अर्शदीप सिंगच्या हातून कॅच सुटला आणि ट्रोलर्स म्हणाले....

भारत-पाकिस्तान लढतीदरम्यान सोपा झेल हातातून सुटलेल्या युवा अर्शदीप सिंगवर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. परंतु काही लोकांनी विकिपिडियावर त्याच्या प्रोफाईलमध्ये आक्षेपार्ह शब्दात त्याचा उल्लेख केला.

या टीकेमुळे इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विकिपिडियाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. भारतात कोणत्याही इंटरमीडियरी प्लॅटफॉर्मवर चुकीचं माहिती देणं, पसरवणं हे खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी अर्शदीप संदर्भातील ट्वीट शेअर करताना म्हटलं आहे.

कोणालाही असुरक्षित वाटता कामा नये. सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट अशी सरकारची अपेक्षा आहे. राजीव यांनी स्क्रीनशॉट शेअर करताना अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पानावर झालेल्या बदलांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे अकाऊंट पाकिस्तानातून ऑपरेट करण्यात आलं होतं.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अर्शदीपच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह बदलानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्र्यांनी विकिपीडियाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावला आहे. पण यासंदर्भात मंत्रालयाकडून कोणतंही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेलं नाही.

रविवारी भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने 5 विकेट्सनी विजय मिळवला. 17व्या षटकात अर्शदीपच्या हातून एक झेल सुटला. त्यासाठी ट्रोलर्सनी त्याच्यावर टीका केली. काहींनी विकिपीडिया प्रोफाईलमध्ये त्याचा उल्लेख खलिस्तानी असा केला आहे.

मॅचमध्ये काय घडलं?

आशिया चषक टी-20 स्पर्धेत सुपर 4 गटातील सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला.

भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ते पाकिस्तानने 19.5 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात गाठून विजय प्राप्त केला.

भारतीय संघाने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर 181 धावांची मजल मारली. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी 54 धावांची खणखणीत सलामी दिली. पण मोठा फटका खेळण्याचा रोहितचा प्रयत्न खुशदील शाहच्या हातात जाऊन विसावला. त्याने 28 धावांची खेळी केली.

रोहित बाद झाल्यानंतर राहुलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. पण शदाब खानने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यानेही 28 धावा केल्या.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीत शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमारला या लढतीत 13 धावाच करता आल्या. दिनेश कार्तिक नसल्याने ऋषभ पंतवर जबाबदारी वाढली होती पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.

भरवशाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मोहम्मद हसनैनने शून्यावर बाद केलं. सहकारी एका बाजूने बाद होत असताना कोहलीने दिमाखदार खेळी साकारली. कोहलीने 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. दीपक हुड्डाने 16 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

10 षटकात शंभरी गाठणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर ब्रेक लावला. पण शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी सोपे झेल टाकले. पाकिस्तानतर्फे शदाब खानने 2 तर नसीम खान, मोहम्मद हसनैन, हॅरिस रौफ आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

182 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यालढतीतही मोठी खेळी करू शकला नाही. पण मोहम्मद रिझवान एक बाजू सांभाळून खेळत होता. चौथ्या क्रमांकावर आलेल्या नवाजची त्याला चांगली साथ मिळाली.

दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा विजय दृष्टिपथात आणला. पण मोक्याच्या क्षणी दोघेही माघारी परतल्याने सामन्यात रंगत आली होती.

दरम्यान, नवोदित खेळाडू अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीचा सोडलेला झेल भारताला महागडा ठरला. अखेरीस आसिफ अलीने खुशदिल शाहच्या सोबतीने पाकिस्तानचा विजय साकार केला.

अर्शदीपने कधी सोडला झेल?

18वी ओव्हर सुरू झाली तेव्हा पाकिस्तानला 18 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. रवी बिश्नोईचा पहिला चेंडू वाईड देण्यात आला. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव निघू शकली नाही. तिसऱ्या चेंडूवर खुशदिलने एक धाव काढली.

चौथ्या चेंडूवर असिफ अलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अंपायर्सनी वाईड दिला. भारतीय संघाने झेलसाठी अपील केलं. पण थर्ड अंपायरने त्याला नाबाद ठेवलं.

त्याच्या पुढच्या चेंडूवर असिफ अलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत उंच उडाला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करत असलेला अर्शदीप हा चेंडू सहज पकडेल अशी स्थिती होती. पण अर्शदीपने झेल सोडला. अर्शदीपने झेल सोडला आणि मैदानातील पाकिस्तानातील चाहत्यांनी जल्लोष केला.

कर्णधार रोहित शर्मा या घटनेनंतर नाराज झाला.

असिफ अलीने या जीवदानाचा फायदा उठवत 8 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकारासह 16 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

कोण आहे अर्शदीप सिंग?

23वर्षीय अर्शदीपने यंदाच्या वर्षीच इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं. हाणामारीच्या षटकात टिच्चून गोलंदाजी करणं ही अर्शदीपची खासियत आहे. आयपीएल स्पर्धेत अर्शदीपला किंग्ज इलेव्हन पंजाबने ताफ्यात समाविष्ट केलं.

गेल्या वर्षी अर्शदीपने पंजाबसाठी आयपीएल स्पर्धेत 12 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. प्रतिस्पर्धी संघातील मोठ्या फलंदाजांसमोर दडपून न जाता अर्शदीप गोलंदाजी करतो.

भारतासाठी खेळताना अर्शदीपने आतापर्यंत 9 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 5 सामन्यात 16.14च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)