You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
World Elephant Day : हत्ती आणि मानव खरंच गुण्यागोविंदाने एकत्रित नांदू शकतील का?
- Author, स्वामीनाथन नटराजन
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
काही वर्षांपूर्वी भारतातल्या डोंगराळ प्रदेशामध्ये एका अरुंद रस्त्यावरून गाडी चालवत जात असताना तर्ष थेकाएकारा यांना सुळे नसलेला एक मोठा हत्ती त्यांच्या दिशेने येताना दिसला.
"गाडी मागे वळवायला काहीच जागा नव्हती, त्यामुळे मी कार थांबवली, बाहेर आलो आणि माघारी पळायला लागलो," थेकाएकारा बीबीसीशी बोलताना म्हणाले.
"आपण हत्तीच्या खूप जास्त जवळ गेलो, तर ते हल्ला करतात आणि आपण गाडीत असलो, तर अधिक त्वेषाने हल्ला करतात."
पण त्या वेळी रस्त्याच्या कडेने चालणारी स्थानिक मुलं मात्र थेकाएकरा यांच्या भयग्रस्ततेवर हसत होती.
"ती मुलं म्हणाली, 'घाबरू नका, हा हत्ती गायीसारखाच आहे. तो पाणी प्यायला येतो, तुम्हाला काही त्रास देणार नाही'."
आणि त्यांचं बरोबर होतं.
त्या हत्तीने खरोखरच थेकाएकरांकडे दुर्लक्ष केलं आणि पाण्याच्या झऱ्यापाशी गेला, याने ते चकित झाले.
थेकाएकरा स्वतः हत्तीविषयीचे संशोधक आहेत. दक्षिण भारतातील गुदलूर वनविभागामध्ये ते काम करतात. तिथेच त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. त्यांना या हत्तीचं वागणं काहीसं विचित्र वाटलं, म्हणून ते त्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले.
गावाकडे येणारे आणि तिथे राहणारे हत्ती
या वन्य हत्तीच्या रूपातील पाहुण्याला स्थानिकांनी गणेशन असं नाव दिलं असल्याचं थेकाएकरा यांच्या लक्षात आलं.
जगातील अनेक ठिकाणी अन्न व पाणी यांच्या शोधात हत्ती मानवी वसाहतींमध्ये येण्याचे प्रकार वारंवार घडतात.
बहुतेकदा काही दिवसांनी हत्ती वनात परत जातात. पण दक्षिण भारतात मात्र, वर उल्लेख आलेल्या हत्तीप्रमाणे, अनेक वन्य हत्ती मानवांच्या सोबत राहायला शिकले आहेत. किंबहुना, वर्षातला बहुतांश भाग हे हत्ती मोठ्या वनांशेजारच्या छोट्या शहरांमध्ये व गावांमध्ये घालवताना दिसतात.
गुदलूर या छोटेखानी शहराची लोकसंख्या अडीच लाखांहून थोडी जास्त आहे. पाचशे चौरस किलोमीटरच्या या वनप्रदेशात अधे-मधे चहा व कॉफीचे मळे आहेत, आणि इथे सुमारे 150 वन्य हत्ती राहतात.
काही हत्ती नागरी जीवनात इतके रुळले आहेत की त्यांच्या हजेरीत फटाके वाजवले किंवा जवळपास कुठे जोरजोरात ढोल वाजवले जात असतील, तरीही गणेशनसारखे हत्ती आक्रमक होत नाहीत किंवा हल्ला करत नाहीत.
"हे माझ्या माहितीपेक्षा पूर्णच विपरित होतं," असं थेकाएकारा सांगतात. "त्या हत्तीने भांडण्याचा पवित्रा घेतला नाही."
वन्य हत्तींना माणसाळवण्याच्या किंवा प्रशिक्षण देण्याच्या कृतींचा विविध पशुकल्याण संघटांनी निषेध केला आहे, पण जगभरातील अनेक देशांमध्ये असे प्रकार अजूनही होतातच.
