अरविंद केजरीवाल 2024 मध्ये नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी तयार आहेत का?

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ही गोष्ट 2014 मधली आहे. टीव्ही चॅनेलपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे दोन नेत्यांचीच चर्चा होती- नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल.

सलग तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यानंतर नरेंद्र मोदी 2014 ची लोकसभेची निवडणूक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. दुसरीकडे तीन वेळा दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या शीला दीक्षितांना मात देत अरविंद केजरीवालांनी इतिहास घडवला होता.

भारताच्या तत्कालिन राजकारणातल्या या दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमनेसामने उभ्या ठाकल्या होत्या. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला.

आता दहा वर्षांनंतर, 2024 मध्ये केजरीवाल पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना आव्हान देताना दिसत आहेत. मोदींच्या मिशन 2014 प्रमाणेच केजरीवालांनीही भारताला पुन्हा एकदा महान बनविण्यासाठी मिशन सुरू केलं आहे.

मोदींप्रमाणेच त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका करायला सुरूवात करत म्हटलं आहे, 'जर आपण या पक्षांच्या आणि या नेत्यांच्या भरवशावर देश सोडला तर पुढच्या 75 वर्षांतही देश प्रगती करणार नाही. 130 कोटी लोकांना एकत्र यावं लागेल.'

इतकंच नाही तर आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदियांपासून राघव चढ्ढा आणि संजय सिंहसारखे नेते म्हणत आहेत- 'आधी म्हटलं जात होतं की, मोदींविरुद्ध कोण आहे? आता म्हटलं जातंय-मोदी विरूद्ध केजरीवाल.'

पण आम आदमी पक्षाच्या या दाव्यात किती तथ्य आहे, हा खरा प्रश्न आहे.

आकडे कोणाच्या बाजूने?

2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा राष्ट्रीय राजकारणात आले, तेव्हा त्यांच्याकडे तीन वेळा एका राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा अनुभव होता.

त्यांच्याकडे गुजरात मॉडेल होतं. व्हायब्रंट गुजरात समिट सारखे कार्यक्रम, व्यापारासंबंधीची धोरणं आणि प्रचार तंत्राचा वापर यावर हे मॉडेल बेतलेलं होतं.

या गैर राजकीय कार्यक्रमात मुकेश अंबानींपासून गौतम अडानींपर्यंत अनेक मोठे उद्योगपती हजेरी लावायचे. देशभरातला मीडिया त्याची दखल घ्यायचा.

अशा पार्श्वभूमीवर 2014 साली मोदींनी जेव्हा पंतप्रधानपदावर दावा केला, तेव्हा त्यांच्याकडे हिंदू हृदय सम्राट अशी प्रतिमा, विकासाचं मॉडेल आणि तीन वेळा गुजरात निवडणूक जिंकण्याचा अनुभव होता.

आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल हेसुद्धा तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या पक्षाने काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पंजाब निवडणुकीतही विजय मिळवला होता.

त्यांना दिल्लीमधील शाळा आणि आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं श्रेय दिलं जातं.

मात्र हा राजकीय अनुभव आणि दिल्ली मॉडेलच्या आधारावर केजरीवाल 2024 मध्ये नरेंद्र मोदींना पर्याय बनू शकतील का?

राष्ट्रीय राजकारणाचा बारकाईनं अभ्यास करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी या अरविंद केजरीवाल गांभीर्यानं प्रयत्न करत असल्याचं मानतात.

त्या सांगतात, "आज भाजपला आव्हान देण्याचा जर कोणी गांभीर्यानं विचार करत असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत. ममता बॅनर्जींमध्ये आता तितकासा उत्साह नाहीये. भाजप काँग्रेसला गांभीर्यानं घेत नाही. केजरीवाल आगेकूच करत आहेत, यात काहीही शंका नाहीये. "

आम आदमी पक्षाची वाटचाल

नीरजा चौधरी यांच्या मते अरविंद केजरीवाल हे राजकीयदृष्ट्या अतिशय प्रगल्भ नेते आहेत.

