You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सियाचिनमध्ये गायब झालेल्या भारतीय सैनिकाचा मृतदेह 38 वर्षांनी कसा सापडला?
सियाचिनमधल्या हिमस्खलनात 38 वर्षांपूर्वी गायब झालेल्या एका भारतीय सैनिकाचा मृतदेह सापडला आहे. चंद्रशेखर हारबोला असं त्यांचं नाव आहे.
सियाचिनमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर 1984मध्ये चंद्रशेखर हारबोला आणि त्यांचे 19 सहकारी पॅट्रोलिंग करत होते. त्यावेळी अचानक झालेल्या हिमसस्खलनात सर्वजण गाडले गेले होते.
त्यावेळी फक्त 15 मृतदेह सापडले होते. तर 5 जण बेपत्ता होते. त्यापैकी 2 मृतदेह सापडले आहेत. पण, अजून दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आलेली नाही.
सियाचिन जगातल्या सर्वांत उच्च युद्धभूमीपैकी एक आहे. इथं होणाऱ्या हिमस्खलन आणि हिमवादळात आतापर्यंत दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेले आहेत.
चंद्रशेखर हारबोला मुळचे उत्तराखंडच्या हलद्वानीचे आहेत. त्यांचा मृतदेह मिळाल्याची खबर मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. हारबोला यांच्यावर त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दशकांनंतर एखाद्या सैनिकाचा मृतदेह सियाचिनमध्ये सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये पेट्रोलिंग युनिटला तुकाराम पाटील यांचा मृतदेह सापडला होता. 21 वर्षांचे पाटील हिमनदीमध्ये गायब झाले होते.
सिचानिमधलं हावामन आणि भौगोलिक स्थिती पाहाता या भागातून सैन्य मागे घेण्याची चर्चा भारत आणि पाकिस्तानमध्ये झालीय पण त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.
सियाचिनवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये 1984 मध्ये छोटं युद्ध झालं होतं.
आता 4 दशकांनंतरसुद्धा दोन्ही देशांचं सैन्य इथं विपरित स्थित तळ ठोकून आहे.
2012 मध्ये झालेल्या हिमस्खलनात पाकिस्तानच्या किमान 129 सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या भागातून सैन्य मागे घेण्याची चर्चा सुरू झाली होती. पण त्यातून काहीच निर्णय पुढे आला नाही.
नंतर पुढे 2016 मध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 भारतीय जवानांचा मृत्यू झाला. तर 2019 मध्ये 4 सैनिकांचा मृत्यू झाला होता.
कारगिल युद्धापेक्षाही जास्त मृत्यू सियाचिनमध्ये
सियाचिनमध्ये आजही आपल्या जवानांचा मृत्यू होतो. मात्र, हे मृत्यू बहुतांश दुर्घटनेत होतात. सियाचिनहून परतल्यानंतर जवानांचं वजन खूप कमी झालेलं असतं. त्यांना खूप झोप येते. विसरभोळेपणा वाढतो आणि कामेच्छाही कमी होते.
एका अंदाजानुसार भारत सरकार जगातली सर्वात उंचावरची युद्ध भूमी असलेल्या सियाचिनमध्ये रोज 6 कोटी म्हणजे वर्षाला 2190 कोटी रुपये खर्च करतं. भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी सियाचिनमध्ये 5000 जवान तैनात केले आहेत.
भारत सरकारने या जवानांसाठीचे खास कपडे आणि गिर्यारोहणासाठीच्या उपकरणांवर आतापर्यंत जवळपास 7500 कोटी रुपये खर्च केले आहेत. सियाचिनमधल्या तैनातीसाठी प्रत्येक जवानाला जे किट दिलं जातं त्याची किंमत जवळपास 1 लाख रुपये इतकी असते. यात 28 हजार रुपये कपड्यांसाठी, 13 हजार रुपये स्लिपिंग बॅग, 14 हजार रुपये ग्लोव्ह्ज आणि साडे बारा हजार रुपये बुटांवर खर्च होतात.
1984 पासून आतापर्यंत भारताच्या जवळपास 869 जवानांचा सियाचिनमध्ये मृत्यू झाला आहे. कारगिल युद्धात मृत्यू झालेल्या जवानांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. यातले 97% जवानांचा पाकिस्तानशी झालेल्या युद्धात नव्हे तर खराब वातावरणामुळे मृत्यू झाला आहे.कारगिल युद्धापेक्षाही जास्त मृत्यू सियाचिनमध्ये होतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)