अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग #5 मोठ्याबातम्या

अमिताभ बच्चन, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. अमिताभ बच्चन यांना कोरोना

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना करोना संसर्ग झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. 'आज तक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अमिताभ बच्चन यांना यापूर्वी जुलै 2020 मध्ये करोना संसर्ग झाला होता. आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या 14 व्या पर्वाचं निवेदन करण्याचं काम करत आहेत. सध्या त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू होतं.

अमिताभ बच्चन स्वत: च्या प्रकृतीची काळजी घेत असतात. ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करतात. करोना संसर्गाच्या लाटेमध्ये देखील त्यांनी विशेष काळजी घेतली होती. मात्र, त्यांना यापूर्वी करोना संसर्ग झाला होता. एकदा करोना संसर्ग झाला असल्यानं ते विशेष काळजी घेत होते.

2. ब्राह्मोस पाकिस्तान हद्दीत गेल्याप्रकरणी तीन अधिकारी निलंबित

पाकिस्तानवर (Pakistan) चुकून डागलेल्या क्षेपणास्त्रासाठी तीन भारतीय वायुसेना अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले. 9 मार्च 2022 रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र (Brahmos Misfire) चुकून डागण्यात आले होते. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आल्या आहेत, असे आयएएफने (IAF) निवेदनात म्हटले आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

ब्राह्मोस, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्राह्मोस

एअर व्हाईस मार्शलला एअर मुख्यालयातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अपघाताची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सविस्तर तपास केल्यानंतर या घटनेसाठी तिघांना जबाबदार धरण्यात आले. 9 मार्च रोजी चुकून क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते. पाकिस्तानने हे प्रकरण उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 मार्च रोजी संसदेत सविस्तर उत्तर दिले होते.

क्षेपणास्त्रावर कोणतेही वारहेड नव्हते. त्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियाँ चन्नू शहरात पडले होते. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, भारताने लगेचच या घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता.

3. टोमॅटो फ्ल्यू संदर्भात गाईडलाईन्स जारी

कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असताना आता टोमॅटो फ्लूने टेन्शन वाढवलं आहे. हा आजार लहान मुलांमध्ये वेगानं पसरत आहे. केरळच नाही तर आता आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील याचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने अलर्ट जारी केला आहे. टोमॅटो फ्लू संदर्भात केंद्र सरकारने काही गाइडलाईन्स देखील दिल्या आहे. लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

केरळपाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू आणि ओरिसामध्येही टोमॅटो फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 82 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सगळ्यात जास्त लहान मुलांचा सामावेश आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटो फ्लू झालेल्या रुग्णांमध्ये शरीर जड होणे, सांधेदुखी, ताप, उलट्या, त्वचेची जळजळ ही सामान्य लक्षणे आहेत. त्याची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

लहान मुलांच्या अंगावर लाल रंगाचे फोड येतात हळूहळू हे फोड वाढत जातात. साधारण ते टोमॅटोच्या आकारासारखे होतात म्हणून या फ्लूला टोमॅटो फ्लू म्हणतात. लहान मुलांमध्ये हातपाय, तोंडाचे आजार खूप सामान्य आहेत. त्यामुळेच टोमॅटो फ्लू हा लहान मुलांना पटक होतो.

हा आजार 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होत असला तरी टोमॅटो फ्लू जा धोका मोठ्यांना देखील आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका आहे. एवढंच नाही तर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना देखील या आजाराचा धोका जास्त आहे.

4. रामदेवबाबांना फटकारलं

अ‍ॅलोपॅथी आणि अ‍ॅलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर टीका करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, योगाचा प्रसार करणाऱ्या बाबा रामदेव यांनी अन्य उपचारपद्धतींवर टीका करू नये, अशी टीका करण्यापासून त्यांना रोखण्याची गरज आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

बाबा रामदेव, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबा रामदेव

करोनाकाळात बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी या उपचारपद्धतीवर आणि करोना प्रतिबंधक लसीकरणावर टीका केली होती. रामदेव यांच्या वक्तव्यावरून आयएमएने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

''बाबा रामदेव यांना काय झाले आहे? योगा लोकप्रिय केल्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी इतर उपचारपद्धतींबाबत शंका घेऊ नये, त्यांनी इतर वैद्यकीय उपचारपद्धतींवर प्रश्न उपस्थित करू नये. आयुर्वेदिक उपचारपद्धतींमुळे रुग्ण आजारातून बरे होतील याची हमी तुम्ही घेऊ शकता का? सर्व डॉक्टरांवर ते मारेकरी आहेत, अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही दिल्या होत्या. त्या चुकीच्या असून अन्य उपचारपद्धतींवर तुम्ही टीका करू नये,'' अशा शब्दांत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव यांना फटकारले.

5. राणेंच्या बंगल्यावरून न्यायालयाचा संताप

महाविकास आघाडी सत्तेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास मुंबई महापालिकेने ठाम नकार दिला. सत्ताबदलानंतर राणे यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास अनुकूलता दर्शवली. त्यावर पालिका उच्च न्यायालयापेक्षा श्रेष्ठ आहे का? असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने मंगळवारी केला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

नारायण राणे, बीएमसी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नारायण राणे

न्यायालयाने राणेंच्या कंपनीने केलेल्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे. राणे यांच्या याचिकेला व पालिकेच्या भूमिकेला विरोध करणारे कोणी नसल्याने अखेरीस न्यायालयानेच पालिकेची बदललेली भूमिका तपासण्याचा निर्णय घेतला. राणे यांनी पालिकेच्या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

जून महिन्यात पालिकेने व त्यापाठोपाठ उच्च न्यायालयानेही राणे यांची याचिका फेटाळली. मात्र थोड्याच दिवसात राणे यांच्या कालका रिअल इस्टेट कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर बांधकाम नियमित करण्यास पालिकेनेही तयारी दर्शवली. परंतु आर.डी. धानुका आणि न्या. कमल खता यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)