आर के, यशराज ते धर्मा : प्रॉडक्शन हाऊसची नावं आणि लोगोंबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी

प्रेमकथा आणि कौटुंबिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दिग्दर्शक करण जोहर यांच्या 'धर्मा प्रॉडक्शन्स' या संस्थेने नुकताच आपला सोनेरी लोगो बदलून काळा केला.

धर्मा प्रॉडक्शन्सच्या आगामी 'भूत - पार्ट वन : द हॉन्टेड शिप' या सिनेमाच्या निमित्ताने हा बदल करण्यात आला आहे.

नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडत आता ही फिल्म कंपनी वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत असल्याची ही खूण होती. त्यासाठी त्यांनी लोगोचा रंग बदलला आणि ट्विटर बायोमध्ये बदल करत लिहीलं - 'डार्क टाईम्स बिगीन नाऊ...' आणि त्याची सोशल मीडियावर भरपूर चर्चाही झाली.

पण या प्रसिद्ध सिनेमा कंपन्यांची नावं आणि त्यांचे लोगो ठरवण्यात आले तरी कसे?

'हम आपके हैं कौन' सारखा चित्रपट तयार करणाऱ्या राजश्री फिल्म्सचं नाव कसं पडलं? 'यशराज फिल्म्स'च्या नावातलं 'यश' हे नाव यश चोप्रांचं असेल, तर मग 'राज' कोण आहे?

दीपिकाच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव 'का प्रॉडक्शन्स' असं का?

'का प्रॉडक्शन्स'... दीपिका पदुकोणने सुरू केलेली ही फिल्म निर्मिती संस्था. 'छपाक' हा कंपनीचा आणि दीपिकाचाही निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता.

दीपिकानं या नावाबद्दल सांगितलं, 'का' म्हणजे अंतरात्मा. तुमच्या शरीराचा असा एक हिस्सा जो तुम्ही गेल्यानंतरही या जगात राहतो. मलाही कदाचित हेच हवंय. मी गेल्यानंतरही माझं काम राहावं आणि असं काहीतरी करावं ज्यामुळे लोक मला लक्षात ठेवतील.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जितका खर्च आला त्यापेक्षा 'छपाक'ने जास्त कमाई केली आणि हा चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरला.

अॅसिड हल्ल्यातून उभ्या राहिलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित 'छपाक' या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलंय.

'राजश्री फिल्म्स' हे नाव कसं सुचलं?

सूरज बडजात्यांची 'राजश्री फिल्म्स' या कंपनीने 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन'आणि 'हम साथ साथ है'सारखे कौटुंबिक चित्रपट केले आहेत.

ताराचंद बडजात्या यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यांचा मुलगा कमल बडजात्या यांनी कंपनीच्या नावाबद्दल सांगितलं, "कंपनीचं नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा सुरुवातीला 'राज-कमल' नाव द्यायचं ठरलं. माझं नाव 'कमल' आणि माझ्या भावाचं नाव 'राज'. पण नंतर माझ्या बहिणीच्या नावावरून प्रॉडक्शनचं नाव 'राजश्री' ठेवण्यात आलं."

राजश्रीच्या फिल्म्स सुरू होताना आधी सरस्वती देवीचा फोटो येतो.

याविषयी कमल सांगतात, "माझ्या वडिलांची सरस्वतीवर श्रद्धा होती. संपूर्ण कुटुंबानं पाहता येतील अशाच चित्रपटांच्या निर्मितीबद्दल ते आग्रही होते."

आरके फिल्म्सच्या 'त्या' प्रसिद्ध लोगोची गोष्ट

राज कपूर यांनी 1948 मध्ये आरके फिल्म्सची सुरुवात केली. राज कपूर आणि नर्गिस यांनी आरके फिल्म आणि स्टुडिओजसाठी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आणि ते या कंपनीची ओळख बनले.

या दोघांमधलं नातंही चर्चेचा विषय होतं.

आरके फिल्म्स अॅण्ड स्टुडिओजचा पहिला चित्रपट 'आग' फारसा चालला नाही. पण या बॅनरचा दुसरा चित्रपट 'बरसात' यशस्वी झाला.

