बिल्किस बानो यांच्या गावचे मुस्लीम गाव सोडून का जात आहेत?

    • Author, तेजस वैद्य
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींची न्यायालयाने सुटका केल्यानंतर रणधीकपूर गावातील 500 मुस्लीम गाव सोडून गेले आहेत. रणधीकपूर गावातील कोणीही आरोपींच्या सुटकेबाबत बोलण्यास तयार नाहीत.

सुटका झालेले आरोपी सिंगवड गावात राहतात. हे गाव रणधीकपूर पासून जवळच आहे. बीबीसीने रणधीकपूर गाठलं तेव्हा बहुतांश घरांना कुलूप होतं. अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमाचा भाग असलेले तिरंगे घरावर उभारलेले दिसतात.

2002 नंतर रणधीकपूर गावात अनुचित प्रकार घडलेला नाही पण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांप्रति विश्वासाचा अभाव दिसतो.

आधीही भीती होती पण आता ही भीती वाढली आहे कारण 11 आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. 11 आरोपींची सुटका झाल्यानंतर रणधीकपूर गावातील 500 मुस्लीम गाव सोडून गेले आहेत.

बिल्किस बानो यांचे बंधू इम्रान यांनी ही माहिती दिली. ते रणधीकपूर इथेच राहतात.

रणधीकपूर गुजरातमधल्या दाहोद जिल्ह्यात येतं. 2001 साली दंगलीचं केंद्रबिंदू असणाऱ्या गोध्रा शहरापासून हे गाव 50 किलोमीटरवर आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी बिल्कीस बानो रणधीकपूर इथे होत्या जेव्हा साबरमती एक्स्प्रेसला आग लागली आणि दंगलीचा भडका उडाला.

बिल्कीस यांच्या कुटुंबीयांनी दंगलीतून वाचण्यासाठी पळून जाण्याचा निर्णय घेतला. छापरवाड गावाजवळ पाणिवेला डोंगराजवळ हे कुटुंब अडकलं. हा भाग रणधीकपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. बिल्कीस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. त्यांच्या घरच्यांना मारून टाकण्यात आलं. नृशंस अशा ही घटना फक्त गुजरात नव्हे तर देशात खळबून उडवून देणारी ठरली.

बिल्कीस यांच्या वडिलांचं घर रणधीकपूर इथल्या चुंदडी रोड इथल्या मुस्लीम मोहल्ल्यात होतं. याच भागात राहणाऱ्या इक्बाल मोहम्मद यांनी आम्हाला माहिती दिली. देशातल्या मुली या माझ्या मुलीसारख्या आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मग बिल्कीस त्यांची मुलगी नाही का? बिल्कीसला ते न्याय मिळवून देऊ शकतील का? 11 दोषी आढळलेले आरोपी हे अर्धवेळ आरोपी नाहीत. त्यांनी घृणास्पद कृत्य केलं आहे. राज्यघटनेत अशा प्रकारे गुन्हेगारांना सोडून दिलं जाऊ शकतं का?

बिल्कीस बानो प्रकरणात सुटका झालेल्या काही आरोपींची घरं एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहेत.

चुंदडी रोडचा भाग सोडला तर बिलावल फालिया इथेही मुस्लीम लोकसंख्या आहे. 15 ऑगस्ट रोजी बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची सुटका झाल्यानंतर मुस्लीम लोकांचं गाव सोडून जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

22 ऑगस्टला बीबीसीची टीम याठिकाणी पोहोचली तेव्हा बहुतांश घरांना टाळं लागलं होतं. अनेकजण बोऱ्याबिस्तर गुंडाळत होते. पोलीस स्थानकाच्या अगदी जवळ असूनही अनेकजण सोडून जाण्याच्या बेतात होते.

2002मध्येही रणधीकपूर गावातून मुस्लीम लोक सोडून गेले होते. 23 ऑगस्टला आम्ही पुन्हा त्याठिकाणी गेलो त्यावेळी घराला कुलूप नाही असं एकही घर नव्हतं. रिकाम्या रस्त्यांवर बकऱ्या आणि कोंबड्या मात्र उरल्या होत्या.

काही तरुण इथे राहतात यामध्ये बिल्किसचे काका अयुबभाई आणि इम्रान आहेत. आम्ही एकदोन दिवसात इथून जाऊ असं ते म्हणाले.

तिरंगा फडकतोय

बिलावल फलिया इथल्या अमिनाबानो यांच्या घरी आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांच्या घरी तिरंगा फडकत होता. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा फडकावण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "11 दोषी आरोपींना सोडण्यात आल्याने आम्हाला भीती वाटते आहे. 2002 दंगलीत माझा मुलगा मारला गेला. आम्ही जंगलात भूकेलेले हिंडत होते. आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे. पुन्हा दंगल्या झाल्या तर काय करणार"?

त्यांच्या शेजारी मदिनाबानो यांनीही आपलं सामान गुंडाळलं आहे. "आमचे सख्खेशेजारी सोडून गेले, आम्ही इथे राहून काय करणार? मला तरुण मुली आहेत. आमचं सहाजणांचं कुटुंब गाव सोडून जात आहे. देवगढबारिआ नावाच्या गावी आम्ही जाऊ", असं त्यांनी सांगितलं.

कोणावर विश्वास ठेवायचा?

