You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे : 'हात जोडून विनंती आहे, अॅडजस्टमेंट करून निवडणुका लढवू नका'
"मी गद्दारी, दगाफटका करून किंवा खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. बाहेर पडून कुठल्या पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केलाआहे"
"माझ्यावेळी तेव्हा मनोहर जोशी होते. ते रूमच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी आत बोलावले. हात पसरले माझ्यासमोर, मिठी मारली आणि म्हणाले, आता जा. त्यांना समजलं होतं," मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.
राज ठाकरेंनी मंगळवारी (23 ऑगस्ट) राज्यभरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी राज्याचं राजकारण, आगामी निवडणुका, पक्षाची भविष्यातील दिशा अशा विविध विषयांवर भाष्य केलं.
"आपण अनेक आंदोलनं केली, ती लोकांसमोर पोहोचवली. आपण जेवढं केलं तेवढं कोणत्याच पक्षानं केलं नाही," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
पदाधिकाऱ्यांशी बोलताना राज यांनी म्हटलं की, "निवडणुका कधी लागतील माहिती नाही. निवडणुकांना हिमतीने सामोरं जा आणि हात जोडून विनंती आहे की, अॅडजस्टमेंट करून निवडणुका लढवू नका."
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद मागितलं कसं?
राजकारणी अनेकवेळा पक्ष बदलतात आणि लोक त्यांना मतदान करतात याचं मला आश्चर्य वाटतं, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
2019 ला महाविकास आघाडी कशी बनवली? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज यांनी म्हटलं, "आधीपासूनच ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे समीकरण ठरलं होतं. मोदी-शाह जाहीर सांगत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी ऑब्जेक्शन का घेतलं नाही? निकाल लागल्यानंतर तुम्हाला आठवलं याचा अर्थ यांची मागून चर्चा सुरू असणार.
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद मागितलं कसं? जनतेनं मतदान केलं मग तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबक सत्ता बनवली. ही हिंमत कशी होते."
'पक्षात धुडगूस चालू देणार नाही'
जात, धर्माच्या नावावर मतदान ही कीड आहे. आता राज्यात उत्तरेकडील राज्यांमध्ये होतं तसं राजकारण होऊ लागलंय, असंही राज ठाकरेंनी या मेळाव्यात बोलताना म्हटलं.
"लोकांमध्ये जे स्लो पॉइझन पसरवलं जातंय ते छाटणं गरजेचं आहे."
"मी आपल्या पक्षात धुडगूस चालू देणार नाही. पक्षात अंतर्गत कोणी सोशल मीडियावर कमेंट केल्या तर पक्षात ठेवणार नाही," अशी तंबीही त्यांनी दिली.
सत्ता हातात द्या, बाकीचे टोल बंद करतो
"टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं? कोणी हा प्रश्न विचारत नाही."
"तुम्ही लोकांना जाऊन हे सांगितलं पाहिजे की, आम्ही टोलनाके बंद केले आहेत. इतर पक्षांनी त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र केल्याचा दावा केला आहे. पण त्यांनी काय केलं आहे?" असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
"टोलचे पैसे कोणाकडे जातात? त्यांचं काय होतं? सरकारला कोणी जाब विचारत नाही."
"माझ्या हातात सत्ता द्या, बाकीचेही टोल बंद करतो," असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
'महापुरुषांचा वापर फक्त मतांसाठी'
राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना म्हटलं, "पुतळे उभे करून काही होत नाही. ते फक्त जयंती आणि पुण्यतिथीला उपयोगी पडतात. आपल्याकडे आठपैकी चार भारतरत्न दापोलीचे आहेत. त्यांच्याबद्दल आपण काही सांगतो का लोकांना?"
"महापुरुषाचा फक्त मतांसाठी वापर केला जातोय. प्रत्येक जात आपल्याच महापुरूषांचे वाभाडे काढते," असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)