राकेश झुनझुनवाला 'आकासा' विमानसेवा का सुरू करत आहेत?

    • Author, आलोक जोशी
    • Role, ज्येष्ठ आर्थिक पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

शेअर बाजारातील सट्टेबाज अनेकदा एअरलाईन्सच्या शेअर्सवर लक्ष ठेवून असतात. कधी तेजी, तर कधी मंदीचे सौदे करत राहतात.

पण दीर्घकाळ पैसा गुंतवून मोठी कमाई करणाऱ्या किंवा मोठ्या प्रमाणात पैसा कमावण्यासाठी संयमानं पैसे गुंतवणाऱ्या या लोकांच्या जिभेवर एअरलाईन्समधील गुंतवणुकीचा विषय सहजासहजी येत नाहीत. त्यांच्यापैकी बहुतेक जणांचं म्हणणं असतं की, चांगल्या एअरलाईन्समध्ये प्रवास करा, त्याचा आनंद घ्या, पण त्यात पैसे गुंतवण्याची जोखीम पत्करू नका.

पण अशा परिस्थितीत भारताचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी कोणत्याही चालू एअरलाईन्समध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा नवीन एअरलाईन सुरू करत आहेत. ते का आणि कशासाठी?

भारताच्या अवकाशात रविवारपासून उडाण भरणाऱ्या या नवीन एअरलाईन्सचं नाव 'आकासा' आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्यासह किमान सहा संस्थापकांची नावं यात समोर आली आहेत. यात पहिलं नाव विनय दुबे यांचं आहे, जे जेट एअरवेज आणि गोएअरचे सीईओ राहिले आहेत. आकासा एअरची कल्पनाही त्यांचीच आहे आणि राकेश झुनझुनवाला यांना त्यात पैसे गुंतवण्यापासून ते बाकीच्यांना सहभागी करून घेण्याचं काम त्यांनीच केलं आहे.

विनय हेच आकासाचे सीईओही असतील. म्हणजेच एअरलाईन चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कंपनीच्या वेबसाइटवर त्यांच्यासह आणखी पाच सह-संस्थापकांची नावे आहेत. मात्र संस्थापकांच्या फोटोत एकूण नऊ चेहरे दिसत आहेत आणि यात राकेश झुनझुनवाला यांचा समावेश नाहीये.

पण यात जे सर्वांत महत्त्वाचे नाव आदित्य घोष यांचं आहे. इंडिगोला भारताची सर्वांत वेगानं वाढणारी आणि देशातील सर्वांत मोठी एअरलाईन बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.

बिग बुल राकेश झुनझुनवाला या जोखमीच्या व्यवसायात उतरण्यास तयार होण्यामागे कदाचित विनय आणि आदित्य यांची नावेही कारणीभूत असतील.

झुनझुनवाला यांना हवाई सेवा चालवताना येऊ घातलेल्या जोखीमीची किंवा तोट्याची कल्पना नाही, असं मानण्याचं कारण नाही. जगभरातील उदाहरणे सोडली तरी सरकारने एअर इंडियाची भारतातच 77 हजार कोटींच्या तोट्यातून कशी सुटका करून घेतली हे आपल्या सर्वांसमोर आहे. तसंच जेट एअरवेजचे नरेश गोयल आणि किंगफिशरच्या विजय मल्ल्या यांचीही अवस्था आपल्यासमोर आहे.

त्याआधीही सहारा, एनईपीसी, मोदीलुफ्त आणि यांसारखी अशी अनेक छोटी-मोठी नावेही आहेत.

जगभर विमान व्यवसायाची जी स्थिती दिसत आहे आणि मंदीची भीती पुन्हा-पुन्हा व्यक्त केली जात आहे, याची भीती झुनझुनवाला यांना वाटत नाही का? ज्या व्यवसायातून गेल्या अनेक वर्षांत कोणतीही चांगली बातमी आली नाही, अशा व्यवसायात ते उडी का घेत आहेत?

2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या स्थापनेनंतरची ही पहिली नवीन एअरलाईन आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा फोटो काही दिवासांपूर्वी व्हायरल झाला होता. मीडिया आणि सोशल मीडियात या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. त्या बैठकीनंतरच 'आकासा'ला सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाल्याची बातमीही आली होती.

'आकासा एअर'ची सुरुवातही धमाकेदार झालेली दिसून येत आहे. 400 कर्मचाऱ्यांसह सुरू होणाऱ्या या कंपनीत मार्चपर्यंत दर महिन्याला 200 कर्मचाऱ्यांसह दोन हजार इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कंपनीची तयारी आहे. मार्चपर्यंत कंपनीकडे 18 विमानांचा ताफा तयार असेल, असा दावाही केला जात आहे.

ही एक मोठी गोष्ट आहे, कारण इंडिगोला 18 विमाने तयार करण्यासाठी दीड वर्षं लागलं होतं, विस्तारा, एअरएशिया आणि स्पाईसजेटला तीन ते पाच वर्षे लागली होती. सध्या आकासा दोन बोईंग 737 MAX विमानांसह उड्डाणे सुरू करत आहे आणि भविष्यात कंपनीला पाच वर्षांत 72 विमानांचा ताफा उभा करायचा आहे.

