सोयाबीन आणि कापसाला यंदा किती भाव मिळणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"मी गेल्या वर्षीची सोयाबीन साठवून ठेवली आहे. यंदा अधिक चांगला भाव मिळेल अशी आशा आहे. 8 हजारांपर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. "
गणेश सानप सांगत होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही शेतीविषयी चर्चा करत होतो. त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा बोलून दाखवली.
याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये कापूस आणि सोयाबीन शेतमालांना यंदा विक्रमी भाव मिळणार, अशा बातम्या आल्या आहेत.
कापसाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच 10 हजार रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाल्याचीही बातमी आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनला प्रती क्विंटल 11,501 रुपये दर मिळाल्याच्या पावत्याही व्हायरल झाल्या होत्या.
त्यामुळे मग कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात या दोन्ही शेतमालाच्या दराविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अशापरिस्थिती, महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीनला विक्रमी भाव मिळेल का, हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत.
कापूस, सोयाबीन 10 हजार पार
Agmarknet ही भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर देशभरातील बाजारपेठांमधील पिकांचे बाजारभाव पाहता येतात.
या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2022 चा विचार केल्यास सध्या देशभरात कापसाला प्रती क्विंटल सरासरी 9 हजार 492 रुपये इतका दर मिळत आहे.
सर्वाधिक दर गुजरातमध्ये मिळत असून तो प्रती क्विंटल 10 हजार 303 रुपये एवढा आहे.
महाराष्ट्रात सध्या कापूस बाजारपेठेत विक्रीसाठी न आल्यानं राज्यातील दर या वेबसाईटवर देण्यात आलेला नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
देशपातळीवर सोयाबीनला सध्याच्या घडीला सरासरी 5 हजार 692 प्रती क्विंटल एवढा दर मिळत आहे.
सर्वाधिक दर मणिपूर इथं मिळत असून तो प्रती क्विंटल 9 हजार 422 रुपये इतका आहे. या महिन्यात सोयाबीनला महाराष्ट्रात प्रती क्विंटल सरासरी 5 हजार 31 रुपये इतका दर मिळत आहे.
सर्वाधिक बाजारभाव कुठे?
या वेबसाईटवरील 7 सप्टेंबर रोजी प्रकाशित अहवाल पाहिल्यास, मणिपूरमध्ये सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.
7 सप्टेंबर रोजी मणिपूरच्या बिशेनपूर आणि इम्फाळमध्ये सोयाबीनला कमाल 10 हजार रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला आहे.
त्याखालोल महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथं 6 हजार 301 रुपये प्रती क्विंटल दरानं सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.
कापसाचा विचार केल्यास, गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातल्या विसनगर येथे कापसाला सर्वाधिक कमाल 17 हजार 555 इतका दर मिळाला आहे.
त्याखालोखाल मध्यप्रदेशच्या खरगोन इथं कापूस प्रती क्विंटल 12 हजार रुपये दरानं खरेदी केला जात आहे.
महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्र वाढलं
यंदा महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
महाराष्ट्राच्या कृषी सांख्यिकी विभागानं बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात 46.01 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती.
यंदा त्यात तब्बल 2 लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. यंदा राज्यात सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्र 48.76 लाख हेक्टर एवढं आहे.
गेल्या वर्षी 39.37 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती.
यंदा त्यात 3 लाख हेक्टरनं वाढ झाली असून सध्यस्थितीत कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र 42 लाख 29 हजार हेक्टर एवढं आहे.
राज्यात सध्या सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिकं शेतातच आहेत. जवळपास महिन्याभरानं ते मार्केटमध्ये विक्रीसाठी येतील.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे मग राज्यात या दोन्ही पिकांना किती भाव मिळण्याची शक्यता आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
त्यांच्या मते, "यंदा भारत देश तेलाची किती दरानं आयात करेल आणि सोया डीओसीची विक्री किती दराने करेल, यानुसार सोयाबीनचा दर ठरेल. सध्या देशात 550 डॉलर प्रती टन या दरानं डीओसीची निर्यात करता येते. या हिशेबानं सोयाबीनचा दर 5 हजार 500 रुपये प्रती क्विंटल इतका निघतो. त्यामुळे मग यंदा सोयाबीनचा दर पाच ते साडेपाच हजार राहिल. पण, 5 हजारांच्या खाली भाव जाण्याइतपत वाईट स्थिती दिसत नाही."
"क्वालिटी माल असेल तर साडेपाच हजार आणि ओला माल असेल तर साडे चार हजार रुपयेही दर मिळू शकतो. पण, एकंदरीत विचार केल्यास यंदा 4 हजार 800 ते 5 हजार 800 या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव राहू शकतो," असंही चव्हाण पुढे सांगतात.

फोटो स्रोत, dr. ankush chormule/bbc
सोयाबीन आणि कापसाच्या दराविषयी बोलताना अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे सांगतात, "यंदा कापसाला चांगले भाव मिळतील. आठ ते साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटल इतका भाव कापसाला मिळेल.
"कारण आमच्या भागात कापसाचा पेरा कमी झाला आहे आणि जास्त पावसामुळे कापसाचं पीकही चांगलं आलेलं नाहीये. त्यामुळे यंदा कापसाची आवक जास्त राहणार नाही. परिणामी कापसाला चांगले भाव मिळतील."
"सोयाबीनच्या बाबतीत उलटं चित्र दिसेल. यंदा सोयाबीनचं पीक चांगलं आल्यामुळे आवक वाढली आहे. त्यामुळे आताच सोयाबीनचे भाव 5 हजारांच्या आत आले आहेत. नवीन आवक बाजारात आली की भाव अजून कमी होतील. मागच्या वर्षी 8 हजार रुपये भाव होता. यंदा निदान 4 ते 5 हजारापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे," धोत्रे पुढे सांगतात.
दरम्यान, केंद्र सरकारनं जून महिन्यात 2022-23 च्या खरीप हंगामासाठी 14 पिकांचे किमान हमीभाव जाहीर केले. त्यानुसार, सोयाबीनला 4 हजार 300 रुपये, कापूस (मध्यम धागा) 6 हजार 80 रुपये, तर कापूस (लांब धागा) 6 हजार 380 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)










