मारुती ते अमूल - स्वातंत्र्योत्तर भारताला आकार देणारे 5 ब्रँड

अमूल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, संतोष देसाई
    • Role, लेखक आणि स्तंभलेखक

काही गोष्टी कायम आपल्यासोबत राहतात, आपल्या आठवणी बनून. तुमच्याही लहानपणी अशा काही गोष्टी असतील, ज्या तुमच्यासाठी खास असतील. हेच कारण आहे, ज्यामुळे काही कंपन्यांचे ब्रँड ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे असतात.

भारतात तर असे काही ब्रँड आहेत, ज्यांनी केवळ ग्राहकांच्या मनावरच राज्य केलं नाही, तर देशाच्या उभारणीतल्या विविध टप्प्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली.

1947 साली भारतानं ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं. स्वातंत्र्योत्तर भारताला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी इथल्या शासन-प्रशासनानं विविध धोरणं आखली, तशीच इथल्या उद्योगधंद्यांनीही आपापल्या परीने आपलं योगदान दिलं.

गेल्या 75 वर्षात भारत हा जगासाठी मोठी बाजारपेठ म्हणूनही समोर आला. गुंतवणूकदारांची ओढा भारताकडे कायमच जास्त राहिलाय. जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक कंपन्यांचे ब्रँड भारतात दाखल झालेत. मात्र, तरीही इथल्या काही ब्रँडनी भारतीयांच्या मनावर आणि भारताच्या उभारणीत आपला ठसा उमटवलाय. आपण आज अशाच पाच ब्रँडबद्दल जाणून घेणार आहोत.

1) अमूल

अमूलचे दुग्धजन्य पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात सर्वात प्रसिद्ध कंपनी म्हणून अमूलचं नाव आदरानं घेतलं जातं. भारतात सर्वात वेगानं वाढणाऱ्या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये अमूलची गणना होते. फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यात अमूल अव्वल स्थानी आहे.

अमूलची सुरुवात गुजरातमधून झाली आणि पुढे गुजरातमधील सहकार चळवळीची ओळखच अमूल कंपनी बनली. हजारोंच्या पटीत एकत्र येत शेतकऱ्यांनी या सहकार चळवळीला यशाच्या शिखरावर नेलं.

अमूल

फोटो स्रोत, AMUL

भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून पुढे ज्यांची ओळख अवघ्या जगाला झाली, ते डॉ. वर्गीस कुरियन यांनी अमूल कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. तळगाळातील लोकांना एकत्र आणून एखादा उद्योग कसा भरभराटीस आणला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरणंच डॉ. कुरियन यांनी जगासमोर ठेवलं.

बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात पावलं ठेवू लागली होती आणि परिणामी स्पर्धात्मक युग वाढत चाललं असताना, अमूल कंपनीनं भारतातील आपली जागा कधीही ढळू दिली नाही. भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या स्पर्धेत अमूलनं बाजी मारलीच.

अमूलचे दुग्धजन्य पदार्थ जितके लोकप्रिय झाले, तितक्याच त्यांच्या जाहिरातीही 'कूल' ठरल्या आणि आजही ठरतायेत. 'अमूल गर्ल'ने भारतातील बहुतांश महत्त्वाच्या घटनांवर उपहासात्मक, तर कधी गंभीरपणे केलेले भाष्य अनेकांच्या पसंतीस उतरले.

अमूल कंपनी भारताचं स्वत: ब्रँड बनलं. दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात भारताची ओळख जगभर पोहोचवण्यात अमूलनं मोठं योगदान दिलं.

2) पार्ले-जी बिस्किट

पार्ले प्रॉडक्ट्स कंपनीचं ग्लुकोज बिस्किट ब्रँड असलेलं पार्ले-जी बिस्किट जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बिस्किटांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सर्वसामान्यांना परवडणारं बिस्किट म्हणूनही याची ओळख भारतात आहे. भारतातल्या कानाकोपऱ्यात पार्ले-जी बिस्किट पोहोचलंय.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये भारतात स्वदेशीची मोहीम सुरू झाली. या मोहिमेअंतर्गतच पार्ले प्रॉडक्ट्स कंपनीची सुरुवात झाली. त्यावेळी भारतात महागड्या ब्रँडचे बिस्किट भारतात होते, जे स्वदेशी नव्हते, तसंच सर्वसामान्यांना परवडणारेही नव्हते.

पार्लेजी

फोटो स्रोत, Getty Images

पार्ले-जी बिस्कीट भारतातल्या अनेकांच्या चहाचा सोबती बनलं. चहासोबत पार्ले-जी हवाच, असं समीकरणच बनलं. खाद्यपदार्थ म्हणूनच नव्हे, तर भारतीयांना जोडणारं बिस्किट म्हणूनही पार्ले-जीची ओळख बनली.

