न्यूड फोटोंचं मार्केट : जिथे महिलांच्या परवानगीशिवाय विकले जातात त्यांचे खाजगी क्षण

महिला फोटो
    • Author, मोनिका पालाहा आणि पॅनोरमा टीम
    • Role, बीबीसी न्यूज

"तिच्या नग्न फोटोसाठी 5 पाउंड... हवे असतील तर मला डीएम करा."

"मला तिचे काही व्हीडिओ मिळाले आहेत, ते विकायचे आहेत."

"आपण तिच्यासोबत काय करणार आहोत?"

ऑनलाइन फोटो आणि कमेंट्स स्क्रोल करत असताना मला कसंतरीच होत होतं.

तिथे हजारो फोटोग्राफ होते. नग्न किंवा अगदी तोकड्या कपड्यांतल्या बायकांच्या फोटोंची न संपणारी शृंखलाच दिसत होती. त्याखाली पुरुषांनी महिलांबद्दल अत्यंत विखारी अशा भाषेत केलेली शेरेबाजी होती... अगदी बलात्काराच्या धमक्याही होत्या. मी ज्या काही कमेंट्स पाहिल्या होत्या, त्यांतल्या अनेक मी इथे लिहू पण शकत नाही.

माझ्या एका मैत्रिणीकडून मिळालेल्या माहितीनंतर मी हे फोटो पाहिले. इन्स्टाग्रामवरून तिचा एक फोटो उचलून रेडिट (Reddit) वर पोस्ट करण्यात आला होता. तो काही न्यूड नव्हता, पण तरीही त्यावर लैंगिक आणि खालच्या पातळीवरील भाषेत कमेंट्स आल्या होत्या. माझ्या मैत्रिणीला स्वतःची आणि इतर महिलांचीही काळजी वाटत होती.

मला जे काही दिसलं तो बाजारच होता. अनेक अनामिक प्रोफाईलवरून उघडउघडपणे फोटो शेअर केले जात होते, ट्रेडिंग होत होतं आणि ते विकलेही जात होते... सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्या बायकांचे हे फोटो होते, त्यांच्या परवानगीशिवाय हा उद्योग करण्यात आला होता.

ही तथाकथित रिव्हेंज पॉर्नचीच नवीन आवृत्ती होती, जिथे खाजगी लैंगिक गोष्टी या संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पब्लिश केल्या जातात. बहुतांश वेळा हे सूडानं पेटलेल्या एक्स-पार्टनरकडून केलं जातं.

हे अतिशय खाजगी स्वरुपाचे फोटो हे हजारो प्रेक्षकांसाठी केवळ शेअरच केले जात नाही, तर अनेक पुरुष हे आपली ओळख लपवून या महिलांची खऱ्या आयुष्यातली ओळख उघड करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. या प्रकराला 'डॉक्सिंग' म्हणतात.

पत्ते, फोन नंबर आणि सोशल मीडिया हँडलची माहिती ऑनलाइनच एकमेकांना दिली जाते आणि मग त्यानंतर या महिलांना अश्लील कमेंट्स, धमक्या तसंच ब्लॅकमेलसारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.

मला असं वाटलं की, मी इंटरनेटवरच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात धडपडतीये. पण तसं नव्हतं... हे सगळ्या महत्त्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घडत होतं.

Reddit स्वतःला 'इंटरनेटचं फ्रंट पेज' म्हणवून घेतं. त्यांचा स्वतःचा 5 कोटी डेली युजर्सचा प्रेक्षकवर्ग आहे- ज्यांपैकी जवळपास 40 लाख केवळ युकेमधले आहेत.

इथे लोकांना स्वतःचे फोरम तयार करून चालवता येतात, त्यांना 'सबरेडिट्स' म्हणतात. वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असलेले हे लोक असतात. यातले बरेचसे निरुपद्रवीच असतात. पण वादग्रस्त असा लैंगिक मजकूर प्रसिद्ध करण्याचाही Redditचा इतिहास आहे.

2014 मध्ये या साइटवर मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटीजचे अनेक खाजगी फोटो शेअर करण्यात आले होते. त्यानंतर चार वर्षांनी 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर करून सेलिब्रिटींचे सुपरइंपोझ केलेले पॉर्न व्हीडिओ बनविणारा एक ग्रुप Redditने बंद केला.

