बर्फ वितळल्यामुळे आता देवी, प्लेग आणि अँथ्रँक्स पसरण्याची भीती

    • Author, टिम स्मिडले
    • Role, बीबीसी फ्युचर

वातावरण बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे. तापमान वाढल्याने ध्रुवांवरचा बर्फ वितळतोय. समुद्राची पातळी वाढत आहे. मात्र, हा धोका इथपर्यंतच मर्यादित नाही. शास्त्रज्ञांच्या मते बर्फ वितळल्यामुळे संपूर्ण मानवजातीसाठी इतर अनेक धोके निर्माण होत आहेत.

सू नताली यादेखील अशाच शास्त्रज्ञांपैकी एक. त्या एका उदाहरणातून या धोक्याविषयी अधिक माहिती देतात.

2012 मध्ये त्या संशोधक होत्या. त्यावेळी त्या पृथ्वीवर कायम बर्फाने झाकलेल्या ठिकाणांवर म्हणजेच पर्माफ्रॉस्टवर संशोधन करत होत्या. त्यावेळी सू नताली रशियाच्या डुवानी नावाच्या एका ठिकाणी गेल्या होत्या. हा सायबेरियाचा अत्यंत बर्फाळ भाग आहे. हजारो वर्षांपासून तो बर्फाखाली आहे.

मात्र, आता वातावरण बदलामुळे बर्फ वेगाने वितळत चालला आहे. सू यांच्या असं निदर्शनास आलं की बर्फ वितळल्याने जमीन खचते आहे आणि आतापर्यंत बर्फाने झाकलेल्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

सू नताली सध्या अमेरिकेतल्या द वुड्स होल रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नुकतीच पुन्हा एकदा सायबेरियाला भेट दिली. त्यावेळी त्यांना बर्फ इतक्या वेगाने वितळताना दिसला की त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. तिथली जमीन इतकी खचली होती तिथे मोठमोठ्या इमारती सामावतील एवढे मोठे खड्डे तयार झाले होते.

बर्फ वितळत असल्याने तिथे हजारो वर्षांपूर्वी गाडले गेलेल्या मॅमथसारख्या प्राण्यांचे सांगाडे दिसू लागलेत. हे प्राणी पृथ्वीवर प्लीस्टोसीन युगात होते. त्यानंतर ते नष्ट झाले.

1500 अब्ज टन कार्बन

वातावरण बदलामुळे होणारं परिवर्तन तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकता. हे खूपच भयंकर आहे.

कायम बर्फाने झाकलेली जमीन आता बर्फ वितळल्याने दिसू लागली आहे. त्या जमिनीत हजारो वर्षांपासून गाडल्या गेलेल्या गोष्टी आता उघड होत आहेत आणि हाच वातावरण बदलाचा सर्वात नवा धोका आहे.

बर्फाच्या आता मोठमोठी जंगल आहेत. नानाविध प्रकारच्या आजारांचे विषाणू आहेत. बर्फाच्या जाड चादरीखाली कैद विषारी मिथेन वायू आणि विषारी पारादेखील बाहेर येऊन माणसासाठी घातक ठरू शकतो.

पर्माफ्रॉस्ट म्हणजेच बर्फाच्या जाड चादरीच्या खाली अंदाजे 1500 अब्ज टन कार्बन आहे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हे प्रमाण वातावरणात असलेल्या एकूण कार्बनच्या दुप्पट आहे.

याच कार्बनमुळे पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललं आहे. "2100 पर्यंत बर्फाळ प्रदेशातला 30 ते 70% बर्फ वितळेल", असा अंदाज असल्याचं सू नताली सांगतात. आपण हे थांबवायलाच हवं.

तसं झालं नाही तर बर्फ वितळल्याने मोठ्या प्रमाणावर कार्बन वातावरणात मिसळेल. हवेत मिथेन गॅस मिसळेल. मानवतेसाठी तो खूप मोठा धोका असू शकतो.

बर्फ वितळल्यामुळे जगभरात 130 ते 150 अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळेल. अमेरिका दरवर्षी इतकाच कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात सोडतो.

तापमान वाढीचा वेग दुप्पट

सू नताली हे यापद्धतीने समजून सांगतात, "बर्फ वितळल्यामुळे जेवढा कार्बन डाय ऑक्साईड निघेल ते अमेरिकेइतकंच प्रदूषण करणारा एक नवीन देश अचानक समोर आल्यासारखं असेल आणि जगाने अजून याचा हिशेबही लावलेला नाही."

2018-2019 मध्ये उत्तर गोलार्धात ध्रुवीय बर्फाच्या चक्रीवादळाचा धोका कायम होता. यावर्षी जानेवारीत उत्तर अमेरिकेच्या इंडियानामध्ये तापमान उणे 29 अंश सेल्सियसपर्यंत घसरलं होतं.

खरं तर या काळात आर्क्टिकचा बर्फ अधिक वेगाने वितळत होता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्क्टिकचं तापमान उणे 25 अंश सेल्सियस असायला हवं होतं. त्यावेळी ते 1.2 अंश सेल्सियस होतं. म्हणजेच आर्क्टिकची उष्णता दुप्पट वेगाने वाढत आहे.

जगात बर्फ अत्यंत वेगाने वितळत असल्याचं, 'आर्क्टिक रिपोर्ट कार्ड' नावाच्या एका वृत्तपत्राच्या संपादिका एमिली ऑसबॉर्नदेखील सांगतात.