ही कंपनी विनय दुबे आणि त्यांच्या दोन भावांनी सुरू केली होती. आता कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 31 टक्क्यांहून कमी झाली आहे. आता सर्वांत मोठे गुंतवणूकदार हे राकेश झुनझुनवालांचे कुटुंब आहेत. त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या ट्रस्टकडे कंपनीचे 45.97% शेअर्स आहेत.

राकेश झुनझुनवाला यांनी मोठा डाव खेळल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, "अनेक लोक विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना उत्तर देण्याऐवजी मला असे म्हणायचे आहे की मी अपयशासाठी तयार आहे. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करून अयशस्वी होणं कधीही चांगलं."

यात प्रश्नकर्त्यांचीही चूक नाही. राजकारण, नोकरशाही आणि व्यवस्थापनातील हस्तक्षेपामुळे एअर इंडिया बरबाद झाली असं म्हणता येईल. एअर सहाराचं सातत्यानं तोट्यात जाणं आणि जेट एअरवेजच्या हातानं विक्री होण्यामागे कंपनीला होणारा तोटा हेच कारण होतं.

2019 मध्ये जेट एअरवेज बंद पडण्यामागे सहाराला खरेदी करण्याचा करार हे एक कारण होतं, असा बहुतेक लोकांचा विश्वास आहे. किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून ओळखले जाणारे विजय माल्ल्या फरार असून विदेशात आश्रय घेत आहेत. यामागे मोठं कारण त्यांची किंगफिशर एअरलाईन्स बुडणं हेसुद्धा आहे.

पण नाण्याची दुसरी बाजू देखील आहे. विमान वाहतूक व्यवसायात जगातील सर्वाधिक कमाई करणारे गुंतवणूकदार देखील भारतीय आहेत. इंडिगोचे राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांच्याकडे 4 अब्ज डॉलरहून जास्त संपत्ती आहे, जी त्यांनी फक्त एअरलाइन्सच्या व्यवसायातून बनवली आहे.

इंडिगो ही भारतातील सर्वांत मोठी एअरलाईन आहे आणि सर्वांत जास्त नफा देखील कमावते.

कमीत कमी पैशात तिकीट, विमान विमानतळांवर उतरण्यापासून उड्डाण घेईपर्यंत लागणारा कमीत कमी वेळ आणि तिकीटाशिवाय सीटपासून नाश्त्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींवर कमाईची व्यवस्था, हे त्यांच्या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे. इंडिगो ही लो कॉस्ट एयरलाईन्स आहे. पण आजकाल तिचे कोणत्याही मार्गावरील भाडे सामान्यतः विस्तारासारख्या फुल सर्व्हिस एअरलाईन्सशी स्पर्धा करताना दिसत आहेत.

आता आकासाचा दावा आहे की ते ULCC किंवा अल्ट्रा लो कॉस्ट कॅरियर आहे. म्हणजेच स्वस्ताहून स्वस्त विमानसेवा देणारी कंपनी. भारतीय आकाश काबीज करण्याच्या लढाईत त्यांना स्वस्त प्रवास हे शस्त्र बनवायचं आहे, हे स्पष्ट आहे. सध्या भारत सरकार देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याला हवाई उड्डाणानं मार्गानं जोडण्याच्या मोहिमेत गुंतलं आहे. अशा परिस्थितीत आकासासाठीचं हवामान अनुकूल दिसत आहे.

दुसरीकडे, कोरोनाचा तडाखा बसल्यानंतर व्यापार, व्यवसाय आणि विमान प्रवासाला पुन्हा वेग आल्याचं दिसत आहे. त्यामुळे एकीकडे मंदीच्या भीतीने नवी विमानसेवा सुरू करणं ही अत्यंत जोखमीची बाब आहे, अशी शंका असली तरी नवीन विमान कंपनीसाठीची हीच वेळ आली आहे, जेव्हा आकाश निरभ्र होत आहे आणि पुढे हवामान स्वच्छ दिसत आहे.

दरम्यान, आकासाचा व्यवसाय कसा चालणार आणि आकासात पैसे गुंतवणाऱ्यांचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर मिळायला अजून वेळ आहे.

पण सध्यातरी स्वस्त तिकीट आणि आकासासोबतच्या विमान प्रवासासाठी भरघोस ऑफर्सचा भारतात पुन्हा एकदा पाऊस पडेल का, याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. इंडिगो आणि स्पाईसजेटने मार्केट काबीज करण्यासाठी अशीच पावलं उचलली होती.

आणि जर या स्पर्धेत आकासा, इंडिगो, स्पाईस आणि गो एअर यांचा सहभाग असेल, तर प्रवाशांनी आपल्याकडे पाठ फिरवू नये म्हणून फुल सर्व्हिस कंपन्या विस्तारा आणि एअर इंडिया काय करतील? असाही प्रश्न उभा ठाकेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)