या प्रक्रियेला अनेक महिने लागतात आणि त्यासाठी हत्तीला एकाकी कैदेत ठेवावं लागतं आणि 'माहुताचे आदेश मानणं शिकेपर्यंत' हत्तीचा छळ केला जातो.
परंतु, थेकाएकारा यांच्या अनुभवातून असं सूचित झालं की, वन्य हत्ती मानवांसोबत सहअस्तित्व कसं राखायचं हे स्वतःहूनच शिकत आहेत.
टाक्यांमधलं पाणी पिणं आणि कोणालाही इजा न करता अन्न चोरणं
गुदलूर हत्ती देखरेख प्रकल्पातील प्रमुख संशोधक असलेल्या थेकाएकारा यांनी या प्रदेशातील सर्व हत्तींचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि मानवांसोबत राहणाऱ्या पाच हत्तींसह एकूण 90 वन्य हत्तींच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती गोळा केली.
शहरांमध्ये आश्रय घेणारे सर्वच हत्ती वृद्ध नर होते, असं या अभ्यासादरम्यान आढळलं. या हत्तींना तग धरून राहणं कसं शक्य झालं आणि ते अन्न व पाणी कसं मिळवतात, हे सुद्धा या अभ्यासातून स्पष्ट झालं.
"आम्ही तीन वर्षं गणेशनचा पाठपुरावा करत राहिलो. तो सर्व वेळ लोकांमध्ये घालवत होता."
"तो नियमितपणे रस्त्यांच्या कडेला झोपायचा. तो सोंड बसमध्ये घालताना आणि काही वेळा विंडशिल्ड फोडताना दिसायचा. त्याने काही मोजक्या रिक्षांवर हल्लाही केला होता."
घरांमध्ये बसवलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी प्यायची सवय गणेशनला होती.
काही वेळा हा हत्ती चहाच्या मळ्यांमधील कामात अडथळे आणायचा, त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा व्हायचा, कधी विक्रेत्यांकडून तो फळं व भाज्या घेऊन जायचा, पण त्याने कधी कोणाला इजा पोचवली नाही.
गुदलूर वनविभाग हा तीन राज्यांमध्ये पसरलेल्या निलगिरीज बायोस्फियर रिझर्वचा भाग आहे. इथल्या वनांमध्ये सहा हजारांहून अधिक आशियाई हत्ती आहेत. या उंचसखल भूप्रदेशात वाघांचीही संख्या मोठी आहे. भारतातील चांगल्या संरक्षित वन्यजीवन निवासामध्ये या भागाची गणना होते.
थेकाएकारा यांच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील वीसहून अधिक वन्य हत्ती आता छोट्या शहरांमध्ये राहत आहेत. रिव्हाल्डो नावाच्या अशाच एका हत्तीने ऊटीया प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये आश्रय घेतला आहे.
रिव्हाल्डोने एका माणसाकडून चिकन बिर्याणी हिसकावून घेतली आणि तो बिर्याणी खात असतानाचा व्हिडिओ सर्वत्र पसरला आणि अनेक जणांना त्याबद्दल कुतूहलही वाटलं.
पण हत्तीविषयीचे संशोधक असलेल्या थेकाएकारा यांना या घटनांमागील अर्थ लागत होता.
"हत्तीला मुळातच भात व मीठ आवडतं. चिकन ही दुय्यम गोष्ट होती," असं थेकाएकारा सांगतात. हत्ती शाकाहारी असतात.
वन्य हत्ती त्यांचा बहुतांश वेळ अन्न व पाणी यांच्या शोधात घालवतात. नागरी अवकाशात त्यांना गरजेची गोष्ट दोन तासांच्या आत मिळते, असं थेकाएकारा सांगतात.
"पिकं आणि शिजलेलं अन्न खाल्ल्यावर त्यांच्यातील कॅलरीचं प्रमाणही जास्त होतं. त्यामुळे त्यांना खूप खावं लागत नाही."
