You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश : हातात जेवणाचं ताट घेऊन रडणाऱ्या पोलिसाचा व्हीडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
- Author, अनंत झणाणे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
फिरोजाबादच्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा हातात चपाती घेऊन रडतानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे मनोज कुमार. या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी उत्तर प्रदेश पोलीस दलाच्या मेसमध्ये मिळणाऱ्या चपातीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय.
मनोज कुमार यांच्या या व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय आहे?
तर मनोज कुमार यांच्या व्हीडिओच्या छोट्या छोट्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हीडिओ क्लिपमध्ये ते फिरोजाबाद पोलीस लाईनच्या बाहेर हायवेवर येऊन आपलं जेवणाचं ताट लोकांना दाखवतायत आणि सांगतायत की, "आता कोणी ऐकणारच नाहीये, अशा प्रकारची चपाती तर कोणतं जनावर सुद्धा खाणार नाही."
तर दुसरा एक व्हायरल व्हीडिओ फिरोजाबाद पोलीस स्टेशनच्या डबराई मेसचा आहे. या व्हीडिओ क्लिपमध्ये कॉन्स्टेबल मनोज कुमार म्हणतात की, "कच्च्या चपात्या खाऊन खाऊन पोलीस आता वैतागलेत. डाळ तर नुसत्या पाण्यासारखी असते. मी याबाबत आरआय साहेब आणि सिव्हिल लाईनच्या सीओ साहेबांकडे तक्रार केलीय. पण कोणतीच कारवाई झालेली नाही. तुम्ही हा व्हीडिओ जास्तीत जास्त शेअर करा."
एवढंच नाही तर त्यांनी रस्त्यावर जमलेल्या लोकांपुढेच डीजीपी साहेबांना फोन लावला आणि म्हणाले, "मी कॉन्स्टेबल 380 मनोज कुमार बोलतोय. सर मी जेवणाचं ताट घेऊन कॅप्टन साहेबांसमोरही गेलो. पण त्यांनी या प्रकरणात कोणतीच कारवाई केलेली नाही. मी आता हे जेवणाचं ताट घेऊन रस्त्यावर उभा आहे. पण माझं ऐकून घेणार कोणीच नाहीय."
यावर समोरून आवाज येतोय की, चिंता करू नका तुम्हाला लवकरच रिस्पॉन्स मिळेल.
मनोज कुमारांच्या अशा एक ना अनेक क्लिप्स व्हायरल होताना दिसत आहेत.
फिरोजाबाद पोलिसांचं म्हणणं काय आहे?
बीबीसीच्या प्रतिनिधींनी फिरोजाबादचे एसएसपी आशिष तिवारी यांच्याशी या प्रकरणावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर थोड्याच वेळात या प्रकरणाचा तपास सीओ सिटी हिरालाल कनोजिया यांच्याकडे सोपविण्यात आला. सोबतच एसएसपींनी एक ट्वीट देखील शेअर केलं. त्यात ते म्हणतात, "मेसमधील जेवणाच्या गुणवत्तेसंबंधित तक्रारीवर सीओ सिटी पुढील तपास करणार आहेत. पण विशेष म्हणजे या प्रकरणातील तक्रारदाराला मागील वर्षात कामावर गैरहजर राहणे, अनुशासनहीनता, निष्काळजीपणा संबंधित 15 प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्यात."
एसएसपींनी ट्वीटमध्ये ज्या 15 शिक्षांचा उल्लेख केलाय त्याची यादी स्थानिक मीडियामध्ये प्रसिद्धही झाली आहे. मात्र, यासंबंधी पोलीस खात्याकडून कोणतंही अधिकृत ट्वीट किंवा विधान करण्यात आलेलं नाही.
मनोज कुमार यांचं म्हणणं काय आहे?
कॉन्स्टेबल मनोज कुमार बीबीसीशी बोलताना सांगतात की, ते मागील चार वर्षांपासून फिरोजाबाद जिल्ह्यात तैनात आहेत.
पण तुम्हाला रस्त्यावर येऊन तक्रार करायची वेळ का आली?