रणधीकपूरच्या गावकऱ्यांनी जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे अर्ज केला आहे. बीबीसीशी बोलताना दाहोद जिल्हा मॅजिस्ट्रेट हर्षित गोसावी यांनी सांगितलं की, या गावातील मुस्लीम लोकांचा अर्ज आम्हाला मिळाला आहे. घाबरू नका असं त्यांना सांगितलं आहे. तुम्हाला कोणी धमकी दिली आहे का? त्यांनी नाही सांगितलं. पण ते घाबरले आहेत. कोणी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तात्काळ कारवाई करू. पोलीस अधीक्षकांशी आम्ही यासंदर्भात चर्चा केली आहे.

रात्रीच्या वेळी पोलिसांचा ताफा तैनात असतो. अयुबभाई सांगतात, "2002 मध्येही पोलीस होते. पण आमची घरं जाळली गेली. आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा"?

दोषींना न्यायालयाने सोडलं जाण्यासंदर्भात इक्बाल मोहम्मद म्हणाले, "अख्खा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना बलात्काराचा नृशंस गुन्हा करणारे दोषींना सोडून देण्यात आलं".

"हे लोक तुरुंगाबाहेर आले, तेव्हा फटाके फोडण्यात आले. त्यामुळे आम्ही जास्त घाबरलो. याच गुन्ह्यासाठी दोषी आढळलेले अन्य समाजाचे आरोपी 20 ते 30 वर्ष तुरुंगात आहेत. अतिदुर्मीळ अशा या खटल्यात दोषींना कसं सोडलं जाऊ शकतं"?

मेडिकल दुकान चालवणाऱ्या एका माणसाला आम्ही याबाबत विचारलं. तो म्हणाला, "मी या दुकानात कामाला आहे. तुम्ही मालकाला विचारा, मला या केसबद्दल काही माहिती नाही".

मी 2002 मध्ये अगदी लहान होतो. मला माहिती नाही असं पान ठेल्यावर काम करणाऱ्या एका माणसाने सांगितलं.

2002 मध्ये झालेल्या दंगलीनंतर हिंदू आणि मुस्लीम तिथेच राहतात पण दोन्ही समाजांमध्ये विश्वासाचं वातावरण नाही हे जाणवतं.

ते एकमेकांशी व्यवहार करतात पण ऋणानुबंध राहिलेला नाही. जे व्यवहार होतात ती औपचारिकता आहे.

न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवलं पण रणधीकपूरमधल्या काहींना यापैकी काहीजण निरपराध असल्याचं त्यांना वाटतं.

दोषींचं स्वागत करणं किती योग्य आहे याबाबत आम्ही टिनाबहेन दर्जी यांनी सांगितलं, "स्वागत करून काय चुकलं? ते निरपराध आहेत".

त्यांच्यापैकी काहीजण निरपराध आहेत. त्यांचं स्वागत झालं तर त्यात वावगं वाटण्याचं कारण नाही असं पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाने सांगितलं. काहींचं नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं.

रणधीकपूर गावच्या सरपंचांना आम्ही भेटलो, पण त्यांनी काहीही बोलायला नकार दिला. 2011 जनगणनेनुसार रणधीकपूरची लोकसंख्या 3177 आहे. 10-11 वर्षात लोकसंख्या वाढलेली असू शकते पण गाव तसं लहानसंच आहे.

रणधीकपूर आणि सिंगवड गावांमध्ये प्रामुख्याने आदिवासी, कोळी आणि मुस्लीम समाज आहे. शेती आणि शेतमजुरी हेच प्रामुख्याने काम चालतं. गावात काही छोटी दुकानंही आहेत.

बिल्किस बानोचं घर

बिल्किस बानो यांच्या वडिलांचं घर चुंदडी रोडवर होतं, 2002च्या दंगलीत ते नष्ट झालं. तिथे आता सुभाषभाईंचं रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे. ते मूळचे राजस्थानचे आहेत. आम्ही त्यांच्या दुकानात पोहोचलो तेव्हा त्यांनी आम्हाला चहा बिस्कीट घेण्याचा आग्रह केला.

सुभाषभाई म्हणाले, "2003-04 पासून आम्ही भाडेतत्वावर हे दुकान घेतलं आहे. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाची माणसं दुकानात येतात".

सुभाषभाईंचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे. त्यांचं आणखी एक दुकान थोडं पुढे आहे.

दोषी आरोपी भेट देत आहेत देवळं आणि धार्मिक तीर्थस्थळांना

दोषी आरोपींपैकी काहींशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलायला नकार दिला. स्थानिक पत्रकाराच्या मदतीने आम्ही राधेश्याम शहा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एवढंच सांगितलं की, "मला यावर काहीही बोलायचं नाहीये. मी आता राजस्थानात आहे. मला इथेच राहायचं आहे".

"मी आयुष्यात कधीही पानिवेला भागात गेलो नाही. (याच ठिकाणी बिल्कीस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला) मी निरपराध आहे".

आम्ही आणखी एका आरोपी गोविंद रावल यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते घरात नसल्याचं घरच्यांनी सांगितलं. त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. ते विविध मंदिरं आणि तीर्थस्थळांना भेटी देत आहेत. न्यायालयाने सुटका करण्याबाबत बोलण्यास घरच्यांनी नकार दिला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)