टाटांनी 'एअर इंडिया'ची स्थापना कशी केली? सरकारनं ती ताब्यात का घेतली होती?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

15 ऑक्टोबर 1932. पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट आणि पांढऱ्या रंगाचीच पॅन्ट घातलेल्या एका सडपातळ बांध्याच्या व्यक्तीने कराचीच्या दिघ्र रोड विमानतळावरून पुस मॉथ विमानाच्या सहाय्याने मुंबईच्या दिशेने उड्डाण घेतलं होतं.

वेळ होती सकाळी 6 वाजून 35 मिनिटे. त्याच्या काही तासांनी म्हणजेच दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी ते विमान मुंबईच्या जुहू विमानतळावर उतरलं.

दरम्यान काही वेळ विमान अहमदाबादलाही थांबलं होतं. इथं बरमा शेलच्या चार गॅलन पेट्रोलच्या टाक्या बैलगाडीवर लादून आणलेल्या होत्या. हे पेट्रोल तिथं विमानात भरलं गेलं.

विमानातून सुमारे 27 किलो इतकं टपाल उतरवण्यात आलं.

हा एक ऐतिहासिक क्षण होता. कारण इथूनच भारतात सार्वजनिक विमान सेवेचे प्रारंभ झाला होता.

पहिल्या जंबो जेटचं स्वागत

इथून थोडं फास्ट फॉरवर्ड करूया...18 एप्रिल 1971. मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावर सकळा 8 वाजून 20 मिनिटांनी दिमाखदार बोईंग 747 कंपनीचं जंबो जेट उतरतं.

भारतीय वायू दलाची दोन मिग-21 विमाने त्यांच्यासोबत घेऊन येतात. 67 वर्षांचा एक व्यक्ती तिथं उपस्थित लोकांसमोर भाषण करतो.

हा व्यक्ती एअर इंडियाचा प्रमुख आहे. आपल्या ताफ्यात जंबो जेट विमानाचं स्वागत तो करत आहे.

या व्यक्तीसाठी हा मोठा क्षण आहे. कारण त्यानेच 1932 मध्ये पहिल्यांदा मुंबईत विमान उतरवलं होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे, जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा.

संपूर्ण जगभरात त्यांना JRD टाटा नावाने ओळखलं जातं. त्यांचे जवळचे मित्र त्यांना जेह म्हणून संबोधायचे.

ताज हॉटेलचा जन्म

टाटा हे आडनाव गुजराती शब्द 'टमटा' किंवा 'तिखट' या शब्दावरून आलं आहे, असं मानलं जातं.

याचा अर्थ होतो, खूपच मसालेदार किंवा रागीट अशा स्वरुपातला.

विशेष म्हणजे, टाटा घराण्यातील सर्वोच्च पदावरच्या व्यक्ती प्रामुख्याने आपल्या रागीट स्वभावासाठी ओळखली जात असत.

टाटा घराण्याचे संस्थापक आणि JRD टाटा यांचे काका जमशेदजी टाटा यांच्याबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध आहे.

त्यांचा एक इंग्रज मित्र आणि JRD मिळून मुंबईतील एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते.

पण हॉटेलच्या दरवानाने त्यांना अडवलं.

तो म्हणाला, "तुमच्या मित्राचं आम्ही स्वागत करतो. पण आम्ही तुम्हाला हॉटेलात जाण्यास देऊ शकत नाही. हे हॉटेल फक्त युरोपीय लोकांसाठीच आहे."

ते ऐकून जमशेदजी प्रचंड संतापले. त्यावेळीच त्यांनी ठरवलं की एक असं हॉटेल बनवायचं जी भारताची शान मानली जाईल. इथं जगभरातील पर्यटक राहण्यासाठी येतील. त्याच विचारातून 1903 मध्ये मुंबई बंदराच्या समोर ताज महल हॉटेलाचा जन्म झाला.

युरोपातून अमेरिकेला जाणारे प्रवासी जसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहून अमेरिका आल्याचं ओळखायचे तसं युरोपातून भारतात येणारे प्रवासी लांबूनच हॉटेल पाहून मुंबई जवळ आल्याचं ओळखू लागले होते.

पायलट परवाना मिळवणारे पहिले भारतीय

जेआरडी टाटा यांचे वडील RD टाटा जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू.

जेआरडी यांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांच्या घरात फ्रेंच भाषा बोलली जायची. जेआरडी यांना लहानपणापासूनच विमान उडवण्याबाबतचं स्वप्न होतं. पुढे विमान उडवण्यासाठीचा परवाना मिळवणारे जेआरडी टाटा पहिलेच भारतीय व्यक्ती ठरले.

