राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडलाय का?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

राज ठाकरे भाषणाची सुरूवात होते 'जमलेल्या माझ्या सर्व मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो' या वाक्याने.

पण, शिवाजीपार्क वरील गुढी पाडव्याच्या सभेत त्यांनी मराठी ऐवजी 'हिंदू' या शब्दाचा वापर केला. 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो आणि मातांनो' या वाक्याने त्यांनी भाषण सुरू केलं. गेल्याकाही काळापासून ते सातत्याने 'हिंदू' शब्दाचा वापर करताना दिसून येत आहेत.

मराठी अस्मितेच्या मुद्यावर 2009 मध्ये राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केला. मराठी विरुद्ध परप्रांतिय मुद्यावर राजकारण केलं. पण, आता ते 'हिंदू' या व्यापक भूमिकेवर राजकीय चाल खेळताना दिसून येत आहेत.

राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास धरल्यामुळे त्यांनी मराठीचा मुद्दा सोडलाय का? हा प्रश्न उपस्थित होतो. मराठी अस्मितेच्या मुद्यावरून राज, अचानक हिंदुत्वाकडे का वळले? हे आम्ही राजकीय जाणकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडला?

गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी शिवाजीपार्कवर भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी तब्बल एक तासभर भाषण केलं.

एरव्ही भाषणात मराठीचा मुद्दा कळकळीने उपस्थित करणाऱ्या राज ठाकरेंची भाषा बदललेली पहायला मिळाली. आपल्या भाषणात त्यांनी मराठीच्या मुद्यावर फारसं काहीच भाष्य केलं नाही.

राज ठाकरेंची याआधीची भाषणं पाहिली तर, 'जमलेल्या माझ्या सर्व मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो' हे वाक्य आणि टाळ्यांचा कडकडाट हे समीकरण ठरलेलं होतं. गुढी पाडव्याच्या सभेतही पहिल्या वाक्यानंतर टाळ्या पडल्या. पण आता वाक्यात मोठा बदल झालाय. राज ठाकरेंच्या मुखात मराठीच्या ऐवजी हिंदू हा शब्द रूळलेला पहायला मिळतोय.

'ज्या मशिदीवर भोंगे असतील त्यासमोर मोठ्याने हनुमान चालीसा लावा,' असं म्हणत त्यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातला. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी अस्मितेसाठी लढणारी मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणार, हे राज ठाकरेंच्या भाषणानंतर अधोरेखित झालंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा लाऊन धरला. मराठीच्या भावनिक मुद्यावर राजकारण केलं.

राज ठाकरेंची राजकीय भूमिका बदललीये याची चार प्रमुख कारणं राजकीय विश्लेषक सांगतात.

  • मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी मराठी विरुद्ध परप्रांतीय कार्ड खेळलं. रेल्वे भरतीसाठी आलेल्या हिंदी भाषिक मुलांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. उत्तरभारतीयांना पळवून लाऊ अशी आक्रमक भूमिका घेतली. पण, आता राज ठाकरे उत्तरभारतीयांविरोधात आक्रमक नसल्याचं दिसून येतंय.
  • तर, 2018 मध्ये मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या उत्तरभारतीय संमेलनात राज ठाकरेंनी भाषणही केलं होतं. उत्तरभारतीयांबाबत त्यांची भूमिका सौम्य झालीये.
  • मनसेची ओळख म्हणजे मराठी लोकांसाठीचा पक्ष अशी आहे. पण गेल्याकाही वर्षांपासून राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर फारसं बोताना दिसून येत नाहीत. मराठीच्या मुद्यावर मनसे आक्रमक झाल्याचंही पहायला मिळालेलं नाही.
  • पक्ष स्थापनेवेळी मनसेच्या त्यांच्या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा रंग होता. सर्व घटकांना समाविष्ठ करून महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट त्यांनी मांडली. पण, काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलला. आता मनसेचा झेंडा भगव्या रंगचा आहे.

मराठीचा मुद्दा सोडण्याची कारणं काय?

मराठी अस्मितेच्या मुद्याने राज ठाकरेंना भरभरून दिलं. पहिल्याच निवडणुकीत मुंबईत 27 नगरसेवक निवडून आले. विधानसभेत 13 आमदार, तर नाशिकमध्ये लोकांनी सत्ता राज ठाकरेंच्या हाती सोपवली होती.

राजकीय विश्लेषकांच्या मते राज ठाकरेंच्या गेल्याकाही वर्षातील बदललेल्या भूमिकांमुळे त्यांनी मराठीचा मुद्दा सोडल्याचं पहायला मिळतंय.

वरिष्ठ राजकीय पत्रकार संदीप आचार्य म्हणतात, "राज ठाकरे कायम म्हणायचे, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा." पण, आता हिंदुत्वाची कास धरून त्यांनी मराठीचा मुद्दा पूर्णत: सोडलाय.

