You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिल्किस बानो : 'गुजरात सरकारच्या निर्णयामुळे आमची भीती वाढली', नवऱ्याची प्रतिक्रिया
बिल्किसबानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या दोषींच्या सुटकेबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने दिलेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.
यासंदर्भात बीबीसी गुजराती प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांनी बिल्किस बानो यांचे पती याकूब रसूल यांच्याशी संवाद साधला. त्याचाच हा संपादित अंश.
सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हा निर्णय ऐकून तुम्हाला काय वाटलं?
सरकारच्या या निर्णयानंतर आता आमची भीती परत वाढली आहे. राज्य सरकारनं त्यांना सोडताना आमच्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही. आम्हाला काहीच माहिती नाही. आम्हालासुद्धा प्रसारमाध्यमातून अचानक याची माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे.
नेमकी कशा प्रकारची भीती तुम्हालावाटत आहे?
आम्हाला शांततेत जीवन जगायचं आहे. आता ते लोक सुटले आहेत. आधीसुद्धा जेव्हा ते पॅरोलवर सुटून बाहेर यायचे तेव्हासुद्धा भीती वाटायची. तेव्हा थोडी भीती वाटायची. पण आता आमची भीती वाढली आहे. आता मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मी आधीच माझं कुटुंब गमावलं आहे. माझी 3 वर्षांची मुलगी मी गमावली आहे. आता आम्हाला वाटतं होतं की आता आम्ही शांततेत जगू. पण आता आम्हाला भीती वाटत आहे.
हा निर्णय ऐकल्यावर बिल्किसबानो यांची पहिली प्रतिक्रिया काय होती?
हे असं कसं झालं,अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. त्या नाराजसुद्धा झाल्या. ठीक आहे आता काय झालंय ते. पाहुया पुढे काय होतंय ते...
तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे?
मी आता त्यावर फार काही सांगू शकणार नाही. आम्ही आता कायदेशीर बाबी तपासू त्याशिवाय काही बोलू शकणार नाही.
तुमच्या वकिलांशी तुमची काही चर्चा झाली आहे का?
वकिलांशी तर बोलणं झालं आहे. पण आम्ही अजून कुठलही कागदपत्र पाहिलेली नाहीत. आम्हाला काही माहितीच नाही. सरकारनं हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी काहीच संपर्क केलेला नाही.
ही कायदेशीर लढाई तुमच्यासाठी किती कठीण होती?
गेल्या 18-19 वर्षांपासून आम्ही लढाई लढत आहोत. 2002ला मोठी दंगल झाली. बिल्किसबरोबर एवढं वाईट घडलं. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही खूप सोसलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आम्ही वाट पाहिली होती.
मधल्या काळात तुम्हाला नुकसान भरपाई, घर आणि नोकरी देण्याबाबत चर्चा झाली होती. सरकारनं हे आश्वासन पूर्ण केलं आहे का?
सरकारनं नुकसान भरपाई तर दिली आहे. पण नोकरी आणि घर मात्र मिळालेलं नाही.
नोकरीमध्ये नेमकी काय अडचण येत आहे?
नोकरी बिल्किस यांना मिळत होती. पण माझं म्हणणं आहे की तिला आता मुलांना सांभाळायचं आहे. तिच्या ऐवजी मला नोकरी द्यावी. तिने जे भोगलं आहे. एवढ्या कठीण स्थितीतून ती गेली आहे. तिच्या मनात भीतीसुद्धा आहे. त्यामुळे तिच्या ऐवजी मला नोकरी द्यावी असं मला वाटतं.
त्या घटनेत तुमच्या कुटुंबातील किती लोकांचा मृत्यू झाला होता. आता जे जिवंत आहेत त्यांची काय स्थिती आहे?
माझ्या कुटुंबाचे 14 लोक त्यावेळी मारले गेले. त्यात बिल्किस आणि माझ्या काकांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. बिल्किस यांची आई तिच्या दोन बहिणी, दोन छोटे भाऊ, माझे काका, काकू, त्यांच्या तीन मुली शिवाय बिल्किस यांचे मामा, आमच्या आत्या, आणि माझी 3 वर्षांची मुलगी. माझी एक मुलगी तर अवघी 2 दिवसांची होती. त्या 2 दिवसांच्या मुलीचा जन्म तर दंगलीत जीव वाचवत पळताना झाला होता.
आता तुमच्या कुटुंबासाठी पुढची स्थिती नेमकी कशी तुम्ही पाहाता?
पुढे काय करायचं याचा आम्ही विचार कर आहोत.
तुम्ही सध्या उदरनिर्वाहासाठी काय करता? बिल्किस सध्या काय करतात?
मी इतर कामं करतो त्यातून आमचं घर चालतं. बिल्किस घरकामच करतात.
अजूनही तुम्हाला लपून राहावं लगतंय का?
आम्हाला सतत घरं बदवाली लागतात. एका ठिकाणी जास्तकाळ राहू शकत नाही. आमच्यामुळे कुणाला काही त्रास होऊ नये याची काळजी आम्हाला घ्यावी लागते.
बिल्किस यांचा न्यायालयीन लढा
3 मार्च 2002 : बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार, दोन दिवसांच्या मुलीसह 14 नातेवाईकांची हत्या.
4 मार्च 2002 : पोलिसात तक्रार दाखल.
2002 : अहमदाबाद न्यायालयात खटला सुरू.
ऑगस्ट 2004 : साक्षीदारांना धमकावणे आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याच्या शक्यतने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मदतीने खटला मुंबईत वर्ग.
21 जानेवारी 2008 : विशेष न्यायालयाने 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर डॉक्टर आणि पोलिसांसह 7 जणांची मुक्तता केली.
4 मे 2017 : मुंबई उच्च न्यायालयाने 7 जणांना दोषी ठरवलं. यात 5 पोलीस आणि 2 डॉक्टरांचा समावेश होता. पुराव्यांशी छेडछाड आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपात दोषी सिद्ध.
10 जुलै 2017 : दोषी सिद्ध झालेल्यांपैकी आयपीएस अधिकारी आर.एस.भगोरासह 4 पोलीस आणि 2 डॉक्टरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका 'स्पष्ट पुरावे' असल्याचे म्हणत न्यायालयाने फेटाळली.
2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सरकारला दिले होते.
बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका झाल्याचे सांगण्यात येत आहे.
2002 साली गुजरात दंगलीत एक हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. यात बहुतांश मुस्लीम होते. गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत 60 हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. मुस्लीम समाजातल्या लोकांनीच आग लावल्याचा आरोप करत हिंदू जमावाने गुजरातच्या अनेक शहरात मुस्लिमांना लक्ष्य करायला सुरुवात केली आणि दंगल उसळली. तीन दिवस ही दंगल सुरू होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)