचार केला तर 'दीवार'ची पटकथा 'शोले'पेक्षा जास्त सशक्त होती. दीवार एक भावनिक चित्रपटही होता. या संपूर्ण सिनेमात एकच फाइट सीन होता...जो नंतर 'गोडाऊन फाइट' म्हणून प्रसिद्ध झाला. गाणीही दोनच होती.

"चित्रपटाचे निर्माते गुलशन राय यांना दीवारमध्ये राजेश खन्नाला हिरो म्हणून घ्यायचं होतं, कारण त्यांच्या 'दाग' चित्रपटात राजेश खन्नाची भूमिका होती आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला होता.

पण मी जंजीर पाहिला होता. त्यामुळे मला अमिताभलाच घ्यायचं होतं. आम्ही 1974 साली मार्च आणि ऑक्टोबर दरम्यान या सिनेमाचं शूटिंग केलं होतं. या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण हे रात्री करण्यात आलं होतं, कारण अमिताभ दिवसा 'शोले'चं शूटिंग करायचे.

अमिताभ एकाचवेळी दीवार आणि शोलेचं शूटिंग करायचे

'दीवार' आणि 'शोले' या दोन्ही सिनेमांचं शूटिंग केवळ वेगवेगळ्या लोकेशन्सवर नाही, तर दोन वेगवेगळ्या शहरातही होत होतं.

अमिताभ बच्चन यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, "दीवारचा क्लायमेक्स मुंबईमध्ये रात्री शूट होत होता. मी रात्रभर ते शूटिंग करायचो आणि सकाळी बंगळूरूसाठी फ्लाइट पकडायचो. तिथून एक तासाच्या अंतरावर 'शोले'चं शूटिंग सुरू होतं.

ते संपलं की मी पुन्हा संध्याकाळी मुंबईसाठी विमान गाठायचो, जेणेकरून 'दीवार'चं शूटिंग करता येईल. जी काही झोप आवश्यक होती, ती मी फ्लाईटमध्येच घ्यायचो. ही धावपळ बरेच दिवस सुरू होती."

'शोले'चे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि दीवारचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी नंतर एकदा सांगितलं होतं की, दिवसभरात दोन शिफ्ट केल्यानंतरही अमिताभ कधीही कोणत्याही शूटिंगसाठी उशीरा आले नाहीत.

जेव्हा 'शोले'चं शूटिंग संपलं, तेव्हा यश चोप्रांनी 'दीवार'सोबत 'कभी-कभी'चं शूटिंग सुरू केलं.

क्लासिक चित्रपटांच्या यादीत

'दीवार'ला व्यावसायिक यश तर मिळालंच होतं, पण त्याचसोबत समीक्षकांची पसंतीही मिळाली.

स्टीव्हन जे श्नीडर यांनी आपल्या '1001 मुव्हीज यू मस्ट सी बिफ़ोर यू डाय' च्या यादीमध्ये ज्या तीन हिंदी चित्रपटांचा समावेश केला होता, त्यांपैकी एक 'दीवार' होता.

'फ़ोर्ब्स' मासिकानं भारती सिनेमाच्या इतिहासातील 25 सर्वश्रेष्ठ अभिनय प्रदर्शनाच्या यादीत अमिताभ बच्चन यांच्या 'दीवार'मधील भूमिकेचा समावेश केला. 'दीवार' जवळपास शंभर आठवडे चालला होता आणि त्याला क्लासिक सिनेमाचा दर्जा दिला गेला.

याचं एक कारण म्हणजे या चित्रपटाने अनेक पारंपरिक चौकटी मोडल्या होत्या.

सिनेमात दोनच गाणी होती. चित्रपटाचा हिरो हा खरं तर 'अँटी हिरो' होता, रोमान्ससाठी फारसा स्कोप नव्हता, हिरोईनचा रोलही छोटा होता आणि ती भूमिकाही आदर्श मुलीची वगैरे नव्हती.

अमिताभ बच्चन य़ांनी म्हटलं होतं, "जेव्हा मी 'दीवार'ची कथा ऐकली तेव्हा त्या काळाचा विचार करता ज्यापद्धतीने चित्रपट केला जात होता, ते मला आवडलं. यशजींना सौंदर्य, निसर्ग आणि रोमान्स आवडायचा. त्यांना नेहमी फुलांचे गुच्छ आवडायचे. त्यामुळे 'दीवार' बनवणं त्यांच्यासाठी किती कठीण गेलं असेल, हे मी समजू शकतो."

गुलशन राय यांना सिनेमात इतकी कमी गाणी आहेत, हे पटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी खूप आग्रह करून सिनेमात एक सूफी गाणं घ्यायला. यश चोप्रांना सुरूवातीला ही गोष्ट आवडली नव्हती, पण त्यांनी गुलशन राय यांचं म्हणणं ऐकलं.

'दीवार'मध्ये 'जोशीला' चित्रपटासाठी तयार केलेलं टायटल म्युझिक वापरण्यात आलं. नंतर हेच म्युझिक याराना सिनेमामध्येही पुन्हा वापरलं गेलं.

