राजस्थान : शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू, काय आहे नेमकं प्रकरण?

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, जयपूर, बीबीसी हिंदीसाठी

राजस्थानमधल्या जालौर जिल्ह्यात नऊ वर्षाच्या एका दलित शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर वातावरण तापलं आहे. मृतदेह बरोबर घेऊन लोक आंदोलन करत आहेत.

कुटुंबीयांची मागणी हीच आहे की कुटुंबातल्या एका माणसाला नोकरी आणि 50 लाख नुकसानभरपाई मिळावी.

प्रशासन आणि मृत मुलाच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा झाली आहे. कुटुंबातील एकाला नोकरी आणि नुकसानभरपाईसंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या सरस्वती विद्या मंदिर शाळेचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षा अधिकाऱ्याला एपीओ करण्यात आलं आहे. अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एका खाजगी शाळेतील शिक्षकाने केलेल्या मारहाणीत दलित मुलाचा मृत्यू झालाचा आरोप आहे. एका भांड्यातून पाणी प्यायल्याच्या आरोपावरून शिक्षकाने मुलाला मारहाण केली होती.

शिक्षकाकडून झालेल्या कथित मारहाणीनंतर कुटुंबीयांनी त्या मुलावर वेगवेगळ्या रुग्णायलयात उपचार केले. 23 दिवस उपचार सुरू होते. शनिवारी 13 ऑगस्टला अहमदाबाद इथे एका रुग्णालयात त्या मुलाचा मृत्यू झाला.

मुलाचा मृतदेह रविवारी दुपारी मुलाच्या गावी नेण्यात आला. कुटुंबीयांकडून आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित केली आहे.

ज्या शिक्षकावर मारहाणीचा आरोप आहे त्याला अटक करण्यात आली आहे. परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मते भांड्यातून पाणी पिणे आणि या कारणापायी मारहाण याला दुजोरा मिळालेला नाही.

नेमकं प्रकरण काय आहे?

जालौर विधानसभा मधील सायला तहसील मध्ये सुराणा गावात सरस्वती विद्यालय ही शाळा आहे. या खाजगी शाळेत तिसरीत दलित मुलगा इंद्र कुमार शिकत होता. शाळेचे संचालक आणि शिक्षक छैलसिंह यांनी 20 जुलैला तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवालला मारहाण केल्याचा आरोप आहे. 40 वर्षीय छैलसिंह यांनी 9 वर्षाच्या इंद्रकुमार मेघवालला कान आणि डोळ्यावर मारलं.

कुटुंबीयांनी यासंदर्भात पोलिसात लेखी तक्रार केली. त्यानुसार 20 जुलै रोजी नेहमीप्रमाणे इंद्रकुमार शाळेत गेला होता. 11 वाजता त्याला तहान लागली तर त्याने भांड्यातून पाणी प्यायलं. लहान असल्यामुळे ते भांडं सवर्ण जातीचे प्राध्यापक छैलसिंह यांच्यासाठी वेगळं ठेवण्यात आलं आहे हे त्याला समजलं नाही.

"खालच्या जातीचा असूनही सर्वणांसाठीच्या भांड्यातून तू पाणी कसं प्यायलास," असा सवाल छैलसिंह यांनी इंद्रकुमारला केला. यानंतर छैलसिंह यांनी मारहाणही केली. यामुळे इंद्रकुमारच्या कान आणि डोळ्याला गंभीर जखम झाली.

या मारहाणीनंतर कुटुंबीयांनी इंद्रकुमारवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार केले. पण त्याला बरं वाटलं नाही. गंभीर स्थितीत त्याला उदयपूरहून अहमदाबादला नेण्यात आलं. अहमदाबाद इथल्या रुग्णालयात तो दोन दिवस होता. 13 ऑगस्टला इंद्रकुमारची प्राणज्योत मालवली. इंद्रकुमार हा तीन भावांमध्ये सगळ्यात लहान होता.

मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर सरस्वती विद्यालयातील शिक्षक छैलसिंह हेच इंद्रकुमारच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचं बोललं जाऊ लागलं. 13 ऑगस्टला इंद्रकुमारच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सायला पोलीस स्थानकात छैलसिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. इंद्रकुमारचे काका किशोर कुमार मेघवाल यांच्या लेखी तक्रारीनंतर छैलसिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सवर्णासाठींच्या भांड्यातून पाणी प्यायलयाने मारहाण?

इंद्रकुमारचे मामा मीठालाल मेघवाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, इंद्रकुमारने सांगितलं होतं की त्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळेच मारहाणीला सामोरं जावं लागलं.

जालौर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे मारहाण केली या गोष्टीला पुष्टी मिळालेली नाही. मी स्वत: शाळेत गेलो होतो. तिथे वर्गाबाहेर पाण्याच्या मोठ्या भांड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी पाणी पिण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठवीपर्यंतचं शिक्षण त्या शाळेत मिळतं. मी सातवीतल्या काही मुलांशी बोललो. पण त्या मुलांनी असं काही भांडं नसल्याचं सांगितलं. आम्ही यासंदर्भात तपास करत आहोत.

एफआयआर दाखल झाल्यानंतर छैलसिंह यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी छैलसिंह यांनी चौकशीदरम्यान काय सांगितलं यासंदर्भात पोलीस अधीक्षक अग्रवाला यांनी सांगितलं की, छैलसिंह यांनी सांगितलं की मुलं वर्गात गडबड गोंधळ करत होते. त्यावेळी थोबाडीत मारली. भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे मारहाण केल्याच्या घटनेचा छैलसिंह यांनी इन्कार केला आहे.

थोबाडीत मारल्यानंतर मुलाची स्थिती गंभीर कशी झाली यासंदर्भात विचारलं असता अग्रवाल यांनी सांगितलं की अजूनही पोस्टमॉर्टेम अहवाल आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

स्थानिक पत्रकार ओमप्रकाश यांनी मुलाचा मृत्यू त्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे झाला असल्याचं म्हटलं आहे. दलित मुलाचे पिता आणि शिक्षक छैलसिंह यांच्यादरम्यानचं एक ऑडियो संभाषणही समोर आलं आहे. उपचारादरम्यान मदत करण्यासंदर्भात ते बोलत आहेत. मात्र या संभाषणातून मारहाणीचं कारण भांड्यातून पाणी पिणं असल्याचं आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.

व्हीडिओत विद्यार्थी गंभीर दिसतो

13 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा विद्यार्थ्याचे इतर दोन व्हीडिओ समोर आले. या व्हीडिओंमध्ये तो मुलगा गंभीर असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.

नातेवाईक त्या मुलासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो त्याला कोणताच प्रतिसाद देऊ शकत नाही, असं या व्हीडिओत दिसतं.

विद्यार्थी डोळे बंद करून वेदनेने तडफडत आहे. हा व्हीडिओ विद्यार्थ्याला रुग्णालयात घेऊन जाताना त्याच्या नातेवाईकांनीच बनवला आहे.

व्हीडिओमध्ये दिसतं की विद्यार्थ्याच्या नाकावर ऑक्सिजन लावण्यात आलेलं आहे. उजव्या डोळ्यावर सूज आली आहे. नातेवाईक सातत्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण विव्हळत असलेला मुलगा काहीच बोलत नाही.

याशिवाय, दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये नातेवाईक विद्यार्थ्याला विचारत असतात की तुला कुणी मारलं, या व्हीडिओतही विद्यार्थी झोपलेलाच आहे. त्याचे डोळे बंद आहेत, तर पलंगावर औषधं ठेवलेली आहेत.