जेआरडी यांच्या 'बियॉन्ड द लास्ट ब्लू माऊंटेन' या जीवनचरित्रात आर. एम. लाला लिहितात, "लंडन टाईम्सच्या 19 नोव्हेंबर 1929 रोजीच्या अंकात आगा खाँ यांनी एक जाहिरात छापली होती. जो भारतीय व्यक्ती इंग्लंड ते भारत किंवा भारत ते इंग्लंड एकट्याने विमानप्रवास करेल, त्याला 500 पाऊंड बक्षीस म्हणून मिळतील, असं आव्हान त्यांनी दिलं होतं.

हे आव्हान टाटा यांनी स्वीकारलं. पण त्यांना या शर्यतीत अस्पी इंजीनिअर यांनी हरवलं. हेच इंजीनिअर पुढे जाऊन भारताच्या वायू दलाचे प्रमुख बनले."

थेली यांची भेट

जेआरडी यांना वेगाने कार चालवण्याचाही छंद होता. याच कारणामुळे कदाचित त्यांची आपली भावी पत्नी थेली यांच्याशी भेट झाली.

त्या काळी जेआरडी यांच्याकडे निळ्या रंगाची बुगाती कार होती. त्या कारला मडगार्ड आणि छप्पर नसायचं.

एके दिवशी जेह यांचा पेडर रोडवर ही कार चालवताना अपघात झाला. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

त्यातून सुटण्यासाठी मुंबईतील नामवंत वकील जॅक विकाजी यांच्याकडे ते गेले. तिथं त्यांची बेट विकाजी यांची सुंदर पुतणी थेली यांच्याशी झाली. दोघांमध्ये प्रेम होऊन पुढे दोघेही विवाहबद्ध झाले.

बंगालचे गव्हर्नर जॅकसन यांना सुनावलं

जेआरडी आणि थेली आपल्या हनिमूनसाठी दार्जिलिंगला गेले होते, तेसुद्धा हिवाळ्याच्या दिवसांत. तिथून ते कारने परतत असताना त्याचवेळी बंगालचे गव्हर्नर सर स्टॅनली जॅकसन हेसुद्धा कारनेच कोलकात्याला परतत होते.

गव्हर्नर जॅकसन यांच्या वाहनांचा ताफा जाणार असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणामुळे टाटा यांची कार अडवली.

गिरीश कुबेर यांनी आपल्या 'टाटाज् : हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन' या पुस्तकात लिहिलंय,

त्या दिवशी थंडी खूप होती. तरीही जेआरडी यांची कार एका तासापेक्षा जास्त वेळ तिथं थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने याचा विरोध करण्याचा निर्णय घेतला.

गव्हर्नर जॅकसन यांची कार त्याठिकाणी येताच थेली त्याच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. कार थांबली. जेआरडी त्या कारच्या खिडकीजवळ जाऊन म्हणाले, 'तुम्ही स्वतःला काय समजता. इतक्या कडाक्याच्या थंडीत 500 लोकांना अडवून ठेवलं आहे. त्यात महिला आणि लहान मुलंही आहेत. यू डॅम फूल.'

दिलखुलास जेह

जेह यांची पत्नी थेली सुंदर होत्या. पण जेआरडी यांना नेहमीच इतर महिलांबाबत रस होता.

ते 80 वयाचे असतानाही एखादा सुंदर चेहरा आजूबाजूला दिसल्यास त्यांच्या डोळ्यात चमक यायची.

लोकप्रिय नेते मीनू मसानी यांचे पुत्र जरीर मसानी आपल्या 'अँड ऑल इज सेड मेमॉईर ऑफ द होम डिव्हायडेड' या आत्मकथेत लिहितात, "माझे आई-वडील टाटा दांपत्याच्या घराजवळच राहायचे. मीनू मसानी हे टाटा यांचे कार्यकारी सहायक म्हणून काम करायचे. जेआरडी यांचं वैवाहिक जीवन सुखद असं नव्हतं. ते पत्नी थेली यांच्याप्रति एकनिष्ठ नव्हते. JRD यांच्या फ्रेंच व्यक्तिमत्वामुळे तसंच बोलण्याच्या शैलीने प्रभावित होऊन अनेक महिला त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या. नंतर मला कळलं की माझी आईही त्यांच्यापैकीच एक होती."

असं असूनही जेआरडी यांनी कधीच आपल्या पत्नीला सोडून देण्याचा विचार केला नाही.

