You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जालना आयकर छापा: वऱ्हाडी बनून आले अधिकारी अन् जप्त केले 390 कोटी रूपये
महाराष्ट्रातील जालन्यात स्टील कंपन्या आणि खासगी व्यवसायिकांवर आयकर विभागाने (Income Tax) छापेमारी केलीये. या कारवाईत तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त केल्याचा दावा इन्कम टॅक्सने केलाय.
आयकर विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिलाय.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, या कारवाईत 58 कोटी रुपये रोकड, 32 किलो सोनं, हिरे इतर मौल्यवान दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आलेत. तीन ऑगस्टपासून ही छापेमारीची ही कारवाई सुरू होती.
ज्या कंपन्यांवर आणि व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यात आलाय. त्यांच्याकडून आयकर विभागाच्या छाप्याबाबत अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
लग्नाचे वऱ्हाडी बनून पोहोचले आयकर अधिकारी
राज्यातील सर्वांत मोठ्या बांधकामासाठी स्टीलचं उत्पादन करणाऱ्या चार कंपनीवर हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या नाशिकच्या टीमने ही कारवाई 3 ऑगस्टला सुरू केली.
या कारवाईत 250 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तर तब्बल 120 गाड्यातून अधिकारी जालन्यात दाखल झाले होते. याची माहिती कुठेही फुटू नये यासाठी, छापेमारीत वापरण्यात आलेल्या गाड्यांवर लग्नाचं वऱ्हाड असल्याचं दाखवणारे स्टिकर लावण्यात आले. प्रत्येक गाडीवर 'वर' आणि 'वधू'चं नाव लिहिण्यात आलं होतं.
महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाने इनकम टॅक्सला स्टील कंपन्यांकडून खोटी बिलं दाखवून कर चोरी होत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करत असल्याची माहिती आहे.
500 च्या नोटांची बंडलं आणि 250 अधिकारी
स्टील कंपन्यांची कार्यालयं, मालक, बांधकाम व्यवसायिक आणि इतर व्यापाऱ्यांवर ही कारवाई सुरू झाली. तपास पुढे सरकत गेला आणि कोट्यावधी रूपयांची रोकड (कॅश) जप्त करण्यात आली.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, या छापेमारीत 58 कोटी रूपये रोकड जप्त करण्यत आलेत. या कारवाईचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात 500 रुपयांच्या नोटांची बंडल एका टेबलावर एकमेकांवर एक रचून ठेवण्यात आल्याचं दिसून येतंय.
तर, काही कर्मचारी नोटांची बंडलं मोजताना दिसून येतात. हा व्हिडीयो 3 ऑगस्टचा असल्याची माहिती आहे. नोटा मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मशिनचा वापर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तासांचा वेळ लागला. जालन्यातील स्टेट बॅंकेच्या कार्यालयात जाऊन ही रक्कम मोजण्यात आली. सकाळी 11 वाजता नोटा मोजणीचं काम सुरू झालं ते पहाटे एक वाजेपर्यंत सुरू होतं.
छाप्यात काय मिळाले?
जालन्यातील स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरील छापेमारीबाबत आयकर विभागाने प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे, पण कोणत्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत इनकम टॅक्स विभागाने माहिती दिलेली नाही.
आयकर विभागाच्या माहितीनुसार,
1.दोन मोठ्या स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर छापा टाकण्यात आला
2.जालना, मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये 30 जागांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली
3.खोटी खरेदी दाखवून या दोन्ही कंपन्या टॅक्सची चोरी करत होत्या
4.120 कोटी रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या कच्च्या मालाची या कंपन्यांनी कुठेच एन्ट्री केली नव्हती
आयकर विभागाच्या या कारवाईबाबत जनसंपर्क अधिकारी सुरभी अहलूवालिया सांगतात, "कोलकात्यातील बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा वळवण्यात येत होत. कंपनीत काम करणाऱ्या लोकांच्या नावे लॉकर उघडण्यात आले होते. हे लॉकर एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेत ठेव्यात आले होते."
त्या पुढे म्हणाल्या, आत्तापर्यंत 30 लॉकरची चौकशी करण्यात आलीये. यात मोठ्या प्रमाणात कॅश आणि दागिने आढळून आले आहेत. तर 56 कोटी रोख रक्कम आणि 14 कोटी रूपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)