TATA-Air India: एअर इंडियाची मालकी अधिकृतरित्या टाटाकडे, मालकीहक्कांचं हस्तांतरण पूर्ण

एअर इंडियाची मालकी आता अधिकृतरित्या टाटा कंपनीकडे गेली आहे. यासंदर्भात मालकी हक्कांचं हस्तांतरण पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्यावर्षी 8 ऑक्टोबर रोजीच टाटा समूहाने 18 हजार कोटींच्या बोलीत एअर इंडियाला खरेदी केली. 2700 कोटी रुपये रोख रक्कम आणि 15300 कोटी रुपयांचा कर्ज आपल्या डोक्यावर घेत टाटानं एअर इंडियाला आपल्या ताब्यात घेतली.

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीचा मालकी हक्क आता टाटा सन्सकडे असणार आहे.

भारत सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात जाहीर केलेला लिलाव टाटा सन्सने जिंकला, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली होती.

एअर इंडिया ही कंपनी पूर्वी टाटाच्याच मालकीची होती. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने ही कंपनी अखत्यारित केली होती. पण आता टाटाने या कंपनीच्या विक्रीसंदर्भातला लिलाव जिंकला.

त्यामुळे तब्बल 59 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे गेली आहे.

'वेलकम बॅक, एअर इंडिया'

जेव्हा टाटाने हा लिलाव जिंकला तेव्हा रतन टाटांनी आनंद व्यक्त केला होता.

उद्योगपती रतन टाटा यांनी एअर इंडियाची मालकी टाटा समूहाला मिळाल्यानंतर ट्वीट करून आनंद व्यक्त केला. 'वेलकम बॅक, एअर इंडिया' म्हणत रतन टाटांनी जे आर डी टाटांचा फोटो आणि त्यासोबत काही आठवणी लिहिल्या आहेत.

एअर इंडियाकडे एकूण 146 विमानं असून एकूण ताफ्याच्या 56% विमानं कंपनीच्या मालकीची आहेत.

याशिवाय कंपनीकडे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवरच्या मोक्याच्या लँडिंग आणि पार्किंगच्या जागा आहेत. पण अधिक किफायतशीर विमान कंपन्या आल्यानंतर गेल्या दशकभरामध्ये कंपनीचा बाजारपेठेतील दबदबा कमी झाला.

एव्हिएशन फ्युएल म्हणजेच विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या वाढलेल्या किंमती, एअरपोर्ट वापरासाठीचे वाढलेले दर, लो-कॉस्ट विमान कंपन्यांकडून होणारी स्पर्धा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं घसरलेलं मूल्य आणि खराब आर्थिक कामगिरीमुळे वाढलेल्या कर्जावरील व्याजाचा डोलारा या सगळ्याचा परिणाम एअर इंडियावर झाला.

एअर इंडियाकडे एकूण 146 विमानं असून एकूण ताफ्याच्या 56% विमानं कंपनीच्या मालकीची आहेत. याशिवाय कंपनीकडे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवरच्या मोक्याच्या लँडिंग आणि पार्किंगच्या जागा आहेत. पण अधिक किफायतशीर विमान कंपन्या आल्यानंतर गेल्या दशकभरामध्ये कंपनीचा बाजारपेठेतील दबदबा कमी झाला.

एअर इंडियामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला त्यासोबत कंपनीवरचं कर्जंही काही प्रमाणात स्वीकारावं लागेल. याविषयी बोलताना SBICAP सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्च प्रमुख महंतेश सबारद बीबीसीशी बोलताना म्हणाले होते की, "कर्जाचं प्रमाण मोठं असल्याने हे एक आव्हान ठरू शकतं. कारण जवळपास 70 विमानांसाठी त्यांना पुढची 8 ते 10 वर्षं परतफेड करावी लागणार आहे. शिवाय कंपनी विकत घेणाऱ्यांना यामध्ये भरपूर पैसा ओतावा लागेल. म्हणूनच ही कंपनी घेणाऱ्यासाठी सुरुवातीला खूप खर्च असेल."

याशिवाय एअर इंडियाच्या 14,000 पेक्षा जास्त लोकांचा ताफा सांभाळणंही आव्हान ठरणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)