एनए : जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेतले 3 मोठे बदल जाणून घ्या...

औरंगाबाद तहसील कार्यालय

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

शेतकरी असाल तर तुम्ही एनए शब्द ऐकला नसेल असं अजिबात होणार नाही. पण, एनएची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ असल्याची तक्रार वारंवार सामान्य नागरिकांकडून केली जात होती.

एखादी जमीन एनए करायची म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रं घ्यावी लागायची आणि यासाठी बराच वेळ लागायचा.

त्यामुळे मग एनएची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत.

याचाच भाग म्हणून जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी महसूल कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.

पण, हे एनए म्हणजे नेमकं काय, ते का करतात, जमीन एनए करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, आणि एनएच्या प्रक्रियेत कोणते बदल करण्यात आलेत, याची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

एनए म्हणजे काय? एनए का करतात?

सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.

या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात. या रुपांतरणच्या प्रक्रियेसाठी ठरावीक 'रुपांतरण कर' आकारला जातो.

औरंगाबाद तहसील कार्यालय

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc

याशिवाय, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी-विक्री करता येत नाही.

तो विकायचा असेल तर त्याचा एनए लेआऊट करूनच तो विकावा लागतो. त्यामुळे मग एनएच्या प्रक्रियेला महत्त्व आहे.

एनए करण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

जमीन एनए करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. यासाठी तहसील कार्यालयात जाऊन तिथं एनएसाठीचा अर्ज घ्यावा लागतो किंवा तुम्ही स्वत: स्वतंत्र कागदावर अर्ज लिहून तो सादर करू शकता.

या अर्जासोबत काही कागदपत्रं जोडावी लागतात. यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा, सातबाऱ्याशी संबंधित फेरफार, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, ज्या जमिनीचा अकृषिक म्हणून वापर करायचा आहे, त्या जमिनीचा चतु:सीमा दर्शवणारा नकाशा, संबंधित जागेचा सर्व्हे किंवा गट नंबरचा नकाशा, आर्किटेक्टनं तयार केलेल्या बांधकाम लेआऊटच्या प्रती इ. कागदपत्रांचा समावेश होतो.

एनएसाठीच्या अर्जाचा नमुना

फोटो स्रोत, https://www.drdcsanjayk.info/

फोटो कॅप्शन, एनएसाठीच्या अर्जाचा नमुना

या कागदपत्रांसोबतचा अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा लागतो.

महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या 'महसूली कामकाज पुस्तिका' या पुस्तकात या अर्जासाठीचा नमुना देण्यात आला आहे. त्याप्रमाणे तुम्ही तहसीलदारांकडे कागदपत्रांसहित अर्ज करू शकता.

एनए प्रक्रियेत काय बदल झाले?

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमिनीच्या अकृषिक (एनए) वापरासाठी परवानगी देण्यात येते.

कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा कलम 42 (ब), (क) आणि (ड) अशाप्रकारे ओळखल्या जातात. या सुधारणांमुळे जमिनीच्या अकृषिक (एनए) परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.

या संदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 13 एप्रिल 2022 रोजी जारी केला आहे.

त्यात नमूद केलयं की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (ब) या सुधारणेनुसार, जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल, तर अशा क्षेत्रातील जमीन एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही.

औरंगाबाद तहसील कार्यालय

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc

कलम 42 (क) या सुधारणेनुसार, तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल, तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल.

तर, कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे, अशा शेतमालकांना एनए परवानगीची असणार नाही, अशी सुधारणा कलम 42 (ड)मध्ये करण्यात आली आहे.

पण, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात एनए परवानगी गरजेची नसली तरी जमिनीचा अकृषिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे.

त्यासाठी तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून, त्यासाठीचं रुपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं गरजेचं आहे.

तहसीलदारांकडून मिळणारी सनद

फोटो स्रोत, Maharashtra government

फोटो कॅप्शन, तहसीलदारांकडून मिळणारी सनद

तहसीलदारांकडून मिळणारी सनद वरच्या फोटोमध्ये दाखवण्यात आली आहे.

काय काळजी घ्यायची?

जमीन एनए करण्यासाठी अर्ज करताना तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल संहितेतील कोणती कलम लागू होते, यानुसार कागदपत्रं लागतात, असं महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

उदा. जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीचा एनए करायचा असेल, तर जमिनीचा सातबारा उतारा, फेरफार उतारा आणि ग्रामपंचायतीचं गावठाण पत्र ही कागदपत्रं अर्जासोबत जोडायची.

हा अर्ज तहसीलदारांकडे दिला तर ते सांगतील तितका कर भरायचा आणि मग अकृषिक वापराची परवानगी देणारी सनद तुम्हाला तहसीलदारांकडून दिली जाईल.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

त्यामुळे मग आपली जमीन कोणत्या क्षेत्रात येते, त्यानुसार एनए करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतील, याची माहिती तहसील कार्यालयातून घेणे अधिक सोयीचे ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)