रश्मी ठाकरे शिवसेनेच्या राजकारणात पडद्यामागून किती सक्रीय असतात?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 'सामना' वृत्तपत्राचं संपादकपद देण्यात आलं होतं. ही ठाकरे कुटुंबाशी संबंधित महत्त्वाची घटना मानली गेली होती.

याचं कारण ठाकरे कुटुंबातील कोणतीही महिला यापूर्वी सार्वजनिक आयुष्यात एखादं पद स्वीकारुन सक्रीय झाली नव्हती. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या 'संपादकीय एन्ट्री'नं अनेकांना धक्का बसला होता.

मात्र काही दिवसांपूर्वी 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात गेले. यानंतर रश्मी ठाकरे यांच्या जागी पुन्हा उद्धव ठाकरे विराजमान झाले.

मात्र, रश्मी ठाकरे शिवसेनेच्या विविध कार्यक्रमात उपस्थित असतात. आज (23 सप्टेंबर) त्यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं बीबीसी मराठीनं त्यांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा पुन्हा इथे देत आहोत :

बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे या बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरा करत, कार्यकर्त्यांना आईचं प्रेम देत, असं अनेकजण आजही सांगतात. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही राज्यभर फिरतात. मात्र, यातल्या कुणीही राजकीयपदी किंवा कुठल्याही सार्वजनिकपदी विराजमान झाल्या नाहीत. हा पायंडा रश्मी ठाकरेंच्या रूपानं मोडीत निघाला होता.

सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगी ते ठाकरे कुटुंबाची सून ते आता मुख्यमंत्र्यांची पत्नी इतकाच काही रश्मी ठाकरेंचा प्रवास किंवा इतकीच काही त्यांची ओळख नाहीय.

त्यांच्या प्रवासाला-ओळखीला अनेक पैलू आहेत. ज्यातून रश्मी ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील पडद्यामागील वावर, शिवसेनेतील वजन लक्षात येईल.

रश्मी ठाकरेंचा हा प्रवास उलगडण्याचा बीबीसी मराठीनं प्रयत्न केलाय.

उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर रश्मी ठाकरे यांना हात मिळवतानाचा उद्धव ठाकरेंचा एका फोटो खूप व्हायरल झाला. मराठी माध्यमांनी या फोटोभोवती वेगवेगळ्या बातम्या केल्याच, पण देशातल्या हिंदी-इंग्रजी माध्यमांनीही त्या फोटोच्या निमित्तानं रश्मी ठाकरेंवर 'स्पेशल रिपोर्ट्स' केले.

कुणी रश्मी ठाकरेंना 'फर्स्ट लेडी' म्हटलं, तर कुणी 'दुसऱ्या माँसाहेब' म्हटलं. पण रश्मी ठाकरे नेमक्या कशा आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्या एखाद्या गोष्टीवर कशा व्यक्त होता, हे सर्वसाधारणपणे पुढं आलं नाही. याचं कारण त्या शिवसेनेच्या वर्तुळात आणि फारतर निवडक कार्यक्रमांमध्येच दिसतात. त्यापलिकडे त्या जाहीर व्यासपीठांवरून फार बोलत नाहीत.

रश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे

आता रश्मी ठाकरे खऱ्या अर्थानं लोकांसमोर येतील - निमित्त सामनाच्या संपादकापदाचं का असेन, पण त्यांनी सार्वजनिक आयुष्यात पाऊल ठेवलंय. त्यांच्या आजवरच्या पडद्यामागील राजकीय (शिवसेनेपुरता किंवा त्याहून अधिक) सक्रियेतेकडे वळण्याआधी त्यांचा वैयक्तिक प्रवास थोडक्यात पाहू.

रश्मी ठाकरे मूळच्या मुंबईजवळील डोंबिवलीतल्या. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची ओळख झाली ती जयवंती ठाकरे यांच्यामुळं.