3) मारुती

भारतात चारचाकी गाड्यांच्या आगमनानंतर बराच मोठा कालावधी या गाड्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातील नव्हत्या. भारतातील मध्यमवर्गीयांसाठी चारचाकी गाडी म्हणजे स्वप्नवत गोष्ट होती.

मारुती कंपनीनं मात्र भारताली मध्यमवर्गीयांच्या या स्वप्नाला सत्यात उतरवलं. भारतात मारुतीनं केवळ 50 हजार रुपयात कार उपलब्ध करून दिली.

1960 ते 1990 पर्यंत भारतात अम्बॅसिडर कारच होती. मात्र, ही कार श्रीमंतांना परवडणारी होती नि त्यांच्याकडेच दिसून यायची. मात्र, मारुतीनं हे समीकरण मोडलं. 800 सीसीची छोटीशी, पण उत्तम सेवा देणारी कार बाजारात आणून सर्वसामान्यांच्या घरासमोर चारचाकी उभी केली.

मारुती कार

फोटो स्रोत, Getty Images

मारुती कंपनीनं कारचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण केलं आणि भारतातील ग्राहकांच्या वर्तनातही बदल घडवून आणला. मध्यमवर्गीयांच्या प्रवास आणि स्वप्नांचं लोकशाहीकरण केलं.

या कारमुळे अनेक कुटुंबांना आपली सामाजिक नि भौगोलिक सीमा वाढल्याचं लक्षात आलं. एरवी भारतीय समाज सावधगिरीने पावलं उचलण्यास प्रसिद्ध आहे, मात्र या कारमुळे त्याही सीमा ओलांडण्यास मदत झाली.

4) निरमा

1980 पर्यंत भारतातल्या बाजारात काही मोजक्या ब्रँडचंच वर्चस्व होतं. मात्र, हे चित्र ऐंशीच्या दशकानंतर बदलत गेलं. गुजरातमधील अहमदाबादमधून पुढे आलेल्या निरमा साबणानं या बदलात महत्त्वाची भूमिका बजावली.

निरमा बाजारात आल्यानंतरही आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याचं धाडस कंपनीला होत नाहीय. मात्र, एकदा टीव्हीवर जाहिरातीस सुरुवात झाली आणि पाहता पाहता निरमा कंपनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

निरमा

फोटो स्रोत, NIRMA

निरमा-निरमा वॉशिंग पावडर निरमा या गाण्याच्या ओळी तर अजूनही अनेकांच्या कानात घुमत असतील. या गाण्यामुळे हा ब्रॅंड घराघरात पोहोचला. अलीकडेच नव्या पिढीने नव्या अवतारातील रिमिक्स बनवून ही धून पुन्हा लोकप्रिय केल्याचे दिसते.

निरमानं आपल्या ब्रँडचा वापर वाढवण्यासाठी त्या काळातील सर्वात शक्तिशाली माध्यमाचा अत्यंत नियोजनबद्ध मदत घेतली.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक युक्ती निरमा कंपनीनं वापरली, ती म्हणजे, कमी दरात आणि सर्वांना उपलब्ध होईल अशा पद्धतीनं निरमाची उत्पादनं उपलब्ध करून दिली गेली.

लाखो भारतीयांना योग्य दरात साबण किंवा तत्सम उत्पादनं हवी होती, अशांसाठी निरमानं आपलं उत्पादन अपरिहार्य निवड बनवलं.

निरमाचं ब्रँड उत्तम, यशस्वी उद्यमशीलतेचं उदाहरण बनून आज लोकांसमोर उभं आहे.

5) जिओ

रिलायन्स इंडस्ट्रीजचं जिओ ब्रँड भारतातील सर्वात मोठं टेलिकॉम ब्रँड आहे.

रिलायन्सचे सर्वेसर्वा आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींनी 2016 साली जिओचं लॉन्चिंग केलं. त्यावेळी भारतात टेलिकॉम क्षेत्रात अनेक ब्रँड आधीपासूनच होते. मात्र, तरीही जिओनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

चाणाक्ष विपणन युक्ती आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे दर या गोष्टींनी जिओला गावखेड्यापर्यंत पोहोचवलं. डिजिटल भारताची क्षितिजं विस्तारण्यात जिओनं मोलाचा वाटा उचलला.

जिओ

फोटो स्रोत, Getty Images

जगातल्या तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचं स्थान, बाजार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम, या दोन्ही बाबातीत अव्वल बनलंय. भारतातील डिजिटल पेमेंटसह अनेक डिजिटल गोष्टींना यामुळे मोठं प्रोत्साहन आणि वेग प्राप्त झालाय. जिओनं गावागावापर्यंत पोहोचून या सगळ्याला मोठं प्रोत्साहन दिलंय.

मात्र, या सर्व तंत्रज्ञान प्रगतीमुळे भारतातली ध्रुवीकरणात झालेली वाढही मोठ्या प्रमाणात दिसून येते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)