पण या अन्नाचं पोषण मूल्य कमी असतं, त्यामुळे दूर अंतरांपर्यंत प्रवास करण्याची गरज मंदावते.
"त्यांना जास्त हालचालीचा व्यायाम पडू नये यासाठी ते दिवसाचा बहुतांश वेळ शांतपणे बसून असतात. त्यामुळेच हे हत्ती आकाराने जास्त मोठेही आहेत."
मानवांनीही जुळवून घ्यायला हवं
हत्तींसोबत जगताना आपल्यालाही काही गोष्टींबाबत जुळवून घ्यायला हवं हे स्थानिकांना इतक्या वर्षांमध्ये कळलं आहे.
नागरी अवकाशात दिसणाऱ्या मोठ्या आकाराच्या हत्तींपैकी एक आहे भारदान. तो गुदलूरमधील थोरापल्ली या छोट्या शहरात नियमितपणे येतो, तिथल्या एका उपहारगृहापाशी जातो आणि तिथे खास त्याच्यासाठी उरलेलं अन्न ठेवलं जातं.
"त्या उपहारगृहाचे मालक त्यांच्याकडच्या वाया गेलेल्या भाज्या व वापरून झालेली केळीची पानं हत्तीसाठी बाजूला ठेवतात."
एका उपहारगृहात जेवत असताना भारदानला पाहिल्याचं थेकाएकारांच्या आठवणीत आहे.
"हत्तीने खाणं सुरू केल्यावर गर्दी जमली. काहींनी फोटो काढायला सुरुवात केली. एका तरुणाने अति उत्साहाने चांगला फोटो येण्यासाठी हत्तीची शेपटी अक्षरशः खेचली."
हत्तीने मागे वळून कॅमेऱ्याकडे पाहावं, अशी त्या तरुणाची इच्छा होती.
"मला ते पाहून धक्का बसला. देशात इतर ठिकाणी याहून किरकोळ कृतीसाठीही लोकांना जीव गमवावे लागले आहेत. इथे मात्र हत्तीने सहज पाय मागे सरकावला, पण तो त्या तरुणाला लागला नाही. मग हत्तीने पुन्हा खाणं सुरू ठेवलं."
तो हत्ती अजिबात आक्रमक झाला नाही. भारदानच्या या शांत स्वभावामुळे त्याची 'गुड बॉय' अशी ख्याती झाली. स्थानिक लोक काही वेळा त्याला घरातल्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागवायचे आणि अनेकदा तर त्याच्याशी बोलायचेही.
पण दोन तरुण नर हत्ती भारदानसोबत यायला लागल्यावर परिस्थिती बदलली. या नवीन हत्तींनी दुकानांची दारं नि खिडक्या मोडून भाज्या व फळं खाल्ली.
या दोन हत्तींचा स्वभाव भारदानसारखा नव्हता, त्यामुळे ते अनेकदा लोकांचा पाठलाग करायचे आणि गावात भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं.
परत जायला नकार
वन्य प्राण्यांनी हल्ला करायचा निर्णय घेतला तर त्यात मानवी जीवितहानी होईल, अशी भीती वन विभागाला वाटली. त्यामुळे त्यांनी रिव्हाल्डोला वनात परत पाठवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
"एका माणसाने हत्तींसाठी फणस ठेवायला सुरुवात केल्यानंतर," रिव्हाल्डो ऊटीमध्ये यायला लागला, असं थेकाएकारा सांगतात.
फणस खाऊन झाले तरी रिव्हाल्डो परतायचा नाही. मग उपहारगृहाच्या मालकांनी त्याला खाणं द्यायला सुरुवात केली. या सगळ्यांत रिव्हाल्डो पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला. त्याची यावर हरकत नव्हती, त्यामुळे तो यासोबत जगत राहिला.
सरत्या वर्षांनुसार हत्ती व स्थानिक लोक दोघांनाही परस्परांची भीती वाटेनाशी झाली.