या प्रश्नावर मनोज कुमार सांगतात, "अशा प्रकारचे जेवण जेऊन कोण जिवंत राहिलं. हे जेवण जेऊन शारीरिक आणि मानसिक त्रास तर होतोच. पण हल्ली आम्ही आजारीही पडतो. जेवणाची गुणवत्ता इतकी खराब आहे की काही विचारू नका. तुम्ही बघितलंच आहे, चपात्या कशा कच्च्या असतात. वरणात डाळ कमी आणि पाणीचं जास्त असतं. मी यासंबंधी सीओ सिटी, एसपी, कॅप्टन, डीजी या सर्वांकडे तक्रार केली होती."
आणि जेवणाच्या गुणवत्तेचा हाच प्रश्न घेऊन उत्तरप्रदेश पोलीस दलातला साधा शिपाई तुमच्यासमोर आला होता.
जेवण जर इतकंच खराब आहे तर जशाप्रकारे तुम्ही विरोध करताय तसे इतर पोलीस कर्मचारी विरोध का करत नाहीत?
यावर मनोज कुमार सांगतात, "कोणीच तक्रार करत नाही. एक-दोन जण बोलतात आणि सोडून देतात, पण पुढे कोणीच येत नाही. मला वाटलं म्हणून मी पुढे आलो आणि तक्रार केली."
या प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत तुम्ही वाट बघितली का ? तुम्ही औपचारिक तक्रार दाखल करून फक्त दोनच दिवस झालेत. तरीही तुम्ही सार्वजनिकरित्या विरोध करायचं असं का ठरवलं?
बीबीसीच्या या प्रश्नावर मनोज कुमार सांगतात, "मला जे वाटलं ते मी केलं. हे जेवण जेवून मी पुरता वैतागलो होतो. त्यादिवशी मेस इन्चार्जला सांगून ठेवलं होतं की, मी 30 ते 40 किलोमीटर अंतरावर ड्युटी करायला निघालोय. त्यामुळे माझ्यासाठी रात्रीचे जेवण ठेव. मला मोहरमची ड्युटी लागली होती. पण तसं झालं नाही.
"आजच नाही तर मागच्या चार वर्षापासून हाच प्रश्न आहे. आज मला वाटलं की आता हे सहन करण्याच्या पलीकडचं आहे. तक्रार करून पण माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं. मग शेवटी मला रस्त्यावर उतरावं लागलं."
मनोज कुमार यांनी आपली तक्रार जिल्ह्याच्या एसएसपींकडे केली होती का? त्यावर मनोज कुमार सांगतात, "मी त्यांच्याकडे जेवणाचं ताट घेऊन गेलो होतो. पण त्यांनी माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही ना कोणता रिस्पॉन्स दिला."
सध्या फिरोजाबादच्या एसएसपींनी सीओ सिटी स्तरावर चौकशी नेमली आहे. पण पोलीस डिपार्टमेंट आता मोठी ॲक्शन घेईल म्हणून कॉन्स्टेबल मनोज कुमार चिंताग्रस्त झालेत. ते वारंवार हेच सांगत होते की, जेवण चांगलं मिळावं हाच माझा उद्देश होता.
घडलेल्या या सर्व प्रकारानंतर तुम्हाला काय वाटतं, नेमकं पुढं काय घडेल? यावर मनोज कुमार सांगतात की, मला तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मी सर्वात मोठा आणि एकटाच कमावणारा आहे. माझी आई हयात नाही आणि वडिलांवर उपचार सुरू आहेत. मला वाटतं माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझा आवाज दाबण्यात येईल आणि मला नोकरीवरून कमी केलं जाईल."
विरोधकांनीही साधला निशाणा
मनोज कुमार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट करून भाजप सरकारवर निशाणा साधलाय.
ते ट्वीटच्या माध्यमातून विचारतात की, "अमृत महोत्सवाच्या नादात उपाशीपोटी राहणाऱ्या यूपी पोलिसांचं कोणी ऐकून घेणार आहे का? महोत्सवाच्या नावावर भुकोत्सव सुरू आहे का?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)