You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Chhapak: अॅसिड हल्ला पीडितेचं दुःख आणि तळमळ सिनेमातून खरंच व्यक्त होते का?
- Author, वंदना
- Role, भारतीय भाषांच्या टीव्ही एडिटर, बीबीसी
''फॉर्ममध्ये' अॅसिड हल्ल्याची कॅटेगरी नाही ना' मुलाखत द्यायला आलेल्या एका मुलीचा जळालेला चेहरा बघून संकोचलेला कंपनीचा बॉस तिला जेव्हा विचारतो की, तू मुलाखतीच्या फॉर्ममध्ये जळालेल्या चेहऱ्याविषयी माहिती का दिली नाहीस. त्यावेळी त्या तरुणीने दिलेलं हे उत्तर तुम्हाला निरुत्तर करतं.
अशाच एका लढवय्या तरुणीची कहाणी आहे 'छपाक'. खऱ्या आयुष्यात अॅसिड हल्ला झेललेल्या लक्ष्मी अग्रवालच्या संघर्षाची कहाणी छपाक सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मेघना गुलजार आणि दीपिका पदुकोण यांनी.
"कोई चेहरा मिटा के और आँख से हटा के
चंद छींटे उडा के जो गया...
छपाक से पहचान ले गया..."
अरीजीतने गायलेलं हे गाणं छपाक सिनेमाचा आत्मा शब्दातून व्यक्त करतो आणि सांगतो की अॅसिडचे काही थेंब एखाद्याची ओळख आणि आयुष्य कायमचं बदलून टाकतात.
सौंदर्याच्या निकषांपासून लांब एका नायिकेचा जळालेला चेहरा आणि आत्मा दाखवणारा हा सिनेमा बहादूर म्हणता येईल. पण महान नाही.
सिनेमात पुरूषी मानसिकतेचंही दर्शन
अॅसिड हल्ल्यात आपला चेहरा, कान, नाक सगळंच गमावून बसलेल्या मालतीची निराशा, तिची अस्वस्थता दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दीपिकाने केला आहे.
उदाहरणार्थ एका दृश्यात दाखवलं आहे की हल्ल्यानंतर खचून गेलेल्या मालतीला (दीपिका) आपलं सगळं जुनं सामान, चमकीचे कपडे, झुमके फेकून द्यावेसे वाटतात.
आई थांबवते तेव्हा मालती रागाने म्हणते, "नाक नाही, कान नाही. झुमके कुठे घालू?"
खरंतर ती स्वतःलाच टोमणा देत असते. मात्र, या टीकेचा भार तुम्ही स्वतःच्या खांद्यावर अनुभवता. ऑपरेशननंतर दीपिकाच्या कानात घातलेला एक छोटासा झुमका बरंच काही सांगून जातो.
सिनेमात विक्रांत मेसीने उत्कृष्ट अभिनय केला आहे. सिनेमात तो आधी मालतीचा सहकारी असतो. पुढे मित्र होतो आणि नंतर जोडीदार. दोघांमधलं कडू-गोड नातं विक्रांतने अत्यंत सुंदरपणे साकारलं आहे. बरेचदा आपल्या मौनातून तर कधी डोळ्यातून.
सिनेमात केवळ अॅसिड हल्ला नाही तर समाजाची पुरूषी मानसिकता, दुबळी न्यायव्यवस्था आणि संवेदनशून्यताही दाखवली आहे.
एका दृश्यात अॅसिड हल्ल्यानंतर पोलीस मालतीचा मोबाईल तपासतात तेव्हा त्यातले बरेचसे मेसेजेस मुलांचे असतात.
अॅसिड हल्ल्यानंतर असह्य वेदनेने तडपणाऱ्या मालतीप्रती सहानुभूती दाखवण्याऐवजी पोलीस प्रश्न विचारतात की तू मुलींच्या शाळेत शिकत असताना इतक्या मुलांशी मैत्री कशी झाली. ही तीच गलिच्छ विचारसरणी आहे जी गुन्हा घडल्यानंतर मुलीलाच दोषी ठरवते.
राजी सिनेमा असो, फिलहाल असो किंवा मग तलवार... दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या सिनेमांमध्ये स्त्री पात्राला कायमच महत्त्व देण्यात आलं आहे. छपाकमध्येही तेच दिसतं.
अॅसिड हल्ला पीडितेचं दुःख
सिनेमा अॅसिड हल्ला पीडितेचं दुःख आणि तळमळ दाखवतो. मात्र, यात पीडिता कुठेच बिचारी वाटत नाही, हे या सिनेमाचं वैशिष्ट्यं आहे.
प्रेमात पहिलं पाऊल तीच उचलते. कठोर स्वभावाच्या विक्रांत मेसीला सगळेच घाबरतात. मात्र, तीच त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी बोलते.
आयुष्याने आपल्यावर अन्याय केला, हे ठाऊक असूनही कायम व्हिक्टिम झोनमध्ये राहणं आणि कायम त्याचा भार वाहणं, तिला पसंत नाही.
आपल्या एनजीओमध्ये एका छोट्याशा यशाबद्दल पार्टी करणाऱ्या दीपिकावर जेव्हा विक्रांत ओरडतो आणि पार्टी थांबवतो तेव्हा ती न घाबरता त्याला म्हणते, "तुमचा प्रॉबलम हा आहे की तुम्हाला वाटतं घटना तुमच्याबरोबर घडली आहे. पण अॅसिड हल्ला माझ्यावर झाला आहे. आज मी खूश आहे आणि मला पार्टी करायची आहे."
मात्र, प्रामाणिक प्रयत्न करूनही हा सिनेमा तुमच्या मनात ते घर करू शकत नाही, जेवढी या कथानकाची ताकद आहे.
दीपिकाने मेहनत घेतली आहे. मात्र, तरीदेखील मालतीच्या भूमिकेच्या बारीक-सारिक बाबी आणि खोली दीपिका गाठू शकलेली नाही, असं वाटतं.
या सिनेमासोबत हिंदी सिनेमांच्या महिला निर्मात्यांच्या यादीत दीपिका पदुकोण हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. दीपिकाने फॉक्स स्टुडियोसोबत मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.
2019 मध्ये 'उयारे' नावाचा एक मलयाळम सिनेमा आला होता. अॅसिड हल्ला झालेल्या एका तरुण महिला पायलटची ती कहाणी होती.
कामानिमित्त गेल्या काही वर्षात अशा अनेक तरुणींना जाणून घेण्याची संधी मिळाली ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाले आहेत. काहींचं शरीर जळालं तर काहींनी दृष्टी गमावली.
अशा लोकांशी बोलल्यानंतर मला हेच जाणवलं की 'उयारे' आणि 'छपाक' सारखे सिनेमे अशा हल्ल्यांचा सामना करणाऱ्यांमध्ये आशेचा किरण जागवतात. त्यांना वाटतं की कुणीतरी आपल्यासाठी आवाज बुलंद करत आहे.
छपाक बघितल्यानंतर एक मात्र जाणवतं की सिनेमा याहून अधिक गहिरा आणि उत्तम करता आला असता. असं वाटतं की कहाणी सुरू झाली. मात्र काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या.
अगदी तसंच जसं जेएनयूमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला दीपिका गेली खरी. पण तिथे काहीही बोलली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)