त्या म्हणतात, "जर त्यांनी गांभीर्याने वाटचाल केली, तर त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करायला 15 वर्षांचा काळ लागेल. याच कारणामुळे ते एक नवीन राजकीय ताकद उभी करत आहेत. मात्र त्याला वेळ लागतो. मात्र ते राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहेत. त्यांना देशाची नाडी ओळखता येते. धर्मनिरपेक्षतेची जी जुनी व्याख्या आहे, ती आता काम करत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे."

"म्हणूनच ते आपली प्रतिमा एक प्रो-हिंदू नेता म्हणून तयार करत आहे, जो मुसलमानांच्या विरोधात नाहीये. राहुल गांधींसारखे नेते कधीतरी मंदिरात जातात, पण त्याने काहीच साध्य होत नाही. पण केजरीवाल हळूहळू ही गोष्ट करण्यात यशस्वी होत आहेत. भाजपलाही याची जाणीव आहे की, आपल्याला भविष्यात केजरीवालांकडूनच आव्हान मिळू शकतं," चौधरी सांगतात.

या धोरणाबद्दल अरविंद केजरीवाल यांना अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. दिल्ली दंगलींपासून एनआरसी, सीएए सारख्या मुद्द्यांवर अरविंद केजरीवालांनी धारण केलेल्या मौनावर विरोधी पक्षांनी टीका केली होती.

राष्ट्रीय पातळीवर आम आदमी पक्षाचा आलेख चढता राहिला आहे, असं अशोका युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक आणि सीपीआर इंडियाचे फेलो राहुल वर्मा यांनाही वाटतं.

ते म्हणतात, "ऑगस्ट महिन्यात दोन सर्व्हे करण्यात आले होते. त्यातून हे समोर आलं की, सुरुवातीला राष्ट्रीय पातळीवर एक ते दीड टक्क्यांच्या दराने वाढणारा आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय स्तरावर सहा ते आठ टक्के दराने पुढे जात आहे.

"अशा परिस्थितीत पुढच्या दोन वर्षांत आम आदमी पक्षाची लोकप्रियता अजून थोडी वाढू शकते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता थोडी कमी होऊ शकते. मात्र अजूनही या दोन नेत्यांमध्ये आणि त्यांच्या पक्षांमध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळे या दोन पक्षांना आता तरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहता येणार नाही," वर्मा सांगतात.

प्रतिमा निर्मितीच्या लढाईत कोण आघाडीवर?

नरेंद्र मोदींपासून डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयींचा समावेश अशा नेत्यांमध्ये होतो, ज्यांनी अनेक दशकं काम करून आपली एक प्रतिमा तयार केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या सक्रिय राजकारणाला जेमतेम दहा वर्षं झाली आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींना आव्हान देईल अशी प्रतिमा बनवणं त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक असेल.

हे समजून घेण्यासाठी आपल्याला पब्लिक रिलेशन्सचा अभ्यास करणाऱ्या दिलीप चेरियन यांच्याशी संवाद साधला.

चेरियन सांगतात, "मला वाटतं की, दोन राज्यांमध्ये असलेल्या सत्तेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाकांक्षा ठेवणं हे खूप मोठं लक्ष्य आहे. इंद्र कुमार गुजराल यांचा अपवाद वगळता बाकी सर्व नेत्यांकडे मोठ्या राज्यांमध्ये सरकार चालवण्याचा अनुभव होता. आणि येत्या दोन वर्षांत अरविंद केजरीवालांसोबतच किमान इतर दोन राज्यांतील नेतेही या जागेसाठी दावा करू शकतात."

जनतेच्या महत्त्वाकांक्षेवर स्वार होऊन पुढे जाण्यासाठी काही नवीन आणावं लागतं, असं दिलीप चेरियन मानतात.