जयवंती ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांची सख्खी मोठी बहीण. जयवंती आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याशी घट्ट नातं, दुसरीकडे घट्ट मैत्री असलेल्या रश्मी ठाकरे.

जयवंती ठाकरेंनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ओळख करुन दिली आणि त्यांच्या लग्नासाठी प्रयत्नही केले. अशा पद्धतीनं रश्मी ठाकरे डोंबिवलीच्या पाटणकर कुटुंबातून कलानगरच्या 'मातोश्री' या राजकीयदृष्ट्या धगधगत्या घरात पोहोचल्या.

रश्मी ठाकरेंमुळं उद्धव ठाकरे राजकारणात आले?

1989 मध्ये रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न झालं. लग्नानंतर सहा वर्षांनी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. त्यानंतर काही वर्षांनीच उद्धव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला. हा क्रम सांगण्याचा मुद्दा असा की, अनेकांचं म्हणणं असंय की, फोटोग्राफीमध्ये आवड असणाऱ्या आणि त्यातच रमणाऱ्या उद्धव ठाकरेंना राजकारणात प्रवेश करण्यासाठी रश्मी ठाकरेंनी आग्रह केला.

मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं संयुक्त राजकीय चरित्र लिहिणाऱ्या पत्रकार धवल कुलकर्णी यांना हे पटत नाही.

धवल कुलकर्णी म्हणतात, रश्मी ठाकरेंमुळं उद्धव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला, असं म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यासारखं होईल.

शिवाय, राजकारणात प्रवेश केल्यापासून उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे शिवसेनेत आपली जागा तयार केली, त्यावरून तर रश्मी ठाकरेंबाबतचा हा दावा खोटाच ठरतो, असंही धवल कुलकर्णी म्हणतात.

शिवसेनेच्या खडतर काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंचा आधार

उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवेशामागे जरी रश्मी ठाकरे नव्हत्या, असं मानलं, तरी शिवसेनेतील पडद्यामागील त्यांचा वापर कायमच दबक्या आवाजातील चर्चेचा विषय राहिलाय.

शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आयोजित केलेल्या बहुतांश कार्यक्रमांनी रश्मी ठाकरे हजर राहताना दिसतात. काही ठिकाणी सेनेच्या व्यासपीठांवरुन भाषण करतानाही त्या दिसल्या.

2000 सालानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावरही जाऊ लागल्या. पतीसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत त्या राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसू लागल्या. हा सर्व काळ शिवसेना विरोधी पक्षात असतानाचा होता. मात्र, पुढे सहा-सात वर्षानी त्या अधिकच सक्रीय झाल्या.

2010 साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी रश्मी ठाकरे प्रचारातही उतरल्या.

या काळातल्या घडामोडी पाहिल्यास रश्मी ठाकरेंचं सक्रीय असणं आपल्या लक्षात येईल. एकीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जोमात होता. याच काळात उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रासही जाणवू लागला होता.

2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. 2010 ते 2012 हा काळ शिवसेनेसाठी खडतर होता. सगळी धुरा उद्धव ठाकरे यांच्यावर होती आणि त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती. अशा काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे रश्मी ठाकरे या खंबीरपणे उभ्या होत्या, असं जाणकार सांगतात.

रश्मी ठाकरे पडद्यामागून सक्रीय असतात का?

रश्मी ठाकरे यांची स्वत:ची वैयक्तिक राजकीय महत्त्वकांक्षा अद्याप स्पष्टपणे समोर आली नसली, तरी त्यांनी पती उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्या प्रवासासाठी दिलेली साथ पाहाता, त्यांचा घरातील-शिवसेनेतील प्रभाव दिसून येतो.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी मुंबईतल्या वरळीतून आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यापासून अगदी विजयी प्रमाणपत्र स्वीकारण्यापर्यंत, रश्मी ठाकरे हे क्षणाक्षणाला सोबत होत्या. अगदी आदित्य ठाकरे यांचा बहुतांश प्रचारही रश्मी ठाकरेंनी केला.