यामुळे जगाचं रंग-रुप खूपच बदलण्याची शक्यता आहे. आपण तर अजून याचा नीट अभ्यासही केलेला नाही.

30 हजार वर्ष जुना विषाणू

नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 1898 नंतर पहिल्यांदा 2016 साली तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या वर गेलं होतं.

उत्तर अमेरिकेतल्या अलास्कासारख्या 'पर्माफ्रॉस्ट'चा बर्फही वेगाने वितळतोय.

आता तिथे बर्फाऐवजी पाणी दिसतंय. बर्फात कैद असलेला मिथेनसारखा विषारी वायू हवेत मिसळतोय. यामुळे हजारो वर्षांपासून बर्फात गाडलेले आजारांचे विषाणू बाहेर येऊ लागले आहेत

2016 साली सायबेरियामध्ये काही जण आजारी पडले होते. तो एक विचित्र आजार होता. लोकांनी सांगितलं की 1941 सालच्या सायबेरियन प्लेग पुन्हा परतलाय.

या रहस्यमय आजाराने एक मुलगा आणि 2500 रेनडियर्सचा मृत्यू झाला तेव्हा तो आजार कळला. त्या सर्वांना अँथ्रॅक्स झाला होता.

ते सर्व 75 वर्षांपूर्वी मेलेल्या एका रेनडिअरच्या सांगाड्याच्या संपर्कात आले होते. तो सांगाडा 75 वर्षांपासून बर्फात गाडला गेला होता आणि बर्फ वितळल्याने तो उघड झाला होता.

स्पॅनिश फ्लू, देवी, प्लेग यासारखे आजार आता नामशेष झाले आहेत. मात्र, बर्फ वितळल्याने हे आजार पुन्हा डोकं वर काढू शकतात, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

2014 साली फ्रान्समध्ये 30 हजार वर्षांपासून बर्फात असलेल्या एका विषाणुला उष्णता देण्यात आली. तो जिवंत झाला. ही येणाऱ्या धोक्याची भयंकर चाहूल होती.

या धोक्याला 2016 साली नॉर्वेमध्ये घडलेल्या आणखी एका घटनेने बळ मिळालं. तिथे एक 'ड्युम्सडे वॉल्ट' आहे. म्हणजे जगाच्या अंताच्या दिवशी मानवाच्या कामी येणाऱ्या काही वस्तुंची तिजोरी.

ध्रुवीय बर्फात 16.5 लाख टन पारा

या वॉल्टमध्ये लाखो झाडं आणि वनस्पतींची बियाणी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. पृथ्वीवर कधी प्रलय आलाच तर इथल्या बियाण्यांचा वापर करून नव्याने जीवसृष्टी निर्माण केली जाईल.

मात्र, 2016 साली इथे पाणी भरल्याने बरीचशी बियाणं खराब झाली. त्याचप्रमाणे स्वीडनमध्ये आण्विक कचऱ्याला बर्फाखाली झाकून ठेवण्यात आलं आहे.

बर्फ वितळला तर हा कचराही उघडा होईल. त्यामुळे रेडियोअॅक्टिव्ह कण वातावरणात मिसळून नवीन धोका निर्माण करू शकतात.

पर्माफ्रॉस्टखाली अनेक गुपित हजारो वर्षांपासून दडलेली आहेत आणि सुरक्षितही आहेत. ही गुपितही उघड होऊन नष्ट होण्याची भीती आहे. उदाहरणार्थ ग्रीनलँडमध्ये 4 हजार वर्ष जुनं एस्किमोंचं घर नुकतच वाहून गेलं.

समुद्राच्या लाटा अशा फिरतात की शेवटी सगळं पाणी आर्क्टिकला जातं. परिणामी जगभरातला सगळा कचरा आर्क्टिकवर जमा होतो.

आर्क्टिकवर मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक जमा झालंय. प्लॅस्टिकचे छोटे तुकडे मासे खातात. असे मासे माणसाने खाल्ल्यावर माणसाच्या शरिरात ते प्लॅस्टिक जातं.

अशाच पद्धतीने पारादेखील आपल्या पोटात जातोय. आर्क्टिकवर मोठ्या प्रमाणावर पारा जमा आहे. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार ध्रुवीय बर्फात 16 लाख 56 हजार टन पारा आहे. हे प्रमाणही पृथ्वीवर असलेल्या पाऱ्यापेक्षा दुप्पट आहे.

बर्फाळ प्रदेशात राहणारे प्राणी हा पारा नकळत गिळतात. माणसाने अशा प्राण्यांचं मांस खाल्लं तर तो आपल्याही पोटात जातो. पारा अत्यंत विषारी पदार्थ आहे.

असं असलं तरी आर्क्टिकवरचा बर्फ वितळल्याने फायदा होईल, असाही काहींचा दृष्टीकोन आहे. तिथे नवीन झाडं येतील. त्यामुळे हिरवळीचा नवीन प्रदेश तयार होईल. समुद्रमार्गे व्यापार करण्याचे नवे मार्ग तयार होतील.

मात्र, सू नताली यांच्या मते या फायद्यांपेक्षा बर्फ वितळल्याने होणारे तोटे अधिक गंभीर आहेत.

मानवाने आत्ताच सजग होण्याची गरज आहे. प्रदूषण करणाऱ्या वायूंचं उत्सर्जन कमी करून पृथ्वीचं तापमान वाढण्यापासून रोखलं पाहिजे. यातच आपलं हित आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)