You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया युक्रेन युद्ध : खारकीव्ह प्रांतात युक्रेनची मुसंडी, पण पुढे काय?
- Author, जाह्नवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
युक्रेनमधलं युद्ध पुन्हा चर्चेत आहे. अनेक महिन्यानंतर इथे सैनिकी हालचालींनी वेग घेतला आहे आणि गेल्या आठवडाभरात तर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.
युक्रेनने दावा केलाय की त्यांनी आपल्या खारकीव्ह प्रांतामधला एक मोठा हिस्सा रशियान सैन्याच्या ताब्यातून परत मिळवलाय, तर रशियाचं म्हणणंय की त्यांच्या सैन्यानं पुन्हा जुळवाजुळव सुरू केलीय आणि त्यासाठीच ते मागे फिरले आहेत.
युक्रेनमध्ये नेमकं काय घडतंय, त्याचे काय पडसाद उमटतायत, हे युद्ध कधी थांबू शकतं?
सहा महिन्यांत परिस्थिती बदलली
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियानं युक्रेनच्या पूर्व भागात आपलं लष्कर उतरवत सैनिकी कारवाई सुरू केलीआणि राजधानी किएव्हसह मोठ्या शहरांवर हवाई हल्ला केला. युद्ध सुरू झालं तर रशिया आठवडाभरात युक्रेनचा मोठा भाग आपल्या ताब्यात घेईल असं भाकित त्याआधी अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. पण प्रत्यक्षात आता दोनशे दिवस, म्हणजे सहा महिन्यांहून अधिक काळ उलटल्यावरही हे युद्ध संपलेलं नाही.
रशियाला या देशाच्या पूर्व भागातील एका मोठ्या प्रदेशावर नियंत्रण मिळालं, पण युक्रेनी फौजांनीही कडवा प्रतिकार केला आणि आक्रमण थोपवून धरलं. त्यानंतर गेल्या चार-पाच महिन्यांत इथे बुद्धिबळातल्या स्टेलमेटसारखी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे कुणी पुढे जाऊ शकत नव्हतं किंवा मागे हटत नव्हतं. पण सप्टेंबरमध्ये परिस्थिती बदलली आहे.
6 सप्टेंबरला युक्रेनच्या सैन्यानं आक्रमक पवित्रा घेत खारकीव्ह प्रांतात मोहीम म्हणजे खारकीव्ह ऑफेन्सिव्हला सुरूवात केली. युक्रेननं आता खारकीव्ह प्रांतात अनेक मोक्याच्या ठिकाणांवर परत ताबा मिळवला आहे तर रशियन सैन्यानं इथून घाईघाईत माघार घेतल्याचं चित्र दिसतंय.
युक्रेननं कुठे यश मिळवलं आहे?
पूर्व युक्रेनमधलं इझियुम हे मोक्याचं आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं शहरही युक्रेननं परत मिळवलं आहे. 1 एप्रिलला रशियानं इझियुम ताब्यात घेतलं होतं. या शहरातून ब्लॅक सी म्हणजे काळ्या समुद्राकडे जाण्याचा महत्त्वाचा मार्ग जातो.
तसंच हे शहर म्हणजे युक्रेनमधल्या डोनबास या रशियन भाषिक प्रांतात जाण्याचा दरवाजाच आहे. डोनबासला युक्रेनमधून तोडणं हे रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामागचं प्रमुख उद्दिष्ट होतं. पण आता हे शहर पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आलं आहे.
इझियमला रसद पुरवणारं कुपियान्स्क हे रेल्वेमार्गावरचं महत्त्वाचं शहरही रशियाच्या हातून निसटलं आहे. इथे युक्रेनच्या सैन्यानं आधी रशियन सैन्याची रसद तोडली होती आणि त्यांना कोंडीत पकडलं. त्यामुळे रशियाच्या फौजांना शस्त्रास्त्रांचे मोठे साठे मागे ठेवून माघार घ्यावी लागली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या देशानं साधारण 2000 चौरस किलोमीटर प्रदेशावर पुन्हा ताबा मिळवल्याचं शनिवारी जाहीर केलं होतं. आता हा आकडा 3000 चौरस किलोमीटरवर पोहोचला आहे.