चॅटचा फोटो
फोटो कॅप्शन, महिलांच्या फोटोवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी केली जाते.

या सगळ्या विवादांना उत्तर देताना या अमेरिकास्थित कंपनीने आपले नियम अधिक कठोर केले आणि लैंगिक, अतिखाजगी स्वरुपाचा मजकूर पोस्ट करण्यासंबंधीचे, धमकीवजा मजकूर पोस्ट करण्यासंबंधीचे नियम कडक केले.

पण तरीही मला एक गोष्ट जाणून घ्यायची होती की, महिलांचे असे खाजगी फोटो Redditवर नेमके कसे शेअर केले जातात आणि ज्यांना या प्रकाराला सामोरं जावं लागलं त्यांना काय वाटतं असेल.

त्यानंतर यापाठीमागे नेमकं कोणं होतं, हेही मला शोधायचं होतं.

कारण Redditने जी काही बंदी घातली तिचा उपयोग झालं नसल्याचंही स्पष्ट होतं. कारण संपूर्ण युकेमध्ये बायकांचे अश्लील फोटो शेअर करणारे Redditचे उपगट अस्तित्वात होते.

यातला पहिला गट होता दक्षिण आशियाई महिलांचा आणि त्यामध्ये 20 हजारपेक्षा अधिक युजर्स होते. त्यांपैकी बरेचसे पुरूष हे त्याच कम्युनिटीतले (दक्षिण आशियाई) होते, ज्यांनी इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि पंजाबीमध्ये कमेंट्स केल्या होत्या. काही महिलांना मी पण ओळखलं कारण, त्यांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स होते. त्यातल्या अगदी मोजक्या जणींना मी वैयक्तिकरित्याही ओळखत होते.

यामध्ये 15 हजारांहूनही अधिक फोटो होते. त्यांपैकी हजारो फोटो आम्ही चाळले आणि त्यात 150 वेगवेगळ्या महिलांचे लैंगिक फोटो होते.

या फोटोंवर ज्या कमेंट्स आल्या होत्या, त्यातून या बायकांकडे एखाद्या सेक्शुअल ऑब्जेक्टप्रमाणे पाहिलं गेलं होतं. माझी खात्री होती, की यांपैकी कोणत्याही महिलेनं या पद्धतीच्या फोरमवर आपले फोटो प्रसिद्ध करायला परवानगी दिली नसेल.

माझ्या मैत्रिणीप्रमाणे काहीजणींचे फोटो तर थेट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून उचलले होते आणि ते आक्षेपार्हही नव्हते. पण त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या, त्या अतिशय पातळी सोडून होत्या. काहीवेळा तर न्यूड फोटोंसाठी पीडितेचा फोन आणि कॉम्प्युटर हॅक करण्याच्या रिक्वेस्टही होत्या.

आम्ही संपर्क साधलेल्या महिलांपैकी एका महिलेनं सांगितलं की, ग्रुपवर तिचा इन्स्टाग्रामवरून घेतलेला क्रॉप टॉपमधला फोटो पोस्ट गेला. त्यानंतर आता तिला दररोज सोशल मीडियावर आगंतूक लैंगिक मेसेज येतात, तिच्यावर बलात्कार करण्याच्या धमक्याही दिल्या जातात.

या Redditच्या उपगटावर महिलांचे फोटो केवळ शेअर केले जात नाहीत, तर विकलेही जातात. हे फोटो आपल्या पार्टनरला पाठवलेल्या सेल्फीप्रमाणे वाटतात, जे खाजगी आहेत आणि इतरांच्या वापरासाठी नाहीयेत.

या साइटवर व्हीडिओ पण आहेत, जे जास्त ग्राफिक आहेत. महिलांचे हे व्हीडिओ शरीरसंबंध ठेवताना चोरून शूट केले आहेत, असं वाटतं.

'मी तुला शोधून काढेन'

एक नग्न महिला ओरल सेक्स करतानाचा व्हीडिओ आहे, त्याखाली मेसेजचा एक थ्रेड आहे.