सुमंत मुळगावकर होते सर्वात जवळचे

34 व्या वर्षीच जेह यांच्याकडे टाटा समुहाची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. जेआरडी यांनी एकापेक्षा एक उत्कृष्ट लोकांची एक टीम बनवली.

जेडी चौकसी, नेहरु मंत्रिमंडळात मंत्री असलेले जॉन मथाई, सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला, रुसी मोदी आणि सुमंत मुळगावकर यांचा त्यामध्ये समावेश होतो.

मुळगावकर हे टाटा यांच्या सर्वात जवळचे होते. त्यांना कुणीच काही प्रतिप्रश्न करत नसत.

इतकंच नव्हे तर टाटा कंपनीच्या सुमो या मॉडेलचं नावसुद्धा त्यांच्याच नावाच्या पहिल्या दोन अक्षरांवरून ठेवण्यात आलं आहे. पण ते नाव जपानी मल्लांच्या नावाने दिलं असल्याचा गैरसमज लोकांना अजूनही आहे.

टाटांच्या नम्रपणा आणि साधेपणाचे असंख्य किस्से

आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे जेआरडी टाटांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगतात.

सुधा मूर्ती यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधून पदवी मिळवल्यानंतर टाटांच्या टेल्को कंपनीची जाहिरात पाहिली. त्यात लिहिलं होतं की, या पदासाठी केवळ पुरुष इंजिनिअरनीच अर्ज करावा.

सुधा मूर्तींनी तातडीने जेआरडी टाटांना पोस्टकार्ड लिहिलं आणि त्या जाहिरातीबद्दल नाराजी व्यक्त करत, कंपनीला प्रतिगामी म्हटलं.

जेआरडी टाटांनी सुधा मूर्तींच्या पोस्टकार्डची दखल घेत, हस्तक्षेप केला आणि केवळ सुधा मूर्तींना मुलाखतीसाठी बोलावलं नाही, तर टाटा शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्या पहिला महिला इंजिनिअर म्हणून नेमणूकही केली.

आठ वर्षांनंतर एक दिवस सुधा मूर्ती बॉम्बे हाऊसच्या पायऱ्यांवर जेआरडी टाटांना भेटल्या. तिथं त्या एकट्याच होत्या. सुधा मूर्तींचे पती नारायण मूर्ती त्यांना नेण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे जेआरडी टाटा तिथंच उभे राहून जोवर नारायण मूर्ती तिथे आले नाहीत, तोवर सुधा मूर्तींशी गप्पा मारत राहिले.

जेआरडी टाटांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सुधा मूर्ती आजही त्यांचा फोटो आपल्या कार्यालयात लावला आहे. टाटांच्या नम्र आणि साधेपणाच्या स्वभावाचे असे असंख्य किस्से अनेकजण आवर्जून आठवतात.

हरीश भट्ट हे त्यांच्या 'टाटा लोग' या पुस्तकात लिहितात, "अनेकदा कार्यालयात जाताना, रस्त्यात बस स्टॉपवर बसची वाट पाहणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना ते लिफ्ट देत असत. सुरुवातीच्या दिवसात तर ते कार थांबवून, बस स्टॉपवरील लोकांना विचारत असत की, मी तुम्हाला पुढे कुठे सोडू शकतो का? त्यावेळी ते तितकेसे प्रसिद्ध नव्हते."

भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे पैसे नाहीत..

आजही कुणा श्रीमंत व्यक्तीची तुलना करायची झाल्यास टाटा-बिर्लांशी केली जाते. मात्र, फार कमी लोकांना माहित आहे की, टाटा स्वत:कडे फार कमी पैसे ठेवत.

प्रसिद्ध पत्रकार कूमी कपूर 'द इंटिमेट हिस्ट्री ऑफ पारसीज' या पुस्तकात डी. पी. धरचे पुत्र आणि नस्ली वाडियांचे जवळचे मित्र विजय धर यांना सांगतात की, 'जेआरडींच्या पत्नी प्रचंड आजारी होत्या, त्यावेळी त्यांनी नस्ली वाडियांना सल्ला दिला की, आपण जेआरडी, थेली यांच्यासाठी व्हीडिओ प्लेयर खरेदी करून देऊ, जेणेकरून त्या बसल्या बसल्या सिनेमे पाहू शकतील. तर नस्ली वाडियांनी सांगितलं की, जेआरडी कधीच व्हीसीआर खरेदी करणार नाहीत. कारण त्यांच्याकडे तितके पैसेच नसतात. किंबहुना, ते भेट म्हणूनही स्वीकारणार नाहीतच, तसंच ते त्याचा बिल स्वत: अध्यक्ष असलेल्या कंपन्यांनाही पाठवणार नाहीत.'

