खोके कुठे जातात आणि कोण-कोठे गद्दारी करतो हेही मला माहीत आहे- एकनाथ शिंदे #5मोठ्याबातम्या

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा घेतलेला आढावा

1.माझ्याकडे सगळा हिशोब, बोलायला भाग पाडू नका- मुख्यमंत्री

"माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हटलं आहे.

"बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो, त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे", असं शिंदे म्हणाले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"खोके कुठे जातात? आणि कोण-कोठे गद्दारी करतो? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. पण मला काम करायचं आहे. मला कामाने उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे" असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

2.पंतप्रधानांच्या मित्राच्या संपत्तीत 85 कोटींची भर- राहुल गांधींची मोदींवर टीका

या वर्षी देशात आत्महत्यांचे प्रमाण 6.2 टक्क्यांनी वाढले आहे. तर दुसरीकडे गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत, यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

एनसीआरबीरने नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या अहवालानुसार भारतात रोज 450 लोक आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ब्लूमबर्गच्या इंडेक्स नुसार उद्योगपती गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

राहुल गांधी, काँग्रेस

फोटो स्रोत, FACEBOOK/INC

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

"पंतप्रधानांचे एकच काम, मित्रांना श्रीमंत करण्यासाठी सामान्य माणसांची लूट करणे. सुटा बुटातील मोदी सरकारचे त्यांच्या मित्रांसाठी अच्छे दिन आले आहेत. नवीन भारत, मित्रांचा नवीन इंडिया", असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

3. केजरीवालांना सत्तेची नशा- अण्णा हजारे

''दिल्ली सरकारच्या नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. एकेकाळी दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती'', अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले दहा वर्षांपूर्वीचे सहकारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून खडसावले आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल

मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारे यांनी केजरीवाल यांना लगावला आहे. हजारे यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने आपण व दिल्लीचे सध्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया अनेक वेळा राळेगण सिद्धी येथे आला होतात. त्या वेळी तुम्ही राळेगण सिद्धीतील व्यसनमुक्तीचे कौतुक केले होते. मात्र सत्तेत आल्यावर मात्र तुम्ही या गोष्टी विसरलात याची खंत वाटते.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांबद्दल (टीम अण्णा) जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देशभर फिरून जनजागृती, लोकशिक्षण करणे अपेक्षित होते, याची आठवण अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्रात करून दिली आहे. आपण त्या मार्गाने गेला असता तर सर्वसामान्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणारे मद्यधोरण आपण राबवले नसते, असे हजारे यांनी केजरीवाल यांना उद्देशून पत्रात म्हटले आहे.

4.कांजूरमध्ये 'मेट्रो-३'चे कारशेड नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांकडून 'तो' आदेश मागे

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मुंबई मेट्रो-3 या महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो प्रकल्पाचे कारशेड शिंदे-भाजप सरकारने पुन्हा आरेमध्ये हलवून त्याप्रमाणे कामही सुरू केल्याने कांजुरमार्गमध्ये ते होणार नसल्याचे स्पष्ट झालेच होते.

1ऑक्टोबर 2020च्या आदेशाद्वारे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कांजुरमार्गच्या एकूण जमिनीपैकी 102 एकर जमीन 'एमएमआरडीए'ला कारशेडसाठी हस्तांतर केली होती, तो आदेश जिल्हाधिकाऱ्यांनीच मंगळवारच्या आदेशाने रद्दबातल ठरवला. परिणामी कांजुरमध्ये कारशेड होणार नाही, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

'29 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो वॉर रूम बैठक झाली. त्यानंतर जमीन हस्तांतरणाचा आदेश मागे घेण्याची विनंती 'एमएमआरडीए'ने त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी 30 ऑगस्टच्या आदेशाद्वारे आपल्या कार्यालयाचा 1 ऑक्टोबर 2020चा आदेश रद्दबातल केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या याचिकेचा आधारच गेलेला असल्याने याचिकेत अर्थ उरलेला नाही', असे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला आदेशाची प्रत दाखवत सांगितले.

5.गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद- सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या 2002च्या गुजरात दंगलींशी संबंधित नऊपैकी आठ खटले बंद करण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिले. 'दैनिक भास्कर'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गुजरात दंगल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुजरात दंगल

गुजरात दंगलींदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची याचिका; तसेच दंगलींची चौकशी गुजरात पोलिसांऐवजी सीबीआयला सोपविण्याची मागणी करणाऱ्या 'सिटिझन्स फॉर जस्टिस' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या याचिकांचा बंद करण्यात आलेल्या आठ प्रकरणांमध्ये समावेश आहे. गुजरात दंगलींचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी प्रमुख याचिकेमध्ये करण्यात आली होती. ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचे न्या. लळित यांच्या पीठाने निदर्शनास आणून दिले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)