"कोणाकडे हे अजून व्हीडिओ आहेत का?" एका अनामिक युजरने त्या महिलेसाठी अत्यंत अपमानास्पद संबोधन वापरत प्रश्न विचारला.

"माझ्याकडे तिचं एक अख्खं फोल्डर आहे...5 पाउंड्सना," दुसऱ्या एका युजरने त्यावर म्हटलं.

आपले व्हीडिओ अशापद्धतीने शेअर केल्याचं आयेशाला (बदललेलं नाव) गेल्या वर्षी लक्षात आलं.

तिला असं वाटतं की, तिच्या एक्स पार्टनरने हा व्हीडिओ गुपचूप शूट केला असावा.

तिचा जो विश्वासघात झालाय, त्याचा तर तिला धक्का बसलाच आहे, पण त्याचबरोबर तिला सोशल मीडियावरून होणारा छळ, धमक्या यांनाही सामोरं जावं लागतंय.

महिलांच्या फोटोवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी केली जाते.
फोटो कॅप्शन, महिलांच्या फोटोवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी केली जाते.

"जर तू माझ्यासोबत सेक्स केला नाहीस, तर हा व्हीडिओ तुझ्या पालकांना पाठवेन. मी तुला शोधून काढेन...जर तू माझ्यासोबत सेक्स करायला तयार झाली नाहीस, तर तुझ्यावर बलात्कार करेन."

यासारख्या कमेंट्स करून आयेशाला त्रास देणाऱ्यांनी तिचे अजून फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलही केलं आहे.

"मी एक पाकिस्तानी मुलगी आहे. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं किंवा तशा कोणत्याही कृती आमच्या समाजात योग्य समजल्या जात नाहीत. त्या समाजमान्य नाहीयेत," ती सांगते.

आयेशानं बाहेरच्या जगात मिसळणंच बंद केलं आहे. एवढंच काय ती घरातूनही बाहेर पडत नाही. तिने अगदी जीव देण्याचाही प्रयत्न करून पाहिला. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र जे काही घडलंय ते तिला पालकांना सांगावंच लागलं.

हे सगळं ऐकल्यानंतर आई आणि वडील दोघांनाही नैराश्य आल्याचं ती सांगते.

"जे काही घडत होतं आणि त्यांना ज्या परिस्थितीत मी ढकललं होतं त्याची मला प्रचंड शरम वाटत होती," ती सांगते.

आयेशानं Reddit शी खूप वेळा संपर्क साधला. एकदा तिने सांगितलेला एक व्हीडिओ डिलीट करण्यात आला, पण दुसरा व्हीडिओ डिलीट करण्यासाठी जवळपास चार महिने लागले. पण हे इथंच थांबलं नाही. डिलीट केलेला व्हीडिओ हा इतर सोशल मीडिया साइटवर शेअर केला गेला होता आणि महिन्याभराने मूळ साइटवरही पुन्हा अपलोड झाला.

आयेशाचा व्हीडिओ ज्या गटावर टाकण्यात आला होता, तो ग्रुप झिप्पोमॅड नावाच्या युजरनं तयार केला होता आणि तोच हा ग्रुप चालवतही होता. या नावावरूनच संबंधित व्यक्तीचा शोध घेतला गेला.

प्रवर्तक म्हणून झिप्पोमॅडनं त्याच्या ग्रुपकडून Redditच्या नियमांचं पालन होईल याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. पण त्यानं ते केलं नाही.

मी जेव्हा या झिप्पोमॅडला ट्रॅक करत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, Redditवर त्याने त्याच्या उपगटाचे तीन व्हर्जन तयार केले होते. Redditकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी एक ग्रुप बंद केला की, त्याचं दुसरं व्हर्जन तयार केलं जायचं.

या ग्रुपचा जेव्हा नवीन अवतार तयार व्हायचा, तेव्हा त्याचं नाव हे आधीच्या नावाचंच बदललेलं रुप असायचं. प्रत्येक ग्रुपमध्ये काही कंटेट असायचाच आणि त्याचे हजारो अॅक्टिव्ह युजर्सही.