राजेश खन्ना आणि नवीन निश्चल होते यश चोप्रांची पहिली पसंती

यश चोप्रांनी जेव्हा 'दीवार'ची स्क्रीप्ट ऐकली, तेव्हा ते 'गर्दिश' नावाचा सिनेमा बनवत होते. मात्र, त्यांना 'दीवार'ची कथा इतकी आवडली, की त्यांनी 'गर्दिश' सिनेमाचं शूटिंग थांबवलं.

आपण जर वेळ लावला तर 'दीवार'ची स्क्रीप्ट दुसऱ्या कोणाच्या हातात जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती.

यश चोप्रांनी सुरूवातीला विजयच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना आणि रवीच्या भूमिकेसाठी नवीन निश्चल ही नावं निश्चित केली होती. आईच्या भूमिकेसाठी त्यांच्या डोक्यात वैजयंतीमालाचं नाव होतं.

पण याच दरम्यान लेखक सलीम-जावेद यांचा राजेश खन्नासोबत वाद झाला. त्यामुळे हा चित्रपट राजेश खन्नाला मिळू नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करायला सुरूवात केली.

या चित्रपटात राजेश खन्ना नाहीये, हे कळल्यानंतर नवीन निश्चल आणि वैजयंतीमालानेही फार उत्सुकता दाखवली नाही.

त्यानंतर यश चोप्रांनी विजयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चनची निवड केली.

आईची भूमिका त्यांनी जवळपास वहीदा रहमान यांना ऑफर केलीच होती, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याच 'कभी कभी' चित्रपटात वहिदा या अमिताभची प्रेमिका आहेत. त्यामुळे या 'दीवार'मध्ये या दोघांना प्रेक्षक कदाचित आई-मुलाच्या भूमिकेत स्वीकारणार नाहीत, असा विचार त्यांनी केला.

'मदर इंडिया' शी मिळती जुळती कल्पना

एका समीक्षकांनी 'दीवार'मध्ये अनेक त्रुटी काढल्या होत्या. 'दीवार'ची कथा आणि चित्रपट बनवण्याची पद्धत 'मदर इंडिया'सारखीच असल्याचं त्यांनी म्हटलं असेल.

सिनेमाची कथा फ्लॅशबॅकमधून उलगडते. पतीशिवाय एका स्त्रीला आपल्या दोन मुलांना वाढवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तिचा एक मुलगा सरळमार्गी आहे, तर दुसरा कायदा हातात घेणारा आहे. आईचं खरंतर आपल्या बिघडलेल्या मुलावर जास्त प्रेम आहे, पण तिला आपल्या धाकट्या मुलासोबत जावं लागतं.

'दीवार'ची कल्पना ही खूपशी 'मदर इंडिया'शी मिळतीजुळती होती, पण सलीम-जावेद यांनी त्याला समकालीन टच दिला होता. खरंतर निरुपा रॉय नर्गिसइतक्या मोठ्या स्टार नव्हत्या, पण त्यांनी एका आदर्श आईची भूमिका सशक्तपणे निभावली.

चित्रपटाच्या शेवटी जेव्हा आई आजारी पडते, तेव्हा वाईट मार्गाला गेलेला विजय प्रार्थना करण्यासाठी त्याच मंदिरात जातो, जिथे जायला तो कधीही तयार नसायचा. जेव्हा हे दृश्य चित्रित केलं जात होतं, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रांना विनंती केली की, जेव्हा हा सीन शूट होईल तेव्हा सेटवर कोणी उपस्थित नसावं.

हा सीन रात्री शूट केला गेला आणि 15 टेकनंतर यश चोप्रांनी हा शॉट ओके केला.

या सिनेमातलं अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूचा सीन खूप गाजला. पण विशेष म्हणजे या सीनसाठी कोणताही डायलॉग लिहिला गेला नव्हता. यश चोप्रांच्या परवानगीने अमिताभने हा संपूर्ण सीन 'अॅडलिब' करून दिला.

सिनेमातली काही दृश्यं 1954 साली प्रदर्शित झालेल्या एलिया कजान यांच्या 'ऑन द वॉटरफ़्रंट' सिनेमातील दृश्यांशी मिळती जुळती होती.

'मेरे पास माँ है'

'मदर इंडिया'मध्ये चुकीच्या मार्गाला लागलेला बिरजू आपल्या आईच्या हातून मारला जातो. सिनेमात आईची भूमिका मुख्य होती. दीवारमध्ये मुख्य पात्र मुलाचं, विजयचं आहे.

विजयशी मतभेद झाल्यानंतर त्याची आई आणि भाऊ त्याच्यापासून वेगळे राहात होते. विजय आणि रवीची भेट एका पुलाखाली होते. मागे ' सारे जहाँ से अच्छा , हिंदोस्ताँ हमारा' हे गाणं वाजत असतं.