देशाच्या दक्षिण भागातील खेरसन प्रांतातही 500 चौरस किलोमीटरचं क्षेत्र परत मिळवल्याचा दावा युक्रेनच्या सैन्यानं केला आहे. गेल्या 24 तासांत 20 गावं पुन्हा ताब्यात मिळवल्याचंही युक्रेननं सांगितलं आहे.
पण यातली कुठलीच आकडेवारी बीबीसीला पडताळून पाहता आलेली नाही, कारण सध्या लढाई सुरू असलेल्या प्रांतात कुठल्याच पत्रकारांना प्रवेश नाही.
रशियाचं म्हणणं काय आहे?
रशियानं खारकीव्हच्या बहुतांश भागातून आपले सैनिक मागे घेतल्याचं मान्य केलं आहे. 11 सप्टेंबरला त्यांच्या संरक्षण मंत्रालयानं तसं जाहीरही केलं. रशियानं अधिकृतरित्या कुठेही आपण माघार घेत असल्याचं म्हटलेलं नाही, तर सैन्याची नव्यानं जुळवाजुळव सुरू असल्याचं त्यांच्या संरक्षण मंत्रालयानं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं.
गेल्या आठवड्यात खारकीव्ह प्रांतात दर एका रशियन सैनिकामागे आठ युक्रेनी सैनिक अशी स्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती तिथे असलेल्या एका रशियन अधिकाऱ्यानं दिली आहे. व्हिटाली गांचेव्ह यांनी रशियन टीव्हीला माहिती देताना सांगितलं आहे की युक्रेनच्या सैन्यानं देशाच्या उत्तर भागातील काही गावं ताब्यात घेतली आहेत आणि सीमा ओलांडून रशियात प्रवेशही केला आहे.
इझियमच्या पाडावानंतर रशियाला खारकीव्ह प्रांतातून डोनबासमध्ये आपले सैनिक हलवावे लागत आहेत, त्यामुळे खारकीव्हमध्येही त्यांची ताकद सध्या कमी झाली आहे असं या युद्धावर बारकाईन लक्ष ठेवून असणारे जाणकार सांगतात.
रॉयल युनायटेड सर्व्हिसेसचे माजी संचालक प्राध्यापक मायकल क्लार्क सांगतात की, "आपण रशियाला फक्त कमजोर पडलेलं पाहात नाहीये, तर इथे त्यांचा पराभव होताना पाहतो आहोत. हा या युद्धातला एक टर्निंग पॉइंटही आहे."
पुढे काय होऊ शकतं?
एकूणच युक्रेनला गेल्या काही दिवसांत मिळालेलं यश हा रशियासाठी विशेषतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय, तर युक्रेननं त्यांचं सैन्य शत्रूला केवळ थोपवू शकत नाही, तर त्यांना हरवूही शकतं हे दाखवून दिलं आहे.
पण म्हणजे युक्रेन जिंकत आहे, असं म्हणता येणार नाही.
खारकीव्ह प्रांतात रशिया सध्या बॅकफूटवर आहे. पण तिथे युक्रेननं परत मिळवलेल्या भागांमध्ये त्यांनी हवाई हल्ले कायम ठेवले आहेत. पण रशिया केवळ सरकारी आणि लष्करी कार्यालयांवर नाही, तर नागरी सुविधांवरही मिसाईल दागत असल्याचा आरोप केला जातो आहे.
गेल्या दोन दिवसांत खारकीव्ह, इझियुम, कुपियान्स्क परिसरातल्या औष्णिक विद्युत केंद्रासह महत्त्वाच्या ठिकाणांवर रशियाकडून मिसाईल हल्ले झाले आहेत. त्यामुळे खारकीव्ह आणि दोनेत्स्क प्रांतात अनेक ठिकाणी वीज आणि पाणीपुरवठा पूर्णपणे थांबला आणि लाखो लोकांना याचा फटका बसला आहे.
युक्रेनचा एक पंचमांश भाग अजूनही रशियाच्या ताब्यात आहे.
त्यामुळे हे युद्ध इतक्यात संपेल किंवा काही वाटाघाटी होतील, अशी चिन्हं सध्यातरी दिसत नाहीयेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)