न्यूडचा हा जो काही व्यापार आणि व्यवहार होतो, तो आता इतका पसरला आहे की, ऑनलाइन हिंसाचाराचा अभ्यास करणाऱ्यांनी याला एक नावही दिलं आहे- कलेक्टर कल्चर.

डरहम विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक असलेल्या आणि ऑनलाइन हिंसाचाराचा अभ्यास करणाऱ्या क्लेअर मॅकग्लेन सांगतात, "या कृती कोणा लिंगपिसाट किंवा विचित्र व्यक्तीच करतात असं नाहीये. असे खूप लोक आहेत, हजारोच्या संख्येनं हे पुरूष आहेत."

या फोटोंचा व्यापार हा मेसेजिंग अॅप्सवरच्या अतिशय छोट्या, खाजगी चॅट ग्रुप्समध्ये चालतो. त्याचप्रमाणे तो वेबसाइट्सवरही होतो, जिथे हजारो पुरूष भेट देऊ शकतात, प्राध्यापक मॅकग्लेन सांगतात.

त्या सांगतात की, "अशाप्रकारच्या कम्युनिटीमध्ये असलेले पुरूष हे त्यांच्याकडे जास्तीत जास्त फोटोंचा साठा करणं हे स्वतःच्या प्रतिष्ठेचा मुद्दा करतात. असा संग्रह केल्यामुळेच हे फोटो किंवा व्हीडिओ हे पूर्णपणे नष्ट करता येत नाहीत. आयेशाच्या बाबतीतही हेच झालं. तिचा डिलीट केलेला व्हीडिओ दुसऱ्या कोणाच्या तरी संग्रहातून पुन्हा एकदा रिपोस्ट केला गेला."

Reddit वरून आपले फोटो काढून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात महिलांनी मला सांगितलं की, कंपनी पुरेशी मदत करतीये असं त्यांना वाटत नव्हतं. चौघीजणींनी सांगितलं की, Redditवरून त्यांच्याशी संबंधित गोष्टी हटवल्याच गेल्या नाहीत. काहीजणींना तो कन्टेन्ट डिलीट करण्यासाठी आठ महिने वाट पाहावी लागली.

Redditने आम्हाला सांगितलं की, परवानगी न घेता अपलोड केलेले 88 हजार लैंगिक फोटो त्यांनी काढून टाकले आहेत आणि त्यांनी हा विषय 'अधिक गांभीर्याने' घेतला आहे.

ते यासाठी ऑटोमेटेड टूल वापरतात आणि परवानगीशिवाय अपलोड केलेले फोटो शोधून ते काढून टाकण्यासाठी एक टीम असल्याचंही Redditनेही सांगितलं आहे. आम्ही नियमितपणे याबाबत कारवाई करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

"अशाप्रकारचा कंटेट शोधून काढून त्याला प्रतिबंध करण्यात अधिक तातडी करणं गरजेचं आहे, हेही आम्हाला मान्य आहे. त्यामुळेच आता आम्ही आमची टीम वाढवत आहोत, वेगवेगळे टूल्स वापरत आहोत आणि हे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत," कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

जॉर्जि तिचे आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या पार्टनरबद्दल म्हणते, " मला त्याला शिक्षा द्यायची नाहीये. त्यानं पुन्हा असं करू नये ही माझी इच्छा आहे."
फोटो कॅप्शन, जॉर्जि तिचे आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या पार्टनरबद्दल म्हणते, " मला त्याला शिक्षा द्यायची नाहीये. त्यानं पुन्हा असं करू नये ही माझी इच्छा आहे."

महिलांना त्यांचे खाजगी फोटो अपलोड करण्यापासून संरक्षण देता यावं यासाठी युकेमधील कायदा प्रयत्न करत आहे.

संपर्क साधला आणि तिचे काही खाजगी फोटो इंटरनेटवर शेअर केले जात असल्याचं सांगितलं. हे कळल्यावर ती तातडीने पोलिसात गेली. केवळ एकाच व्यक्तीकडे आपले असे फोटो आहेत, याची तिला कल्पना होती.

"किती लोकांनी ते फोटो पाहिले असतील याचा मी अंदाजही बांधू शकत नाही आणि हे फोटो पाहण्यापासून लोकांना थांबविण्याचाही काही मार्ग नाहीये. अगदी आताच्या घडीलाही लोक माझे फोटो पाहात असतील," ती सांगते.

