कोरोना व्हायरस : केरळमध्ये कोव्हिड-19चे मृत्यू लपवले जात आहेत का?

    • Author, सौतिक बिश्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

केरळमध्ये कोरोना मृत्यू लपवले जात आहेत का?

मार्चपासून केरळमध्ये काही स्वयंसेवक दररोज स्थानिक वर्तमानपत्रं आणि चॅनेल काळजीपूर्वक पाहतात. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात छापून येणारी आणि प्रक्षेपित होणारी बातमी काळजीपूर्वक पाहतात, वाचतात. ही आकडेवारी टिपून ठेवतात.

डॉ. अरुण. एन. माधवन यांच्या नेतृत्वाखालील हा गट हे काम करतो. माधवन जनरल मेडिकल फिजिशियन आहेत. सात वर्तमानपत्रांच्या स्थानिक आवृत्यांमध्ये छापून येणारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंदर्भातली माहिती हा गट टिपून ठेवतो.

पाच चॅनेल्सही दररोज पाहिले जातात. दररोज टाचणं काढली जातात. कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या बातम्या, शोकसंदेश, शोकसभेची सूचना असं सगळं ते टिपून ठेवतात. ही सगळी माहिती संगणकावर स्प्रेडशीटमध्ये भरली जाते.

माहिती संकलित करण्याची ही प्रभावी पद्धत आहे, असं प्रभात झा यांना वाटतं. कॅनडातील टोरंटो विद्यापीठात ते कार्यरत आहेत. मिलिअन डेथ स्टडी या अकाली मृत्यूंसंदर्भातील प्रचंड मोठ्या अभ्यासगटाचे ते प्रमुख होते.

गुरुवारी रात्रीपर्यंत केरळमधील या स्वयंसेवकांच्या गटाने राज्यातील कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 3,356 असल्याचं म्हटलं आहे. केरळमध्ये पहिला कोरोना रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. कोरोनामुळे केरळमध्ये पहिला मृत्यू मार्च महिन्यात झाला होता. सरकारी आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची संख्या 1,969 इतकी आहे.

कोरोनामुळे होणारे अनेक मृत्यू नोंदलेच जात नाहीत, असं माधवन सांगतात. कोव्हिडमुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू को-मॉर्बिडिटी अर्थात अन्य आजारांच्या गुंतागुंतीमुळे झाल्याचं दाखवण्यात येतं.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8.9 दशलक्ष इतकी आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आहेत, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,30,000 रुग्णांनी जीव गमावला आहे. मात्र 'केस फॅटॅलिटी रेट' अर्थात सीएफआर म्हणजेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूदराचं प्रमाण हे 1.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जगात सगळ्यांत कमी प्रमाण भारताचं आहे.

भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी आहे हे सर्वार्थाने खरं चित्र नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंदच होत नाही हेही यामागचं कारण आहे. संभाव्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादीत नोंद केली जात नाही. कोरोनामुळे होणारे मृत्यू अन्य गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याचं दाखवलं जातं.

केरळमध्ये प्रशासकीय माहितीसंदर्भात पारदर्शकता आहे, असा दावा करण्यात येतो. कोरोना रुग्ण, कोरोनामुळे होणारे मृत्यू याची माहिती देण्यासाठी केरळ सरकारने डॅशबोर्डही तयार केला आहे. मात्र तरीही कोरोनामुळे होणारे अनेक मृत्यू कागदावर दाखवलेच जात नाहीत.

मृत्यूपूर्वी कोरोना निगेटिव्ह ठरलेले तसंच केरळबाहेरील मृत रुग्णांची नोंद केली जात नाही. कमी मृत्यू दाखवणं सर्रास होत असल्याचं डॉ. माधवन यांना वाटतं.

कोरोनाची लक्षणं असणारे तीन रुग्ण माधवन यांच्या क्लिनिकमध्ये आले. तिघेही पुरुष होते आणि त्यांची वयं 65 ते 78 दरम्यानची होती. ऑक्टोबर महिन्यात हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या निधनासंदर्भात प्रसारमाध्यमांनी काहीही माहिती दिली नाही. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या अधिकृत आकडेवारीत या तिघांच्या मृत्यूची नोंद नव्हती. तिघांच्या मृत्यूची नोंद मिसिंग डेथ अशी करण्यात आली आहे.