विजय धर यांचं इथपर्यंत म्हणणं होतं की, जेआरडी हे इतके साधे राहायचे की, स्वत:चे कपडेही स्वत:च धुवायचे. मात्र, ही गोष्ट त्यांनी जेव्हा इंदिरा गांधींना सांगितली, तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही.

एअर इंडियाच्या लहानातल्या लहान कामातही रस

भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेआरडी टाटांनी भारतासाठी मोठमोठे स्वप्न पाहिले.

सामाजिक दृष्टीने ते नेहरू-गांधी कुटुबांच्या जवळचे होते. मात्र, त्यांच्या समाजवादी आर्थिक मॉडेलबाबत त्यांना आक्षेप होता.

ऑगस्ट 1953 मध्ये नेहरू सरकारनं सर्व खासगी हवाई वाहतूक कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यानुसार एअर इंडिया इंटरनॅशनल आणि इंडियन एअरलाईनस यांचं विलिनीकरण झालं.

जेआरडींना यामुळे मोठा धक्का बसला. मात्र, त्यांनाच एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. एअर इंडियाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी एअर लाईन्सच्या कामात इतका रस घेतला की, विमानातील खिडक्यांचे पडदेही तेच निवडत असत.

गिरीश कुबेर लिहितात, "एकदा त्यांनी एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. सी. बखले यांना पत्र लिहिलं होतं की, तुम्ही जेवणात अधिक अल्कोहोल असणारी बिअर देता त्यामुळे पोट जड होतं. त्यामुळे हलकी बिअर देत जा. मी पाहिलंय की, आपल्या विमानांमधील खुर्च्या सहजपणे मागे सरकत नाहीत. कृपया, त्या ठीक करून घ्या. आणि हेही पाहा की, जेवणाचं वाटप करताना विमानातील सर्व लाईट्स सुरू असतील, जेणेकरून कटलरी त्या प्रकाशात चमकतील."

एअर इंडियाची वेळेबाबत खात्री

जेआरडींना माहित होतं की, पैसे खर्च करण्यात ते परदेशी एअरलाईन्स कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा जोर सेवा आणि वेळेवर असे. याबाबतचा एक रंजक किस्सा एअर इंडियाचे प्रादेशिक संचालक राहिलेले नारी दस्तूर सांगतात.

"त्या काळात दिवसा 11 वाजता एअर इंडियाचं फ्लाईट जिनिव्हात उतरायचं. एकदा मी स्विस व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला वेळ विचारताना ऐकलं. त्या व्यक्तीने खिडकीतून बाहेर पाहून सांगितलं की, 11 वाजले आहेत. पहिल्या व्यक्तीने विचारलं, घड्याळाकडे न पाहता तुम्हाला वेळ कसा कळला? उत्तरात त्या व्यक्तीनं म्हटलं, एअर इंडियाच्या विमानानं आताच लँड केलंय."

मोरारजींनी अपमानित करून जेआरडींना एअर इंडियातून काढलं...

इंदिरा गांधींच्या लग्नासाठी जवाहरलाल नेहरूंनी जेआरडी आणि त्यांच्या पत्नीला अलाहाबादला निमंत्रित केलं होतं. सुरुवातीला इंदिरा गांधींनाही ते आवडत असत. मात्र, नंतर समाजवादाकडे त्या वळत गेल्या, तसतसं त्यांच्यात आणि इंदिरा गांधींमध्ये अंतर वाढत गेलं.

नंतर जेव्हा कधी जेआरडी टाटा त्यांना भेटायला जात असत, तेव्हा त्या खिडकीबाहेर पाहत किंवा आपले पत्र उघडून पाहत. इंदिरा गांधींशी त्यांचे वैचारिक मतभेद होते, मात्र त्यांनी कायमच त्यांना एअर इंडियाशी जोडून ठेवलं.

इंदिरा गांधींनंतर पंतप्रधानपदी आलेल्या मोरारजी देसाई यांनी जेआरडी टाटांना एअर इंडियातून काढलं. टाटांना याची कुठलीही पूर्वसूचना मोरारजींनी दिली नव्हती.

एवढंच नव्हे, तर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मोरारजी देसाई हे जेआरडींना पन्नासच्या दशकापासूनच पसंत करत नव्हते.

