दामिनी अॅप : वीज कुठे पडणार ते 15 मिनिटे आधी कळणार, कसं ते जाणून घ्या...

वीज, प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं 'दामिनी अॅप' तयार केले आहे.

तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या अॅपच्या माध्यमातून समजते.

पण, हे दामिनी अॅप नेमकं काय आहे? ते कुठे उपलब्ध आहे आणि ते वापरायचं कसं? याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

'वीज पडल्यामुळे दरवर्षी 2 हजार जणांचा मृत्यू'

जगभरात दरवर्षी 28 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय वीज सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गेल्या वर्षी या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना इंडियन मेटरॉजिकल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. ए. के. सहाय यांनी वीज पडण्याच्या संकटाचं गांभीर्य सांगताना म्हटलं की, "भारतात अलीकडच्या वर्षांत वीज पडून मृत्यू आणि नुकसान होण्याचं प्रमाण वाढत आहे.

"वादळ आणि वीज पडणं ही भारतातील सर्वांत मोठी धोकादायक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामुळे दरवर्षी 2000 हून अधिक मृत्यू होतात."

दामिनी अॅप काय आहे?

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेनं 2020 मध्ये 'दामिनी लाईटनिंग' अप विकसित केलं आहे.

संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो , त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो.

दामिनी अॅप

फोटो स्रोत, @ndmaindia

फोटो कॅप्शन, दामिनी अॅप

हे अॅप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे अॅप देतं.

तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असात तर काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना या अॅपमध्ये दिल्या आहेत.

आता हे अॅप कसं वापरायचं ते जाणून घेऊया.

दामिनी अॅप कसं वापरायचं?

दामिनी अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर 'Damini : Lightning Alert' असं सर्च करायचं आहे.

हे अॅप डाऊनलोड केलं की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठी परवानगी द्यायची आहे.

त्यानंतर हे अॅप तुमचं लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. आणि मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल.

दामिनी अॅप

फोटो स्रोत, @moesgoi

वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथं दिलेली असेल.

पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते आणि निळा रंग असेल, तर 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.

खबरदारीच्या सूचना

या अॅपवरील Instructions या पर्यायात तुम्ही जर वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची, याच्या सूचना दिल्या आहेत.

या अॅपवरील Register या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथं नोंदणी करू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, पिनकोड, व्यवसाय ही माहिती भरून तुम्ही या अॅपवर नोंदणी करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या भागात वीज पडण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते.

जून-जुलैचा महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी दामिनी अॅप वापरण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला केलं आहे.

यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासदंर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात वीजा चमकत असल्यास काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना दिल्या आहेत.

काय करावं?

  • घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा आणि मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटाच्या आत घरातच थांबावं.
  • घराबाहेर असल्यास मजबूत इमारतीकडे जावं. ट्रॅक्टर, शेतीची अवजारं, मोटारसायकल यांपासून दूर राहावं. मोकळ्या आणि लटकत्या तारांपासून दूर राहावं.

काय करू नये?

  • वीज चमकत असल्यास उंच जागा, टेकडी, मोकळ्या जागा, विद्युत खांब, उघडी वाहनं आणि पाण्याची ठिकाणं टाळावीत.
  • घरात असल्यास मोबाईल आणि इतर विद्युत उपकरणं चार्जिंगला लावू नये. वीजा चमकत असल्यास विद्युत उपकरणांचा वापर करू नका. यादरम्यान अंघोळ, भांडी धुणे, कपडे धुणे ही कामे टाळा.
  • घराबाहेर असल्यास वीजा चमकत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभं राहू नका. तसंच विद्युत उपकरणांशी संपर्क टाळा.
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

शेतकऱ्यांना आवाहन

दामिनी अॅपच्या वापरासंदर्भात कृषी विभागही स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांना आवाहन करताना दिसून येत आहे.

औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "दामिनी अॅप शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी आहे. कारण वीज कुठे आणि किती वेळात पडणार याची चेतावणी हे अॅप देत असतं. वीज पडण्याच्या 15 मिनिटे आधी सुरक्षित ठिकाणी जाण्याची चेतावणी हे अॅप देतं. त्यामुळे मग शेतात काम करत असलो तर बैल-बारदाणा घेऊन आपण सुरक्षित स्थळी जाऊ शकतो.

"शेतकरी बांधव नियमितपणे शेतात काम करत असतात. त्यांच्या कामात ते व्यग्र असतात. अचानकपणे वीज पडते आणि अपघात होतात. हे टाळायचं असेल तर हे अॅप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करणं फार गरेजचं आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करावा, असं आवाहन मी करतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)