उत्तर प्रदेश पोलिसांनीच चोरांना 'लुटलं', चार पोलिसांची तुरुंगात रवानगी

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये चोरांकडून चोरीचा पैसा घेऊन जिल्ह्याची सीमा पार करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

फिरोजाबादचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी बीबीसीला याविषयी अधिक माहिती दिली.

अशा प्रकारच्या कारवाईनेच पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारता येऊ शकतं, असं ते म्हणाले.

पोलीस हेच गुन्हा करू लागले तर समाजात चुकीचा संदेश जातो. गेल्या महिन्यातच एका दारू माफियाकडून लाच घेतल्याच्या आरोपांखाली आम्ही चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यात एकाला अटकही करण्यात आली, असंही अशोक कुमार यांनी सांगितलं.

स्थानिक पत्रकार मुकेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केल्याचं हे प्रकरण जिल्ह्यात चर्चेत आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला असल्याचं दिसून येत आहे."

काय आहे घटनाक्रम?

15 ऑक्टोबर रोजी रसूलपूर पोलीस ठाणे हद्दीत एका डिलिव्हरी ऑटो रिक्षातून 1 लाख 10 हजार रुपये चोरी झाले होते. चोरांनी ड्रायव्हिंग सीट फाडून पैसे काढून घेतले होते.

पीडित गौरव जेव्हा घरी पोहोचले तेव्हा पैसे गायब असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी रसूलपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या चोरीचं संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं. घटनेचे स्पष्ट फुटेज उपलब्ध झाले होते. चोर ऑटोमधून पैसे काढताना दिसून आले. त्यानंतर आम्ही संपूर्ण जिल्ह्यात याबाबत सूचना दिली. नाकेबंदी करून चेकिंग सुरू केली, असं अशोक कुमार यांनी सांगितलं.

18 ऑक्टोबर रोजी चोरी करणाऱ्या दोन्ही चोरांना अटक करण्यात आली.

चोरांकडून चोरीच्या रकमेबाबत विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं, पैसे तर पोलिसांनीच घेतले.

त्यानंतर पोलीस तपासात माहिती मिळाली की चौकीवर तैनात असलेले पोलीस निरीक्षक सुनील चंद आणि त्यांच्या पथकाने चोरांकडून पैसे घेतले. त्यानंतर त्यांना आपल्या गाडीने फिरोजाबाद जिल्ह्याची सीमा पार करून दिली.

यानंतर पोलिसांनी चोरांना लुटणाऱ्या सुनील चंद आणि त्यांच्या पूर्ण पथकाला अटक केली. चोरीचे पैसेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं.

पोलिसांना अटक

वरीष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. चारही पोलीस कर्मचारी सध्या तुरुंगात आहेत.

अटक करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन शिपाई आणि एक पोलीस वाहनचालक आहे.

या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा बिघडेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना अशोक कुमार म्हणतात, "पोलिसांच्या प्रतिमेवरचा डाग पुसण्यासाठी आणखी जास्त मेहनत करावी लागेल. माझ्या मते या कारवाईमुळे पोलिसांची प्रतिमा सुधारेल. पोलीस पोलिसांनी केलेले गुन्हे लपवतात, अशी धारणा सर्वसाधारणपणे असते. पण आम्ही त्याला छेद दिला आहे. दोषी कुणीही असला तरी कारवाई होईल, असा संदेश यामधून जाईल."

पोलिसांचं काम गुन्हेगारी रोखणं हे आहे. त्यामध्ये सामील होणं त्यांचं काम नाही. भविष्यात आमच्या जिल्ह्यात असे प्रकार समोर आले तर आम्ही आणखी कठोर कारवाई करू, असंही ते म्हणाले.

खुनाच्या आरोपाखाली पोलिसांना अटक

नुकतेच उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका व्यावसायिकाचा हॉटेलवर टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान हत्या केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

यामध्ये एक SHO आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे. या प्रकरणात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पीडित कुटुंबावर गुन्हा दाखल न करण्याचा दबाव निर्माण केला होता.

पण पीडित कुटुंब धरणे आंदोलनाला बसलं. त्यानंतर विरोधी पक्ष आणि माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा

उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था हा प्रमुख मुद्दा ठरू शकतो.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मते राज्यात गुन्हेगारी कमी झाली असून लोकांना पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित वाटत आहे.

मात्र, पोलिसांच्या हातूनच खून आणि लूट यांसारख्या प्रकारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

फिरोजाबाद येथील स्थानिक पत्रकार मुकेश बघेल यांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांवर कठोर कारवाई करूनच पोलीस लोकांचा विश्वास संपादन करू शकतात, असं नागरिकांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)