तिच्या एक्स-पार्टनरने आपणच हे फोटो शेअर केल्याचं मान्य केलं. पण त्यानं तिला हेही सांगितलं, की त्याचा उद्देश तिला दुखावण्याचा किंवा तिला शरम वाटावी असं काही कृत्य करण्याचा नव्हता.

त्याचा हाच कबुलीजबाब हा कायद्यातली एक पळवाट ठरला. युकेमध्ये रिव्हेंज पॉर्नविरोधात असलेल्या सध्याच्या कायद्यानुसार असे फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीचा उद्देश हा पीडितेला त्रास देणं आहे, हे पुराव्यानं सिद्ध होणं आवश्यक आहे.

सरकारची स्वतंत्र सल्लागार संस्था असलेल्या लॉ कमिशनने ही तरतूद काढून टाकण्याची शिफारस केली आहे. पण सध्या पार्लमेंटमध्ये प्रक्रियेत असलेल्या ऑनलाइन सेफ्टी विधेयकामध्ये हा बदल समाविष्ट करण्यात आला नाहीये.

आयेशाप्रमाणे दक्षिण आशियाई महिलांना लक्ष्य करणारं फोरम तयार करणाऱ्या झिप्पोमॅडचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करत होते. साइटवर त्याने केलेल्या कमेंट्स मी जेव्हा पाहात होते, तेव्हा कोठेही खरं नाव, ईमेल आयडी किंवा फोटो आढळले नाहीत.

केवळ त्याच्या युजरनेमवरून तो कोण आहे याचे धागेदोरे मिळाले- तो झिप्पोच्या लायटरचा संग्रह करतो आणि त्याला एक लायटर विकायचा होता. त्यामुळे मी एक फेक अकांउट तयार केलं आणि तो लायटर खरेदी करण्याची तयारी दाखवली.

तो भेटीसाठी तयार झाला आणि अखेरीस आमच्या अंडरकव्हर रिपोर्टरनं त्या माणसाला प्रत्यक्ष पाहिलं ज्यानं असंख्य महिलांच्या खाजगीपणावर गदा आणली होती.

त्याचं नाव हिमेश शिंगाडिया आहे. त्यानं पदवीपर्यंतच शिक्षण घेतलंय आणि एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो.

पॅनोरमाने संपर्क साधल्यानंतर शिंगाडियांनी त्यांचं subreddit अकांउंट डिलीट केलं. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, हा ग्रुप दक्षिण आशियाई महिलांचं कौतुक करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. पण मेंबर्सची संख्या जास्त असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणं अवघड होऊन बसलं.

आपण कोणाचेही खाजगी फोटो किंवा इतर कोणतेही तपशील शेअर केले नसल्याचं तसंच त्याचा व्यवहार केला नसल्याचंही शिंगाडिया यांनी म्हटलं. काही महिलांनी सांगितल्यावर त्यांनी आक्षेपार्ह मजकूर हटवायलाही त्यांना मदत केली.

हिमेश शिंगाडिया
फोटो कॅप्शन, हिमेश शिंगाडिया

"झिप्पोमॅड आपल्या कृतींबद्दल दिलगिर आहे. हे त्याचं खरं व्यक्तिमत्त्व नाहीये," असंही त्यानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Reddit नेही असे इतर ग्रुपही हटवले आहेत.

याचाच अर्थ हजारो महिलांचे फोटोही हटवले गेले. त्यामुळे त्यांना ज्या नको असलेल्या यातना झाल्या, त्यातून थोडा तरी दिलासा मिळाला असेल.

तंत्रज्ञान कंपन्या आणि कायदे बनविणाऱ्यांनी महिलांना अशाप्रकारच्या व्यापाराला सामोरं जावं लागू नये, म्हणून कायद्यात बदल करणं गरजेचं आहे.

जॉर्जि तिचे आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या पार्टनरबद्दल म्हणते, " मला त्याला शिक्षा द्यायची नाहीये. त्यानं पुन्हा असं करू नये ही माझी इच्छा आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)