राजकीय जाणकार राज ठाकरेंनी मराठी मुद्दा सोडल्याची पाच प्रमुख कारणं सांगतात,

  • मराठी मतं मिळणार नाहीत आणि फक्त मराठी मतांवर राजकारण चालणार नाही याची राज ठाकरेंना जाणीव झालीये
  • शिवसेना कॉंग्रस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाची रिकामी स्पेस राज ठाकरे भरू पहात आहेत
  • भाजप आणि हिंदुत्वाची कास धरली नाही तर मुंबईत मनसेला फार मोठं यश मिळणार नाही
  • राज्यात शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना विरोधावर मनसेचं राजकारण वाढणार आहे.
  • मराठी मतदारांसाठी शिवसेना आणि भाजपही प्रयत्न करतेय. त्यामुळे या गर्दीत जाऊन राज ठाकरेंच्या हाती काहीच लागणार नाही

संदीप आचार्य पुढे म्हणतात, "मनसेला मिळालेली मतं आणि जागा, आणि पुढे मिळू शकणारी मतं यात भाजप आणि हिंदुत्वाची कास धरली नाही. तर, मनसेला मुंबईत 5-10 जागाही मिळणार नाहीत." मनसेला स्वबळावर जाऊन काहीच फायदा होणार नाही.

देशात 2014 मध्ये हिंदुत्वाची लाट उसळली. या लाटेत भाजप सत्तेत आली. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हापासूनच हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालं. राजकीय विश्लेषक सांगतात, हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे सत्तेचा राजमार्ग असं समीकरण आता रूळू लागलंय. देशात प्रो-हिंदुत्वाचं वातावरण पहायला मिळतंय. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकांनी हे दाखवून दिलंय.

"सद्यस्थितीत जो हिंदू हित की बात करेगा, वहीं देश पर राज करेगा," हे कुठेतरी दिसून येतंय, मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या.

मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वाचं राजकारण केलं. हिंदुत्वाचं मत दोन्ही पक्षांना मिळायचं. मुंबईतील मराठी आणि गैरमराठी लोक हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्यावर शिवसेनेला मतदान करायचे. मृणालिनी नानिवडेकर पुढे सांगतात, "शिवसेना हिंदुत्वाच्या डब्यातून बाहेर पडल्यामुळे शिवसेनेचा बेस आपल्याकडे ओढण्यासाठी राज स्वत:ला प्रो-हिंदुत्ववादी असं दाखवत आहेत."

मुंबईत मराठींच्या सोबतच गैरमराठी मतदाराचं मतदान मोठं आहे. खासकरून उत्तरभारतीय आणि गुजराती मतदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आकर्षण अजूनही कमी झालेलं नाही.

"मुंबईतील मराठी मतदार शिवसेनेसोबतच दिसून येतोय. भाजपही या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे मराठीच्या डब्यात गर्दी झालीये. या गर्दीत कसंतरी घुसण्यापेक्षा व्यापक हिंदुत्वाची बस राज ठाकरेंना सोडायची नाही," मृणालिनी नानिवडेकर सांगतात. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांना मी बाळासाहेबांचा पुढचा राजकीय वारसदार आहे असं दाखवून द्यायचं आहे.

मनसेचं राजकारण हे मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांपुरतं आहे. या भागातील मराठीचा टक्का देखील हळूहळू कमी होत चाललाय. त्यामुळे मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी थोडा मागे ठेवल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

वरिष्ठ राजकीय पत्रकार संजीव शिवडेकर म्हणाले, "मराठीला वगळून हिंदुत्व होणार नाही. त्यामुळे त्यांनी मराठीचा मुद्दा पूर्णत: सोडल्याचं म्हणता येणार नाही." त्यांनी फक्त मराठीचा मुद्दा सोडून मोठ्या मुद्याला हात घातलाय हे खरंय.

शिवसेनेलाही काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्यावर फक्त राजकारण चालणार नाही हे कळून चुकलं होतं. त्यामुळे शिवसेनेने आपली राजकीय भूमिका बदलली होती. त्यामुळे मराठी भाषिक मतदार नाराज झाल्याचं बोललं जात होतं.

संजीव शिवडेकर पुढे म्हणाले, "स्वतचा पक्ष स्थापन करताना राज ठाकरेंनी या नाराज मराठी माणसाची स्पेस घेण्याचा प्रयत्न केला. पण, कालांतराने नुसत्या मराठीच्या मुद्यावर काहीच होत नाही हे कळल्याने त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घरला आहे."

मनसे नेते काय म्हणतात?

हिंदुत्वाची कास धरत राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडलाय का? यावर आम्ही मनसे नेत्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले, "हिंदुत्वचा मुद्दा घेतला म्हणजे मराठीचा मुद्दा सोडला असं नाही." मनसे मराठी माणसांच्या न्याय-हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. मुंबईत मनसेने मराठी भाषेच्या आग्रहाबाबत अनेक आंदोलनं केल्याचं ते पुढे सांगतात.

अॅमेझोनमध्ये मराठी भाषा असावी यासाठी आवाज उठवला. तर, IPL च्या मुद्यावरूनही मराठीचा मुद्दा लाऊन धरला होता असं संदीप देशपांडे पुढे म्हणाले.

संदीप देशपांडे पुढे सांगतात, "काही दिवसांपूर्वी मुंबईत राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट अशी पोस्टर्स लावण्यात आली होती. या पोस्टरवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)