You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्क्टिक समुद्रातला बर्फ भेदण्यास निघालंय हे महाकाय जहाज
या आठवड्यात रशियाच्या व्लॅडीवोस्तोक इथून डेन्मार्कचं कंटेनर वाहून नेणारं एक जहाज विश्वविक्रमी सफरीवर निघालं आहे. रशियाच्या उत्तरेकडील आर्क्टिक समुद्रातला निव्वळ बर्फाचा मार्ग कापत पुढे येणारं हे पहिलं कंटेनर जहाज ठरणार आहे.
माएर्स्क लाईन या कंपनीचं 'द वेंटा मेएर्स्क (The Venta Maersk)' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे. रशियाच्या एका कोपऱ्यातल्या व्लॅडीवोस्तोकहून निघून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत ते सेंट पीटर्सबर्ग गाठणार आहे. दक्षिणेकडील सुएझ कालव्यातील मार्गापेक्षा या मार्गाद्वारे 14 दिवस लवकर पोहोचता येणार आहे.
आर्क्टिक समुद्रातला बर्फ वितळत असल्याने हा मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरेल काय, याची माहितीही मेएर्स्क कंपनी या सफरीदरम्यान गोळा करणार आहे.
मेएर्स्क कंपनीकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, "या उत्तर सागरी मार्गातून प्रवास केल्याने भविष्यात जहाजांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग योग्य ठरेल किंवा नाही, याची माहिती आम्हाला मिळेल."
'द वेंटा मेएर्स्क' हे नव्यानं तयार करण्यात आलेलं 'आईस क्लास' म्हणजेच फ्रिझिंगची गरज असलेलं सामान नेण्यास सक्षम असणारं जहाज आहे. या जहाजात मासे आणि इतर पदार्थ आहेत.
रशिया आणि अमेरिका या खंडांना वेगळा करणारा बेरिंग समुद्र (रशिया आणि अलास्का दरम्यानचा सागरी भाग) ते पश्चिमेकडील नॉर्वे इथपर्यंत हा सागरी मार्ग पसरला आहे.
मेएर्स्कनं पुढे दिलेल्या माहितीनुसार, "या उत्तरी सागरी मार्गाला सध्याच्या मूळ मार्गाचा पर्याय म्हणून आता तरी आम्ही पाहत नाही. कारण पूर्वीपासून अस्तित्वात असलेला मार्ग हा ग्राहक, व्यापार आणि लोकसंख्या या दृष्टीनं आखण्यात आला होता."
न्युक्लिअर आईसब्रेकर
या मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याने या कंटेनर जहाजाला न्युक्लिअर आईसब्रेकर जहाजं सोबत करत आहेत. न्यूक्लिअर आईसब्रेकर जहाजं बर्फ वितळवून या जहाजाचा मार्ग मोकळा करत आहेत. पण जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्यात या सागरी मार्गावरील समुद्राचं तापमान 30 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे. त्यामुळे हा मार्ग वापरण्याजोगा होण्याची शक्यता आहे.
कोपनहेगन बिझनेस स्कूल यांनी 2016 मध्ये या उत्तर सागरी मार्गावर एक अहवाल प्रसिद्ध केला. या मार्गावरील बर्फ असाच वितळत राहिला तर 2040 पर्यंत हा सागरी मार्ग आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे वापरता येईल.
'द ख्रिस्तोफर दे मार्गेरी' या 984 फूट नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या जहाजानं प्रथम गेल्या वर्षी या मार्गावरून प्रवास केला होता. तर रशियन गॅस कंपनी 'नोवाटेक'च्या काही जहाजांनी हा मार्ग यंदा वापरला आहे.
चीन त्यांच्या 'वन बेल्ट, वन रोड' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत या मार्गाचा वापर करत आहे, जेणेकरून युरोप आणि आशियाच्या काही भागात त्यांचा व्यापार सुरळीत होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)