ही काही पहिलीच वेळ नव्हती, जेव्हा त्या राजकीय मैदानात उतरल्या. याआधी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राजकीय निर्णयप्रक्रियेत असल्याचे संकेत दिलेत. रश्मी ठाकरे निर्णयप्रक्रियेत असतात, याचा असाच एक संकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

'लोकमत' वृत्तपत्राच्या फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या 'महाराष्ट्र ऑफ द ईयर' या कार्यक्रमातला हा किस्सा.

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध प्रचंड तणावाचे बनले होते. हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जातील की नाही, याचीही शंका होती. मात्र, नंतर तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत आले आणि संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा झाली.

याच अनुषंगानं लोकमतच्या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखनं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की, "शिवसेना-भाजपची दिलजमाई नेमकी झाली कशी? त्या दिलजमाईचे स्क्रीप्टरायटर कोण होते?"

त्यावेळी फडणवीस म्हणाले, "मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनीनं जो वडा आम्हाला खाऊ घातला, साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली, त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही. विषयच संपला."

फडणवीसांच्या उत्तरानंतर उपस्थित प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्वच जण हसले. त्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेही होते. मात्र, सगळ्यांनीच उत्तर हसण्यावारी नेलं असलं, तरी यातला अर्थ अनेक राजकीय जाणकार विसरत नाहीत.

शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा सेनेशी संबंधित राजकीय घडामोडी असो, प्रत्येकवेळी रश्मी ठाकरे या 'महत्त्वाचा रोल प्ले' करतात, असं एक ज्येष्ठ राजकीय पत्रकार सांगतात.

मीनाताई ठाकरे या बाळासाहेबांसोबत दौऱ्यावर जात, मातोश्रीवर येणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवू-खाऊ घालत, पण त्या कधीच राजकीय भाष्य करत नसतं, राजकीय निर्णयप्रक्रियेत नसत, मात्र रश्मी ठाकरेंचं तसं नाहीय. त्या विविध निर्णयांवेळी उद्धव ठाकरेंना 'कन्व्हिन्स' करण्याची भूमिका बजावतात, असंही राजकीय पत्रकार सांगतात.

'संपादकपद हे रश्मी ठाकरेंचं कृतिशील पाऊल'

"संपादकपद हे रश्मी ठाकरे यांचं कृतिशील पाऊल आहे. त्या आता केवळ पडद्यामागे नसतील याचे संकेत आहेत हे," असं प्रतिमा जोशी म्हणतात.

आतापर्यंत शिवसेनेच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या रश्मी ठाकरे आता आता संपादकपदी विराजमान झाल्यानं राजकीय भूमिकेतच उतरल्याचं ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी सांगतात.

त्या म्हणतात, "संपादकपदी येणं म्हणजे वृत्तपत्रातील भूमिकांबाबतही त्यांना विचारलं जाईल. आतापर्यंतचा त्यांचा राजकीय वावर पाहिल्यास, त्यांची देहबोली पाहिल्यास त्या राजकीयरित्या परिपक्व, सुसंस्कृत भासतात. त्यामुळं त्या योग्य पद्धतीनं या पदाचं काम करतील असं दिसतंय."

उद्धव ठाकरेंच्या निर्णयात त्यांच्या भूमिकेचा अंश दिसत होताच, मात्र आता संपादकपद देऊन त्यास दुजोराच मिळाल्याचं प्रतिमा जोशी म्हणतात. त्या म्हणतात, "याचं कारण असं की, संपादकपद इतर कुणाकडे देता आलं असतं, मात्र ते रश्मी ठाकरेंकडे देऊन उद्धव ठाकरेंना संकेत द्यायचेत."

आतापर्यंत पडद्यामागे असलेल्या रश्मी आता समोर येऊन सर्व गोष्टींना कशा सामोऱ्या जातील, हे येणारा काळ सांगेलच, असं प्रतिमा जोशी म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)