पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय; भारताचं आशिया कपमधलं आव्हान संपुष्टात

शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या 9 विकेट्स गेल्या होत्या. शेवटची जोडी मैदानात होती. वेगवान गोलंदाज नसीम खानने 2 चेंडूत 2 षटकार खेचत पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध थरारक विजय मिळवून दिला.

या विजयासह पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.

पाकिस्तानच्या या विजयासह भारत आणि अफगाणिस्तान यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला 129 धावांतच रोखलं. इब्राहिम झाद्रानने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली.

हॅरिस रौफने 2 तर नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ आणि शदाब खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने सातत्याने विकेट्स गमावल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम भोपळाही फोडू शकला नाही. भरवशाचा फखर झमान 5 धावा करून तंबूत परतला. रशीद खानने मोहम्मद रिझवानला पायचीत करत आशा पल्लवित केल्या.

इफ्तिकार अहमद आणि शदाब यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. इफ्तिकार अहमदने 30 तर शदाब खानने 36 धावांची खेळी केली. पण हे दोघेही नियमित अंतरात बाद झाल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत आला.

भारताविरुद्धच्या सामन्याचा शिल्पकार मोहम्मद नवाझ 4 धावा करून बाद झाला आणि पाकिस्तानच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.

खुशदील शाह बाद झाल्यानंतर असिफ अलीने दोन षटकार खेचत पाकिस्तानचा विजय जवळ आणला. पण फरीद अहमदने टाकलेल्या उसळत्या चेंडूला बॅट लावण्याचा असिफचा प्रयत्न करिम जन्नतच्या हातात जाऊन विसावला. यावेळी असिफ आणि फरीद यांची बाचाबाची झाली. पंच आणि बाकी खेळाडूंनी या दोघांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

असिफ बाद झाल्यामुळे आता मोठा फटका कोण लगावणार का अफगाणिस्तानचे गोलंदाज बाजी मारणार अशी परिस्थिती निर्माण झाली.

शेवटच्या षटकात 11 धावा हव्या असताना नसीम शहा स्ट्राईकवर होता. नसीम शाहने फझलक फरुकीच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत पाकिस्तानला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी छोट्या लक्ष्याचा चांगल्या पद्धतीने बचाव केला पण नसीम शाहच्या अफलातून षटकारांनी पाकिस्तानला सनसनाटी विजय मिळवून दिला.

फझलक फरुकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रशीद खानने 2 विकेट्स घेतल्या.

26 चेंडूत 36 धावा आणि एक विकेट पटकावणाऱ्या शदाब खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात येण्याची तीन कारणं तीन मुद्द्यांतून समजून घेऊ या.

गोलंदाजीतल्या चुका

सध्या जसप्रीत बुमराह टीममध्ये नाही. हर्षल पटेल जायबंदी असल्याने संघात नाही. मात्र ज्या पद्धतीने भारतीय टीम ने गोलंदाजी केली त्यावरून भारतीय संघाची परिस्थिती फारशी बरी आहे असं दिसत नाही.

पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना सोडला तर इतर सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांची कामगिरी अगदीच सामान्य होती.

या मालिकेत पहिला स्पेल भुवनेश्वर कुमार ने टाकला. त्याचवेळी शेवटच्या ओव्हरमध्ये कमी वेग असल्याने त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. अर्शदीप सिंह ने काही चांगले ओव्हटर टाकले. मात्र त्यातही अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत होता.

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी तुकड्या तुकड्यात चांगली कामगिरी केली. भारतीय संघाने कुलदीप यादवला विसरायला नको अशी टिप्पणीही समालोचकांनी केली. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सुपर फोरच्या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी 180 च्या आसपास रन दिले.

फलंदाजीतल्या चुका

गौतम गंभीर म्हणतात, जर टी20 मध्ये चांगली सुरुवात झाली तर इतर फलंदाज छोटी छोटी खेळी करून विजय मिळवून देऊ शकतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुल आणि रोहित ने कमी वेळात 50 रन्स केल्या. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव ने तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

इतर फलंदांजांकडे एक नजर टाकली तर रोहित शर्माही गेल्या काही दिवसात 30 च्या आसपास रन करून आऊट होताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने 72 धावा केल्या. मात्र त्याची विकेट सहजगत्या घेण्यात आली. विराट कोहली ने ही दोन अर्धशतक लागवले मात्र श्रीलंकेविरुद्ध त्याने खातंही उघडलं नाही. मधल्या फळीत मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्याने चांगला खेळ केला.मात्र दुसऱ्या मॅचमध्ये तो फारशी चमक दाखवू शकला नाही

कर्णधारपदाच्या चुका

रोहित शर्मा ला आयपीएलचा सर्वश्रेष्ठ कर्णधार मानण्यात येतं. मात्र आशिया कप मध्ये त्याच्याही कर्णधारपदाच्या चुका दिसल्या.

निवड केलेला भारतीय संघ संतुलित नव्हता. त्याचवेळी पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही मॅचमध्ये सुपर फोरच्या मॅचेस मध्ये दीपक हुड्डा ला गोलंदाजी न देणं हीसुद्धा एक चूक होती.

जेव्हा एखाद्या गोलंदाजाची धुलाई होत असते तेव्हा सहाव्या गोलंदाजाकडे सुत्रं देऊन नुकसान कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.

मात्र रोहित ने तसं केलं नाही. खरंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना स्पिनर्स विरुद्ध खेळताना त्रास होत होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता