R Kelly : अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध, सेक्स कल्ट आणि पॉर्न बनवणारा गायक कोण आहे?

फोटो स्रोत, Reuters
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
अकरा महिला न्यूयॉर्कच्या कोर्टात आपबिती सांगत होत्या. त्यातल्या अनेक जणींची ओळख गुप्त आहे.
एका सेलिब्रिटीने त्या अल्पवयीन असताना त्यांचं लैंगिक शोषण कसं केलं याबद्दल त्या साक्ष देत होत्या.
"तो हिंसक व्हायचा, राग-राग करायचा. मला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचा आणि त्याला 'डॅडी' म्हणून हाक मारायला सांगायचा," एकीने सांगितलं.
"त्याने जबरदस्तीने माझ्याकडून पत्रं लिहून घेतली. त्यात खोटी गोष्टी होत्या. याच पत्रांचा वापर त्याने नंतर मला ब्लॅकमेल करण्यासाठी केला."
हा गायक गेली दोन दशकं आपल्या अधिकाराचा, पैशाचा आणि स्थानाचा वापर करत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत होता. न्यूयॉर्कमधल्या एका कोर्टाने त्याला या प्रकरणी दोषी ठरवलं.
पण गेल्या दोन दशकात कोणकोणत्या मुलींना काय काय सहन करावं लागलं? आणि कोण होता हा गायक?
आर केली त्याचं नाव.
या मुलींपैकी एक होती जेऱ्होंडा पेस. जेऱ्होंडाने केली तिच्यासोबत काय करायचा हे कोर्टात सांगितलं.
"केली मी काय कपडे घालावेत, काय खावं, इतकंच काय कधी बाथरुमला जावं या सगळ्यावर नियंत्रण ठेवायचा."
"त्याच्या दृष्टीने मी चांगलं वर्तन केलं असेल तर तो लगेचच मला टॉयलेटला जायची परवानगी द्यायचा पण त्याच्या दृष्टीने माझं काही चुकलं असेल तर टॉयलेटला जाण्यासाठी तो जबरदस्तीने तीन तीन दिवस थांबायला लावायचा."
या नियमांना ती 'रॉब्स रूल्स' म्हणाली. तिने कोर्टात असाही दावा केला की, "मी जेव्हा त्याचे नियम मोडले तेव्हा त्याने माझ्या मुस्काटात मारली आणि मी बेशुद्ध पडेपर्यंत माझा गळा दाबला."
जेऱ्होंडा आता 28 वर्षांची आहे. तिच्या साक्षीत तिने सांगितलं की ती 16 वर्षांची असताना केलीने तिच्यासोबत सेक्स केला. "मी सुरुवातीला त्याला सांगितलं की माझं वय जास्त आहे. पण जेव्हा त्याला मी खरं सांगितलं त्यानंतरही त्याने माझ्याशी सेक्स करणं बंद केलं नाही."

फोटो स्रोत, Reuters
तिने आपल्याला 'डॅडी' म्हणून हाक मारावी असं केलीने तिला सांगितलं होतं.
"त्याची इच्छा असायची की मी माझ्या केसांच्या दोन वेण्या घालाव्यात आणि शाळकरी मुलीसारखे कपडे घालून त्याच्याशी सेक्स करावा."
आर केलीच्या वकिलांनी जेऱ्होंडाला कोर्टात खोटं पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी म्हटलं की, जेऱ्होंडा फक्त एक फॅन आहे जिला पैसे हवेत आणि केलीचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती असं करते आहे.
पण केलीवर आरोप करणारी जेऱ्होंडा एकटीच नव्हती.
आणखी एका महिलेने तिची कहाणी सांगितली.
या महिलने सांगितलं की, ती केलीसोबत पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. ती 17 वर्षांची असताना केलीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवायला सुरुवात केली. तिने म्हटलं की, 'दर दोन तीन दिवसांनी तिला मारहाण व्हायची.'
केलीने आपल्याला गर्भपात करायला सांगितलं असंही ती म्हणाली.
'मी जीव वाचवून पळत होते'
कोर्टात साक्ष देताना एका जेन (बदलेलं नाव) महिलेने सांगितलं की केलीने तिच्यावर कसे अत्याचार केले. "एकदा माझ्या मैत्रिणीला मी केलीविषयी मेसेज केला तेव्हा त्याने सैन्यात असतात तशा प्रकारच्या बुटांनी मला मारहाण केली. माझ्या संपूर्ण शरीरावर तो प्रहार करत होता आणि मी जीव वाचवून पळत होते."

फोटो स्रोत, Getty Images
केलीने तिचे अपमानजनक व्हीडिओ रेकॉर्ड केल्याचंही तिने म्हटलं.
"तो शिक्षा म्हणून असे व्हीडिओ रेकॉर्ड करायचा. एकदा त्याने माझ्या चेहऱ्यावर विष्ठा लावायला सांगितलं आणि मी तसं करत असताना त्याने माझा व्हीडिओ रेकॉर्ड केला."
कोण आहे आर केली?
आर केलीचं पूर्ण नाव रॉबर्ट केली असं आहे. त्याचा जन्म अमेरिकेतल्या शिकागोत झाला. त्याची आई शिक्षिका होती.
केलीला लहानपणापासूनच संगीतात रूची होती. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने चर्चमध्ये गायला सुरुवात केली.
वयाच्या 12 व्या वर्षी आपलं लैंगिक शोषण झालं असं त्यानेच आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. एका महिला नातेवाईकाने आपला बलात्कार केल्याचंही त्याने म्हटलं. या वयात त्याने आपल्या एका मैत्रिणीचा बलात्कार होतानाही पाहिलं असंही त्याने लिहिलं आहे.
यानंतर केलीने गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, शिकागोच्या मेट्रो स्टेशन्सवर गायला, कधी आंधळा बनून गाणी म्हटली.
1990 साली केलीच्या गाण्याच्या ग्रुपने एका रिअॅलिटी शोमध्ये पहिलं बक्षीस जिंकलं. याबरोबर तगडे पैसेही मिळाले. पण पैशांवरून वाद झाल्याने केलीचा ग्रुप तुटला आणि त्यातले सदस्य वेगळे झाले. पण एव्हाना संगीत क्षेत्रांमधल्या दिग्गजांची नजर केलीवर पडली होती.

फोटो स्रोत, Getty Images
दोनच वर्षांत केलीचा स्वतःचा अल्बम आला आणि त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही.
त्याचे एकामागोमाग अल्बम येत गेले, ते प्रचंड लोकप्रिय झाले आणि केलीही चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला.
त्याने नंतर मायकल जॅक्सन, व्हीटनी ह्युस्टन यासारख्या गायकांसाठीही अल्बम प्रोड्युस केले. नव्वदच्या दशकात आर केली अमेरिकन संगीत इंडस्ट्रीतलं मोठं नाव बनलं होतं.
खोटी कागदपत्रं आणि अल्पवयीन मुलीशी लग्न
1994 साली केलीचं आणखी एक प्रकरण गाजलं. त्याने आलिया नावाच्या एका अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. हे लग्न व्हावं म्हणून त्याने खोटी कागदपत्रं तयार केली.
केलीच्या माजी मॅनेजरने कोर्टात साक्ष दिली की आलियाच्या, जी त्यावेळेस फक्त 15 वर्षांची होती, वयाचा खोटा दाखला बनवण्यासाठी त्याने एका सरकारी अधिकाऱ्याला लाच दिली.
त्यावेळेस आलिया एक पॉप स्टार होती. खोट्या दाखल्यात तिचं वय 18 दाखवण्यात आलं त्यामुळे केली तिच्याशी लग्न करू शकला. त्यावेळी केलीचं वय 27 वर्षं इतकं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
65-वर्षीय मॅनेजर डिमीट्रीस स्मिथनी म्हटलं की, "केलीच्या 1994 टूर नंतर आलिया गरोदर असू शकेल असं मला सांगितलं गेलं. त्यामुळे केलीने घाईघाईने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणजे अल्पवयीन मुलीसोबत सेक्स केला या गुन्ह्याखाली त्याला अटक होणार नाही आणि खटला चालणार नाही."
स्मिथनी म्हटलं की, "मी आधी नाही म्हणालो पण नंतर तिच्या वयाचा खोटा दाखला आणून द्यायला हो म्हणालो."
गंमत म्हणजे केलीने आलियाचा पहिल्या अल्बममधली गाणी लिहिली आणि हा अल्बम प्रोड्युसही केला. या अल्बमचं नाव होतं, 'एज इज नथिंग बट ए नंबर' म्हणजे 'वय फक्त एक आकडा आहे'.
आलियाच्या मागे ज्या मुली नाचायच्या त्यातल्या एकीने नंतर कोर्टात साक्ष देताना म्हटलं की तिने चुकून केली आणि आलिया यांना सेक्स करताना पाहिलं होतं. ही घटना 1993 ची, म्हणजे त्यांच्या लग्नाच्या आधी एक वर्षापूर्वीची होती.
या महिलेने अँजेला या नावाने कोर्टात साक्ष दिली आणि म्हणाली, "जेव्हा मी त्यांना तशा परिस्थितीत पाहिलं, तेव्हा आलियाचं वय फारफार तर 13 किंवा 14 असेल."
म्हणजे केलीच्या शोषणाच्या बळी ठरलेल्या मुलींपैकी आलिया सगळ्यात लहान मुलगी असू शकते.
ज्या मिनिस्टरने (लग्न लावणारा चर्चचा अधिकारी) त्यांचं लग्न लावलं, त्यांनी म्हटलं की नक्की कोण लग्न करतंय हे त्यांना माहिती नव्हतं.
आता 73 वर्षांच्या असणाऱ्या एडमंड यांनी म्हटलं की त्यांना गुप्ततेच्या करारावर सही करायला सांगितलं होतं पण त्यांनी सही करायला नकार दिला. पण त्यांनी केलीला वचन दिलं की या प्रकाराविषयी ते कोणालाही सांगणार नाहीत. शेवटी त्यांना कोर्टात हजर राहाण्याचं समन्स बजावल्यानंतर त्यांनी कोर्टात साक्ष दिली.
केली आणि आलिया यांचं लग्न एक वर्षानंतर म्हणजे 1995 साली रदद् झालं. कारण होतं आलियाचं अल्पवयीन असणं. आलियाचा 2001 साली एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर केली कधीही तिच्याविषयी बोलला नाही. त्याच्या आत्मचरित्रातही तिचा उल्लेख नाही.
आलिया हयात असतानाही तिने त्यांच्या लग्नाबदद्ल कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही.
लैंगिक शोषणाचे इतर आरोप
1996 साली टिफनी हॉकिन्स नावाच्या महिलेने केलीविरोधात कोर्टात खटला दाखल केला. केलीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिला जो 'शारिरीक त्रास आणि मानसिक तणाव' सहन करावा लागला यासाठी तिने नुकसानभरपाईची मागणी केली.

फोटो स्रोत, Getty Images
कोर्टाच्या कागदपत्रांवरून कळतं की 1991 साली तिचे केलीशी लैंगिक संबंध निर्माण झाले, तेव्हा ती फक्त 15 वर्षांची होती तर केलीचं वय होतं 24. टिफनी 18 वर्षांची झाल्यानंतर त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आले.
1998 साली या प्रकरणी कोर्टाबाहेर तडजोड झाली.
2001 साली केलीची इंटर्न ट्रेसी सिम्पसन हिनेही केलीने आपल्याला भुलवून आपल्यासोबत सेक्स केला असं म्हटलं. त्यावेळी ती 17 वर्षांची होती. ट्रेसीने म्हटलं की केली तिला 'एक वैयक्तिक भोगवस्तू समजून तिच्याशी वागायचा."
या प्रकरणीही कोर्टाबाहेर तडजोड झाली.
2002 साली शिकागो टाईम्सने बातमी छापली की त्यांना केली एका अल्पवयीन मुलीसोबत सेक्स करतो आहे अशी व्हीडिओटेप सापडली आहे. ही व्हीडिओ टेप 26 मिनिटांची होती आणि पॉर्न म्हणून विकलीही जात होती.
या प्रकरणी शिकागो पोलीस केलीची चौकशी करत आहेत असंही त्यांनी बातमीत लिहिलं. पण ही मुलगी आणि तिच्या आईवडिलांनी म्हटलं की तिने कधीच केलीसोबत सेक्स केला नाही.
2002 साली चाईल्ड फॉर्न बाळगल्याप्रकरणी केलीवर शिकागोत खटला भरला. त्याच्यावर 21 गुन्हे दाखल झाले. केलीची 7 लाख 50 हजार डॉलर्सच्या जामिनावर सुटका झाली.
पुढच्याच वर्षी मायामी पोलिसांनी केलीला चाईल्ड पॉर्न प्रकरणात अटक केली. पोलिसांनी म्हटलं की एका अल्पवयीन मुलीसोबत सेक्स करताना त्याचे फोटो मिळाले आहे. 12 हजार डॉलर्सच्या जामिनावर त्याची सुटका झाली.
नंतर या प्रकरणी गुन्हे मागे घेतले गेले कारण कोर्टाने म्हटलं की पोलिसांकडे केलीच्या घराची झडती घेण्यासाठी अधिकृत वॉरंट नव्हतं.
फेब्रुवारी 2004 मध्ये शिकागोत केलीवर चाईल्ड पॉर्नचे जे 21 गुन्हे दाखल केले होते त्यातले पोलिसांनी 7 मागे घेतले.
2008 साली या प्रकरणी केलीची निर्दोष मुक्तता झाली.
हे सगळं घडत असताना एकीकडे केलीचे अल्बम खोऱ्याने पैसा कमवत होते. त्याची नवनवीन गाणी हिट होत होती, तो जगभरात गाण्यासाठी दौरे करत होता आणि त्याला अनेक मान-सन्मान, पारितोषिकही मिळत होती.
केली मुलींना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमांना येणाऱ्या प्रेक्षकांमधून निवडायचा तर कधी गाण्यात करियर करू पाहणाऱ्या मुलींना आपलं लक्ष बनवायचा.
त्यांना आपल्यासोबत येण्याची संधी द्यायच्या. एकदा त्या त्याच्याबरोबर गेल्या की अडकायच्या. त्यांना अत्यंत जाचक नियम पाळावे लागायचे. हे नियम त्यांनी पाळले नाहीत त्यांना क्रूर शिक्षा व्हायच्या.
सेक्स कल्टचे आरोप
केली सेक्स कल्टमध्ये अल्पवयीन मुलींना ओढून त्यांचं शोषण करतो असेही आरोप झाले. 2017 साली बझफीडने प्रसिद्ध केलेल्या एका दीर्घ लेखात याचं वर्णन केलेलं आहे.
या लेखात म्हटलं की केली त्या तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढतो ज्यांना संगीतात करियर करायचं आहे आणि त्यासाठी त्या केलीची मदत घ्यायला जातात.

फोटो स्रोत, Getty Images
एकदा का त्या जाळ्यात सापडल्या की बाहेर पडणं मुश्कील असतं. मग त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर केलीचं नियंत्रण असतं - त्यांनी काय खावं, काय घालावं, कुठे जावं, कधी झोपावं आणि कशाप्रकारे त्याच्याशी सेक्स करावा हे सगळं केली ठरवतो.
या मुलींचे मोबाईल फोनही जप्त केले जातात म्हणजे त्यांना आपल्या घरच्यांशी किंवा जवळच्यांशी संपर्क साधता येऊ नये असंही या लेखात म्हटलं होतं.
या लेखात केलीच्या तीन माजी कर्मचारी आणि अनेक पालक यांनी आपबिती मांडली होती. या पालकांचं म्हणणं होतं की त्यांच्या मुली नाहीशा झाल्यात.
मग प्रकरण पुन्हा कोर्टात कसं गेलं?
बझफीडच्या या लेखानंतर केलीने ज्यांचं शोषण केलं होतं अशा अनेक मुलींना बळ मिळालं. सगळ्यांत आधी गुप्ततेचा करार मोडून केलीच्या शोषणविषयी सार्वजनिकरित्या बोलणारी होती जेऱ्होंडा पेस. तिचीच साक्ष 2021 च्या खटल्यात महत्त्वाची ठरली.
इतरही अनेक मुली पुढे आल्या. 2018 साली त्याच्याविरोधात #MuteRKelly ही चळवळ सोशल मीडियावर उभी राहिली.
यावर बोलताना एकदा केली म्हणाला की, "फक्त देवच मला गप्प बसवू शकतो. तुमच्या मतासाठी मी जेलमध्ये जावं की माझं करियर संपवावं?"
केलीचे लाईव्ह शो होत होते, पण #MuteRKelly या चळवळीचा परिणाम दिसायला लागला. त्याचे शो कॅन्सल व्हायला लागले. स्पॉटिफाय, अॅपल, पँडोरा या स्ट्रिमिंग कंपन्यांनी केलीची गाणी आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवली.
अनेक दिग्गजांनी त्याच्यासोबत काम करायला नकार दिला. लेडी गागाने त्याच्यासोबत गायलेल्या व्दंव्दगीतासाठी जाहीर माफी मागितली आणि ते गाणं मागे घेतलं.
याच काळात केलीचा सगळा स्टाफ - वकील, पब्लिसिस्ट आणि स्वीय सहायक - सोडून गेला.
जानेवारी 2019 मध्ये लाईफटाईम या चॅनलने डॉक्युमेंट्री दाखवली 'सर्व्हायव्हिंग आर केली'. यात सगळे जुने आरोप, केलीचं वागणं, पीडित महिला यांना उजाळा दिला होता. यात एकेका मुलीचं शोषण केलीने कसं केलं हे दाखवलं होतं.
याच्यापाठोपाठ आली बीबीसीची डॉक्युमेंट्री 'आर केली : सेक्स, गर्ल्स अँड व्हीडिओटेप'. यात केलीच्या अनेक आजी-माजी सहकाऱ्यांनी त्यांच्या शोषणाचा, विशेषतः अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा उल्लेख केला.
