You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी, बिल्कीस बानो यांचा टाईमच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश
अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम नियतकालिकाने जगातील प्रभावाशाली 100 व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुष्मान खुराणा यांच्यासह शाहीन बाग आंदोलनाचा चेहरा बिल्कीस बानो यांचा समावेश आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवरील संशोधक प्राध्यापक रवींद्र गुप्ता यांनाही स्थान मिळालं आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा समावेश असला तरी त्यांच्याबद्दल परखड शब्दात भाष्य केलं आहे.
टाइम मॅगजिनने लिहिलं आहे, "लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका घेणं असा अर्थ होत नाही. निवडणुकांमधून कोणाला किती मतं मिळाली आहेत ते कळतं. मात्र त्यापेक्षा ज्यांनी विजेत्या उमेदवारासाठी मतदान केलेलं नाही त्यांचे अधिकार महत्त्वाचे आहेत.
"गेल्या सात दशकांपासून जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असलेला देश असा भारताचा नावलौकिक आहे. 1.3 अब्ज लोकसंख्येत ख्रिश्चन, मुसलमान, शीख, बौद्ध, जैन अशा असंख्य धर्मांचे-पंथांचे-समाजाचे नागरिक राहतात. दलाई लामा सर्वधर्मसमभाव आणि बंधुत्व तसंच स्थिरतेसाठी भारताचं कौतुक करतात.
"नरेंद्र मोदी यांनी या वातावरणाला वादग्रस्त केलं आहे. भारतात अजूनही 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. मात्र मोदींनी असं सरकार चालवलं ज्यांना कशाचीच पर्वा नाही. हिंदू राष्ट्रवादची कास धरलेल्या भारतीय जनता पक्षाने सहिष्णुतेला रद्दबातल केलं आहे. त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केलं आहे. कोरोना संकट हे असंतोषाला दाबून टाकण्याचं साधन बनलं आहे. जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही आणखी अंधारात गेली आहे," अशा शब्दांत टाईमने मोदींवर परखड भाष्य केलं आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अनेक विदेशी मासिकांनी त्यांना मुखपृष्ठावर स्थान दिलं आहे. त्यांचा कार्यकाळ आणि कार्यशैलीवर टीका केली आहे.
टाईम मासिकाने गेल्यावर्षीही सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांना मुखपृष्ठावर स्थान दिलं होतं. त्यावरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी टाईम मासिकाने मोदी यांचा फोटो छापताना लिहिलं होतं- India's divider in Chief असं लिहिलं होतं.
जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही मोदी सरकारला पाच वर्ष सहन करू शकतं का?
त्यावेळी भाजपने आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा त्यावेळी म्हणाले होते, 2014 मध्ये असंख्य विदेशी मासिकांनी मोदींवर टीका करणारे लेख छापले होते.
2015 मध्येही टाईम मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात पंतप्रधान मोदींवर कव्हरस्टोरी केली होती. त्यावेळी त्या लेखाचं शीर्षक होतं- why Modi matters
आयुष्मान खुराणा
टाईम मासिकाच्या या यादीत अभिनेता आयुष्मान खुराणाचं नाव आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं की, टाईम मासिकाच्या जगातील प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत स्थान मिळणं अभिमानाची गोष्ट आहे. टाईममध्ये आयुष्मानवर दीपिका पदुकोणने लेख लिहिला आहे.
विकी डोनर चित्रपटापासून मी आयुष्मानला ओळखते. त्याआधीही तो बॉलीवूडचा भाग होताच. पण आज आपण त्यांच्या अनेकविध भूमिकांविषयी बोलतो आहोत. कारण त्यांनी दमदार अभिनयासह आशयघन भूमिकांना न्याय दिला आहे. बहुतांश पुरुष अभिनेता ताकद आणि पौरुषत्वाच्या साचेबद्ध प्रतिमा असलेल्या भूमिकांमध्ये अडकून पडतात. आयुष्मान यांनी या समजाला छेद देत आव्हानात्मक भूमिका समर्थपणे पेलल्या.
बिल्कीस बानो
सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात झालेल्या आंदोलनाचा चेहरा याअर्थी 82 वर्षीय बिल्कीस बानो यांना टाईम मासिकाने प्रभावशाली शंभर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केलं आहे.
बिल्कीस बानो यांना शाहीन बाग की दादी अशी उपाधीही मिळाली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा परत घेण्यासाठी तब्बल शंभर दिवस बिल्कीस बानो या आंदोलनाचा भाग होत्या.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बिल्कीस बानो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. ते शेती आणि मजुरी करत असत. बिल्कीस बानो सध्या दिल्लीत आपल्या मुलासुनांबरोबर राहतात.
टाईम मासिकाने त्यांच्याविषयी लिहिलं आहे की "बिल्कीस या भारतातील वंचितांचा चेहरा बनल्या. आंदोलन सुरू आहे त्याठिकाणी त्या सकाळी आठपासून रात्री 12 पर्यंत उपस्थित असत. त्यांच्याबरोबरीने हजारो महिलाही या आंदोलनात सहभागी होत. महिलांनी केलेल्या या आंदोलनाला विरोधाचं प्रतीक मानलं गेलं.
"सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी नेता ज्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्यांच्यासाठी बिल्कीस बानो आशेचा किरण ठरल्या. लोकशाही जिवंत राखणं किती आवश्यक आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.
"शाहीन बाग आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकदा म्हणाले होते की नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही. त्यावर बिल्कीस बानो म्हणाल्या, गृहमंत्री म्हणतात की आम्ही एक इंचही मागे हटणार नाही तर मग मी सांगते आम्हीही एक पाऊल मागे हटणार नाही," असं टाइम मॅगजिनने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)