कोरोनासारख्या आरोग्य संकटाचा मुकाबला कसा करायचा यासंदर्भात केरळ सरकारला सल्ला देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये राजीव सदानंदन यांचा समावेश होतो. केरळमध्ये कोरोना रुग्णांचे मृत्यू कमी दाखवले जात असल्याचं त्यांनी मान्य केलं.

टर्मिनल किंवा रेनल आजारांमुळे मृत्यू झालेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची नोंद कोरोना मृत्यू सूचीत केली जात नाही. हे चुकीचं आहे. कोरोना मृत्यू यासंदर्भात प्रोटोकॉल अतिशय स्पष्ट आहेत, असं सदानंदन यांनी सांगितलं.

माहिती पारदर्शकतेबाबत केरळ राज्याने नेहमीच स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. याच्याच बळावर केरळने दोन वर्षांपूर्वी निपाह व्हायरसचा सामना केला होता.

"आम्ही जाणीवपूर्वक माहिती लपवलेली नाही. टोकाच्या प्रतिक्रिया उमटू शकतात हे लक्षात घेऊन काही जिल्ह्यांनी कोरोना मृत्यूची संख्या कमी दाखवली असेल. सरकारी माहिती पारदर्शक पद्धतीने जनतेसमोर असावी यासाठी आग्रही असणाऱ्या राज्यात कोरोना मृतांची माहिती लपवणं सोपं नाही," असं सदानंदन यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रत्येक देशाने कोरोना मृतांची संख्या 30 ते 50 टक्के कमीच सादर केली आहे असं डॉ. झा सांगतात. देशातील नगरपालिकांनी कोरोना मृत्यूसंदर्भात दर आठवड्याला माहिती जाहीर करावी. आधीच्या आकडेवारीशी ही माहिती पडताळून पाहता येईल.

केरळमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी दाखवणं हे जाणीवपूर्वक आणि व्यवस्थेविहीन आहे, व्यवस्थेतली त्रुटी नाही, असं ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे ओमेन सी. कुरियन यांना वाटतं. ओआरएफ हा दिल्लीस्थित थिंकटँक आहे.

कोरोना रुग्णांसंदर्भात अतिशय वेगवान आणि अत्याधुनिक यंत्रणा असूनही आणि सरकारला सल्ला देण्यासाठी तज्ज्ञांची समिती कार्यरत असताना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात मोठा घोळ उघडकीस आलेला नाही, असं त्यांना वाटतं.

कोरोना साथीचा मुकाबला करण्यात यशस्वी ठरलेलं राज्य ही केरळची प्रतिमा कायम राखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असं कुरियन यांना वाटतं.

जानेवारीत, केरळमध्ये कोरोनाची पहिली केस आढळली होती. वैद्यकीय शिक्षण घेत असलेली एक मुलगी चीनमधल्या वुहानमधून केरळमध्ये दाखल झाली.

वुहानमध्येच कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली आणि केरळ कोरोनाचं हॉटस्पॉट झालं. मार्चपर्यंत सहाहून अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती.

मे महिन्यापर्यंत केरळने टेस्ट, ट्रेस, आयसोलेट ही त्रिसूत्री अवलंबली. चांगल्या अशा पायाभूत यंत्रणेच्या माध्यमातून केरळने कोरोनावर नियंत्रण मिळवलं. काही दिवशी तर अख्ख्या राज्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचीही नोंद झाली.

मात्र हा आनंद काही दिवसांपुरताच ठरला. केरळमध्ये हजाराव्या कोरोना रुग्णाची नोंद पहिला रुग्ण आढळल्यापासून 110व्या दिवशी झाली. जुलैच्या मध्यापर्यंत केरळमध्ये दिवसाला 800 रुग्ण आढळू लागले. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण वाढलं.

19 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 545,641 इतकी आहे. 46,000 पेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात तसंच होम क्वारंटीनमध्ये आहेत. केरळमध्ये दररोज साधारण 60,000 कोरोना चाचण्या घेतल्या जातात. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची प्रशासनाला भीती आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवून फार काही साध्य होत नाही, असं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं. केरळने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 30 टक्के कमी दाखवली आहे, असं या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

हा विरोधाभास आहे असं डॉ. कुरियन म्हणाले. सगळ्या कोरोना मृत्यांची नोंद पटावर दाखवण्यात आली तरीही केरळने मृत्यूदर कमी करण्यासाठी केलेले काम उल्लेखनीय असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)