जागतिक हत्ती दिन: 9 वर्षं मानवी वस्तीत राहिलेल्या हत्तीला परत जंगलात कसं सोडण्यात आलं?

    • Author, शुभगुनाम कन्नम
    • Role, बीबीसी तमिळ

(12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय हत्ती दिन आहे. पूर्वसंध्येला वाचा एका हत्तीचा जंगलातून मानवी वस्तीत येण्याचा आणि पुन्हा आपल्या घरी पोहोचण्याचा प्रवास)

रिव्हाल्डो नावाचा हत्ती...आज दूर तिकडे तामिळनाडूच्या मुदुमलाई जंगलात पुन्हा एकदा मनसोक्तपणे फिरणार आहे. गेल्या 9 वर्षांपासून तो माणसांच्या सहवासात होता, आता मात्र त्याला पूर्वीसारखेच जंगलात हिंडता-फिरता येणार आहे.

पण आजच का? याआधी तो कुठे होता. तर हा हत्ती माणसांच्या वस्तीत शिरला आणि त्याचा गंभीर अपघात झाला. एका स्फोटात त्याची सोंड गंभीररीत्या भाजली आणि तो याच वस्तीत काही दिवस भटकत राहिला. नंतर त्याच्यावर उपचार झाले आणि तो त्याच ठिकाणी राहिला.

यावर तामिळनाडू जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. शेखर कुमार नीरज सांगतात की, "जंगलातून आलेल्या हत्तीला परत जंगलात अर्थात त्याच्या अधिवासात किंवा हक्काच्या घरी पाठवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असेल."

स्थानिक लोक रिव्हाल्डोची गोष्ट सांगतात, "2013 मध्ये एका गावठी बॉम्बच्या स्फोटात रिव्हाल्डोने त्याच्या सोंडेचा सुमारे 30 सेंटीमीटर भाग गमावला. अन्नधान्याची रानडुकरांकडून नासाडी होऊ नये म्हणून अनेक जण शेतात फळांमध्ये दारू भरून ठेवतात. ही रानडुकरं जेव्हा शेतात येतात तेव्हा त्यांची फसगत होते आणि फळ समजून ते बॉम्ब खाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बॉम्बचा स्फोट होतो. असाच एक बॉम्ब या हत्तीने खाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला दुखापत झाली."

अशाप्रकारे स्फोटक ठेवणं बेकायदेशीर आहे मात्र तरीही लोक त्याचा सर्रास वापर करतात, असं स्थानिक सांगतात.

रिव्हाल्डो या स्फोटात जखमी झाला आणि नंतर वनविभागाला सापडला. त्यामुळे त्याच्या या दुखापतीला नेमकं कोण जबाबदार आहे हे कळलंच नाही. या दुखापतीनंतर, रिव्हाल्डोला नीट खाता देखील येत नव्हते. त्यामुळे त्याला भरवावे लागत होतं, असं अधिकारी सांगतात.

वनाधिकारी आणि जंगलाच्या सीमेला लागून असलेल्या वाढाई थोट्टम गावातील लोकांनीही त्याला खायला द्यायला सुरुवात केली.

रिव्हाल्डोला जंगलात सोडावं की नाही यासाठी जी टीम तयार करण्यात आली होती त्या टीमचा भाग असलेले वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडचे सदस्य मोहन राज बीबीसीशी बोलताना सांगतात की, स्थानिकांनी रिव्हाल्डोला फणस, नारळ, टरबूज आणि पपई खायला देत असत.

"परिसरात जे रिसॉर्ट्स होते तेथील लोकही त्याला जेवण द्यायचे. त्यामुळे तो त्याठिकाणी वारंवार जायचा. तो परिसरात लाडका झाला होता. तो कधीही गावात शिरायचा आणि कुठेही हिंडायचा."

ते पुढे सांगतात, "जंगली हत्तींनी असं हिंडण फिरणं चांगलं नसतं. त्यामुळे त्याला छावणीत हलवण्यात आलं."

पण त्याच्या या छावणीप्रकरणावर वन्यजीव प्रेमींनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं होतं की, रिव्हाल्डोचं मूळ घर सिगूर पठार आहे. हा हत्तींचा कॉरिडॉर आहे. त्यामुळे रिव्हाल्डोला त्याच्या हक्काच्या घरातून काढून देऊन नंतर कुठे ठेवणार?

यावर मोहन राज सांगतात, "शिवाय कॅम्प म्हणजे जन्मठेपेची शिक्षा असल्यासारखा प्रकार. त्याने असा कोणता गुन्हा केलाय ज्यामुळे त्याला जंगलात न सोडता या कॅम्पमध्ये ठेवावं असं आम्हाला वाटायचं"

रिव्हाल्डोला पकडण्याचा निर्णय

रिव्हाल्डोला पकडून त्याला त्याच्या अधिवासात पाठवावे यासाठी 2015 च्या सुरुवातीपासूनच वनविभागाकडे लोकांचे कॉल यायला लागले. पण हा विशेष चर्चेचा मुद्दा तोपर्यंत तरी बनला नव्हता.

पण 2020 मध्ये रिव्हाल्डोला पकडण्याच्या मागणीने जोर धरला आणि शेवटी त्याला 2021 मध्ये पकडण्यात आल्याचं प्राध्यापक टी. मुरुगावेल सांगतात. त्यांनी रिव्हाल्डोला त्याच्या अधिवासात पुन्हा पाठवण्यात यावे यासाठी एक याचिका केली होती.

मुरुगावेल सांगतात की, "वाळाई थोट्टम चेकपोस्टजवळ एक क्रॅल ठेवण्यात आला होता. क्रॅल म्हणजे सागवानासारख्या जड लाकडापासून बनवलेला एक प्रकारचा पिंजरा. हत्तींना सहसा हा पिंजरा तोडता येत नाही. या क्रॅलचा उपयोग जंगली हत्तींना नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो."

रिव्हाल्डोला पकडण्यासाठी क्रॅलमध्ये फणस आणि पपईचं ठेवण्यात आली. "तो फळं खाण्यासाठी क्रॅलमध्ये आला आणि वनविभागाने त्याला सहज पकडलं," असं मुरुगवेल सांगतात.

मुरुगावेल पुढं सांगतात की, वनविभागाने त्याला क्रॅलमध्ये तर पकडलं. पण न्यायालयात माहिती मात्र चुकीची दिली. "त्यांनी सांगितलं की त्याला त्याच्या सोंडेच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलंय.

"रिव्हाल्डो क्रॅलचं छप्पर उचलण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यामुळे रात्रभर कर्णकर्कश्श आवाज यायचे. याबाबतचा अहवाल आम्ही मद्रास उच्च न्यायालयात सादर केला. वन्य हत्तींना माणसाळवणे न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असल्याचं सांगत वनविभागाला अवमानाची नोटीस पाठवली. पण वनविभागाने त्यावर जैसे थे भूमिका ठेवली," मुरुगावेल सांगतात.

दरम्यान जुलै 2021 मध्ये डॉ. शेखर कुमार नीरज यांनी मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणून चार्ज हाती घेतला. त्यांच्या टेबलावर पहिली केस आली होती रिव्हाल्डोची.

डॉ. नीरज सांगतात की, "रिव्हाल्डो स्थानिक रहिवाशांच्या मालमत्तेचं नुकसान करायचा म्हणून त्याला क्रॅलमध्ये ठेवण्यात आलं होतं."

तसेच त्याच्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्याच्या जखमी सोंडेबद्दल, त्याच्या एका डोळ्यातील मोतीबिंदूबद्दल उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे त्याला जंगलात सोडलं तर तो एकटा राहू शकेल का? याविषयी साशंकता होती असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

त्यावर डॉ. नीरज सांगतात, "जेव्हा मी या प्रकरणाची माहिती घेतली तेव्हा हा 40 वर्षांचा रिव्हाल्डो मला निरोगी, हुशार आणि मृदू स्वभावाचा वाटला."

"हत्तीला उपचारासाठी ताब्यात घेतल्याचं वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आलं होतं. पण जेव्हा मी वन्यजीव डॉक्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी रिव्हाल्डो एकदम फिट असून त्याला आणखी उपचारांची गरज नसल्याचं सांगितलं."

डॉ. नीरज पुढे सांगतात की, "त्या रात्री मी विविध क्षेत्रातील 10 तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. दुसऱ्या दिवशीही मी रिव्हाल्डोची माहिती घेतली."

आणि शेवटी असं ठरलं की आता रिव्हाल्डोला त्याच्या त्याच्या घरी अर्थात जंगलात पाठवायचं.

पुन्हा जंगलात सोडण्याचे ऑपरेशन

रिव्हाल्डो 75 ते 80 दिवसांपासून क्रॅलमध्ये होता. त्याला माहूतांनी ताब्यात तर घेतलं होतं पण तो पुन्हा मानवी वस्तीत जाऊन नुकसान करण्याची भीती होती. अधिकार्‍यांनी ठरवून जुगार खेळला होता.

रिव्हाल्डोला जंगलात सोडण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं. जसं की, रिव्हाल्डोला ज्या जंगलात पाठवायचं आहे तिथं त्याचं आवडतं खाद्य मुबलक प्रमाणात असावं. त्याला ज्याठिकाणी क्रॅलमध्ये ठेवण्यात आलं होतं ते ठिकाण जंगलापासून लांब असावं. त्याठिकाणी पुरेसे जलस्रोत असावे. वाळाई थोट्टमजवळच्या जंगलात मानवी वस्ती नसावी. त्याच वनक्षेत्रात आणखी एक टस्कर हत्ती असल्यास संघर्ष निर्माण होऊ शकतो. म्हणून तिथं आणखीन एक हत्ती नसावा याकडे लक्ष देण्यात आलं.

पुढचं मोठं आव्हान होतं ते म्हणजे, रिव्हाल्डोला नैसर्गिकरीत्या खाता-पिता येईल अशी सवय लावलं. कारण आजअखेर तर त्याला माणसांकरवी खायची सवय होती. त्याच्या या सवयी बदलण्यात आल्या.

त्याच्या रक्त, लघवी आणि डीएनएचे नमुने घेण्यात आले. त्याच्या मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, थायरॉईडची चाचणी करण्यात आली. त्याचं नेमकं लोकेशन बघण्यासाठी सॅटेलाइट ट्रॅकिंग सिस्टीम आणि वायरलेस सिस्टीमसह त्याच्या मानेवर रेडिओ कॉलर लावण्यात आला.

आणि शेवटी रिव्हाल्डोला जंगलात पाठवण्याची वेळ ठरवण्यात आली. 2 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे 3 च्या सुमारास रिव्हाल्डोला जंगलात सोडण्यात आलं. त्यावेळी तिथं सुमारे 30 वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकांचे पथक आणि सुमारे 100 वन विभागाचे कर्मचारी हजर होते.

मात्र शेवटच्या क्षणीही अडचण आलीच.

रिव्हाल्डोने त्याला त्याच्या घरी परत नेण्यासाठी आलेल्या ट्रकमध्ये बसायलाच नकार दिला.

तब्बल चार तास त्याला ट्रकमध्ये बसवण्याची धडपड सुरू होती. नंतर पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार, रिव्हाल्डोला भुलीचे इंजेक्शन देऊन ट्रकमध्ये चढवण्यात आलं. सकाळी 6.30 च्या सुमारास त्यांचा प्रवास सुरू झाला.

सकाळी 9.30 च्या सुमारास ते सर्वजण जंगलात पोहोचले. त्याला ट्रकमधून खाली उतरवण्यासाठी वनविभागाला परत आटापिटा करावा लागला. या सगळ्यांत परत दीड तास वेळ लागला.