एकदा जेआरडी टाटा मोरारजी देसाई यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा मोरारजी तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. जेआरडींसोबत तेव्हा टाटा इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होमी मोदीही होते.

टाटा आणि मोदी दोघांचंही म्हणणं होतं की, आगामी काळात विजेची मागणी वाढताना दिसेल. त्यामुळे आपल्याला विजेची क्षमता आणखी वाढवायला हवी. मोरारजी देसाईंनी त्या दोघांचं म्हणणं तोडत, दुसऱ्या विषयावर बोलण्यास सुरुवात केली.

हे पाहून जेआरडी टाटा त्यांच्या खुर्चीवरून लगेच उठले आणि मोरारजी देसाईंना म्हणाले, "ही बैठक पुढे चालू ठेवून तुमचा (मोरारजी देसाई) वेळ वाया घालवू इच्छित नाहीय."

टाटांचा संताप पाहून मोरारजींनी त्यांना बसायला सांगितलं आणि त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकलं. मात्र, त्या दिवसापासून मोरारजी आणि जेआरडी टाटा यांच्यातल्या संबंधात बिघाड झालीच.

नैतिक मूल्यांना कायमच प्रोत्साहन दिलं...

जेआरडी टाटांचे चरित्रकार आर. एम. लाला यांनी त्यांना एकदा विचारलं की, भारताच्या आर्थिक क्षेत्रात तुमचं योगदान काय आहे? तर उत्तरात जेआरडी टाटांनी सांगितलं की, "मला नाही वाटत की, भारताच्या अर्थव्यवस्थेत मी नैतिक मूल्य वगळता काही विशेष योगदान दिलंय. मला वाटतं की, नैतिक जीवन आर्थिक जीवनाचा भाग आहे."

प्रसिद्ध पत्रकार टी. एन. नाइनेन सांगतात की, टाटा समूहने अपवादात्मक वेळी मूल्यांशी तडजोड केली असेल. कारण भारताच्या वर्तमान कायद्यांमध्ये राहून नम्रपणे काम करणं सोपी गोष्ट नाही.मात्र, व्यापक स्तरावर पाहिल्यास टाटांनी नैतिक मूल्यांना सोडून कधीच काम केलं नाही.

वारसदाराची ओढ

टाटांना आयुष्यभर आपली पुस्तकं, कविता, फुलं आणि पेंटिंग्ज यांच्याबाबत प्रेम राहिलं. इतिहास विषयात त्यांना रस होता. विशेषत: ग्रीक, रोमन आणि नेपोलियनसह फ्रेंच इतिहासात.

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांच्यासोबत त्यांची जवळची मैत्री होती. दोघेही एकमेकांना पत्र लिहायचे.

जेआरडी टाटांबाबत त्यांनी लिहिलं होतं की, "मी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक लोकांशी चर्चा केल्या, बोललो, मात्र जेआरडी टाटांसारख्या व्यक्ती कमी भेटल्या."

एकेकाळी फ्रान्सचे राष्ट्रपती राहिलेल्या जाक शिराक हेही जेआरडी टाटांना आपले जवळचे मित्र मानायचे. अनेक वैयक्तिक गोष्टींमध्ये जेआरडींचा ते सल्लाही घ्यायचे.

जेआरडी टाटांची स्मृती अफाट होती. त्यांना अपत्य नव्हतं.

गिरीश कुबेर लिहितात, "एकदा त्यांना विचारलं गेलं की, तुम्हाला कधी वारसदाराची कमी भासली नाही? तुमच्यानंतर तुमचा हा वारसा पुढे कोण नेईल? त्यावर जेआरडी म्हणाले, मी मुलांवर प्रेम करतो. मात्र, मी कुणालाच कधी आपल्या वारसदाराच्या रुपानं पाहिलं नाही."

दोन राष्ट्रांकडून सर्वोच्च सन्मान

जेआरडी टाटांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या 'भारतरत्न'ने गौरवण्यात आलं. तसंच, फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या 'लिजन ऑफ ऑनर'नेही गौरवण्यात आलं.

जेव्हा रतन टाटांनी जेआरडींना सांगितलं की, तुम्हाला 'भारतरत्न' जाहीर झाला आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं की, "ओह माय गॉड! मलाच का? हे थांबवण्यासाठी आपण काही करू शकत नाही का? हे खरंय की, मी काही चांगली कामं केली आहेत. देशातील नागरिकांना उड्डाण दिलं. त्याचं औद्योगिक उत्पादन वाढवलं. बट सो व्हॉट? हे तर कुणीही आपल्या देशासाठी करतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)