शेती : जमीन मोजणी होणार '30 मिनिटांत'; कशी ते जाणून घ्या...

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत फकिरबा बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची मोजणी करणार आहे. या मशीनद्वारे 1 हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ 30 मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे.
पण हे रोव्हर मशीन काय आहे? ते कसं काम करतं? ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळं कसं आहे? तेच आता आपण जाणून घेणार आहोत.
रोव्हर मशीननं जमीन मोजणी करण्याच्या पद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं भूमी अभिलेख विभागाचे (पुणे) उपसंचालक किशोर तवरेज यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.
प्रश्न - रोव्हर मशीन म्हणजे नेमकं काय?
किशोर तवरेज - आता आपण महाराष्ट्रात 77 ठिकाणी CORS (continuously operational reference station) स्थापन केलेले आहेत. यांचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. आणि रोव्हर हा एक मूव्हिंग ऑब्जेट आहे, जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो.
याचंसुद्धा कनेक्शन सॅटेलाईटशी आहे. त्यामुळे कुठेसुद्धा गेलात, तर ते रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शवतं. हे रोव्हर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी जाऊ शकता, असं ते साधन आहे.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
प्रश्न- रोव्हर मशीनच्या साहाय्यानं जमीन मोजणी कशी केली जाते?
किशोर तवरेज - पूर्वी प्लेन टेबल किंवा ईटीएस मशीनच्या साहाय्यानं जमीन मोजणी केली जायची. शेतकरी वहिवाटीच्या खुणा जसजशा दाखवेल, तर त्याच्यासोबत चालत चालतच रोव्हर त्याठिकाणचं रीडिंग एका मिनिटात घेतो.
जोपर्यंत आपलं क्षेत्र फिरून होतं, तोपर्यंत क्षेत्राची रोव्हरद्वारे मोजणी पूर्ण होते. ईटीएस मशीननं अर्धा दिवस लागायचा, आता रोव्हरद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरची मोजणी अर्ध्या तासात होते.
प्रश्न- जमीन मोजणीची रोव्हर मशीन पद्धत ही प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळी कशी?
किशोर तवरेज- टेबल प्रक्रिया करताना आपल्याला प्रत्येक दोनशे मीटरवर टेबल लावावा लागायचा. उंच झाडांचं निरीक्षण घेता यायचं नाही. झाडाच्या फांद्या तोडाव्या लागायच्या. उंच गवत असेल, तर मोजणी होऊ शकत नव्हती. ईटीएस मशीन साडेचार फुटावर लावत असल्यामुळे यापेक्षा जास्त उंचीची झाडं असली की अडथळा यायचा.
पण ,रोव्हर्समध्ये रीडिंग सॅटेलाईटकडून येत असल्यामुळे परिसर ओपन टू स्काय असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन घेऊ शकता. ही मोजणी तत्काळ होते. यातली अॅक्यूरसी मशीनमधून पाहून आम्ही खात्री करू शकतो. आपल्याला अगदी 5 सेंटीमीटरच्या अचूकतेची मोजणी करता येते.

प्रश्न - प्लेन टेबल आणि ईटीएस पद्धतीनं जमीन मोजणीसाठी किती वेळ लागायचा?
उत्तर - प्लेन टेबलनं मोजणी करण्यासाठी एक दिवस लागायचा. कारण टेबल प्रत्येक ठिकाणी उचलून नव्यावं लावावा लागायचा. ईटीएस मशीनसाठीसुद्धा झाडं किंवा उंचसखल भागाचा अडथळा यायचा. यासाठी अर्धा दिवस लागायचा. रोव्हरद्वारे मात्र अगदी कमी वेळात जमीन मोजणी होते. एक किलोमीटरचं क्षेत्र केवळ 2 तासांत मोजून होऊ शकतं.
प्रश्न - रोव्हर मशीननं जमीन मोजणीची पद्धत किती अचूक आहे?
किशोर तवरेज - सोलापूरमध्ये 400, पुण्यात 400, सातारा 250 प्रकरणं आणि नांदेडमध्ये काही प्रकरणं अशाप्रकारे राज्यात रोव्हर वापरून हजारपेक्षा जास्त प्रकरणांची मोजणी झालेली आहे. आणि याची अचूकता (accuracy) 5 सेंटीमीटरच्या आतमध्ये आहे.
सर्वसाधारपणे भूमी अभिलेखाची मोजणीची जी परमिसेबल लिमिट असते ती ग्रामीण भागासाठी 25 सेंटीमीटर आणि शहरी भागात साडेबारा सेंटीमीटर असते. त्याच्या आतमधली अचूकता मिळत असल्यामुळे रोव्हरमुळे मोजणी कामाला खूप सुविधा झालेली आहे.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
प्रश्न- रोव्हर मशीन पद्धतीचे फायदे काय?
किशोर तवरेज-रोव्हर वापरून आता जी मोजणी केली जाणार आहे, त्याचे अक्षांश रेखांश आपल्याला मिळणार आहेत. ते कायमस्वरुपी जतन केले जाणार आहेत. भूकंप झाला, पूर आला, दगड खूना वाहून गेल्या, तरी आमच्याकडे अक्षांश रेखांश असल्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या हद्दी या साहाय्यानं दाखवू शकू.
अतिक्रमण करताना लोक बांध कोरतात. त्यामुळे जमीन समोरच्याचीच असल्याचा भास होतो. पण अक्षांश रेखांशामुळे बांध कोरणारे उघडे पडतील. आणि या पद्धतीनं मोजणी करून घेतली तर समोरच्यानं किती बांध कोरला हे स्पष्ट होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.
प्रश्न- भविष्यात रोव्हरद्वारे जमीन मोजणी करण्यासाठी विभाग काय प्रयत्न करणार?
किशोर तवरेज- पुढच्या 2 वर्षांत प्रत्येक सर्व्हेअरकडे रोव्हर मशीन देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर राज्यातील कोणतीही मोजणी रोव्हरच्या साहाय्यानं करता येईल. किंवा ईटीस मशीनचं रोव्हरमध्ये रुपांतर करून ती करता येईल.
'आतापर्यंत 780 जणांना ट्रेनिंग'
औरंगाबाद येथील 'भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी' ही महाराष्ट्र सरकारच्या भूमी अखिलेख विभागाची एकमेव राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था आहे.
रोव्हर्सद्वारे मोजणीच्या प्रशिक्षणाविषयी विचारल्यावर येथील प्राचार्य लालसिंग मिसाळ यांनी सांगितलं, "रोव्हर्सच्या बाबतीत आतापर्यंत 12 बॅचेसला ट्रेनिंग दिलेलं आहे. मार्च 2021 पासून आतापर्यंत 780 जणांना ट्रेनिंग दिलेलं आहे."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
"रोव्हरद्वारे होणारी जमिनीची मोजणी ही तंतोतंत आहे. अचूक आहे. समजा कुणी अतिक्रमण केलं असेल तर सरकारी यंत्रणेकडे अर्ज करून त्याचं निराकरण करावं. आपआपसात तंटे अथवा भांडण करू नये," असं आवाहन मिसाळ पुढे करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