शेवटी रिव्हाल्डो एकदाचा खाली उतरला. थोडा वेळ उभा राहिला आणि जंगलात निघून गेला.

एक ड्रोन रिव्हाल्डोच्या मागावर होतं. फक्त ड्रोनचं नाही तर डॉ. निरज यांच्यासह 15 सदस्यांची टीम त्याच्या मागावर होती.

जसेजसे ते जंगलात आत आत जात होते तसतसा रिव्हाल्डो त्यांच्या नजरेआड होत गेला.

त्याच्या मानेवर लावलेल्या रेडिओ कॉलरच्या मदतीने टीमने त्याचा माग काढला. पण डॉ. निरज आणि त्यांच्या टीमला धक्का बसला.

कारण रिव्हाल्डोला ज्या ठिकाणाहून पकडलं होतं तिथे तो परत जात होता.

24 तासांत त्याने 40 किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. "आम्ही पुन्हा तिथेच आलो होतो." असं डॉ. निरज सांगतात.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना तात्काळ सावध केलं. त्यांनी गावाच्या आजूबाजूच्या भागावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. जंगली हत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पकडण्यासाठी माहूत तयार ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी रिव्हाल्डोला खायला देऊ नये असं सांगण्यात आलं. जंगलातून गावाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले.

दोन हत्तींशी केली मैत्री

पण रिव्हाल्डो गावात शिरलाच नाही. तो तिथल्या मसिनागुडीजवळच्या जंगलातच फिरत राहिला. वनविभागाचे अधिकारी त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून होते.

डॉ. निरज सांगतात, "पुढच्या 15 दिवसांत रिव्हाल्डोने दोन हत्तींशी मैत्री केली. तो छावणीत असताना त्याला भेटायला दोन जंगली टस्कर यायचे. जंगलातही बहुधा तेच आले असावेत."

2021 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. रिव्हाल्डो मात्र सत्यमंगलम, मुदुमलाई आणि बांदीपूरच्या जंगलभागात फिरत राहिला.

दरम्यान मुरलीधरन नावाच्या एका व्यक्तीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच्या या याचिकेत म्हटलं होतं की, रिव्हाल्डोला जंगलात परत जाण्यास भाग पाडू नये. त्याला एमआर पलायम येथील छावणीत हलवावं.

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यावर तामिळनाडूचे मुख्य न्यायाधीश म्हणाले, जसं मनुष्य किंवा इतर प्राणी आपल्या अपंगत्वावर मात करून सामान्य जीवन जगतात त्याचप्रमाणे हत्तींनीही त्यांच्या अपंगत्वासह जगायला शिकलं पाहिजे. त्याच्या तब्येतीत झालेल्या सुधारणा पाहता याचिकाकर्त्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य आढळत नाही. हा हत्ती अन्न खाण्यास आणि श्वास घेण्यास समर्थ असल्याचं दिसतं."

त्यामुळे रिव्हाल्डोला छावणीत हलवण्याची विनंती फेटाळण्यात आली.

रिव्हाल्डोला जेव्हा जंगलात सोडलं तेव्हाचा क्षण आठवताना डॉ. निरज सांगतात, "सुरुवातीला तो जंगलात जायला कचरत होता. पण ज्याक्षणी त्याने जंगलात पाय ठेवला अगदी त्याचक्षणी त्याने आपल्या सोंडेने जमिनीवर खरवडली. ती माती आपल्या सोंडेत घेऊन स्वतःवर उधळली."

"हे असं फक्त जंगलातलेच हत्तीच करू शकतात. माणसाळलेले हत्ती सहसा असं करत नाहीत. जेव्हा त्याने अशी कृती केली तेव्हा मात्र आम्हाला खात्री पटली की, रिव्हाल्डो आपली मूळ ओळख विसरलेला नाही."

या कृतीतून ते आपण स्वतंत्र आहोत ही भावना व्यक्त करतात आणि रिव्हाल्डोने देखील हेच केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)