परंतु, हत्ती एखाद्या दिवशी लोकांवर हल्ला करतील, अशी भीती वन विभागाला वाटत होती, त्यामुळे त्यांनी इतर 'प्रशिक्षित हत्तीं'चा वापर करून या हत्तींना वारंवार वनांकडे माघारी पाठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिव्हाल्डोला पकडून वनाच्या अगदी आतल्या भागात नेऊनही सोडलं.
पण रिव्हाल्डो 24 तास, 40 किलोमीटर अंतर चालत परत शहरात आला.
रिव्हाल्डो हत्ती सुमारे 15 वर्षं शहरात होता आणि मानवांसोबत जगणं जुळवून घेणाऱ्या पहिल्या काही हत्तींपैकी तो होता, असं थकाएकारा सांगतात.
वन्य प्राणी लोकांना मारतात
गेल्या आठ वर्षांमध्ये गुदलूर वनविभागात हत्तींनी 75 लोकांना मारलं आहे, पण यातील केवळ एका मृत्यूचा ठपका 'नागरीकरण झालेल्या हत्ती'वर ठेवण्यात आला.
हा हत्ती (जेम्स लॉरिस्टन) अजूनही लोकांसोबत राहतो. हा प्रकार जाणीवपूर्वक जीव घेण्याचा नव्हता, तर अपघाताना झालेला होता, असं लोक मानत असल्यामुळे हत्ती तिथेच राहिला, असं थेकाएकारा सांगतात.
"वन्य हत्तींकडून स्थानिकांना प्राण गमवावा लागला, तरी लोक गावात राहणाऱ्या हत्तींना इजा पोचवत नाहीत. हत्ती शांतताप्रिय असतात, हे लोक जाणतात."
भविष्यात हत्ती व मानव एकमेकांसह राहण्याची शक्यता वाढेल
भारतामध्ये सुमारे 27 हजार हत्ती आहेत, त्यातील अनेक संरक्षित वनांबाहेर राहतात.
प्राणी व मानव एकमेकांशी ज्या रितीने जुळवून घेत आहेत, ते पाहता या प्रजातींच्या जगण्याची शक्यता वाढेल, असं थेकाएकारा यांना वाटतं.
"प्रजाती विशिष्ट रितीने वागतात, असं जैवविज्ञानातील गृहितक आहे. पण आता हत्तींबद्दल जाणून घेण्यासाठी आपण व्यक्तिगत हत्तींचा अभ्यास करण्याची गरज आहे, आणि अशा अभ्यासाची सुरुवात झाली आहे."
ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या थेकाएकारा यांना आशा आहे की, त्यांच्या प्रकल्पामुळे त्रासदायक हत्ती ओळखण्याला आणि जतनाला मदत होईल.
अधिकाधिक वन्य हत्ती वनं सोडून लोकांसोबत राहायला येत असल्याचा आकृतिबंध अधिकाधिक दिसू लागला आहे, आणि हा प्रवाह सुरूच राहील, असं ते सांगतात.
"आता निवासी भागांमध्ये दोन माद्या व एक पिल्लू अशा तीन हत्तींचा कळप आमच्या इथे आहे. कर्त्या माता इतक्या शांत राहू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या पिल्लांची काळजी घ्यायची असते. पण मादा हत्तीही रस्त्याशेजारी शांतपणे राहात असल्याचं आपल्याला दिसतं."
सध्या या 'नागरी हत्तीं'नी अनेक स्थानिक लोकांची मनं जिंकली आहेत.
दुर्दैवाने, त्या अरुंद डोंगराळ वाटेत थेकाएकारा यांना सामोरा आलेला पहिला हत्ती- गणेशन उंचावरून खाली पडल्यामुळे जखमी होऊन मरण पावला.
वनविभागाने गणेशनचं शव दफन केलं. आठ वर्षं आपल्या सोबत राहिलेल्या या हत्तीबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्थानिक लोकांनी मरणोत्तर समारंभांचं आयोजन केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)