यात केलीचा एक माजी सहकारी लोवेल जोन्स म्हणतो, "पार्टीत गेलं की केली मला लहान लहान मुली हेरायला सांगायचा. केलीला अल्पवयीन मुली हव्या असायच्या हे सर्वश्रुत होतं."
दबाव वाढत होता, तसं पोलिसांनी पुन्हा केलीवर 11 नवे लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल केली. याच प्रकरणी आता कोर्टाने केलीला दोषी ठरवलं आहे.
पुरुषांचंही लैंगिक शोषण
केलीने फक्त महिलांचं लैंगिक शोषण केलं असं नाही. दोन पुरुषांनीही त्याच्याविरोधात साक्ष दिली.
केलीच्या टीमचा भाग असताना त्याने आपलं शोषण केलं असं या पुरुषांनी म्हटलं. एकाने लुई या टोपणनावाने साक्ष दिली. त्याने म्हटलं की तो 17 वर्षांचा असताना शिकागोच्या मॅकडॉनल्डसमध्ये काम करायचा, तेव्हाच तो केलीला भेटला.
त्याने म्हटलं, "केलीने मला त्याचा फोन नंबर दिला आणि मला त्याच्या घरी बोलवलं. तो म्हणाला की त्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत मी गाऊ शकतो. एकदा त्याने मला विचारलं संगीतासाठी तुझी कुठवर जायची, काय करायची तयारी आहे?"
केलीने लुईला विचारलं की पुरुषांविषयी कधी तुझ्या मनात (लैंगिक) कल्पना येतात का?
"तो गुडघ्यावर बसला आणि माझ्यासोबत ओरल सेक्स करायला लागला. मी तेव्हा अल्पवयीन होतो."
केलीने लुईला सांगितलं की ही गोष्ट आपल्यातच ठेवायची आणि आता आपण 'भाऊ' झालो आहोत.
दुसऱ्या पुरुषाने अॅलेक्स या नावाने साक्ष दिली. अॅलेक्स केलीला शाळेत असताना भेटला. 20 व्या वर्षी त्याने केलीसोबत रिलेशनशिप सुरु केली.
तो म्हणाला की केलीने त्याला एकदा जबरदस्तीने किस केलं आणि म्हणाला की 'मोकळा दृष्टीकोन ठेव.'
केली माझ्यासाठी मुली शोधून आणायचा. त्यांच्यासोबत मी सेक्स करत असताना पाहायचा आणि त्याचे व्हीडिओ बनवायचा. कधी कधी तोही या सेक्समध्ये सहभागी व्हायचा तर कधी हस्तमैथून करायचा."
"केली मला ज्या मुलींसोबत झोपायला सांगायचा त्या 'जिंवतपणीच मेलेल्या' असायच्या."
कोर्टात काय झालं?
महिला आणि लहान मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण तसंच मारहाण, मानसिक छळ या प्रकरणी आर केली उर्फ रॉबर्ट सिल्व्हेस्टर केली याला ज्युरींनी दोषी ठरवलं.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी केली, त्याचे मॅनेजर, सिक्युरीटी गार्ड तसंच इतर टीम मेंबर्स कसे त्याला मुली शोधण्यासाठी, त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मदत करायचे याचं सविस्तर वर्णन केलं.
ग्लोरिया अलर्ड या अनेक पीडित मुलींच्या वकील आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, "मी गेली 47 वर्षं प्रॅक्टीस करतेय. मी अनेक लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांविरोधात खटले लढले आहेत पण केलीसारखा लैंगिक शोषण करणारा माणूस पाहिला नाही."
आर केलीला अजून शिक्षा ठोठावली गेली नाहीये, पण अनेकांचा अंदाज आहे की त्याला आता पुढचं आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल.
इतर गायक आणि लैंगिक शोषणाचे आरोप
संगीत क्षेत्रात लैंगिक शोषणाचे प्रकार नवीन नाहीत. याआधी मायकल जॅक्सनवर बाल लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.
मायकल जॅक्सनची या प्रकरणी अनेकदा चौकशीही झाली, आणि खटलेही चालले. पण सगळ्या प्रकरणातून मायकल जॅक्सनची निर्दोष मुक्तता झाली.
पण मायकल जॅक्सनने आपलं शोषण केलं असं सांगणारे अनेक लोक आजही आहेत. 2019 साली एचबीओने 'फाईडिंग नेव्हरलँड' ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली. यात दोन पुरुषांनी मायकल जॅक्सनने आपलं कसं शोषण केलं याचे अनुभव सांगितले आहेत.
जॉन एल्टन यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते पण नंतर हे आरोप मागे घेण्यात आले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