1949 मध्ये आलेल्या या 'बरसात'च्या पोस्टवर एक फोटो होता. यामध्ये राज कपूर यांच्या एका हातात व्हायोलिन होतं आणि दुसऱ्या हाताने नर्गिस यांना पकडलं होतं.

हेच पोस्टर पुढे आरके फिल्म्सचा लोगो बनलं. या कंपनीने निर्मिती केलेल्या चित्रपटांच्या सुरुवातीला हाच लोगो येतो.

यशराज प्रॉडक्शन्स मधलं 'राज' कुठून आलं?

'दाग' या सिनेमापासून 'यशराज फिल्म्स'ची सुरुवात झाली. 1973 मध्ये आलेला 'दाग' निर्माता म्हणून यश चोप्रांचा पहिला चित्रपट होता.

हा सिनेमा संपतो तेव्हा नायकासोबत दोन्ही नायिका घरी जातात. यामुळेच त्या काळाच्या दृष्टीने हा चित्रपट धाडसी होता.

पण यश चोप्रांचा या चित्रपटावर विश्वास होता आणि राजेश खन्नांचा यश चोप्रांवर.

असं म्हटलं जातं, की हा चित्रपट तयार होण्यामध्ये राजेश खन्नांचं योगदान मोठं होतं. म्हणूनच 'यशराज'मधील 'राज' हे राजेश खन्नांसाठी असल्याचं सांगितलं जातं.

बॉम्बे टॉकीज- मूकपटांपासून बोलपटांपर्यंतचा प्रवास

मूकपटांपासून ते बोलपटांपर्यंत चित्रपटांचा प्रवास पाहणारी निर्मिती संस्था म्हणजे बॉम्बे टॉकीज.

हिमांशु राय, देविका राणी आणि राज नारायण दुबे यांनी 'बॉम्बे टॉकीज'ची स्थापना केली होती.

1934 मध्ये बॉम्बे टॉकीजला सुरुवात झाली. याच्या लोगोमध्ये हिमांशु राय आणि राज नारायण दुबेंचा फोटो आहे.

राज नारायण दुबे मोठे व्यापारी होते आणि त्यांनीच या निर्मिती संस्थेत पैसा ओतला होता. हिमांशु राय हे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.

रविंद्रनाथ टागोरांच्या नातेवाईक असणाऱ्या देविका राणींसोबत राय यांनी नंतर लग्न केलं.

राज कपूर, सत्यजीत रे, बिमल रॉय आणि किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांनीही या प्रॉडक्शन हाऊससोबत काम केलेलं आहे.

परदेशी फिल्म कंपन्यांचे लोगो

इंग्रजी फिल्म्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या लोगोंमागच्या कहाण्या आणि कल्पना तर विलक्षण आहेत.

चित्रपट समीक्षक अर्णब बॅनर्जी सांगतात, "MGMच्या लोगोमध्ये एक सिंह आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा लोगो तयार करण्यात आला होता. या कंपनीचे मुख्य हार्वर्ड डाइट्स यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं होतं आणि त्याच्याच बोधचिन्हापासून प्रेरणा घेत त्यांनी MGMच्या लोगोतही एक सिंह वापरला. तो मूकपटांचा काळ होता आणि सिनेमामध्ये आवाज येईपर्यंत म्हणजे 1928पर्यंत या सिंहाची डरकाळी ऐकू येत नव्हती."

काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी वर्षानुवर्षं आपली ओळख बदलली नाहीत. तर काही कंपन्या काळानुसार बदलत राहिल्या. यशराज आणि राजश्रीसारख्या जुन्या संस्था आजही चित्रपट निर्मिती करत आहेत. तर काही फिल्म संस्था काळाच्या ओघात बंद झाल्या.

मुंबईतल्या चेंबूरमध्ये असणाऱ्या 'आरके फिल्म्स'चा शेवटचा चित्रपट होता 1999मध्ये प्रदर्शित झालेला 'आ अब लौट चले.'

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)