ते म्हणतात, " अरविंद केजरीवाल आता जे काही करत आहेत, त्या सर्व कँपेन ओरिजिनल नाहीयेत. त्यांच्याकडे शिक्षण किंवा आरोग्याचं मॉडेल आहे. पण त्याचसोबत त्यांना काही नवीन स्वप्नंही दाखवावी लागतील. देशाला नंबर वन बनविण्याचं स्वप्न मोदींनी 2014 मध्येच देशातील युवकांना दाखवलं आहे. त्यामुळे केजरीवालांना नवीन विचार करावा लागेल.

उदाहरणार्थ- नरेंद्र मोदींनी पंतप्रधान बनल्यानंतर 'स्वस्थ भारत, स्वच्छ भारत' ही घोषणा केली होती. इतर कोणत्याही पक्षाने आतापर्यंत ही घोषणा दिली नव्हती. केजरीवालांनीही एखादी अशी नवीन घोषणा शोधावी लागेल, जो लोकांना आकर्षित करू शकेल."

विरोधक अरविंद केजरीवालांना स्वीकारतील?

भाजपकडे देशभरात निवडणुका जिंकण्यासाठी जी संसाधनं आणि संस्थात्मक यंत्रणा आहे, ती आम आदमी पक्षाकडे नाहीये, हे नक्की.

त्यामुळेच विरोधक एकत्र येऊन आपला उमेदवार निश्चित करून मोदींना आव्हान देतील का, हा प्रश्न आहे.

नीरजा चौधरी ही शक्यता फेटाळून लावतात.

त्या म्हणतात, "विरोधी पक्ष आम आदमी पार्टीला समर्थन देतील याची शक्यता फार कमी आहे. केजरीवालांनीही सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं आहे की, ते एकटेच लढतील. विरोधकही याकडे धोक्याची घंटा म्हणूनच पाहत आहेत. ते स्वतःला एक पर्याय म्हणून तयार करत आहेत आणि त्याला वेळ लागेल."

त्यामुळे जर अरविंद केजरीवाल हे विरोधकांच्या आघाडीचे उमेदवार नसतील तर दुसरं कोण असेल, हा कळीचा प्रश्न आहे.

नीरजा चौधरी सांगतात, "नितीश कुमार यांच्या नावावरही प्रश्नचिन्ह आहे. ते विरोधकांचे सर्वसहमतीचे उमेदवार बनतील का आणि मोदींच्या उदयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जी भूमिका बजावली ती विरोधी पक्ष मिळून बजावू शकतील का, हेही पाहावं लागेल. ममता बॅनर्जींबद्दल बोलायचं तर त्यांच्याच पक्षात अडचणी आहेत."

त्या पुढे म्हणतात, "नितीश कुमार यांच्या काही जमेच्या बाजू आहेत. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, ते हिंदी पट्ट्यातून येतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण पहिल्यांदा हिंदी भाषक पट्ट्यातच भाजपचा पाया कमकुवत करायचा आहे. त्यांचं वय 70 च्या पुढे आहे पण त्यांचं नेतृत्व विरोधी पक्षाचे तरुण नेतेही स्वीकारतील. तेजस्वी यांना बिहारमध्ये सत्ता मिळाली तर राजद नितीश कुमारांना केंद्रात पूर्ण समर्थन देईल."

"त्यांचं नेतृत्व काँग्रेसलाही मान्य असेल. कारण राहुल गांधींना विरोधक स्वीकारणार नाहीत हे काँग्रेसलाही माहिती आहे. काँग्रेसमधूनच कोणी राहुल गांधींचा स्पर्धक म्हणून समोर यावं हे काँग्रेस कधीच खपवून घेणार नाही. काँग्रेसमधून फुटून गेलेल्या कोणालाही नेतृत्व मिळू नये, हीसुद्धा त्यांची इच्छा असणार. कारण मग शरद पवार, जगन रेड्डी किंवा ममता बॅनर्जींसारखा एखादा माजी काँग्रेसी नेता पक्षातील एखादा गट आपल्याकडे ओढून घेऊ शकतो," चौधरी सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)