व्हीडिओमध्ये नातेवाईक विद्यार्थ्याला विचारतात, तुला कुणी मारलं, पण त्याला विद्यार्थ्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. जेव्हा सातत्याने सगळे जण त्याला विचारतात, छैलजी मास्टरजी यांचं नाव घेतात, तेव्हा विद्यार्थी होकारार्थी मान डोलावतो.

नातेवाईक कुठे मारलं असं विचारतात, तेव्हा विद्यार्थी बेशुद्धावस्थेतच कानाच्या मागील बाजूकडे इशारा करतो.

इंद्र कुमार मेघवालचे मामा मिठालाल मेघवाल यांनी बीबीसीशी फोनवर बोलताना सांगितलं की त्याला कानाच्या मागील बाजूस वेदना होत होत्या.

मुलाला उपचारासाठी सुरुवातीला बगोडा, भिनमाल, डिसा, मेहसाणा, उदयपूर आणि त्यानंतर अहमदाबादला नेण्यात आलं. याठिकाणी दोन दिवस रुग्णालयातच घालवल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सकाळी विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली.

आरोपी शिक्षकावर हत्येचा गुन्हा दाखल

20 जुलै रोजी ही घटना घडल्यानंतर 23 दिवसांनी सायला पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षक छैलसिंह यांना अटक केली आहे. मुलाचे नातेवाईक छैलसिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

जालौर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी आतापर्यंतच्या पोलीस कारवाईची माहिती देताना सांगितलं, "आरोपीविरुद्ध अत्यंत गंभीर अशा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 302 तसंच अनुसूचित जाती-जमातींविरोधातील अट्रासिटी अंतर्गत FIR दाखल करून आरोपी शिक्षक छैलसिंह यांना अटक करण्यात आली आहे.

अग्रवाल यांनी पुढे सांगितलं, "ही घटना 20 जुलैची आहे. मुलाचा मृत्यू 13 ऑगस्ट रोजी झाला. आमच्यासमोर हे प्रकरण 11 ऑगस्ट रोजी आलं. नातेवाईकांनी तक्रार दिली नव्हती. तर SHO यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला होता. तेव्हा मुलाचे वडील अहमदाबादच्या रुग्णालयात होते. आल्यानंतर गुन्हा दाखल करतो, असं त्यांनी म्हटलं होतं. पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली होती."

विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. घटनेच्या विरोधात लोकांचं निषेध आंदोलन सुरू झालं आहे.

जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 पासूनच इंटरनेट सेवा बंद केली आहे. तरीही सामाजिक संघटनांकडून होत असलेला विरोध शमलेला नाही.

घटनेवर सत्ताधारी-विरोधकांच्या प्रतिक्रिया

राजस्थानच्या बहुजन समाज पक्षाने या घटनेच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. ते 16 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. गहलोत यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत हे प्रकरण केस ऑफिसर स्कीममध्ये आणावं, अशी सूचना केली आहे. याअंतर्गत लवकरात लवकर तपास करून आरोपींवरील दोष सिद्ध करता येऊ शकतो.

विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री गहलोत यांच्याकडून पाच लाख रुपयांची मदतसुद्धा घोषित करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ट्विट करून या प्रकरणाबाबत टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "राजस्थानात वारंवार अशा प्रकारच्या जातीयवादी घटना समोर येत आहेत. राजस्थानच्या काँग्रेस सरकारला दलित, आदिवासी आणि वंचितांचा जीव आणि इज्जत-अब्रूचं संरक्षण करण्यात अपयश येत आहे."

राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हणाले, "राजस्थानात गेल्या साडेतीन वर्षांत एकामागून एक अशा दलित अत्याचाराच्या घटना घडल्या. सरकार आणि मुख्यमंत्री कमकुवत असतात, अशा वेळी या घटना वाढतात. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी."

राजस्थानच्या गृह विभागाचे मंत्री राजेंद्रसिंह यादव यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं.

ते म्हणाले, "मानवतेच्या नावावर कलंक असलेल्या या शिक्षकाला कठोर शिक्षा देण्यात यावी."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)