विजय रवीला सांगतो की, त्यानं दुसऱ्या एखाद्या केसवर काम करावं. मात्र रवी साफ नकार देतो.

त्यावेळी विजय त्याचा प्रसिद्ध डायलॉग म्हणतो, "तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श ! तुम्हारे सारे उसूलों को गूँध कर एक वक़्त की रोटी नहीं बनाई जा सकती है रवि. क्या दिया है तुम्हारे उन आदर्शों ने ? एक चार पाँच सौ रुपए की पुलिस की नौकरी. एक किराए का क्वार्टर, एक ड्यूटी की जीप, दो जोड़ी ख़ाकी वर्दी. आज मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास?"

या मोठ्या डायलॉगला रवीचं ते प्रसिद्ध प्रत्युत्तर येतं- 'मेरे पास माँ है.'

सलीम-जावेदचं नशीब पालटलं

'दीवार' सिनेमातल्या मंदिरातल्या दृश्याची खूप चर्चा झाली होती.

विजय शंकरांबद्दल आपली नाराजी व्यक्त करतो, त्या दृश्याबद्दल जावेद अख्तर यांनी सांगितलं, "जेव्हा या दृश्याचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा आम्ही अमिताभसोबत बोललो. ते ज्यापद्धतीने संवाद बोलत होते, त्यात काहीसा कोरडेपणा आहे असं आम्हाला वाटत होतं. पण अमिताभ यांना हे पूर्णपणे पटत नव्हतं.

अमिताभ यांनी म्हटलं की, जर मी डायलॉग हळू आवाजात बोलत असेन तर या सीनदरम्यान कुठे ना कुठे तरी मला माझ्या आवाजाची पट्टी वाढवावी लागेल. त्यामुळे मी विचार केला की, आधीच मी आवाज चढा ठेवतो आणि मग हळूहळू खालच्या पट्टीत बोलतो. माझ्या मते हा विचार योग्य ठरला. अमिताभचं बरोबर होतं."

हा सीन शूट करण्याआधी अमिताभ बच्चन यांनी आरशासमोर उभं राहून खूप तालीम केली होती. अमिताभ यांनी मुद्दामहून या सीनचं डबिंग केलं नव्हतं, कारण डबिंगमध्ये ते या सगळ्या भावना पुन्हा आणू शकणार नाहीत आणि डबिंगमध्ये या दृश्याचा परिणाम कमी होईल.

या सिनेमानंतर सलीम-जावेद यांनी आपलं मानधन 8 लाख रुपये केलं होतं. ते कोणत्याही कथा-पटकथाकारांसाठी सर्वाधिक होतं.

सलीम-जावेद यांनी जेव्हा यश चोप्रांना आपली कथा सुरुवातीला जेव्हा ऐकवली होती, तेव्हा त्यांनी मानधन म्हणून एक लाख रुपये मागितले होते. पण यश चोप्रांनी ते द्यायला नकार दिला. मात्र, 'ज़ंजीर' हिट झाल्यानंतर सलीम-जावेद यांनी आपलं मानधन वाढवून तीन लाख केलं. यश चोप्राही हे मानधान द्यायला तयार झाले होते.

1973 साली प्रदर्शित झालेल्या 'ज़ंजीर' ने अमिताभ बच्चनला अँग्री यंग मॅनची प्रतिमा दिली, पण 'दीवार'ने अमिताभला एकदम 'सेंटर स्टेज' ला आणलं.

अमिताभ बच्चनचा हटके लूक

या चित्रपटात अमिताभ बच्चनचा मजूराच्या भूमिकेतला लूक आहे. यामध्ये अमिताभने शर्टला गाठ मारलेली दिसते.

अमिताभला या सीनसाठी जो शर्ट दिला होता, तो जास्तच लांब होता. अगदी गुडघ्यापर्यंत येत होता. त्यावेळी मग अमिताभने त्या शर्टला गाठ मारली आणि तो घातला.

'दीवार'मधला अमिताभ बच्चनची भूमिका स्मगलर हाजी मस्तान यांच्या आयुष्याशी बरीचशी मिळतीजुळती होती. त्यामुळे भूमिका समजावून घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी अनेकदा हाजी मस्तानची भेट घेतली होती.

याच सिनेमातली मदन पुरींची भूमिका ही मस्तानचा प्रतिस्पर्धी सुकूर नारायण बखियाच्या आयुष्यावर बेतलेली होती.

70 आणि 80 च्या दशकात 'दीवार' त्या 13 चित्रपटांपैकी एक होता, ज्यांनी पूर्ण देशभरातील प्रत्येक टेरेटरीमध्ये 1 कोटीहून अधिकची कमाई केली होती.

दीवारला त्यावर्षी अनेक पुरस्कार मिळाले. मात्र करिअरमधला तेव्हापर्यंतचा उत्तम अभिनय करूनही अमिताभ बच्चनला 'फिल्मफेअर'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही. त्यावर्षी तो पुरस्कार 'आँधी' चित्रपटासाठी संजीव कुमार यांना मिळाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)