You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सियाचिन ग्लेशिअरजवळ हिमस्खलनामुळे दोन जवानांचा मृत्यू
जगातील सर्वात उंचीवरील युद्धक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचिन ग्लेशिअरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण सियाचिन ग्लेशिअरमध्ये 18 हजार फूट उंचीवर शनिवारी भारतीय सैन्यातील जवान गस्त घालत असताना हिमस्खलनाची घटना घडली
हिमस्खलन झाल्यावर बर्फाखाली अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी बचावपथक तेथे पोहोचले आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं.
याआधीही घडली होती अशीच घटना
यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी उत्तर सियाचिन ग्लेशिअरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे चार जवान आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे दोन नागरिक सामान वाहून नेण्याचं काम करत असत.
भारतीय सैन्याने सांगितल्याप्रमाणे सियाचिन ग्लेशिअरच्या उत्तर सेक्टरमध्ये 19 हजार फूट उंचीवर आठ लोक गस्त घालणाऱ्या तुकडीत सहभागी झाले होते. तेव्हा दुपारी सुमारे तीन वाजता हिमस्खलन झाले होते. या घटनेनंतर हिमस्खलन बचाव तुकडीला तेथे पाठवण्यात आलं होतं आणि आठ लोकांना बर्फातून बाहेर काढण्यात आलं होतं.या सर्वांना हेलिकॉप्टरद्वारे सैन्याच्या रुग्णालयात पाठवलं गेलं. त्यातल्या 7 जणांची प्रकृती गंभीर झाली होती. अथक प्रयत्नांनंतरही चार जवान आणि दोन नागरिकांचा जीव वाचवता आला नाही.
या हिमस्खलनामुळे काही भारतीय चौक्यांचे नुकसान झाल्याचे वृत्तही समजले होते.
जगातील सर्वात उंच रणभूमी
सियाचिन जगातील सर्वातील उंच रणभूमी मानली जाते. ती काराकोरम पर्वतरांगेत आहे. या प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून 20 हजार फूट उंचीवर आहे.
सियाचिन ग्लेशिअरमध्ये उणे 60 अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते. तसेच इथं हिमस्खलन आणि भूस्खलन सतत होत असतं.
2016मध्ये सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे 10जवान बर्फाखाली अडकले होते. सहा दिवसानंतर लान्सनायक हनुमंतप्पा यांना वाचवलं गेलं होतं मात्र त्यांचं दिल्लीमध्ये निधन झालं होतं. अशीच स्थिती सियाचिनच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पाकिस्तानातील गयारी सेक्टरमध्ये आहे. 2012 साली झालेल्या हिमस्खलनात पाकिस्तानचे 129 सैनिक आणि 11 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)